पसायदान-१
लेख़क प्रा. भालचंद्र दामोदर केळकर   

“पसायदान" एक अधिभौतिक अभ्यास

पसायदानाने कार्यक्र्माची सुरुवात अगर सांगता.

पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता होईल, या पध्दतीने शाळेत असल्यापासून पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन जीवनाच्या विविध टप्यांवरील वाटांवर, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा उपक्रमातील कार्यक्रमांची सुरवात अगर संपन्न होताना, अतिशय पवित्र, रसाळ, ओजस्वी, चेतनामय वातावरण निर्माण करुन, सर्वानाच एक आंतरिक समाधान देणारे, उत्कृष्ठ काव्य म्हणून, पसायदानाचा परिचय आहे. कित्येकांच्या दैनंदिन पूजापाठातसुध्दा ते वर्षानुवर्षे बसलेले आहे. केवळ नित्य पठनानेसुध्दा जीवनातील मरगळ निघून जावून चैतन्य लाभावे, अशा तर्‍हेची ध्वनिनिर्मिती रचना, म्हणूनसुध्दा पसायदानाचे वैशिष्ट्य उल्लेखनीय आहे. अशा रितीने पसायदानाच्या नित्य, प्रासंगिक, भक्तीपर पठनातून सर्वानाच ह्ळू हळू उलगडत जाणारा त्यातील अर्थ, सर्वजण सुखी होवोत, सर्वांचे कल्याण व्हावे, दुष्टांचे पारिपत्य व्हावे, त्याना सद्वविचार सुचावेत, दु:खीतांच्या जीवनातील अंधार नष्ट व्हावा, अखिल प्राणिमात्रांना मागेल ते, ईच्छेला येईल ते मिळावे, डागरहित चंद्र, तापरहित सूर्य, सर्वांशी सज्जनतेचे नाते सांगणारा व्हावा, आदीपुरुषाचे भजनपूजन करणारास तिन्ही लोकांतील सर्व सुखांची प्राप्ती होवो...... अशा तर्‍हेचा कमी जास्ती अर्थ समजून, त्या अर्थातून, आपल्या अडचणीतून, कष्टातून, दु:खातून, वाईट प्रसंगातून, वाट शोधणारास नक्कीच आशेचा किरण सापडत आलेला आहे.

केवळ अध्यात्मिक नव्हे तर सर्वांगीण विकासाचा संकल्प.

पारंपारिक पघ्दतीने पसायदानाचा अर्थ, हरिदासी थाटातील कीर्तनातून, प्रवचनातून, व्यासंगी, विद्वत्ताप्रचुर लेखनातून, वाचनात आला आहे. त्यामधून स्पष्ट होणारा आध्यात्मिक स्वरुपाचा अर्थ, हा सुध्दा ज्ञानेश्वरांचे विचार वैभव, सौदर्यपूर्ण काव्य रचना आणि सखोल विचाराने युक्त अशी एकूण मांडणी विस्मयकारक आहे. पण असा अध्यात्मिक स्वरुपाचा अर्थ समजून त्यातील संदेशाचा उपयोग आत्मिक, वैयक्तिक उन्नति करुन घेण्याची क्षमता समाजातील किती टक्के समुदायास होणार? असे कोडे कायम पडत आले आहे. अशा समजेप्रत जाणारा समाज १०,००० ( दहा हजार) मध्ये एक एवढ्या प्रमाणातसुध्दा असेल काय? म्हणजे सहाकोटी मराठी बांधवापैकी केवळ ६००० लोकांनाच आपली उन्नत्ती करुण घेण्याचा, त्याचा अर्थ समजून, उमजून समाधान मिळविण्याची संधी मिळणार काय ? असा प्रश्न पडतो.

