स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow आमचा रणजितभाई (भाग ५)
आमचा रणजितभाई (भाग ५)
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   

कोवाड खेडे खरेच पण फ्रीज-रेडिओपासून टेलिफोन-फर्निचरपर्यंत सर्व आधुनिक सोयी रणजितच्या घरात आहेत. अद्ययावत्‌ ध्वनिमुद्रिकांचा खूप मोठा संच आहे. पाहुणा आला की लवकर परत जाण्याची गोष्ट काढणे जरा अवघडच. सामान्य शेतकर्‍यापासून दूरदूरच्या मित्रमंडळींपर्यंत सारी इथे येतात ती या वास्तूच्या अन्‌ तिथे राहणार्‍या देसाई दांपत्याच्या ओढीने. रणजितचा जन्म पूज्य शिवछत्रपतींच्या जवळच्या आप्त संबंधातल्या कुटुंबात झालेला. सर्व प्रकारची संपन्नता हात जोडून समोर उभी असलेल्या वातावरणात याचे बालपण गेलेले. असे असूनही त्याच्या वागण्यात एक पारदर्शक साधेपण आहे, आत्मीयता नि राजसपण आहे. या खानदानाला भडकपणा, भपका-डामडौल वर्ज्य आहे. कोवाडकर जनतेचे व रयतेचे हे ’सरकार’ आहेत. इथल्या सर्व सत्कार्याला या ’सरकार’चे उदंड आशीर्वाद आणि आधार असायचाच. मग ती माधवीवहिनींची चालवलेली ’बालवाडी’ असो की गावाचे वाचनालय. गावकर्‍यांशी त्याचे नाते आहे ते वत्सल कुटुंबप्रमुखाचे आहे. याच्या वाड्यापासून थोड्या अंतरावर रणजितची जमीन शेतीवाडी आहे. तिथली त्याची बंगली आणि त्यालगतचे छानदार देऊळ ही एखाद्या भावकवितेसारखी मनात रेंगाळत राहतात. काजू-आंब्यांच्या झाडाशेजारच्याच शेतात रणजित, नरहर कुरुंदकर, माधवीवहिनी आणि मी यांनी दोन वर्षापूर्वीच एक संध्याकाळ किती मजेत घालवली होती. ते दोघे साहित्यातले महारथी! आणि जिवाभावाचे मित्रही. निकोप-अवखळ मनांनी ते एकमेकांना कोपरखळ्या देत होते, वादसंवादही करीत होते. ते पाहणे-ऎकणे हाही आम्हा दोघींना मोठा सुखद अनुभव वाटत होता. कितीतरी दिवस चिंतनाला पुरेल एवढे खाद्य त्यातून लाभत होते. ती संध्याकाळ आठवली म्हणजे आजही चित्त गलबलून येते. दोन दिवस तिथे भर्रर्रदिशी गेले. आम्ही निघालो तसा रणजित जवळ येऊन मला म्हणाला, "हे बघ, हे तुझ्या भावाचे हक्काचे घर आहे मनात येईल तेव्हा इथे यायचे नि रुचेल तेवढे रहायचे, काऽय?" आणि पाठीवर दिन धपके घातलेन्‌. माधवीवहिनींनी कुंकू लावून इंदुरी साडी हातात ठेवली, "कशी आवडली ते कळवा हं" म्हणाल्या. वाड्याच्या पायर्‍या उतरताना माझी पावले जड झाली होती.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color