पसायदान-४
लेख़क प्रा. भालचंद्र दामोदर केळकर   

ज्ञानेश्वरांच्या संकल्पातून साकारली वस्तु निर्मिती तंत्राची ज्ञान वृध्दी

अशा प्रकारे सामान्य माणसाच्या आवाक्यात अचेतनाला चेतन करण्याचे सामर्थ्य योग आणि भक्तिच्या सामर्थ्याचा योग्य वस्तुचा सार्वत्रिक विकास रुपाने, विज्ञानाने व तंत्र ज्ञानाने घेतलेला व्यवहारी वेध म्हणजे, आज सामान्य माणसाला जीवनाच्या अंगोपांगात उपयोग असणार्‍या वस्तु साधनांचे, कल्पतरु व चिंतामणी रत्नांचे काम करणारे हवे ते देणारे सामर्थ्य, गेल्या आठ शतकातील, जगभरातील सर्वाधिक प्रगति, पदार्थ वस्तु विकास, तंत्रज्ञान विज्ञान वृध्दि, ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील संकल्पनेतून साकारलेले प्रकृतिचे पूर्ण रुपच म्हणायचे.

हे घडायचे तर, सृष्टीत दडलेले शास्त्र व अचेतनाला चेतन रुप देण्याचे तांत्रिक ज्ञान, यांचे अगम्यातून गम्य रुपांत आवश्यक असे रुपांतर करायला, सर्व चमत्कार वाटावा, अशा या शास्त्राचे व तंत्रज्ञानाचे, मानवरुपातून अवतरण करायला, सर्व प्रथम सृष्टितत्वाचे आकलन, नियम संस्थापन, त्यातून शास्त्रतत्व प्रस्थापन व त्यानुसार कार्य करणारी तंत्रशक्ती, विकासाची साधने, अचेतनातून विविध रुपाने साकार करणारे तंत्रज्ञान-विकास, यांची सूत्ररुप कालबध्द सुसंगत मांडणी, अखंड ८ शे वर्षे घडत राहाण्याचे, जड्णघडणीचे आविष्करण, कसे घडत गेले, हे पाहाता, असे दिसते की, आधी एक व मग दुसरे म्हणजे, आधी शास्त्र व मग तंत्र अगर उलट क्रमाने, असे ते साधाणारे नव्हते. दोन्हीही अंगाने होत जाणारा विकास एकाच वेळी समांतर पध्दतीने होत गेला व त्यांची परस्परांतील गुंफण ही खरोखरच विस्मयकारी आहे. कारण वैज्ञानिक सत्य साकारायला, तत्त्वाचे आविष्करण, प्रकटीकरण होणे, त्याची मोजमाप पध्द्तीने, नियमबध्द शास्त्रीय सूत्रात मांडणी होणे, या गोष्टी क्रमाने आखून, संगतवार कार्य घडवत नेण्याचा उपक्रम, प्रयत्नाने रेखाटून पाहाता येतो व त्यामधून असे दिसते की विविध शास्त्र अभ्यासकांच्या रुपाने, चमत्काराचे आविष्करण, मांडणी, वर्णन, मापन, आकड्यामधील रुपांतरण, आणि गणिती पध्द्तीने अंतिम सिध्दांतरुपातील प्रकटण, हा मार्गक्रम पाहिला तर त्यातील संगति थक्क करणारी आहे.

