पसायदान-२
लेख़क प्रा. भालचंद्र दामोदर केळकर   

पसायदान व मानव जातीच्या प्रगतीचा आलेख.

पसायदानसारखे सूत्ररुप काव्य, अखिल मानव जातीच्या प्रगतीचा आलेख, सदैव सुख, समृध्दि, मांगल्य या सत्स्वरुपाकडे जात राहण्याचा आश्वासक क्रम दाखविते. समुदायाची प्रगती, सुखाची प्राप्ती मांगल्याची वृध्दी होत असताना दुष्टांचे दुष्टपण हरविण्याचा क्रम, त्यांना सदबुध्दि सुचविण्याचा उपक्रम, याचबरोबर भूताना परस्पर जीवाभावाशी मित्रत्व लाभण्याची प्रक्रीया एकाचवेळी, सातत्याने घडत राहतात. तसेच दुरितांचे वाईट अवस्थेतून, चांगल्या स्थितीत जाण्याची प्रगती, अव्याहत चालू राहून, त्यांना स्वधर्माचरणाच्या प्रकाशात, जीवनाची वाटचाल करण्याची भूमिका पार पाडण्याची प्रेरणा देत राहते. अशा प्रकारे प्रगती करणारा समाज, आवश्यक त्या गरजा इच्छेप्रमाणे प्राप्त करीत जातो व त्या योगे एक स्वस्थ, शक्ती संपन्न, एकीयुक्त, परस्पर मैत्रिने बांधलेला, सहकारी समाज, सुख, संपन्नता मिळवितो. नेमका याच टप्यावर तो सुखाधीन, सुखासीन होण्याच्या अधिकाधिक आशेने बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी ईश्वर निष्ठांचे समुदाय, सज्जन व्यक्तींचे गट , संतांचे सत्संग विषयक उपक्रम, याद्वारे समाजाची सन्मार्गावरील वाट अखंड, निर्वेध व्हावी असा प्रयत्न चालू राहातो. आज जगामध्ये विज्ञानाबरोबरच, अध्यात्म, योग, आयुर्वेद, साधना, संगीत, शाकाहाराची आवड या सदभावनेच्या मार्गावरचा प्रवास सुखकर करणार्‍या ज्ञानाचा प्रसार सर्वत्र वाढतो आहे. कृष्ण संप्रदायाची जगभर वाढ होते आहे. भारतीय तत्वज्ञान सर्वत्र प्रसार पावत आहे. प्रगत राष्ट्रातील समाजला एक प्रकारची मरगळ, वैचारिक, बौध्दिक, पीछेहाट, अनुभवास येत आहे. आणि आजवर जणू अंधकार युगात राहिलेल्या भारत चीन सारख्या देशातून नब्या बौध्दिक,वैचारिक, तांत्रिक, वैज्ञानिक जाणिवांची वाढ होऊन समाजातील सर्व थरांच्या प्रगतीचा आश्वासक आलेख उंचावत चालल्याचा प्रत्यय येत आहे.

पसायदान - चिरंतन , नित्य, नूतन जीवन प्रक्रिया दर्शविते.

