फुलांचे वैभव
लेख़क अरविंद देशपांडे   


अलिकडे फुलांना अर्थशास्त्रीय महत्त्व प्राप्त झालेय. त्यातूनच फुलं शेतीची संकल्पना साकार झालीय. वेगवेगळ्या जातीच्या आणि रंगाच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्यात. पण फुलांची विक्री ही संकल्पनाच मान्य नसलेल्या त्या काळात फुले ही देण्यासाठीच असतात, सुगंध वाटल्याने वाढतो या कल्पनेत असलेल्या काळात फुलांचा आनंद न्याराच होता.

आषाढ श्रावण म्हणजे फुलांचा महिना। निरनिराळ्या फुलांच जणू संमेलनच । जीवन कस जगाव याच मुंर्तीमंत उदाहरण म्हणजे ही फुलं. आपल्या इवल्याशा जीवनात सारा आसमंत सुगंधित करणारी ही फुलंच असतात. हवी हवी वाटणारी आणि मनाचा गाभारा सुगंधित करुन यच्चयावत सृष्टी आनंददायी करण्याच सामर्थ एकट्या फुलात असतं.

‘ अश्रूची झाली फुल ’ या नाटकात प्रा. विद्यानंद, लाल्याला पारिजातकाची फुलं देतो आणि या फुलासारखा सुगंधित हो असा आशिर्वाद देतो आणि या फुलांच्या सुगंधाप्रमाणे लाल्याच्या जीवनात बदल घडतो हे मोठ्या ताकदीने नाटककाराने दाखविले आहे. फुलांचे आणि माणसांचे नाते असेच अनादी अनंत.

लहानपणी आमचे परसदार म्हणजे अशा विविध फुलांची मैफल होती. वडिलांना वेगवेगळी झाडे-वेली आणायचे आणि परड्यात लावायचे. भलं मोठ परसदार वेगवेगळ्या फुलांनी श्रीमंत व्हायचं. त्यानी मधुमालतीचा वेल मांडवावर बहरुन यायचा. त्याचा अनोखा सुगंध आणि त्याचे मनोहारी स्वरुप मनाला मोहवून टाकायचे. गल्लीतील आणि गावातील पोरी फुलांसाठी तुटून पडायच्या. गजरा घालून आलेल्या त्या मुली म्हणजे पुष्पराणी वाटायच्या. त्यांच्या चेहर्‍यावरील प्रसन्नता पाहून आईही प्रसन्न हसायची.

पहाटेच्या वेळी सारं अंगण पारिजातकाच्या फुलांनी सजायचं, पारिजातकाची नाजूक फुले परडीत गोळा करता करता परडी अपुरी पडायची, त्याचे लालसर देठ, पांढुरक्या पाकळ्या नाजूक हातांनी उचलायला लागायची. श्रीकृष्णानं स्वर्गातून पृथ्वीवर आणलेला हा वृक्ष, सवतीमत्सर जागा करणारा तरीही लग्नाळू मुलींना हवाहवासा वाटणारा दररोज एकशे आठ पारिजातकाची फुले श्रीकृष्णाला वाहिली की लग्न लवकर जमते अशी ही कथा. त्यामुळे कदाचित पहाटे पहाटे फुलं वेचणार्‍या मुलीचं फुलांचे अंगण साफ करत.

गुलाबी गुलाब जीवनातील गुलाबी रंगाचं महत्व सांगायला सज्ज असायचा. बहरलेल्या गुलाबाचे ताटवे आपल्या गंधांनी आसमंत सुगंधित करायचे आणि शिकवायचे. रडगाणे गात कधि बसायचं नसतं, काट्याकुट्यातूनही फुलायच असतं, हसायचं असतं. मधूनच मोगरा आपल्या टपोर्‍या फुलांनी आकाशातील तार्‍यांची स्पर्धा करायचा. मोगर्‍याचे गजरे सारा गांव सुगंधीत करायचा.

