स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow आमचा रणजितभाई (भाग ४)
आमचा रणजितभाई (भाग ४)
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   

कोवाडची त्याची राहण्याची वास्तू म्हणजे एक नमुनेदार सुंदर ’कला भुवन’च आहे. बाकी एरवी ते गाव, भारतातल्या इतर खेड्यांसारखेच. पण गाव ओलांडून तुम्ही त्याच्या घराच्या अंगणात पाऊल टाकलेत की तिथली रंगीबेरंगी देशीविदेशी फुले आणि झाडे. पक्ष्यांचा किलबिलाटही कानावर येईल. पोपटांचे दोन तीन पिंजरे माडीवर हलताना दिसतील, ’रॉबर्ट’ नावाचा बदकासारखा पण खूप मोठा राखी-गुलाबी रंगाचा पक्षी ’क्वॅक क्वॅक’ करीत दाणे टिपताना दिसेल. बर्फासारखी पांढरीशुभ्र लुसलुशीत अंगाची कुत्रीही त्यांच्या आस्तित्वाची जाणीव करून देतील आणि त्यांच्या पाठोपाठच ’या हो’, ’या ना’ म्हणत स्वागत करतील आमच्या माधवीवहिनी. सावळ्या रंगाच्या, रेखीव, शिडशिडीत बांध्याच्या, उंच, डोक्यावरून पदर घेतलेल्या आणि सदैव प्रसन्न अशा. तेवढ्यात ’कल्लू’ किंवा ’पुंडलिक’ तुमचे सामान अदबीने पुढे येऊन घेतील. हातपाय धुवून याल तोवर चहाफराळाचा सरंजाम टेबलावर टापटिपीने मांडलेला दिसेल. ’रणजित’ची भेट इथे होईल किंवा त्याच्या प्रशस्त शोभिवंत दिवाणखान्यात. तिथली बैठक पूर्णपणे भारतीय. तक्क्या, लोड, गालिचा आणि विविध आकर्षक कलात्मक वस्तूंनी थाटलेली. अर्ध्या बाह्यांचा शर्ट, लुंगी अशा साध्या पोषाखात रणजित तेथे कुण्या नवोदित लेखकाला मार्गदर्शन करताना किंवा एखाद्या लेखक प्रकाशकाशी दिलखुलास गप्पा करताना आढळेल. तोंडात विड्याचे पान रंगलेले आणि हाताजवळ अखंड पानाचा चांदीचा डबा संगतीला. जवळच्या खोलीत कुठे भाऊसाहेब खांडेकर, लताबाई अशा मान्यवरांची तर कुठे त्यांच्या जीवनातील मौलिक क्षणाची स्मृती जपणारी आप्त सुहृदांसमवेत काढलेली सुरेख छायाचित्रे दिसतील. नामवंत छायाचित्रकारांची देखणी लॅंडस्केप्स आणि पोर्ट्रेटस देवघरात व जवळही लावलेली आहेत. शिसवीचा केवढा थोरला देव्हारा आहे, पूजा अर्चेनंतर तिथे दरवळणारा गंध सारे वातावरण आणि मन प्रसन्न करतो. दिवाणखान्यातल्या कपाटातून पुस्तकेच पुस्तके दाटीवाटीने उभी आहेत. नवे-जुने, इंग्रजी-मराठी सार्‍यांची तिथे दिलखुलास पंगत आहे. किती वाचावे, काय काय पहावे असे होऊन जाते. बाजुच्याच कपाटात वाद्यांचा सरंजाम आज्ञाधारकपणे उभा आहे. गच्चीलगतची खोली-चिमुकली आटोपशीर-ही रणजीतची खास लेखनसाधनेची जागा. छोटेसे मेज, खुर्ची, निवडक पुस्तके आणि लेखनसाहित्य. बस्स! एक मात्र लक्षात ठेवायचे या घरात कुठेही वावरताना सुंदर सुंदर कलाकृतींची भेट हा कॉमन फॅक्टर म्हणून असतो. या खोलीत बसूनच रणजितने ’स्वामी’, ’श्रीमान योगी’ ही मराठी भाषेची अलोलकीची लेणी निर्माण केली असतील या जाणीवेने मनावरून आनंदाभिमानाची लकेर चमकून जाते. गच्चीवरून पाहिले की दूर क्षितिजापर्यंत हिरवीगार शेते, लहानशी घरे असे हृदयंगम दृश्य दिसते. येणार्‍या पाहुण्याला रणजित स्वतः जातीने हे सारे हिंडवून दाखवणार. मलाही त्याने ते तसे दाखविले आणि नंतर एका खोलीतले भले थोरले कपाट उघडून त्यातून एक पेटी काढली. काय होते म्हणाल त्यात? तर निरनिराळी सुंदर फाऊंटनपेन्स. ती हातात घेऊन तो सागू लागला,"मालू, या पेनने मी ’स्वामी’ लिहिली, याने ’श्रीमान योगी’ ...माझे लक्ष पेनएवढेच त्याच्या चेहर्‍याकडेही होते. त्याचे डोळे एक प्रकारच्या आंतरिक समाधानाने भरून आल्यासारखे मला वाटले. ती पेने म्हणजे त्याच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची साहाय्यक साक्षीदार होती. त्यांची जपणूक त्याने अशी हळुवारपणे करावी हे स्वाभाविकच होते. त्याला लाभलेली अनेक सन्मानचिन्हेही मी तिथे पाहिली. आणि कितीतरी उंची अत्तरांच्या नाजुक कुप्याही. पलिकडच्या खोलीत ज्ञानेश्वरांची विलक्षण मनोहारी मूर्ती बसवलेली दिसली. मी स्वतःशीच म्हटले या सार्‍या वास्तूत शालीन सौंदर्य आणि चोखंदळ अभिरुची यांचा केवढा मनोज्ञ संगम झालाय.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color