पसायदानात एक चिरंतन, नित्य, नूतन अशी जीवन प्रक्रिया मांडलेली आहे. समाजजीवनाचा निरंतर प्रवाह वाहता राहण्याची प्रक्रिया, संगणक प्रणालीच जणू, आखून दिली आहे. या जीवन प्रवाहात सुष्ट आणि दुष्टांना सहजीवनाच्या वाटेवरुन जावेच लागते. मार्गात दुष्टांचे निराकरण होणे, त्यांना सद्‍बुध्दी सुचून, चांगल्या कामात रस वाटणे ही नियतीची आखणी आहे. चराचराला, पंचमहाभूतांना जीवसृष्टीचे मैत्र जडावे, आणि त्यातून जीवसृष्टीचे जीवन फुलावे, अशीच विश्वात्मक देवाची संकल्पना आहे. या जीवनात प्रकृति धर्माला अनुसरुन जीवसृष्टीचे वर्तन होणार आहे. मात्र त्यामघ्ये दुरित, दु:खीत, दु:स्थित अशा समाजघट्कांचे अंधारविश्व, नष्ट्चर्य संपावे, त्यांना सुस्थापित, आश्वस्त जीवनाचा लाभ व्हावा, अशीच नित्याची योजना आहे. अशा या सृष्टिचक्रातील जीवनप्रवाहात, प्राणिमात्राना, जीवनाच्या सौख्य, समृध्दिसाठी जे जे आवश्यक असे इच्छेला यावे, ते ते मिळावे, अशी कामना प्रकट केली आहे. असे हे सृष्टिचक्र, ज्ञानेश्वरांच्या संकल्पविश्वातून साकारत चालले आहे. अशा प्रगत होत जाणार्‍या सुखी समाजार सुखाला लाचावलेली मांणसे स्वधर्म, स्वकर्तव्य, स्वत्व विसरतात, दुमार्गाला लागतात. त्यांना स्वधर्माची जाणीव करुन, सन्मार्गावर ठेवावे, त्याव्दारेच जीवनात सुखाबरोबरच ईश्वरप्राप्तीचे वेधही त्यांना लागावेत, त्यांच्यावर सर्व मंगल, सुरेख, सुंदर, जीवन वर्षावे, यासाठी व सतत सन्मार्गावर ठेवण्यासाठी, ईश्वरनिष्ठ, अशा संत महात्मे, विद्वान शास्त्रज्ञ, मीमांसक यांचे समूह, समाजात सर्वत्र फिरत राहोत. आपल्य़ा सदाचार दर्शनाने समाजाला योग्य मार्गावर ठेवण्याचे काम करीत राहोत. असा हा जीवनक्रम आहे. या मध्ये त्या त्या टप्यावर योग्य तर्‍हेचे वर्तन संबंधित घटकांकडून होत राहण्यासाठी, जीवनाच्या सर्वच अंगामध्ये कार्यशिल अशा सर्जनशिल, निर्माणक्षम, शोधक, संशोधनात्मक, कल्पनाशक्तीने कार्यरत असणारे शास्त्रवेत्ते, तंत्रज्ञ, कारागीर यांचे चालत्या कल्पवृक्षांचे प्रतिनिधि, इच्छित ते ते देणार्‍या चिंतामणि रत्नांचे चेतनायुक्त ग्राम संकुल, आणि बोलत्या जीवनामृत सागराचे साठे जणू असणारे असे, संशोधन निर्माण पध्द्तीचे समूहच होत. समाजाचा ओघ सदैव प्रगती पथावर राहावा यासाठी, राज्यकर्ते, सामाजिककार्यक्रर्ते,समाजाचे पुढारी , उत्पादन प्रक्रियेतील व्यवस्थापक, प्रशासक, रक्षक या सर्वांना आपापल्या कार्यातील परिणामकारकता साधण्यासाठी, विविध प्रकारचे कार्यकौशल्य, परिणामकारकता, उपक्रमशीलता, नावीन्य, बाणवावे लागते. रुढ पध्द्रीने नेहमीच कार्ये साधत नाहीत. त्या कार्यामध्ये सतत सर्जन्शीलता, कल्पकता, नावीन्य, शोधक प्रवृत्ति, असे कल्पवृक्ष आणि चिंतामणी रत्नांच्या सहाय्याने, आणि बोलत्या अमृतसागराचे सल्याने, जागृत राहून जीवनक्रमात सतत चेतना, उत्प्रेरक, उत्साहक, जीवनाभिमुख मूल्यांचे जतन करावे लागते.

पसायदानात वर्णिलेला सुखी सामाजाचा जीवनक्रम सतत चक्रनेमिक्रमाने योग्य मार्गावर राहण्याचे, जे विविध टप्पे दर्शविले आहेत. त्या सर्वांच्यापरीघ वाटचालीत, केंद्रस्थानी वर्तुळात असलेल्या, कल्पकतेच्या वृक्षांच्या बागा, चिंतामणी रत्नांची गावे, आणि बोलत्या अमृत सागराचा वाटा, फार मोठा आहे. आजवरच्या एकूण विश्वभरच्या जीवन समृध्दीच्या प्रयत्नात, कल्पकतेचा, निर्माणक्षमतेचा, नावीन्याचा वेध आणि शोध घेणार्‍या वृत्तीचा वाटा,फार मोठा आहे. त्यातूनच जीवनाच्या विविध अंगामध्ये उपक्रमशीलता, जबाबदारीच्या जाणीवा, नवनवतेचा ध्यास, उत्तुंग गोष्टी साध्य करण्याच्या महत्वाकांक्षा साकारण्यासाठी, प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची वृत्ति, समाजातील घटकांमध्ये प्रकटते व वृध्दिंगत होते.