चैत्र पाडव्यात चाफ्याचे महत्त्वचं न्यारे. गुढीला सजवायला जणू चाफा फुललेला असायचा. घेता किती घेशील दोन करांनी. अशी स्थिती व्हायची. फांदी आणि फांदी लगडून जायची फुलांनी. गुढीला चाफ्याची माळ, गुढीपुढं चाफ्याच्या कळ्यांची घोडी करताना मनाचा आनंद वेगळा असायचा.

मिरची जास्वंदी आपले लाल ओठं दाखवत बाजूला बसलेले असतं. जास्वंदीचे वेगवेगळे प्रकार फुललेले असतं. सदाफुली सतत फुलून आपल्या जाणिवा जागृत ठेवतं. माझ्याप्रमाणे सतत फुलत रहा असाच संदेश देत आहे असा भास होई. आपल्या गर्द हिरव्या पानातून गुलबुसाची लाल फुले हात लाल करायला सिध्द असायची तर साक्षात सोन्याची स्पर्धा करणारा कांचन आपल्या पिवळ्याजर्द मुलायम फुलांनी सज्ज असायचा. गौरीची फुले त्या फुलांचा कोंबडा करुन परातीच्या मागे नाचवायला गंमत येई.

खरच ! पैशाच्या वैभवापेक्षा फुलांचे वैभव वेगळे असतं. फुल विकत घेता येतात पण फुलांचा सुवास विकता येत नाही हे तितकचं सत्य. फुलझाड लावणे हे अत्यंत पवित्र काम ! जणू पृथ्वीमातेला सजवण्याचं ! फुलांच्या सहवासातील माणूस सदा सतेज राहातो. त्याचे जीवनच फुलासारखे आनंदी राहते. कदाचित पंडित नेहरुंच्या हसर्‍या चेहर्‍याचं रहस्य त्यांच्या कोटावरील गुलाबात नसेल ना?

अलिकडं, फुलझाडांच्या जागा घरांनी घेतल्या. शहरात तर फुलझाडांना मज्जावच होतोय की काय ? अशी अवस्था झालीयं. उजाड होत चाललेल्या सार्वजनिक बागा, वाढलेल्या इमारतींनी फुलझाडं आपलं अस्तित्वच हरवू लागलेत. येणार्‍या नव्या पिढीला वाढणारी फुलझाडं कशी दिसणार ? एक झाड वाढ्विण म्हणजे चैतन्य वाढविणं. दिसामाजी वाढणारं झाड त्याला कळ्या लागण्याच्या काळ आणि या कळ्यांचे फुलात रुपांतर होऊन डोलणारं झाड पहाणं म्हणजे जीवनातील महद्‍ आनंदाचा प्रवास होय. हा आनंददायी प्रवास जीवनांत सुगंधाचे क्षण आणतो. आपल्या संवेदना जागवितो. जीवन हे देण्यासाठी आहे घेण्यासाठी नाही ही शिकवणी एका झाडापासून सुरु होते आणि जीवनाचा मार्ग सुरु होतो, सुकर होतो.

माणूस ही ईश्वराची सर्वश्रेष्ट कलाकृती हे मान्य केले तरीही या माणसाचे संवेदनाशील माणूसपण फुलापासून सुरु होते, फुलापासूनच तो शिकतो आणि आपले जीवन सुगंघित करुन दुसर्‍याचेही जीवन सुगंघित करतो. फुलांचे वैभव कधि संपू नये. कारण फुलांची निरागसता, फुलांचे चैतन्य, फुलांचा सुगंध आणि दातृत्व मनाला मोहून टाकते आणि जीवनाला अर्थ प्राप्त होतो. फुलांचे वैभव जपायला हवं.

खरचं !
फुलं सुगंध देतात
आचार देतात,
विचार देतात,
फुलं संवेदनाही देतात !
जगण्याची कला देतात.
फुलांचं हसणं अन् बरसणं
फुलांचा सुगंध
जीवन सुगंधित करतो.
खरं ना ?

अरविंद देशपांडे
१८१३, ए वॉर्ड,शिवशक्ती भवन, निवृती चौक,
शिवाजी पेठ, कोल्हापूर.
दूरभाष-२६२७२२३, भ्रमण ध्वनी ९८२३३५४४९८

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color