स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow मराठीपण जपण्यासाठी
मराठीपण जपण्यासाठी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
      १९६६ मध्ये भारत सोडला ते तीन वर्षांनी परत यायचे, असे मनात ठेवून; पण अजूनही इथेच आहोत. माझा मुलगा मला म्हणतो, र् आई, इतक्या वर्षांनंतर देखील तू अजून मराठीच राहिलीस. कसं ते लिहून काढ.' तो वेगळया कारणासाठी म्हणत असेल कदाचित; पण दर वर्षी भारतात येते तेव्हा बरेचसे लोकही असेच काहीसे म्हणतात. प्रत्येकाचे मन, विचार वेगळे असतात. मला माझे मराठीपण टाकावेसे वाटलेच नाही किंवा टाकावे लागले नाही हे जितके खरे, तितकेच ते टिकविण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते सर्व करण्यात माझा खारीचा वाटा आहे हेही तितकेच खरे !
मराठीपण जपण्यासाठी अमेरिकेत केल्या गेलेल्या अनेक योजना या अशा :
'महाराष्ट्न् मंडळ, शिकागोची रचना'
   ही सगळी सुरवात आमच्या Investment Clubमध्ये झाली, असेच म्हणायला हवे. किंबहुना तो क्लबदेखील अमेरिकेत मराठी लोकांचा असा पहिलाच असावा. अधिकृत मंडळ १९७० मध्ये गुढी पाडव्याच्या सुमूहूर्तावर आमच्या क्लबातील गोडबोले, मणेरीकर, हुपरीकर, शेंडे, बोराडे, कामत, कुलकर्णी इत्यादी कुटुंबियांच्या सहभागाने सुरू झाले.
१९६९ या वर्षीच्या दिवाळी कार्यक्रमाच्या वेळी मंडळाची योजना उपस्थितांसमोर सादर केली. सुमारे ५०-६० कुटुंबीय व काही विद्यार्थी त्या कार्यक्रमाला हजर होते. दर वर्षी पाच - गुढीपाडवा, सहल, गणेशोत्सव, दिवाळी आणि मकर संक्रांत - असे कार्यक्रम करण्याचे ठरवले. ङी. दत्तात्रेय मणेरीकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी नेमली आणि कार्याचा शुभारंभ केला. या पाच कार्यक्रमांबरोबरच नाटक तथा संगीताचे कार्यक्रम करण्याचेही मनात होते. मंडळाची Constitutionरजिस्टर्ड करण्याचे काम सर्वप्रथम शिकागोच्या मंडळानेच व त्याचा अनुभव इतर ठिकाणच्या मंडळांना पुढे उपयोगी ठरला.
सुरवात उत्साहात झाली. मंडळाचे मुखपत्र म्हणून `रचना' चा अंकदेखील मोठ्या दिमाखात निघाला. त्यावर प्रामुख्याने गोपाळ व पुष्पा प्रचंड, प्रभाकर भोसले आणि जयश्री हुपरीकर यांनी मेहनत घेतली, अशा प्रकारचे मराठी पत्रदेखील अमेरिकेत शिकागोनेच सर्वप्रथम सुरू केले.
मंडळात सगळे सणवार गोडाधोडाच्या जेवणाने साजरे होतात. ते सगळे जेवण हौशी महिला उत्साहाने करीत असत. त्यामुळे कार्यक्रमाला आपुलकीची झलक असे. आज ३२ वर्षे मंडळ टिकून आहे. तरी १९७० मध्ये घातलेला पाया सुस्थिर आहे. आता भारतीय जेवण बाहेर मिळण्याची सोय झाल्याने कुणाला करावे लागत नाही. पण कार्यवाही मंडळाचीच असते. वाढता मराठी समाज मंडळात वावरताना पाहून त्या पहिल्या दिवसापासून उपस्थित असलेल्या जुन्या सभासदांना कृतकृत्यतेचा प्रत्यय येतो.
महाराष्ट्र मंडळ, शिकागो सहर्ष सादर करीत आहे.
सामाजिक नाटक .'प्रेमा तुझा रंग कसा.' ?

