पसायदान-३
लेख़क प्रा. भालचंद्र दामोदर केळकर   

पसायदान - विश्वात्मक जाणिवेतून अर्थ वेध.


पसायदान : मानवी प्रगतीचा ( ज्ञानेश्वरांनी मांडलेला ) विकास पट

पसायदानाचा जन्म ज्ञानेश्वरांच्या नावातील सामर्थ्याला अनुसरुनच, जणू त्यांच्या योगारुढ स्थितीमधून झाला आहे. जगाच्या तत्कालीन स्थितीचे सम्यक् आकलन झाल्यामुळे, तसेच त्या स्थितीमधून अखिल मानवजातीचे उन्नयन, उत्थापन व सर्वांगीण प्रगती घडून, जीवनमान सुखाचे व्हावे, अशी तळमळ असल्याने , भावी काळात तसा सार्वजनिक बदल, परिवर्तन, प्रबोधन, घडण्याच्या आत्यंतिक आपुलकीने, त्यांत मनुष्याच्या प्रगतीचा वेध घेतला आहे. ही भूमिका त्यांच्या पसायदानाच्या मांडणीतून स्पष्ट दिसते व ती भूमिका देशकाल परिस्थितीच्या पलीकडे जाऊन, निरंतर, दिर्घकालासाठी सैध्दा;तिक भूमिकेतून, मानवी विकासाचा पट कसा उलगडून जावा याची सूत्ररुप मांडणीच आहे.

विश्वात्मक जाणिवेतून ...... अर्थवेध.

पसायदानात क्रमाने मांडलेल्यासूत्रांचा मागोवा घेण्यासाठी गेल्या ७००-८०० वर्षांतील राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक,औद्योगिक, साहित्य घटनांची उकल करुन पाहाता, सर्व घटना क्रमात एक विलक्षण एकात्मता, संगति, विविध क्रमातील सुसंगतता, परस्पर सापेक्षता व प्रगतिचा एक अमोघ ओघ जाणवतो. आजपर्यंत आपण या प्रगतिकडे, अशा दृष्टीने पाहिलेच नाही. आपल्या स्थानिक संदर्भातून पाहाता, त्याला प्रदेश, खंड, राष्ट्र, आपला भारत, पाश्चात्य, पौरात्य, आपण श्रेष्ठ का ते श्रेष्ठ ? आपण कनिष्ठ नव्हतोच .... वगैरे तर्कवादावर आधारित पध्द्तीने आपण जगभरल्या विविध घट्नांचे दर्शन घेत राहिलो. त्यातून उलगडणारा अर्थ फुटिरतावादी, संशयी, आपपरभावाचा, असा होत राहिला आहे.

ज्ञानेश्वरांच्या दृष्टीमधून हा अर्थ उलगडण्यासाठी इतिहासांतील विविध घटनांचा मागोवा घ्यायचा तर ती विश्वात्मक सर्वसमावेशक जाणीव घेऊनच प्रगतिचा अर्थ उलगडून पाहिला पाहिजे.

ज्ञानेश्वरांनी आपल्या वर प्रार्थनेमध्ये केलेले मागणे, सामान्य, संकुचितपणाचे वा स्वार्थी नाही, तर ते आखिल विश्वातील प्राणिमात्राचे, जीवसृष्टीचे कल्याण व्हावे, अशी तीव्र इच्छा प्रकट करणारे आहे. त्यांनी सर्व विश्वाचे मंगल चिंतणारी विश्वप्रार्थना केली आहे.

विश्वात्मक देवाकडे केलेले मागणे, विशाल दृष्टीचे, दीर्घकाल, प्रभाव असणारे, वैश्वीक सत्याचा आविष्कार देशकाल परिस्थितीच्या सीमा ओलांडून, सर्वत्र व्हावा, अशा तर्‍हेचे हे मागणे म्हणजे अखिल मानवजातीच्या सर्वकश विकासाचा कार्यक्रम, जणू मंजूर होण्यासाठीची, ही प्रार्थना आहे. सद्‍गुरु निवृत्त्तिनाथानीसुध्दा आपले शिष्य ज्ञानदेवांची प्रार्थना, सुफल संपूर्ण होवो असा आशिर्वाद दिला.

वैश्वक जाणिवेतून लेलेला संकल्प.