ज्ञानेश्वरांसारख्या अत्युच्य प्रतिभा शक्तिच्या, प्रत्युत्पन्नमती बुध्दीमान तत्वज्ञ सर्वोच्य अध्यात्मिक उन्नत्ति गाठलेल्या महामानवाची बौध्दीक झेप,विश्वनियंत्या परमेश्वराजवळ केवळ अशा तर्‍हेच्या मर्यादित अर्थाचे मागणे मागून स्वस्थ बसेल काय ? १/१०० टक्के समाजाचे हितामध्ये सर्व समाजाचे हित उन्नत्ती सामावलेली आहे काय ? असा प्रामाणीक प्रश्न पडतो. विश्वात्मक जाणीव घेवून, अखिल विश्वातील चराचर सृष्टीचे कल्याण चिंतणारे महायोगी महामानव, उर्वरीत समाजाला त्या अध्यात्मिक उंचीस पोचे पर्यत आशेचे जीवन व्यतीत करुन वाटच पहाण्याचा मार्ग केवळ शिल्लक रहावा काय? ज्ञानाचे ईश्वर असणार्‍या, अतिशय प्रतिभासंपन्न, महाविद्वान, महायोगी, विचारवंतांचे लिखानातील शक्ती, अखिल विश्वातील मानवजातीचे भवितव्य उजळविण्याची, सर्व समाजाचे उन्नयत करण्याची, त्यांचे जीवन सुसह्य होऊन, ईशशक्तीचे, आदिपुरुषाचे मनन,चिंतन करण्याची, किमान भौतिक पात्रता आणून देण्याची, तर नक्कीच असणार. “ विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले " असे म्हणून " अवघेची झाले देह ब्रम्ह " या पदावर पोचलेल्या ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील संकल्पाची शक्ती, अशी लोक विलक्षण असणारच, की त्यामुळे विविध देशातील, प्रांतातील, खंडातील मानव समाज, दुष्ट राज्यकर्ते, समाजकंटक, समाजद्रोही शक्तींच्या कचाट्यातून मुक्त व्हावा, अशा सर्व क्षेत्रातील ( कुटुंबापासून समाज, प्रांत, देश,खंड, पातळीवरील चढत्या क्रमात ) दुराचरणी लोकांची खोड जिरुन त्यांना सद्विचार, सदाचार यातील गोडी वाढावी, दुष्टाचे दुष्टपण जाऊन, सुष्टपण अवतरावे. त्यांच्या ईशशक्तीला केलेल्या मागणीत, केवळ सजीवच काय, तर पंचमहाभूतांनासुध्दा एकमेकांचे परस्पर मैत्री सहकार्य, सामंजस्य लाभून त्यांनी सृष्टीच्या विकासाला हात भार लावावा. मानवाची अध्यात्मिक उन्नत्ती व्हायची तर त्याचे दैनंदिन जीवनांतील काबाड्कष्ट निवारण्यासाठी, दीन, दु:खी, दलित, नाड्लेल्या, पीडीलेल्या, मानवी हक्क नाकारलेल्या, स्त्री पुरुष समाजाची भौतिक उन्नत्ती व्हावयास हवी ना ? अशा दुरित समाजाची तिमिरातून वाट काढून वर आणण्याची गरज, पंचमहाभूतांच्या मानवी सह्कार्यातून भरुन काढता येणार नाही काय ? असा संकटातून, दुरितातून मुक्त झालेला समाज सुखाचा श्वास घेऊन जीवनामध्ये स्वधर्म स्वकर्तव्यास अनुसरुन जीवनाची वाटचाल, स्वकर्माधारेच स्वधर्माच्या सूर्यप्रकाशात पाहू शकणार नाही काय ? अशा जीवनाच्या वाटचालीत किमान जीवनावश्यक सुखसोईंची गरज भागविणार्‍या वस्तु साधन-साहाय्याची ईच्छा पुरविणार्‍या गोष्टींची कामनापूर्ती, पसायदानाच्या या संकल्पातून होऊ नये काय?