डागहीन चंद्रम्याची शीतलता, आल्हादकता, तापहीन सूर्याचा प्रकाश व ऊर्जा यामुळे मानवी जीवन संपन्न होवो. चैतन्यशील होवो, प्रवाही राहो, ही संकल्पना फारच मनोहारी आहे. सूर्यमालेतील पृथ्वीवरील मानवी जीवन, चंद्र सूर्याच्या उपस्थितीने कसे अखंड ऋतुचक्र चालविते, सागराच्या भरती ओहोटीचे व तापमानातील फरकाने कसे विविध ऋतूंच्या योगाने मानवाला अमृत संजीवनीच जणू, असे जीवन प्रदान करते. या सर्वांतील विज्ञानाचे रहस्य फारच विलोभनीय आहे. पर्यावरण राखण्याचा भौतिक विचार जणू या चंद्रम्याच्या अलांछ्न, आणि तापहीन मार्तंड, संकल्पनेतून मांडला आहे. डागविरहित चंद्राची शीतलता, रमणीयता, सौदर्य, तसेच तापविरहित सूर्याची ऊर्जा, प्रकाश व सूर्यापासून मिळणारे तेज, ओज याची ओढ, आसक्ती समाजातील सर्वांना लाभो व चंद्रसूर्याचे, सज्जनपणाचे नाते सर्वांशी जडो, म्हणजे सर्वांची बुध्दी प्रचोदनायुक्त होवो, तेजस्वी, ओजस्वी, प्रतिभासंपन्न होवो, हा संकल्प मानवाची बौध्दीक संपत्ति वाढविण्याची, हमीच देत आहे जणू !

विश्वातील तीनही लोक सर्व सुखांनी परिपूर्ण होवोत
आणि अशा सर्व सुख परिपूर्णतेतही,
आदिपुरुषाच्या, आत्मतत्वाच्या, अखंड भक्तीत
ते रमून जावोत.

पसायदानाच्या या अंतिम फलश्रुतिमध्ये ज्ञानदेवानी, सर्व समाजाला निखळ सुखाची प्राप्ती होवो, तिन्ही लोक म्हणजे, अखिल पृथ्वीपूर्ण सुखी व्हावी, अशी मनोमन प्रार्थना केली आहे. हे सुख पूर्ण सुख असल्याने, भौतिक सुखाच्या कल्पनेबाहेरचे आत्यंतिक सुख म्हणजे, तदाकार होण्याची इच्छा ब्यक्त केली आहे. सर्व सामान्यांना सुखी जीवन लाभो, म्हणताना " जो जे वांछिल तो ते लाहो " , हे व्यवहारी जगातील सुखाच्या कल्पनेला धरुन, असे मागणे आहे. ज्ञानेश्वर आदितत्वाचा जयजयकार करतात, हे तिन्ही लोक त्या आदि पुरुषाची अखंड भक्ती करोत, असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

सृष्टी तत्वाच्या कणा कणात क्रमाने उन्नत होत जाण्याची कामना आहे. सर्व चराचर आणि जीवनसृष्टी, अशा उत्क्रांत होत जाण्याच्या क्रमात असते. सदैव उन्नत होत, अंती तदाकार होऊन राहाण्याची प्रत्येक अणुरेणुची इच्छा असते. सृष्टिनिर्मितीच्या नंतर अखंड प्रगत होत जात. भूतमात्रांना तदाकार होऊन, आत्मसंवेदनेने आत्मरुपात विलीन होण्याची तीव्र इच्छा असते. मानवातील सर्व घटकांना असे अखंड, उन्नत, प्रगत होत जाण्याची मनीषा असते. त्यांच्या परमोच्य सुखाची मागणी ज्ञानदेव करतात. असे सुख, परमसुख, लाभायचे, तर ऐहिक स्वरुपाचे सर्वसुख हस्तगत - प्राप्त व्हावे, ही सुरुवात होय. अशा सुखाची प्राप्ती अचेतनाला चेतन स्वरुप देवून, पंचमहाभौतिकाच्या, सर्वसहकारी सामूहिक, एकीच्या तत्वातून मिळणारी शक्ती, कामाला लाऊन माणसाने भौतिक सुखाची प्राप्ती ज्ञानदेवांच्या " जो जे वांछील तो रे लाहो. “ “ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे " अशा मागण्यामधून, तंत्रज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून मिळवून दिली आहे. अशा तिन्ही लोकांतील सुखी माणसाला परासुखाची प्राप्ती व्हावी व तो आदिपुरुषाच्या भक्तीत रममाण व्हावा, हे मागणे म्हणजे पसायदानाची उत्कट, अंतिम प्रार्थना आहे.