ज्ञानेश्वरांच्या वैश्विक जाणिवेतून केलेला संकल्प जणू विश्वात्मक देवांचा सर्वमानव जातीच्या, चराचर सृष्टीच्या बदलाचा संकल्प होता हा संकल्प पुरा व्हायचा तर " विश्व पट, ब्रह्म दोरा " या न्यायाने विश्वपटाची निर्मिती, ब्रह्मरुपी दोरा घेऊनच होणार. चराचरामध्ये अनुकूल योग्य बदल घडवून, मगच हा संकल्प योग्य आकार , रुप धारण करणार ! संत महात्म्यांचे संकल्प, विश्वात्मक परमसत्याचे अवतरण, पंचमहाभूतांच्या आंतरिक, आत्मिक, आत्मिक स्फुरणांतून, सजीव, निर्जीव सृष्टिच्या सर्वांगीण बदलातून, अंत:प्रेरणात्मक मार्गाने घडवून आणतात. अतिशय व्यापक आणि उदात्त्त जाणिवामधून व्यक्त झालेल्या इच्छा, बुध्दि आणि श्रम यांच्या संयुक्त समन्वयातून, अतिमानवी इच्छांचे, मानवी जीवनातील व चराचर सृष्टीमधील संक्रमण, क्रमाने, सातत्याने, रुपांतरित होत असते.

या संकल्पपूर्ति कार्यक्रमात भौगोलिक, वांशिक, धार्मिक, पंथीय, राजकीय सीमा आड येत नाहीत कारण त्यापलीकडील उदात्त उद्देशांचे प्रकटीकरणे व्हायचे तर विशाल सर्वस्पर्शी, सर्वात्मक पध्द्तीनेच हा अपेक्षित स्थित्यंतरे व प्रत्यक्षात येणारा मार्ग सुकर व्हावा, अशी कामना व कल्पना आहे.

जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रति वाढो.

दुष्ट, दुर्बुध्दि, समाज राष्ट्राविघातक शक्ती शत्रू या सर्वांचा शांतिप्रस्थापनेसाठी उपशम होणे अगत्याचे होय. त्याचा पाडाव होणे व त्यांचे जागी सुष्ट प्रवृत्तीचे प्रजाहितकारक राज्य प्रस्थापित व्हावे, यामध्ये त्या खळांचे वाकुडेपण जावे व त्यांना चांगल्या कामाची, मार्गाची आवड उत्पन्न व्हावी, हा शांततामय बदलांचा मार्ग ज्ञानेश्वरानी सुचविला आहे. हे शक्य नसल्यास, दुष्टांचे निर्दालन होण्याचा, माणसांचे नव्हे. जुलमी, परकीय राज्यकर्त्यांच्या आकांक्षांचे हुंकार, घडलेले संघर्ष, बलिदाने यामघून अंतिमत: सत्ताबदल व त्यामधून शेवटी सर्वामध्ये सन्मार्गाची आवड लागण्याचा, कारण संपल्यावर, सज्जनतेचाव्यवहार घडावा, असा त्यांचा आग्रह आहे.

जगभर गेल्या ८०० वर्षात, अनेक देशात राजकीय स्थित्यंतरे घडली. क्रूर, जूलमी, हुकूमशाही प्रवृतीचे, वसाहतवादी, असे अनेक सत्ताधीश पालटले. त्या त्या देशांत लोकांच्या पसंतीचे राज्य प्रस्थापित झाले. “ जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढो " ही उक्तीच जणू इतिहासातील घटना उलगडून दाखविते. समाजजीवन परावलंबी, पांगळे करणारे, कोणतेही राज्यशकट व त्या राजकर्त्यांचे पतन झाल्यावरच सद्‍वीचार, सदाचार, सद्ववर्तन यांची आवड सर्वत्र वाढीस लागू शकते. जगातील घटनांचा मागोवा हीच गोष्ट प्रकर्षाने दाखवून देतो. १९२० साली राष्ट्रसंघट्नेची स्थापना झाली व त्यामुळे सर्व राष्ट्रातील आपसातील प्रश्न सोडविण्याची सर्वमान्य अशी पध्दत प्रस्थापित झाली. ब्रिटिश साम्राज्यवाद संपल्यानंतर, मुक्त झालेल्या प्रदेशांची राष्ट्रकुल परिषद निर्माण करुन, “ सत्‍कर्मी रती वाढो " या तत्वाचे प्रदर्शन झाल्याचे जाणवते. ज्ञानेश्वरांची दृष्टी विश्वात्म, विशाल आहे. त्यांचे पुढे जगातील विविध ठिकाणच्या मानजातीचे नमुने आहेत. त्यामध्ये दुष्ट, जुलमी राज्ये, रानटी टोळ्या, त्यांची समृध्द भूप्रदेशावरील आक्रमणे, मागासलेल्या टोळ्या ( जंगले वाळवंट, पर्वतीय प्रदेशातील समाज ) प्रगत आणि अप्रगत अशा सर्वांचा समावेश असल्याने " चिंता करितो विश्वाची " या भूमिकेतून क्रमाने सर्वांच्या प्रगतिची दालने व त्यातील गति, या महत्वाच्या गोष्टी ठरतात.