असे इच्छित, आवश्यक ते ते सर्व लाभलेल्या समाजास, सर्व मांगल्याचा वर्षाव झालेल्या समाजास, केवळ भौतिक सुखाच्या खोड्यातून वर काढण्यासाठी, अंतिम अध्यात्मिक उन्नतीस प्रेरित करण्यासाठी, ईश्वर निष्टाच्या मांदियाळीची, विविध गटातील वैचारिक, तात्विक अध्यात्मिक समुदायाची, वारंवार भेट घडून, अखिल जगतामधिल ईश्वरी जाणीवा, आपल्या जीवनात अवतरण्यासाठी, उत्सुक समाजाला, जीवन उजळून निघण्याच्या अध्यात्मिक जीवन बैठकीची जोड देण्यासाठी, ईश्वरनिष्ठ संतसमुदायाची गरज तर फार मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. भासत आहे.

चालत्या कल्पवृक्षांचे समुदाय, बागांच्या बागा, भासावेत. चैतन्यमयी इच्छिलेले देणार्‍या चिंतामणी रत्नांची गावेच्या गावे भासावीत, बोलते दुधाचे सागरच भासावेत, असे संताचे थवेच्या थवे, डागविरहीत चंद्राची शीतलता आणि तापरहित सूर्याची उर्जा देणारे, असे संताचे समुदाय सर्वमानव समाजाला जवळचे नातलग भासावेत....

अशा प्रकारच्य़ा संत या शब्दाबरोबरीने, तंत्रशास्त्रज्ञ हा शब्द वापरल्यास, त्यातून निघणारा अर्थ, कमालीचा आश्चर्यकारक, वस्तुस्थिती निदर्शक वाटावा अशी स्थिती जगभर आज आहे.

कल्पना करेल ते देणार्‍या कल्पवृक्षांच्या बागा म्हणजे, सृजनात्मक संरचातून नवनविन वस्तुसाधने निर्माण करणारे तंत्रशास्त्रज्ञांचे समूह नव्हेत काय ? आज असे अनेक समूह जगभरातील विविध औद्योगिक कार्यात गुंतलेले आहेत.

चिंतिलेले देणारे, चिंतामणी रत्नांचे गांवच जणू वाटावे, असे तंत्रशास्त्र्ज्ञांचे, तंत्रज्ञांचे, शास्त्रज्ञाचे गट आपल्या सामूहिक कार्याचे रुपाने, लहानमोठे प्रकल्प उभारुन, त्याव्दारे आवश्यक त्या सोई, सुविधा उपलब्ध करुन देणारे, असे निर्माते समूह नव्हेत काय ?

अमृताचे बोलते सागरच जणू वाटावेत असे दृकश्राव्य कार्यक्रमाचे विविध स्त्रोत भासावेत असे साहित्य, शास्त्र, संगीतादी उपक्रमांच्या साहाय्याने ज्ञान देणारे कार्यक्रम, उपग्रहमालीका, संगणक मालीकातर नव्हेत ना ?

अशा तर्‍हेने अत्युच्च कोटीतील सर्जनात्मक पध्द्तीचे, अनेक प्रकारचे कार्य, नजरेपुढे आणणारे हे विलक्षण सामर्थ प्रगट करणारे कल्पतरु, चिंतामणि रत्न आणि बोलते पियुष सागर म्हणजे अंतराळस्थानके, वीजनिर्मिती केंद्र, जहाजे, विमाने... अशा किती नवनविन कल्पनांचे उगमस्थान या ओव्यामधून प्रगट झाले आहे.

चंद्रमी जे अलांछन ! मार्तंड जे तापहीन !
ते सर्वाही सदासज्जन ! सोयरे होतु !!

डागरहित चंद्र्प्रकाश आणि सूर्यप्रकाशातील तापरहित उर्जा सज्जनाप्रमाणे साहय्यकारी, आपलेपणाने, जनते बरोबर असोत अशा तर्‍हेचे हे मागणे, म्हणजे सौरचंद्र शक्तीचे, ऊर्जेचे, पवनऊर्जेचे साधनच मांडले आहे, असे नव्हे काय? सूर्यचंद्रामुळे भरती, ओहोटी, हवेचे जास्त कमी दाब निर्माण होण्यातून, पवन ऊर्जा साकारते, अशी ही ऊर्जाच मानवजार्तीला उपकारक असावी. उपग्रहांचे, अवकाश स्थानकांचे सहाय्याने ऊर्जा साधनांची निर्मिती तर यातून साकारली आहे काय ?