तारीख : १७ एप्रिल १९७१ :-
महाराष्ट्न् मंडळाची स्थापना झालेली होती. अध्यक्ष श्री. मणेरीकर सारखे म्हणत होते, `शंकरराव, नाटक कधी करताय?' शेवटी ७० च्या थंडीत डॉ. शंकर हुपरीकरांनी नाटकाची प्रॅक्टिस सूर केली. म्हणजे त्या निमित्ताने थंडीत भेटीगाठीही होतील, असा एक विचार. आमच्या मित्रमंडळातीलच संच उभा राहिला. काही पडद्यावर तर काही पडद्याआड; पण सगळयांचा भरपूर पाठिंबा. सगळयांची लहान मुले, सगळे जण अपार्टमेंटमध्ये राहणारी; पण सगळयांना जबरदस्त हौस! जानेवारीपासून सगळे वीकएंड आम्हा सगळयांचा एकच कार्यक्रम - प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस ! अर्थात, त्याबरोबरच ज्याच्या घरी प्रॅक्टिस असेल त्याच्या घरी चमचमीत खाणेपिणे होईच.
मुलांनादेखील मजा येत असे. एक कौटुंबिक activity च झाली होती जशी काही ! नाटक बसत होते, `रचना' मधून बातमी गेली होती. लोकांचे फोन येत होते पण जागा शोधण्यात खूप वेळ गेला. शेवटी Northern University तील एक स्टेज असलेला हॉल मिळाला.
१७ एप्रिल रोजी अमेरिकेतील पहिले तीन अंकी मराठी नाटक रंगभूमीवर आले. पहिलावहिला प्रयोग नेटका झाला. प्रेक्षकांच्या अपेक्षांपेक्षा सरस झाला. कित्येकांना भारतातच असल्यासारखे वाटले. एका मान्यवर सभासदाने उत्स्फूर्त देणगी देऊन कलाकारांचे कौतुक केले आणि खरेच त्या वर्षीपासून दर वर्र्षी नाटक हे मंडळाचे अविभाज्य आकर्षण ठरले. आजवर डॉक्टरांनी सातत्याने ३१ नाटके सादर केली; पण त्या पहिल्या प्रयोगाची गोडी अजूनही अवीट आहे.
१९७६ मध्ये आमच्या `कथा कुणाची व्यथा कुणा' या नाटकाचे मिल्वॉकी आणि डेट्रॊंईट इथे झालेले प्रयोग हेही दुसऱ्या गावी जाऊन केलेले बहुधा पहिलेच मराठी प्रयोग.
मराठीचे वर्ग :
१९७३ मध्ये आम्ही दहा कुटुंबियांनी एकत्र येऊन मुलांची रविवारी शाळा सुरू केली. श्लोकांनी सुरवात करून हळूहळू मराठी शिकवायला लागलो. साधारण सोळा मुले होती. उदा. दोन ते आठ. सतत आठ वर्षे शाळा चालवली. मराठी हुपरीकर शिकवीत असत तर श्लोक श्री. करंदीकर. मुलांचे मराठीतून कार्यक्रम मंडळात सादर केले. वर्षातील सर्व सण क्लासतर्फे न चुकता साजरे केले. त्यामुळे मुलांना अनेक रितीरिवाज समजले. त्या सणांचे महत्व व गोष्ट देखील सांगत होतो. सामुदायिकरित्या हे शिकल्यामुळे मुलांना उत्साह होता; नाही तर प्रत्येकाच्या घरी ते जमत नव्हते. ही सगळी मुले अजूनही मराठी बोलू शकतात.
बृहन्महाराष्ट्न् मंडळ आणि बृहन्महाराष्ट्न् वृत्त :-
१९८० मध्ये शिकागोत श्री. विष्णू वैद्य, श्री. शरद गोडबोले आणि मी बृहन्महाराष्ट्न् मंडळाची स्थापना केली. स्थानिक मंडळांना एकत्र बांधणारी संस्था. महाराष्ट्न् व अमेरिकेतील मराठी लोकांमध्ये दुवा साधण्याचा प्रयत्न करणारी संस्था. `एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या ब्रीद वाक्याला जपण्यासाठी सुरू केलेली ही संस्था. बृहन्महाराष्ट्न् मंडळाचे मुखपत्र म्हणून बृहन्महाराष्ट्न्वृत्त सुरू केले.