खल निर्दालन व्हायचे तर समाज ढवळून निघण !

खल, दुष्टाचे निर्दालन अशी भूमिका त्यांनी घेतलेली नाही. जुलमी, हुकुमशाही प्रवृत्तिचे परिवर्तन व त्यांचे उत्क्रांत पध्द्तीने, सज्जनतेकडे जाण्याचा क्रम त्यांत अपेक्षित आहे. त्यामुळे जुलमी राजसत्तांचे पाडाव होणे व कालांतराने त्यांची दुष्ट प्रवृत्ति जाऊन, त्यांचे ठायी सुष्ट भाव निर्माण होण्याचा क्रम, अभिप्रेत आहे. त्यामुळे आक्रमण, धर्मपरिवर्तन, जुलुम, जबरदस्ती यामधून घडणारी संक्रमणे अटळ आहेत पण ती सर्व समाजाला सज्जनतेकडे नेणारी क्रमवारी, म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे " चक्रनेमिक्रमेण " अशा दृष्टीने पाहिले तर घटनाक्रम जागतिक पटावर अर्थपूर्ण वाटतो.

किमान भौतिक भूमिकेची गरज - अध्यात्मिक प्रगतिसाठी.

अध्यात्मिक उन्नति व्हावी, यासाठी किमान भौतिक भूमिकांवर तर समाज प्रथम यायला हवा. कांही एका विशिष्ठ जनसमुदायाची सर्वांगीण उन्नत्ति अशी दृष्टी, त्यांनी ठेवलेली नाही. दुष्ट, दुर्जन सुजन व्हावा, दरिद्री समाज किमान जीवनाच्या पातळीवर यावा, समृध्द व्हावा, स्वधर्म – स्वकर्म तत्परता, सर्वांच्या ठायी यावी, सर्व भूतांच्या ठायी, परस्पर मैत्रीचा भाव व्हावा, कष्ट्करी, दलित, दुर्लक्षित, अडाणी, समाजाची अज्ञान अंधकारातून ज्ञानसूर्याकडे वाटचाल व्हावी,सर्वाना प्रगतिची संधि मिळावी, ज्याला जे हवे ते प्राप्त व्हावे, सर्वसमाज क्रमाने सुखी व्हावा, आणि त्याला ईश्वरनिष्ठ होता यावे अशी भूमिका आहे.

भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे !

पंचमहाभूताना एकमेकात, परस्परात मैत्री, आपलेपणाची, एकरुप राहण्याची , कार्यकरण्याची, कांही भौतिक नियमाप्रमाणे वर्तन करण्याची, अथवा होणार्‍या कार्य, हालचालीचे भौतिक पध्दतीने विष्लेषन करुन घेण्याची गोडी लागो, ही पंचमहाभूतांमध्ये सहकार्य रुजविण्याची फारच चांगली आवाहनात्मक साद ज्ञानेश्वरांनी घातली आहे. केवळ पंचमहाभुतामध्ये म्हणजे पृथ्वी, आप(पाणी द्रव), तेज(अग्नी, उष्णता, प्रकाश), वायु( हवा, हवेतील घटक वायु आणि इतर वायु) आणि आकाश ( आकाशाची पोकळी) या सर्वांमध्ये एकमेकाविषयी सहकार्याची भूमिका, असे नव्हे, तर पंचमहाभूते आणि सजीव सृष्टी यांचे मध्येही सामंजस्य, सहकार्याची, एकत्र राहाण्याची, काम करण्याची परस्परांवर विसंबण्याची, एकमेकांचे हित जोपासण्याची भूमिका हवी, असा ज्ञानदेवांचा आग्रह आहे.