किंबहूना सर्वसुखी ! पूर्ण होवोनी तिन्ही लोकी !
भजि जो आदिपुरुखी ! अखंडित !!

सर्व जगामध्ये तिन्ही लोकामध्ये, सर्व सुखे मिळवून आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट झालेल्या मानवाने, अखंडितपणे, सातत्याने, आदिपुरुषाचे, आद्यजीवन प्रणालीचे, विश्वाच्या आदिशक्तीचे चिंतन, मनन करावे, अशा तर्‍हेचा हा क्रम फारच मनोहारी आहे. जीवन पूर्ण रुपाने, संतुलितस्वरुपात, सर्व तर्‍हेने संयमित रीतीने उपभोग घेऊन आत्मतृप्ती झाल्यावर, आदिपुरुषाचे चिंतन करण्याची धारणा होणे, सुकरता येणे, हे तर सुसंगतच होय.

आणि ग्रंथोपजीविये ! विशेषी लोकी इये !
दृष्टादृष्टविजये ! हो आवे जी !!

या जगामध्ये विशेषरुपाने, ग्रंथाच्यासहाय्याने ज्ञानसाधना, ज्ञानप्रसार, ज्ञानवृध्दी यासाठी सतत चालणारे उपक्रम, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन केंद्र, यामधून ज्ञानसाधना चालण्यासाठी, एक मोठा ज्ञानसाधना करणारा वर्ग विस्तारला आहे, चर्चासत्रे, वादविवाद, संशोधन प्रकल्पांचे, प्रारुपांचे, वाचन, या रुपाने सदैव बाहेर येणारे नवनवीन साहित्य, ग्रंथरुपाने, मोठ्या प्रमाणांत प्रसार पावत आहे. ज्ञानसाधनेची एक विराट चळवळच जणू यातून साकारते आहे. व त्या ज्ञानाचे माध्यमातून अनेक प्रकारच्या दृष्ट आणि अदृष्टाचे वेघ घेणारे, अनंताचा अभ्यास करणारे प्रकल्प, विश्वनिर्मितीमागील ईशतत्वांचा वेध घेणारे प्रयोग, साकारत आहेत. अदृष्टावर विजय मिळविणारे, अनेक अवकाश आभ्यासाचे, उपग्रह चालनाचे विषय, आज साकारले जात आहेत.

अध्यात्मिक आणि तंत्रवैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास

पसायदानच्या पारंपारिक अर्थाबरोबरच तंत्रवैज्ञानिक पध्दतीने उलघडणारा अर्थ कदाचित, हास्यास्पद वाटावा, इतके आजवर आपण त्या पारंपारिक अर्थामध्ये बुडून राहिलो. किंबहूना पारंपारिक अर्थ अध्यात्मिक स्वरुपाचा आहे व समांतर पध्दतीने परस्पर विकसित होत गेलेला तंत्रवैज्ञानिक पध्दतीचा अर्थ, ज्ञानेश्वरीच्या नाण्याच्या दोन बाजूच म्हणून पाहाण्याचा विचार, आपण कधि केलाच नाही. तिसरा अर्थ म्हणजे ज्ञानेश्वरीवर गाढ, नितांत श्रध्दा ठेउन त्याची भक्तिभावाने पारायणे करुन खरोखर त्यातील एक तरी ओवी अनुभवावी, असे म्हणणारा समाज, मोठ्या प्रमाणावर आहे. हा आधिदैविक अर्थ, असे म्हटल्यास अध्यात्मिक, अधिभौतिक व आधिदैविक असे अर्थ आपणा समोर असल्याचे जाणवते. भौतिक अर्थ लावून आजच्या जगा कडे पाहिले तर, गेल्या ८ शे वर्षात पसायदानाचा अर्थ कसा जगभर साकारत गेला आहे. हे आश्चर्यकारक सत्य नजरेसमोर येते.