युरोपामध्ये, चमत्कार निरीक्षणातील, शाब्दिक प्रकटीकरणालाही तत्कालीन समाजात बंदी होती. हलका आणि जड दगड उंच इमारतीच्या गच्चीवरुन टाकल्यास एकदमच खाली जमिनीवर टेकतात हा अनुभव सांगणारा गॅलिलिओ, दुर्बिणीतून शनिचे कड्यामधील उपग्रह पाहून, जग कोसळेल म्हणून गॅलिलिओवर टीका करणारे, १५ व्या शतकातील धर्ममार्तंड, कोपर्निकस्ने सूर्या भोवती ग्रह फिरतात, हे सांगणे, व त्यासाठी धर्मप्रमुखांची टिका सोसणे असे प्रकार ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधिल गीता व भागवत मराठीत सांगण्याच्या प्रमादाइतकेच तोलामोलाचे होते. लिओनार्डो द विन्सीने, शेकडो पाने भरुन कल्पनाशक्तीने झपाटून काढलेली वस्तु कल्पना चित्रे, पुढे ५ शे. वर्षात सत्यरुपात प्रगट होतात ! न्यूटनचे ३ गति नियम केवळ पृथ्वीवरच नव्हे तर विश्वात सर्वत्र लागू पडतात, हे सत्यदर्शन त्याला कसे अंत:प्रेरणेने झाले ! अथवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण सिध्दांताचे दर्शन, त्याला सफरचंदाचे फळ जमिनीवर पडताना झाले, या सर्व घटनामधून, शास्त्रतत्वांचे दिव्य दर्शन घडत जाण्याचा क्रम उलगडतो. गॅलिलिओच्या लंबकाचे प्रत्यक्ष घड्याळात होणारे रुपांतर व त्या लंबकाचे गोलक वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचे बनवल्यावर, जग प्रवासांतील वेळ कसा बदलतो यावरुन वस्तुमान व वजन, आणि लंबकाचा आंदोलन काल, यांचे सम्यक दर्शन करुन घेणारे शास्त्राभ्यासक धन्य होत. लग्नानंतर मधुचंद्राला निघालेला ज्यूल,प्रवासांत एक लांब नलीकेचा तापमापी घेऊन, धबधब्याच्या ठिकाणी मधुचंद्र साजरा करीत, धबधब्याचे उंचीवरील पाण्याचे तपमान खाली पोचल्यावर कसे व किती वाढते, याचा, ऊर्जा संक्रमणाचा ज्यूलचा सिध्दांत कसा शब्दरुपात येतो, हे अभ्यासणेजोगे आहे. या प्रत्येक प्रकाराच्या घटना क्रमात पावशतक, अर्धशतक, शतक याप्रकारचे अंतर असे थर्मामीटर तापमापी बनत होत शंभर वर्षे, गतिसिध्दांत अंतिमरुप घेत होते. शतकभर ! बर्फ वितळताना उष्णता दिली तर तापमान बदलत नाही, तसेच पाणी उकळून बाष्पीभवन होताना पाण्याचे तापमान बदलत नाही, या घटनांतील गूढ सुमारे शतकभर उलगडत होते. उष्णता संक्रमणाचे नियम आकार घेत होते, शतक दोन शतके ! आकाशातील वीज पृथ्वीवर, चुंबकाची व फिरत्या वाहकाची योजना करुन, जनित्रातून वीज बनवता येते. हा प्रयोग शंभर वर्षे साकारत होता. स्टीम-बाष्प यंत्र अंतिम रुपात शास्त्रतंत्राचे संयोगीकरणातून येण्यास, शंभर वर्षे लागली. असे किती तरी दाखले मूलभूत विज्ञान व तंत्रज्ञान विकासाच्या टप्प्यातून देता येतात. पण एक गोष्ट मात्रप्रकर्षाने जाणवते की, त्यांचे अवतरण स्वतंत्रपणे पण समांतरपणे, परस्पर पूरक परस्परांना आधार देणारे ,पण एकासाठी एक, असे फार न खोळंबणारे असे अप्रतिहत अमोघ पध्द्तीने घडत गेलेले प्रकटीकरणाचे, अवतरणाचे नाट्य, चमत्कार वाटावे अशा पध्द्तीने साकारत गेले आहे.

ज्ञानदेवांचे प्रार्थनेतील मागणे, व्यापक स्तरावर वैश्विक जाणिवांतून, जगध्दिताच्या, मानवासहित सृष्टीच्या भल्यासाठी मांडले आहे. सर्व देश कालपरिस्थितीत ही प्रार्थना कार्यरत आहे. समाज आणि व्यक्ती यांच्या जीवनाला योग्य वळण लावणार्‍या मूलभूत तत्वांचा विचार , त्यात केला आहे.

महामना, विश्वमना अशा विभुतींचे शब्द साकारण्यासाठी, नियती, निर्सग, प्रकृती योग्य ती आवश्यक रुपे धारण करते. त्या इच्छांना, संकल्पाना प्रत्यक्षात आणण्यासाठी, जणू इच्छाशक्ती वैश्विक पातळीवर, परस्पर पूरक, पोषक रुपे धारण करुन, चराचराला पाचारण करते. व त्यातून मानवी भावभावना, विचार, बुध्दि, श्रम यांच्या संयुक्त उपयोगातून, योग्य आकार देण्यासाठी, घडविण्याची, साकार करण्याची योजना, प्रत्यक्षात येते. मानवी रुपे आकारुन, त्यांच्या कर्तृत्वाला साद घालून, त्यांच्याच कृतीने, बदल साकारत जातो.

विश्वात्मक देवाने वर म्हणून दिलेला संकल्प, एक अमोघ शक्ती बनून, प्रकृतीची नव्याने जडणघडण करण्याची आंतरिक प्रेरणा, बहुतांच्या अंत:करणातून स्फुरित करण्याचा, सृजनाचा अंकुर साकरतो.

अरुप घेई रुप इथे ! अन निराकार आकार
ॐकार, आत्मरुप ओंकार !

अरुपातून रुप आणि निराकारातून आकार साकारतो तो वैश्विक संकल्पाला धरुनच !

ज्ञानेश्वरांची संकल्पना, एका सत्पुरुषाच्या मनातील लोक कल्याण विषयक, पण प्रत्यक्षातील जीवनाशी सुसंबध्द अशी उदात्त विचारधारा असून, त्यामध्ये सर्व समाजाच्या सौख्याशी संबंधित, अत्यंत फलदायी अशी विचारांची, आत्मप्रेरणेची बैठक आहे. असे दिसून येईल.

दिशा आणि देशकाल परिस्थितीच्या पलीकडे जाऊन, स्फुरलेला हा शब्द्रुरुप हुंकार म्हणजे जगन्नियंत्या परमश्रेष्ठ रचनाकाराने, भूतमात्रांच्या हितासाठी, भावी कालासाठी आखलेला असा हा प्रदीर्घ कार्यक्रमच आहे जणू !

प्रा. भालचंद्र दामोदर केळकर
७१२, कृष्णा निवास, गावभाग,
सांगली-४१६४१६
(दूरध्वनी-२३३१०३६)
(निवृत्त प्राध्यापक, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली.)

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color