पंचमहाभूतांच्या मैत्रीपूर्ण अभ्यासातून विविध शास्त्रांचा उदय.

या पंचमहाभौतिकांमध्ये आणि जीवनसृष्टीमधील विविध चमत्कारांचे निरीक्षण, विश्लेषण, अभ्यासकरण्याची आवड, पध्द्तशीरपणे निर्माण करुन, त्यांची शास्त्ररुपाने मांडणी करण्याचा उपक्रमसुध्दा सातत्याने करुन, वेगवेगळ्या खनिजांचा, पदार्थाचा शोध, गुणधर्म, शुध्दिकरण अशा विविधांगानी केलेला अभ्यास यामधून पदार्थाचे, धातुंचे एक वेगळे शास्त्रच बनले. पाणी व द्रव पदार्थाच्या अभ्यासाने द्रवीय शास्त्राचा उदय (Hydraulics) होऊन जलशास्त्रामधून नौकानयन , विमानविद्या यांचाही क्रमाने विकास होत गेला. त्याप्रमाणे सूर्यापासून व अग्निपासून मिळणार्‍या प्रकाश, तेज, उष्णता शास्त्र, प्रकाश किरणांचा, चुंबकीय क्षेत्र, प्रकाश, विद्युत लहरी यांचा अभ्यास करण्याची प्रेरणा, आंतरिक ओढ, निर्माण होत गेली. त्यामधून उर्जा, उर्जेची विविध रुपे, सौर, जल, वायु, आण्विक, विद्युकीय, औष्णीक शक्तींचा विकास व त्यांचे एकमेकांमधील परिवर्तन व ऊर्जेच्या अक्षयतेचा, गतीचा सिध्दांत असे एकन एक पदर उलगडण्याचा क्रम, अविरत शतकानुशतके मानवाला मोह घालून, पुढे पुढे विकास करीत राहाण्याची प्रेरणा देता झाला.

अभियांत्रिकी व तांत्रिक कौशल्य व शास्त्र यातून यंत्र संयंत्र विकास.

सर्व पंचमहाभूतांच्या गुणधर्माचा अभ्यास करुन, त्यांना एकत्र कामाला जुंपण्याचे महान कार्य अभियांत्रिकी तांत्रिक कौशल्याच्या आणि शास्त्राच्या आधारे, विविध प्रकारच्या यंत्रांचे संयोजन झाले. विविध गुणधर्मांचे धातु, विविध वायुंचे गुणधर्मानुसार वापर, त्यांचे दाब तापमान, धातुसारख्या गुणधर्मांचे कोष्टकानुसार, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा वापर, संयोजकतेने केल्यास, नियंत्रित स्वरुपात या पांचभौतिक शक्ती कशा एकत्र नांदतात व मानवाच्या उपयोगी व हितकर यंत्रांना जन्म देतात, हे पाहाणे अतिशय आनंददायक आहे.

सर्व प्रथम बाष्प यंत्र बनले. त्यामध्ये पाणी, उष्णता, बाष्प, तपमान, दाब, विशिष्ट धातुंचे विविध भाग, यामधून सरक पध्द्तीच्या हालचालीचे, गतिक रुपातील, भ्रमिक शक्तीमध्ये, बाष्प शक्तीचे झालेले संक्रमण व पुढे बाष्प शक्तीचे वापराने, बाष्पचक्रांच्या यंत्रांची निर्मिती ही आश्चर्ये माणसाच्या क्रमाने टप्प्यात येत गेली.

त्याच पध्दतीने पेट्रोल व डीझेल यंत्रांची रचना सुध्दा या पांचभौतिक शक्तीना एकत्र नियंत्रित स्वरुपात काम करायला लावून, आज सहस्त्र शेकड्यांची अश्व शक्ती निर्माण करीत असल्याची आश्चर्ये, आपला स्थायीभाव बनली आहेत. अशी कित्येक यंत्रे, उपयंत्रे, साधने, वस्तु या पांच भौतिक तत्वांचे शक्तीचे वापराने, आपण आज प्रचारात आणली आहेत.

“ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे " याचा या वरील भूमिकेतून मागोवा घेतला तर शास्त्रीय, तांत्रिक प्रगतीचा विलक्षण पटच आपणापुढे उलगडला जातो आहे आणि तो पुढे पुढे अजून उलगडतच जाणार आणि सृष्टीच्या गूढ रहस्यावर आधिकाधिक प्रकाश पडणार, असे आज भूतकालातून भविष्याकडे पाहाताना, आपणास दिसून येते.

दुरितांचे तिमर जावो !

विश्वभरातल्या दीन, दुबळ्या, दलित, दरिद्री, दबलेल्या, गुलामगिरीत पिचणार्‍या मजुरांचे, सावकारांच्या पाशात अडकलेले दरिद्री गरजू, धार्मिक वर्चस्वातून पिळविला जाणारा समाज, किमान मिळकतीसाठी शरीर विक्रयाप्रमाणेच जणू १८ तास काम करणारा, घाणीच्या साम्राज्यात राबणारा मजूर वर्ग, बाल कामगार, चार भिंतीत वर्षानुवर्षे कोंडला गेलेला, पुरुषी वर्चस्वाखाली भरडला जाणारा स्त्री समाज आणि तोही अखिल विश्वपटलावर वावरणारा, असा समाज म्हणजे दुरितांचे केवढे मोठे डोंगर उपसणारा अभागी समाज, ज्ञानेश्वरांच्या नजरेत होता. परकीय आक्रमणाखाली पिचणारा अभागी समाज तर त्यांनी भारतभर फिरुन पाहिला होता. धार्मिक वर्चस्वाखाली सामान्य माणूस म्हणूनसुध्दा जगणे किती असह्य होते, हे तर ती चार भावंडे व त्यांचे आईवडील कित्येक वर्षे सोसत होते. असा दुरित पाहून, त्यांच्या भावना अतिशय दु:खी अंत:करणाने शरिराच्या सीमापार जात होत्या.गुलामांचा व्यापार व त्यांचे काबाडकष्ठही त्यानी, भारत यात्रेत पाहिले होते. द्लित बांधवांना अन्नपाण्यासाठी जनावरांपेक्षाही हाल सोसावे लागल्याचे, त्यांनी पाहिले होते.

इंग्लंडमध्ये खाण मजूत खाणीतून पाणी काढ्णे, खनिज माती काढणे, माती उकरणे अशा विविध कामा साठी हजारोंच्या संख्येने, एकाद्या यंत्राच्या, शिस्तीने अहोरात्र राबत होता. जहाजांचे नौकानयन समुद्रावरील सफरीमध्ये, हजारो गुलाम, मालवाहातुक व नौका वल्हविण्याचे कामसुध्दा असेच अव्याहत करीत असत. त्याना चाबकाच्या फटकार्‍यावर, मिळणार्‍या तुकड्यावर,व तोकड्या कपड्यावर, निर्वाह करवा लागे, तो केवळ राबविण्यासाठीच !

हे विश्वाचे आर्त त्यांच्या मनी प्रकटले होत्ते व त्याचा निरास करण्याचा, ते आर्त, दैन्य, दु:ख, दारिद्र्य नष्ट करण्याचा त्यांचा संकल्प फारच मोलाचा होय. त्यासाठी केवळ दुष्टांचे मनपरिवर्तन, स्वधर्म पालनाच्या योगाने होणारे मानवी परिवर्तन उपयोगाचे नव्हते. “सर्वत्र मांगल्य नांदो " ......... म्हणून भागणारे नाही.

शरीरश्रम निर्माण करणारी साधने निर्माण करणे गरजेचे होते.

काबाडकष्ट, शरीरश्रम, हे विविध कामातील अविभाज्य भागच होते. शेत नांगरणी, खुदाई, माल वाहतूक, पाणी वाहणे अशी हातापायांच्या योगाने काम करण्याची यादी जगभर भली मोठी होती. या काम करण्याच्या पध्दतीला पर्याय शोधणे व श्रम कमी करणारी यांत्रिक अवजारे, उपकरणे तयार करणे, हा त्यावर उपाय असावा.

