स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow आमचा रणजितभाई (भाग १)
आमचा रणजितभाई (भाग १)
लेख़क मालतीबाई शं. किर्लोस्कर   

आम्ही दोघंच भावंडे! मुकुंद आणि मी. त्यामुळे लहानपणापासून मला वाटे; आपल्याला एक धाकटा भाऊ हवा होता, मोठ्या भावासारखाच प्रेमळ पण ज्याला मोठ्या बहिणीच्या नात्याने दटावायला मिळेल आणि ज्याच्याशी रुसाय-भांडायलाही मिळेल असा! रणजितभाईच्या रूपाने देवाने ती माझी हौस मनापासून पुरविली.

त्याची ओळख कधी, कुठे नि कशी झाली ते मला आता खरेच आठवत नाही. पण आठवते ती काही वर्षापूर्वीची एक संध्याकाळ. मुकुंदने त्या दिवशी रणजितला आमच्या घरी जेवायला बोलावले होते. दोघांचेही लक्ष जेवणापेक्षा गप्पातच जास्त होते. नव्या जुन्या पुस्तकांपासून मराठ्यांच्या इतिहासापर्यंत आणि प्रचलित राजकारणापासून शेतीपर्यंत कितीतरी विषयात रस घेऊन ते बोलत होते. जेवण झाल्यावर बोलताबोलता गाण्याचा विषय निघाला, (‘गाणे’ हा रणजितचा खास प्रेमाचा आणिअधिकाराचा विषय!) आणि सर्वांनी त्याला गाणे म्हणायचा आग्रह केला. तेव्हा रणजितने तुकारामाचा एक अभंग म्हटला. विलाक्षण तल्लीन होऊन! त्याच्या, भावनेत भिजलेल्या आर्तमधुर स्वरांनी आमचे कान आणि आमची मने अगदी तृप्त होऊन गेली. तुकोबांचा विठुराया त्याने आपल्या स्वरांनी आमच्या मनःश्चक्षुपुढे मूर्तिमंत उभा केला. तेव्हाच मी ओळखले की जे काही करायचे ते अगदी जीव ओतून, मनाच्या गाभ्यापासून करायचे हा याचा स्वभावच असावा.
त्या रात्री रणजितही मुकुंदबरोबर मला निरोप द्यायला स्टेशनवर आला होता. गाडीने शिटी देताच खिडकीपाशी येऊन तो मला म्हणाला, "मालू, मुकुंदबरोबर तूही ये ना एकदाव आमच्या कोवाडला." ते आमंत्रण इतके मनापासून होते की मी देखील पट्‌कन ते स्वीकारून टाकले. योगायोग असा की रणजितकडे जाणे मुकुंदला काही अजून जमले नाही पण मी बरीक त्याच्या आणि माधवीवहिनींच्या घरचा यथेच्छ आणि प्रेमळ पाहुणचार दोनतीनदा घेऊन आले.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color