लौकिक सुखानंतर आत्याअनुभूतिची ओढ.

आज पाश्चात्य जगामध्ये, प्रगत देशामध्ये, लौकिक सुखाची परमावधी प्राप्त झालेल्या समाजाला, आत्मानुभूतिचा ध्यास लागला आहे. निरंतन अशा आत्मसुखाच्या ओढीने त्या समाजाला खुणावयाला सुरुवात केली आहे. ईश्वर शक्ती न मानणारा समाज, एक सर्वशक्तीमान निर्माता, या विश्ववाचे संचलन, नियंत्रण करीत असल्याची जाणीव, त्यांच्यातील शास्त्रज्ञ, तत्ववेते, याना होऊ लागली आहे. सर्वसामान्य पाश्चात्य माणूस योग, ईश्वर या कल्पनांचा मागोवा घेत आहे. भारतीय अध्यात्म,संस्कृती यांच्या अभ्यासातून, असे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे, असे त्यास आज उत्क्टतेने वाटू लागले आहे. ईश्वरशक्ती या स्वरुपात बुध्दिमान निर्माता रचनाकार इंटेलिजंट डिझायनर या स्वरुपात मान्य करण्याच्या स्थितीत, तत्वज्ञाचिंतक आज अमेरिकेत आहेत. डार्विनच्या उत्क्रांति तत्वज्ञानातून आजच्या आधुनिक विज्ञानासमोरील प्रश्न, आव्हाने याचा मागोवा घेऊ शकत नाहीत तर ती दिशा भरतीय तत्वज्ञानातून मिळते असा विश्वास पाश्चात्य तत्वचिंतक, शास्त्रज्ञ यांना वाटू लागला आहे. अमेरिकेतील फोर्ड या शास्त्रन्याचा, मोटारीच्या कारखानदाराचा नातू गेल्या २५ = ३० वर्षापासून कृष्णभक्तीत बुडाला आहे. कृष्णसांप्रदायाची वाढ करीत आहे. भौतिक सुखे मिळविलेला विज्ञाननिष्ठ समाज, ईश्वर शक्तीची आराधना, भक्ती करण्याच्या मार्गावर येत आहे. हे ज्ञानदेवांच्या संकल्पनेतील आदिपुरुषाच्या प्राप्तीचा ध्यास घेत जाण्याचा क्रम, दर्शवीत नाही काय ?

पसायदानातील सुखप्राप्तीच्या, मानवाच्या अखंड प्रगतीसाठी, क्रमाने परमात्म्याचा ध्यास घेणार्‍या जीवनसाखळीत शेवटच्या टप्यावर, ग्रंथोपजीवी, ज्ञानाधिष्ठीत समाजाच्या " विशेषी लोकी इये ", अशा स्वरुपाच्या ज्ञानाच्या अखंड उपासकांना म्हणजे आज जगभर पसरुन वाढत चाललेल्या ग्रंथचळवळीतील ज्ञानोपासकांसाठी, मागलेले मागणे म्हणजे " ग्रंथोपजीवीये दृष्टादृष्ट्विजये होआ वे जी " हे व्यावहारिक आणि पारमार्थिक मार्गावरील अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे ग्रंथ म्हणजे, भौतिक व पारलौकिक मार्गावरील मानवाला, त्या त्या टप्प्यावर दृष्ट आणि अदृष्टावर विजय मिळावा, असे विलक्षण स्वरुपाचे मागणे मांडतात. “अविद्याया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नते " ! म्हणजे व्यावहारिक तंत्रवैज्ञानिक ज्ञानाने मृत्युवर विजय मिळवून, याचा अर्थ अज्ञान दारिद्र्य यातून उद्योगाचे साहाय्याने स्वधर्म पालनाने जय मिळवून, मग अध्यात्मविद्येने अमृतत्व गाठता येते या दोन्ही अर्थाचा समावेश ज्ञानदेवांच्या संकल्पात आहे.