खाणीत हजारो गुलाम कामाला लावूनसुध्दा, पाझरणारे पाणी हटत नसे, पाणी काढून खनिज काढणे, ही मोठी समस्या होती. पखाली घेवून, गुलाम ते पांणी अखंडीतपणे काढीत असत १७०० सालच्या सुमारास न्यू कोमेनने बाष्पचलीत यंत्रावर पंप चालवून, पाणी काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तेव्हापासून पाणी उपसण्याच्या पंपासाठी बाष्पयंत्राचा वापर चालू झाला. त्या आधी १२ - १३ व्या शतकात जलस्त्रोत वापरुन, जल हातोडा वापरुन लोंखंडी हत्यारे बनवीत असत. तसेच मका दळण्याची गिरणी सुध्दा चालवीत असत. बाष्प यंत्राचा वापर अशा रितीने विविध तर्‍हेची काम करण्यासाठी होऊ लागला. पण ही यंत्रे कार्यक्षम नव्हती. १७८०मध्ये जेम्स वॉटने सुधारित बाष्प यंत्र विकसीत केले आणि त्यानंतर२५-५० वर्षातच रस्ते तयार करण्याचे बाष्पयंत्र, मालवाहतुक व माणूस वाहातुक करणारी रेलगाडी तयार झाली. १८१० मध्ये बोटीवर स्टीम इंजिन बाष्प यंत्र बसवून, जहाजे समुद्रातून संचार करु लागली.खाणीतून पाणी काढणे, माल वर चढविणे व उपकरणी, करणी, अशी विविध कामे बाष्प यंत्रावर होऊ लागली व दुरितांचे तिमीर , नष्ट्चर्य घालविण्यास, व्यवहार्य मार्ग सापडला.

ही सर्व यंत्र विकासाची वाटचाल " दुरितांचे तिमीर जावो " , या संकल्पाला धरुनच, विश्वाचे आर्त निवारणासाठी, निर्माण झाली. ती बनविणारे कर्मकार, तंत्रज्ञ, स्वयंप्रेरणेतून, निसर्गाचे दूत बनूनच जणू, चालत्या कल्पवृक्षांच्या उद्यानातून, काम करणारे लोक होते, चिंतिलेले देणार्‍या चिंतामणी रत्नांच्या गावाचे रहिवासी होते, आणि त्यांनी पीयुषाचा सागर बोलता केला.

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो !

विश्वातील सर्व वस्तुजात चराचर सृष्टीला, पंचमहाभूतासह जीवसृष्टीला, जणू स्वकर्तव्याची जाणीव करुन देऊन, स्वकर्तृत्व व्यक्तिगत व सामूहिक विकासासाठी, व्यक्ती आणि समाज आपापल्या कर्तव्याच्या जाणिवेनुसार परस्पर सहकार्याने, “ एकमेक करु सहाय्य, अवघे धरु सुपंथ " असे म्हणून प्रगतिपथावर राहाण्याचा संदेश दिला आहे. आपापल्या गुणदोषांची जाणीव परस्परांना असण्याचे योगे, स्वधर्मरुपी सूर्याच्या प्रकाशात, विश्वाला प्रगतीची वाट सापडो, अशी ही भूमिका मांडून, जणू विश्वातील सर्व वस्तुजातांना, स्वधर्म शोधण्याची हाकच त्यांनी दिली आहे. त्या नंतर संशोधक वृत्तीने, नव्याचा वेध, शोध आणि बोध घेण्याच्या ध्येयाने, ईर्षेने, प्रेरित होऊन जगभर व्यक्ती आणि समूहरुपाने फिरणारे गट यांनी, पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश यांचा सर्वकश शोध घेण्याची मोहीम अखंड चालली आहे. या मोहिमेतून उलगडले शास्त्राचे नवनवीन सिध्दांत ! आणि नवनवीन वस्तु, पदार्थ, यांच्या गुणधर्मानुसार संयोजन करुन नवनविन वस्तू साकरण्याची, संरचना करण्याची, बौध्दिक आणि कार्मिक पध्द्ति साकार झाली ! अशातूनच " जो जे वांछील ते ते लाहो प्राणीजात" हे सूत्र उलगडत गेले व प्राणिमात्रांच्या दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या गैरसोईतून, सोय शोधण्याचे योगे, सुख निर्मिती होण्यासाठी, छोट्या मोठया वस्तुंचा, साधनांचा विकास होण्याची, वस्तुनिर्मितीचा, वस्तुविकासाचा महामार्गच जणू विकसित होत गेला.

