स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow आमचा रणजितभाई (भाग २)
आमचा रणजितभाई (भाग २)
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   

आपल्या जिव्हाळ्याच्या आप्त सुहृदांवर लोभाचा वर्षाव करण्यात हा जेवढा उदार-सढळ आणि तत्पर आहे ना, तेवढाच पत्रलेखनात चालढकल करण्यात पटाईत आहे. प्रतिवर्षी मी याला नारळी पौर्णिमेला राखी धाडते पण तिची पोंच येते ती बहुधा माधवीवहिनींच्या पत्रातून, त्यांच्या वाटोळ्या, सुंदर अक्षरात. काही दिवस याच्या पत्राची वाट पाहून चिडून-भांडून मी याला दुसरे पत्र लिहिते. त्याचे उत्तर रणजित स्वतः लिहितो-तुलनेने जरा कमी उशीर करून, तेही पाच-सात ओळींचे. अनेक मोठ्या माणसांचे अक्षर असते तसेच याचेही आहे. याउप्परही माझ्या रागाची उकळी उरलीच तर ती थंडावते याच्या चातुर्याने. म्हणजे असे की मग हा काय करतो, या पत्रव्यवहारानंतर जेव्हा केव्हा याची सांगली-मिरजेकडे फेरी होते (ती तास-दोन तासापुरतीच का असेना) तेव्हा आवर्जून हा माझ्या ‘पर्णकुटी’त येऊन जातो. ती भेट असते धावतीच. माझी स्वाभाविक इच्छा असते, याने एखाद्या दिवशी तरी आपल्या घरी रहाय-उतरायला वेळ घेऊन यावे, आपल्या हाताने केलेला त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ याला आपण खाऊ घालावा. तसे मी म्हटले म्हणजे हा काय म्हणतो, सांगू? म्हणतो, एखादा पदार्थ सुरीने कापत असल्याचा अभिनय करीत- "हे असले काही येते आहे का तुला करायला? छेः मग काय तुझ्याकडे जेवून उपयोग?" त्यावर नाक फेंदारून मी उत्तर देते, "ते कापाकापीचे खा तू तुझ्या घरी. ते नाही जन्मात मिळायचे माझ्या इथे. पण माझ्या घरच्या खोबर्‍याच्या वडीची नाहीतर बेसनाच्या लाडवाची चव तर घेऊन पहा ना." त्यावर मनमोकळे हसून, माझी थट्टामस्करी करीत समोर ठेवलेल्या बशीतला पदार्थ आपुलकीने खातो, नि लगेच उठतोच. मात्र जाताना न विसरता बजावतो, "मालू, प्रकृतीला नीट जपत जा हं."

त्याचा माझा पत्रव्यवहार नियमित होतो किंवा वरचेवर गाठीभेटी होतात असेही नाही. पण खरे सांगू? त्याची आवश्यकताच वाटत नाही. कारण माझ्या सर्व सुखदुःखात तो माझ्या पाठीशी उभा असणारच याबद्दल मला मनोमन खात्री असते.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color