स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow आमचा रणजितभाई (भाग ६)
आमचा रणजितभाई (भाग ६)
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   

बस चालली होती. मनात येत होते, रणजित बालपणीच मातृसुखाला आचवला. तरूणपणातही नियतीने दुःखाचे कडवट अनुभव दिले पण तरीही त्याचे मन बधीर, कडवट झाले नाही. उलट इतरांच्या दुःखावर फुंकर घालणारे, कोमल, स्निग्ध असेच ते राहिले. निसर्गात वा मानवी जीवनात जिथे जिथे ध्येयभारलेपण, उदात्तता, भव्यता, सौंदर्य ही याला दिसली तिथे तिथे हा विनम्र झाला. व्यथा वेदना पाहिली की उदास होतो. व्याकुळ अंतर्मुख बनतो. त्याची करुणा-अनुकंपा बुद्धी उचंबळून येते, त्याच्या साहित्यातला ’राधेय’ असो ’मनु’ असो की देवा तुका-मुक्तासारखे दुर्दैवी जीव असोत, मूकपणे दुःखे सोसणार्‍यांबद्दल याचे मन फार हळुवार आहे. त्याच्या मनातल्या या माणुसकीच्या गहिवराने त्याच्या साहित्यविश्वाला एक वेगळीच उंची आणि मोल लाभले आहे. ती. भाऊसाहेब खांडेकरांनी याच्यावर पुत्रवत्‌ माया का केली असेल आणि प्रसंगी त्यांची पादत्राणेही या शिष्योत्तमाने हाताने का उचलली असतील याचे उत्तर दोघांच्या मनःप्रवृत्तीतल्या सारखेपणात सापडेल. जीवनात सत्‌तत्वांची पूजा बांधावी, अनेक प्रकारच्या दुःखांनी गांजलेल्या आपल्या समाजाला धीर-आधार द्यावा, आपल्या हातात पणती असो की दिवा त्या दुर्दैवी जीवांच्या मनाजीवनात प्रकाश आणावा, त्यांच्यावर सुसंस्कार करावेत याचीच दोघांना ही तळमळ. असा आमचा हा रणजित! ’अहंकाराचा वारा न लागो माझिया चित्ता’ असे अंतःकरणापासून म्हणणारा, तसे वागणाराही. पण तो ज्यांना मानतो अशा त्याच्या श्रद्धास्थानांवर, त्याला जे विश्वस्त मानतात अशांवर किंवा त्याच्या स्वतःवरही कोणी अन्याय करू लागले की आपल्या सर्व शक्तिबुद्धींसह तो ठामपणे प्रतिकाराला सिद्ध होतो. आपली अस्मिता जागरूकपणे जपतो.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color