स्वधर्म शोधनातून- सृष्टीरचनेचे गूढ शोधण्याचा प्रवास

सृष्टिरचनेचे गूढ शोधण्याच्या कल्पनेने जवळ जवळ दोन तपे अमेझॉन नदीच्या खोर्‍यात, आफ्रिकेच्या जंगलात राहून पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पति, जलचर अशा सर्वांचा सूक्ष्म अभ्यास करणारा डार्विन हा संशोधक व त्याने केलेले विस्मित करणारे, निरीक्षणांतील उत्क्रांति वादाचे सिध्दांत रुप, विश्व स्वधर्म सूर्य रुपे पाहो या तत्वाचे फार सुंदर उदाहरण म्हणायचे. दक्षिण ध्रुवावरील वॉल्टर स्कॉट्ची मोहीम, सहारा व ऑस्टेलियातील काढलेल्या मोहिमा, जगभर संचार करणार्‍या धाडसी खलाशांची सागरी साहसे व त्यातून उलगड्लेले ज्ञान हे सर्व थक्क करणारे आहे.

जो जे वांछिल तो ते लाहो ! प्राणिजात !!

अचेतनाला चेतन रुप देऊन साधनांचा विकास झाला.

ज्ञानेश्वर आणि नामदेव इत्यादि संत उत्तर भारत यात्रेला गेले होते. त्यावेळच्या प्रवासांतील एक गोष्ट प्रचलित आहे. वाळवंटी प्रदेशातून जात असतांना त्यांना खूपच तहान लागली व म्हणून पुढे जाताना एक खोलवर पाणी असलेली विहीर त्यांना दिसली. ज्ञानेश्वर म्हणाले " नामदेवा, मी योगसामर्थ्याने खाली जावून पाणी पिऊन येतो, “ तेंव्हा नामदेव म्हणाले " माझा प्राणसखा विठू मला विहिरीतून पाणी वर काढून देईल, असा माझा भक्तिमहिमा आहे..” दोघानाही योग भक्तिसामर्थ्याने पाणी मिळाले. आपणास आज तरी अशा सामर्थ्याचे, शक्ति संक्रमणाचे, ऊर्जा संक्रमणाचे वैज्ञानिक पध्द्तीत बसणारे सूत्र माहिती नाही. पण ज्ञानेश्वरांच्या " जो जे वांछील तो ते लाहो.” या संकल्पाप्रमाणे तहान लागल्यावर विहिरीतून पाणी काढण्याचे तंत्र विकसित झाले. कारण सामान्य माणसाच्या इच्छा, फलद्रूप व्हायच्या, तर त्या सृष्टिनियमात बसणार्‍या ज्ञात अशा, पांच महाभौतिक तत्वाच्या वापरातून, निर्मित अशा, सर्वांना सहज साध्य अशा साधनांच्या वापरातूनच होणार व त्यासाठी तंत्रा-विज्ञानांच्या विकासाच्या संयुक्त वापरातून तयार झालेले वस्तु निर्माण उत्पादन तंत्रशास्त्र विकासाच्या उपक्रमाची वाटचाल, हळूहळू पण निश्चित स्वरुपाने गेल्या ८०० वर्षात कशी यशाप्रत गेली हे आपण पहातोच आहोत. ज्ञानेश्वरादि भावंडानी चांगदेव व्याघ्रारुढ होऊन भेटायला येतो आहे, असे पाहून, ते बसलेली भिंतच त्यांनी चालती केली. चांगदेव जिवंत प्राण्यावर हुकूमत गाजवितो, तर या भावंडांच्या सामर्थ्याने, अचेतनालाच चेतन केले. या दोन्ही गोष्टी, सामान्य माणसाला अशक्यच ! मांडे खायची इच्छा झाल्यावर मुक्ताईने त्यांच्या पाठीवर मांडे भाजले ! या गोष्टीतील अगम्य, अतर्क्य भाग, सामान्य माणसाला साध्य होणार नव्हता व नाही. मात्र त्या इच्छा सामान्य माणसाला लागणार्‍या गरजातून आवश्यक अशा वस्तु विकासातून, “ जो जे वांछील तो ते लाहो" चे अवाढव्य वस्तुरुप आज आपण जगभर कसे व्यापून आहे हे पाहातोच आहोत.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color