आज पसायदानाचे औचित्य काय ?

आज पसायदानाचे औचित्य काय आहे ? काय असू शकते ? असा प्रश्न सर्वसाधारणपणे पडू शकतो, असे दिसून आले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानानं घेतलेली झेप मोठी आहे. मनोवेगाने त्यात वाढ होते आहे. नवनविन वस्तु, साधने, सोई यंत्रे, मानवी जीवनात येत आहेत, क्रांतिकारक परिणाम करीत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जीवनात आत्यावश्यक अशा प्राथमिक गरजांची पूर्तता केलेली आहे. सर्वसामान्यांच्या, सर्वोच्य, हिताची, सुखाची, साधने देऊन, जीवनाचा दर्जा उंचावण्यास नक्कीच मदत केली आहे. पण आता ज्या पध्दतीने विज्ञान तंत्रज्ञान विकासाचा वेग वाढतो आहे, तो पहाता, एकूण प्रवास पुढील वाटचाल कशी होईल, वाटचालीचा वेग कोणाच्या आवाक्यात राहील, किंवा कसे ? त्याची प्रचंड शक्ती, संरक्षणासाठी ? की सवंर्धनासाठी ? की जीवनविकासाटसाठी ? की सृष्ठीची रचना उलगडण्यासाठी ? की सर्वसंहारासाठी ? असा संभ्रम निर्माण होवू पाहात आहे. हा प्रश्न विज्ञानाचा नसून माणसाचा आहे. माणसाच्या सारासार विवेक बुध्दीचा, धर्मशिलतेचा, सुष्ट-दुष्ट शक्तीच्या संघर्षातील निर्णायक मानवी विजयासाठी आवश्यक असा ईशशक्तीच्या पाठिंब्याचा, अथवा सहकराचा ! आणि अशा तर्‍हेच्या द्वंद्वात, अध्यात्मिक शक्तीच्या समांतर संवर्धनाची, जवळीकिची, आपुलकीची व जाणीवपूर्वक जोपासनेची गरज आहे. आणि त्यासाठी आवश्यकता आहे " ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीची !” जगात ज्या ज्या वेळी असे निर्णायक संघर्षाचे ट्प्पे आले, त्या त्या वेळी ईशशक्तीच्या अवतरणाने, सुष्ठ शक्तीचा विजय होत गेला आहे. रामायण, महाभारत आणि अगदी पुराणकाळापासून, मध्ययुगीन, अर्वाचीन आणि आघुनिक काळाचा विचार करताना, असे खूप दाख्ले आपणास देता यावेत अशी स्थिती आहे. जगभर जेव्हा जेव्हा अशा आसुरी, विनाशकारी, शक्तींची भरभराट होण्याचे प्रसंग आले, तेव्हा, तेव्हा, सुष्ट शक्ती एकवटून त्यांच्या प्रयत्नाने “ खळांची व्यंकटी सांडो &“ हा संकल्प सिध्दीस गेला आहे.

अखिल जगाचे, एकीचे, सुखी, सुंदर, आदर्शवत चित्र काढावे आणि ते अधिकाधिक सुंदर,संपन्न, उत्तम, उदात्त, उन्नत असे होत जावे, अशी स्थिती आज विविध पध्दतीच्या वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानीक संदर्भाने आली आहे. मात्र त्याच बरोबर, दुष्टप्रवृत्तीच्या, वाईट विचारांनी ग्रासलेल्या शक्ती, याच वैज्ञानिक संपन्नतेचा वापर करुन, एक प्रकारचा विनाशकारी संघर्ष उभा करुन पाहत आहेत. दैवी आणि आसूरी शक्तीचा असा हा संघर्ष सतत चालत आलेला आहे. या दृष्टीने तो सनातन आहे. मात्र या प्रवासात विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती, व्यापार सामजीक जीवन, यांच्यावर सध्दर्माचे नियत्रंण हवे. दैवी संपत्तीच्या शक्ती असलेल्यांकडे, राज्य शकटाची सूत्रे असायला हवीत. तरच हे प्रचंड भौतिक सामर्थ, सर्वजनाच्या सुखासाठी, हितासाठी, उपयोगात आणने शल्य होईल. ब्यवहारातील राजकिय, सामजिक, सांस्कृतिक औद्योगिक, ब्यापारी क्षेत्रात काम करणारी मंडळी, स्वधर्म, निष्ठा जपणारी असली पाहिजेत. त्यामुळेच ती प्रसंगी निकराचा सामना करुन, दुष्ट शक्तींचे परिवर्तन, अगर निर्दालन करुन, त्यांना सत्कर्माकडे वळवू शकतील.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत !
अभ्युत्थन्मर्धस्य तदात्मानं सृजाम्यहम !!

