स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow आमचा रणजितभाई (भाग ३)
आमचा रणजितभाई (भाग ३)
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   
काही वर्षापूर्वी घडलेला एक प्रसंग सांगते. आमच्या ’विलिंग्डन’ महाविद्यालयात आम्ही रणजितच्या व्याख्यानाचा कार्यक्रम योजिला होता. त्याच्या व्याख्यानाला आमच्या विश्रामबाग परिसरतील इतर विद्यार्थ्यांचीही गर्दी होणार हे ओळखून आम्ही सर्वात मोठ्या सभागृहात व्याख्यानाची व्यवस्था केली होती. अकस्मात आमच्या कानावर बातमी आली ती बॅ. नाथ पै यांच्या निधनाची. अशा परिस्थितीत कार्यक्रम कसा पार पडणार याबाद्दल आम्ही साशंक झालो. पण रणजित व्याख्यानाला वेळेवर आला. बॅ. नाथ पै सारख्या उमद्या व तेजस्वी नेत्याच्या आणि सन्मित्राच्या वियोगाने आणि त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन त्याला श्रद्धांजली वाहून आल्यामुळे रणजित मनाने तसेच शरीरानेही फार थकला होता. ते त्याच्या सार्‍या हालचालीतून सहज ध्यानात येत होते. व्याख्यान संपल्यावर रात्री कितीतरी उशीरपर्यंत तो आम्हा प्राध्यापक मंडळींशी व्यथित मनाने नाथ पैंच्याबद्दलच बोलत होता. त्यांच्या जाण्याने रणजितच्या मनात केवढी पोकळी निर्माण झाली होती ते त्यावरून जाणवत होते. आम्हाला दिलेला शब्द पाळण्यासाठी, कर्तव्यबुद्धीने तो आला यामुळे कृतज्ञतेने आमची मने नम्र झाली होती.

आमच्या वसतिगृहातल्या मुलींची सहल, अशीच एकदा गोकाक-घटप्रभा इकडे गेली होती. मुक्काम होता घटप्रभेच्या ’कर्नाटक आरोग्यधामा’त! कोणातरी आप्तांना घेऊन रणजितही त्या दिवशी तिथेच आला होता. ती कुणकुण आमच्या कन्यकांना कुठून लागली देव जाणे! त्यांनी लावला माझ्यामागे लकडा, "बाई, आम्हाला त्यांना पहायचे आहे, त्यांचा ऑटोग्राफही घ्यायचाय, त्यांची पुस्तके आम्हाला फार आवडतात, तुम्ही सांगा की बाई, आमच्यावतीने, त्यांना इकडे यायला." मलाही कन्यांचे मन मोडवेना. रणजितला भेटून मी विनंती केली. थोड्याच वेळात तो आला. हसत खेळत एक छोटेसे भाषणही त्याने आमच्या मुलींपुढे केले. त्या भाषणात वा नंतरच्या गप्पाटप्पात नव्हती कसली सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणून बढाई की नव्हता कसला रूक्ष उपदेश! होता अंतःस्फूर्त ओलावा, संस्कारक्षम मनाची यथोचित जाणीव आणि ती मने उमलविण्या-फुलविण्याची प्रांजळ तळमळ.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color