विज्ञानातील दृष्ट व अदृष्टावरील विजय हा तंत्रज्ञानाचे साहाय्याने आज परमोच्च पदावर पोचण्याच्या मार्गावर आहे. ग्रंथ चळवळीचा भाग म्हणून विद्यापिठातून, उद्योग, संशोधन केंद्रातून, चालणार्‍या प्रयोगातून होणार्‍या, साकार होणार्‍या योजना, संगणक, स्वयंचलित वाहाने, उपग्रह, अवकाश स्थानके, विविध शस्त्रास्त्रे, कारखाने यामधून नवनवीन ज्ञानप्राप्तीच्या कक्षा ओलांडत आहे. सृष्टीच्या उत्पतीचे रहस्य उलगडण्याचे स्वप्न साकार करु पाहाणारा मानव, अखेरीस तोकडाच पडतो. विचार आचारात येणे, यातंच विचारांचे साफल्य असते आणि त्यात सर्व मानवजातीचे कल्याण असते. पसायदान अशा सर्व ग्रंथोपजीवनाकडे जाणारे आहे. जन्मोजन्मीचे दुरित जिंकून ग्रंथोपजीवी विजयी होवोत, हा विजय दुरित नष्ट करण्याचा आहे, स्वधर्मसूर्याचा आहे, आणि अंतिमत: आदिपुरुषाच्या भक्तीचा आहे.

पसायदान = मानवी सुखांचा मूलमंत्र सिध्दांत

पसायदान ही विश्वनियंत्यास ज्ञानेश्वरांनी लेलेली प्रार्थना, म्हणजे मानवी समूहाच्या प्रगतीचा, सुखाचा मूलमंत्र सिध्दांतच होय. या विश्वकल्याण संकल्पकाव्यात आलेले टप्पे, मानवाच्या प्रगतिचे, सुखाच्या वाटेवरील स्थानकेच होत. व्यक्तीचे आणि समाजाचे, अखिल मानव जातीचे, विश्वाचे कल्याण चिंतिणारे हे काव्य म्हणजे मानवी समाजाच्या सहास्तित्वाचे, चराचराशी जुळवून घेवून, एकमेकास साहाय्य करुन, सर्वांनीच सृष्ट दुष्टासह, सर्व सामाजिक घट्कांसह, अखंड्पणे, अविरत, सुखासमाधानाच्या प्रवासातील टप्पेच आखून दिले आहेत. एवढेच नव्हेतर त्याची खात्री दिली आहे. विश्व कल्याणाचा मूलमंत्रच जणू या काव्यातून दिला आहे. विशेषत: विज्ञान तंत्रज्ञानाचे आधाराने मिळणारे भौतिक सुख, ह्ळू हळू क्रमाक्रमाने, पारलौकीक अध्यात्मिक सुखाकडे कशी वाटचाल करते, व या सर्व प्रवासात, एकमेकांस समजून, परस्परांच्या अचेतन चेतन जगाच्या पसार्‍यातून, त्यांचेशी जुळवून घेण्याच्या मर्यादा- पात्रता - सहयोगाच्या योजनामध्ये, समावून घेण्याच्या कल्पनांचे विलक्षण कार्यसूत्र आहे. भौतिक – अधिभौतिक व आध्यात्मिक संघर्ष टाळून, परस्पर सहकार्याचे, अवलंबित्वाचे सूत्र या पसायदानाचे मांडणीत आहेत. जेथे विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव ( अचेतनाला दर्शनी, तात्कालिन चेतना देण्याचा) हीन होतो व सुखाच्या भौतिक स्वरुपाच्या मर्यादा संपतात, तेथे अध्यात्म सुरु होते. विज्ञान बाह्यजगाच्या, पदार्थमात्राच्या वर्तणुकीच्या अभ्यासातून, निसर्गाचा अभ्यास करुन, अधिभौतिक शक्तीची प्राप्ती करुन देऊन, ब्यावहारिक सुखाची, जीवन प्रवासातील सुखाची प्राप्ती करुन देते. त्यामध्ये होणारी सुखाची परमावधी, मर्यादित स्वरुपाची असते. त्याच्या पुढचा सुखप्राप्तीचा प्रवास, मानवाच्या अंतरंगप्रवासातील जाणिवांचा विकास घडवून करता येतो. अध्यात्मिक सुखाच्या प्राप्तीची सुरुवात अधिभौतिक सुखाच्या अंतिम टप्यापासून सुरु होते. अशा तर्‍हेने दोन्ही सुखाची प्राप्ती विज्ञान व अध्यात्म अशा दोन्ही अंगानीहोणार, हे या दोन्ही मार्गाची आखणी, पसायदानात करुन दिलेली आहे. विज्ञानाचे उपासक, ईश्वरनिष्ठ उपासक यांच्या एकत्र अशा परस्पर सहाय्यक पुरक कार्यक्रमाची मांडणी, ज्ञानेश्वरानी पसायदानात करुन ठेवली आहे. त्या मांडणीला धरुन गेली ८ शे वर्षे विश्वभर होत असलेली मानवाची तंत्रवैज्ञानिक व अध्यात्मिक प्रगती विलक्षण प्रत्ययकारी आहे. विज्ञान अभ्यासाशिवाय अपुरे आहे. मानवाला पूर्णत्व गाठायचे तर केवळ विज्ञान तंत्रज्ञाचा आश्रय घेऊन चालणार नाही. त्याबरोबरच अध्यात्मशास्त्रम्हणून आत्मप्राप्ती करुन घेण्याच्या अध्यात्मविद्येचीही प्राप्ती आवश्यक आहे. तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, तंत्रवैज्ञानिक यांचे बरोबरच संत,महंत, योगी, अध्यात्मवादी, ईश्वरवादी, ईश्वानिष्ठांच्या समुदायांची परस्पराशी होणार्‍या सहविचार, सहप्रवास, सहकार्य यातून एकीच्या भावनेने परमात्मसुखाची इच्छा ठेवून, केलेला सहप्रवासच, सर्व मानवजातीला तारुन नेईल. हा विचार ज्ञानेश्वरांनी पसायदानाचे रुपाने अखिल मानव समाजापुढे ठेवला आहे.