या गीतेतील सिध्दांतानुसार विश्वाचे नियमन, संतुलन, राखणारी परमोच्च शक्ती, अशा निर्णायक अटीतटीच्या प्रसंगी, सध्दर्माच्या बाजून उभी राहते व पुन्हा सुष्ट शक्तीच्या धाकात, दुष्ट प्रवृत्ति शांत पावतात. नामशेष होतात.

आज विज्ञानाचा उपयोग विनाशकारी अस्त्रे, जैव पध्दतीने प्रतिसृष्टी निर्मितीचे प्रयत्न, अवकाश योजनातून, संहारक शक्ती आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न, अण्वस्त्रांची स्पर्धा, रासायनिक अस्त्रनिर्मिती असे प्रयत्न चालू आहेत. अशा विनाशक प्रवासाच्या पार्श्वभूमिवर आपणाला, मानव जातीला आश्वासक आधार म्हणून, गीता ज्ञानेश्वरी या सारख्या नित्यनुतन, चिरंतन स्वरुपाच्या धर्मजागरण शक्तींचा संदर्भ, स्वधर्माचरणाचा संदेश, मनोबल देवून, व्यक्ती व्यक्तीच्या मनात धर्मज्योत जागविण्याचे काम, सतत करत राहावे लागणार आहे. “ खळांची व्यंकटी सांडो” “ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ” या पसायदानतील (खात्रिने प्रभावकारी) तत्वांचा अंमल विश्वधारणेमध्ये होईल, याची ग्वाही देत आहे. मात्र त्यासाठी जागरुकपणे स्वकर्तव्यतत्परता, स्वधर्मनिष्ठा याबाबत तत्पर राहून कार्य करत राहणे, आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरी, गीता हे ग्रंथ निरंतर, कालनिरपेक्ष, चिरंतर स्वरुपाचे तत्वज्ञान, जनमानसात जागवण्याचे, रुजविण्याचे कार्य करीत असतात. त्यामुळे पिढ्यान पिढ्या अन्याय, अधर्म, अनिती अत्याचार यांचा जुलूम सहन करुन, त्यांना तोंड देवून पुन्हा पुन्हा सुष्टपणे, धिराने, वीर्याने उभे राहून, सध्दर्माचे रक्षण करुन, सत्य, न्याय नीति यांचे राज्य प्रस्थापित होत आले आहे. हा संघर्ष अखंड चालत आलेला आहे, त्यात सदैव धर्माचा होत असतो, हे प्रस्थापित झाले आहे गीता ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, त्याचा पुरस्कार, प्रसार करणारे संत, सज्जन, धर्मनिष्ठ व्यक्ती, सत्शक्तीना बळ देत असतात, त्यांना प्रेरणा, आश्वासन देत सन्मार्गावर राहण्यास मदत करीत असतात. या ग्रंथामधून मांडलेला विचार, समाजातील व्यक्तिव्यक्तींच्या मनात सद्द्विचार राखून, कार्य वाढवीत असतात ? संकटसमयी ईश्वरावर, सत्यावर निष्टा ठेवून स्वकर्तव्य़ पार पाडण्याची प्रेरणा देत असतात.

 

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color