ज्ञानेश्वरांचे मागणे.

१. खलांची वक्रता दूर होवो,सत्कर्माविषयी तयांचे प्रेम वाढो, समाजाच्या सर्व थरातील विविध प्रकारच्या खलांचा दुष्टांचा, वृत्ति नाश होवो ही निरंतरची मागणी सर्वप्रथम आहे.

२. सर्व चराचर प्राणीमात्रात, जीवसृष्टीत, परस्परांचे जीवाभावाचे मैत्र नांदो. पंचमहाभूतांचे परस्पर आणि मानवजातीशी सहकार्य वाढो. यातून विज्ञान तंत्रज्ञानाची अचेतनाला चेतना देण्याची सुरवात आहे.

३. दीनदलीत, दुरितांचे नष्ट्चर्य संपावे. त्यांना चांगले जीवन लाभावे, आत्मसन्मानाचे, परस्पर सन्मानाचे जीवन लाभावे.

संतांच्या कर्यातून सामाजिक अभिसरण, सामाजिक समरसता, चांगलीच जोपालली गेली आहे. सामाजिक, राजकीय पातळीवरुनही जोपासली गेली आहे. तसेच सामाजिक, राजकीय पातळीवरुनही दुरितांचे तिमिर घालविण्याचे कार्य जागतिक पातळीवर चांगलेच पुढारले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने तर मजुरांचे कष्ट, कारकूनाचा मनस्ताप कमि व्हावा म्हणून अनेक प्रकारची यंत्रे विकसित करुन श्रमाला पर्यायी साधने निर्माण केली आहेत. समता प्रस्थापनेतसुध्दा त्यांचा वाटा मोलाचा आहे.

४. यासाठी ईश्वरनिष्ठांचे मेळावेच्या मेळावे जगभर हिंडते फिरते राहोत.ज्ञानेश्वरांच्या समकालीन व नंतरच्या काळात भारतात आणि जगभर संतांच्या व तत्ववेत्यांच्या मेळाव्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. विश्वधर्म संमेलनात प्रथमच १८९२ मध्ये विवेकानंदांनी भारतीय तत्वज्ञानाचा व अध्यात्मिक भूमिकेचा उच्चार अमेरिकेत तंत्रवैज्ञानिक क्रांतिच्या काळात करुन मोलाचे कार्य केले आहे. साईबाबा, कबीर, सूरदास, महर्षि महेश, चिन्मयानंद, रामदेव, ओशो, रमणमहर्षि, गुरुदेव रानडे, श्री. श्री. रविशंकर .... अनेक महान् संतांनी जगभर मानवता, ईश्वरभक्ती, समानता, या गुणांचा परिपोष सतत जागविला आहे.

५. कल्पतरुसारखे, चिंतामणीसारखे, अमृतसागरासारखे केवळ ईश्वरनिष्टच, संतच असतात असे नव्हे तर शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, तंत्रवैज्ञानिक, अभियंते, व्यवस्थापक, कारागीर असे हे उपासक असतात. ते सर्व भूतमात्रांना सदैव भेट्त राहोत. भूतमात्रांना ते प्रिय होवोत.

६. तापहीन मार्तंडासारखे आणि अलांछ्न चंद्रम्यासारख संत आणि ईश्वरनिष्ठ असतात. केवळ तेच नव्हे तर चंद्रसूर्याच्या प्रभावाने पंचमहाभूतांची सृष्टितील पर्यावरणपूरक मानवाला हितकारक अशी प्रभावकारी कामगिरी आणि ऊर्जा वातावरण निर्मिती यामधील व मानवी बुध्दिसामर्थ्याला दिव्य तेज देण्याची त्यांची भूमिका, दिव्यत्वाची प्रचीति आणून देणारी आहे.

७, अशा रीतीने... दुरितांचे तिमिर जात राहील. विश्वामध्ये स्वधर्मसूर्याचा उदय होईल. आणि जो जे इच्छील ते त्यास मिळेल.

८. या सर्व क्रमामध्ये ईश्वरी शक्तीचा, परमात्मशक्तीचा प्रभाव विश्वरचनेचा, मानवी शास्त्र प्रगतीमधून उद्‍भवणार्‍या गैर शक्तीवर प्रभाव, दबाव ठेवून, प्रसंगी त्यांचा यथाक्रम विनाश करण्याची शक्तीसुध्दा, एक विश्वनिर्माता, विश्वनियंता या दृष्टिने महाबुध्दिमान, ईशशक्तीची शक्ती, या सर्व प्रगतीमध्ये नियंत्रण ठेवून असल्याचे भान संत आणि ईश्वरनिष्टांच्या कार्यातून समाजातील जबाबदार घट्कांना राहावे, यास्तव विश्वामध्ये स्वधर्म, स्वकर्तव्याच्या, सत्यधर्ममार्गावर राहून प्रगति साधण्याच्या उपक्रमाचा विसर पडू न देण्याचा संकल्प ज्ञानेश्वरांनी आवर्जून मांडला आहे.

९. म्हणजे मग, तिन्ही लोक आनंदाने भरुन राहू देत, पूर्ण सुखी होऊ देत.

१०. तिन्ही लोक आत्मपुरुषात भक्तिलीन होतील, ते सहज करतील ते, वागतील ते, आत्मपूरुषाचं भजन पूजनच होईल. या सहजभक्तीत विश्व नांदेल. चराचराला असे दिव्यत्व लाभून, आत्मरुपात विलीन होण्याचे भाग्य लाभावे, ही परमौत्कट इच्छा ज्ञानेश्वरांनी अधिकार वाणींने व्यक्त केली आहे आणि ती परमात्मशक्तीने, विश्वात्मक देवाने मान्य केली आहे.

पसायदानाचे प्रयोजन काय ? असा प्रश्नच उद्‍भवत नाही. कारण पसायदानाचा अर्थवेद सृष्टीक्रमाने टप्पे आखून मानवाची अखंड प्रगती, सुखाची प्राप्ती, होण्याचा मार्ग ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये आखून दिल्याप्रमाणे घडतो आहे व त्यात विज्ञान, तंत्रज्ञान व अध्यात्म, धर्मजागरण अशा दुहेरी एकमेकास पोषक अशा भूमिकांचा समतोल ठेवण्याची योजना आहे. मानवी सुखाचा मूलमंत्र देणार्‍या भूमिकेचा तो एक आश्वासक ईशकल्पनेचा जाहीरनामाच आहे.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color