१५ जानेवारी १९८१ रोजी वृत्ताचा पहिला अंक शिकागोतून उत्तर अमेरिकेत सर्वत्र रवाना झाला. संपादक मीच होते. वृत्ताचे स्वरूप `ऐल ते पैल ' केवळ बातम्या पुरविण्यासाठी मर्यादित केले होते. कारण साहित्य ` एकता ' त्रैमासिकातून प्रसिद्ध होत असे आणि त्याच्याशी स्पर्धा करण्याची भावना नव्हती. तसे त्यांना कळवलेही होते. त्यावेळी इंटरनेटवर ` सकाळ ' दिसत नसे. किंबहुना मराठी सॉफ्टवेअरदेखील उपलब्ध नव्हते. तेव्हा हे काम आजच्याइतके सुलभ नव्हते. म्हणून त्याची गरज अधिक होती.
`महाराष्ट्न् टाइम्स' व `लोकसत्ता 'अशी दोन वर्तमानपत्रे दररोज सुरू केली. दर महिन्याच्या १५ तारखेस वृत्त प्रसिद्ध करायचे ठरविले होते. तेव्हा दर महिन्याच्या निवडक बातम्या योग्य त्या सदरात लिहून (हस्तलिखित), शिवाय स्थानिक बातम्यांना प्रसिद्धी देऊन वृत्तपत्र १० तारखेपर्यंत तयार करावे लागे. सुरूवातीपासूनच वाचकांशी संपादकीयातून हितगूज करण्याची प्रथा पाडली होती आणि कालांतराने वाचकांना ते आवडल्याची पावती मला वरचेवर मिळू लागली. इतकी की, नंतर जेव्हा वृत्ताची कॉम्प्यूटर कॉपी निघू लागली तेव्हा काही वाचकांना परक्यासारखे वाटू लागले. त्यातली ओढ नाहीशी झाल्यासारखी वाटली. सतत सहा वर्षे वृत्त शिकागोतून निघाले. त्यानंतर पुण्यातून तयार संकलित बातमीपत्र मिळविण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर व त्याचबरोबर मराठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिल्यानंतरच खांदेपालट केली गेली.
सुरूवातीला कामाचे काही वाटत नसे; पण वृत्त स्वयंपूर्ण कसे होईल याची काळजी अधिक होती. पदरमोड किती दिवस करणार ? पण प्रयत्नांना यश आले. अनेक वाचकांनी उत्स्फूर्तपणे सातत्याने मदत केली. त्यांचा हातभार हा जगन्नाथाचा रथ चालवू शकला. आजवर वृत्त टिकून आहे यातच संस्थापकांच्या प्रसववेदना विरघळून गेल्या आहेत.
पहिले अधिवेशन :-
अधिवेशन खरे म्हणजे १९८३ मध्ये करावे असे मनात होते; पण योग नव्हता. पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि ते पुढे ढकलावे लागले. जुलैच्या अंकात जुलै ८४ मध्ये पहिले अधिवेशन करण्याचे जाहीर केले. १२ व १३ जुलै - औद्योगिक व १४ व १५ जुलैला संमेलन भरविण्याचे ठरविले. बऱ्याच पत्रव्यवहारानंतर शंकरराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून ठरले. मी भारतात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा आणि बालकलाकार आनंदगंधर्व यांच्या कार्यक्रमाची देणगी घेऊन आले. त्याचवेळी उद्योजकांना भेटून आगामी अधिवेशनाचे निमंत्रणही केले गेले.
मे १९८४ पर्यंत कार्यक्रम तर पक्के झाले. जागा ठरवली. दहा ठिकाणी चौकशी केली; पण प्रमुख अडचण होती, की किती जण येतील याचा अंदाज येत नव्हता. निश्चिती कोणीच देत नव्हते. तेव्हा सारी तयारी अनुमान धक्क्यानेच चालली होती. खर्च आमच्या पदरचाच व्हायचा होता. निदान सुरवातीला तरी तेव्हा थाटमाट करण्यास मन धजत नव्हते. ( आता थाटामाटाची दर वेळी स्पर्धाच वाटते ) पर्यायी अशा दोन जागा राखून ठेवल्या. कमीत कमी ३०० लोकांना पुरेल अशा जेवणाची सोय केली. येणाऱ्या लोकांची राहण्याची सोय आसपासच्या मराठी मंडळींच्या घरीच करायची होती; तेही काम वेळेवर करायला हवे होते. ( ही हॉटेलचे पत्ते पुरवले जातात. ) तो पत्रव्यवहार आम्ही तिन्ही कुटुंबे ( वैद्य, गोडबोले, हुपरीकर ) सगळा रिकामा वेळ याच कामात देत होतो. त्यामुळे ते सुरळीतपणे पार पडले. एखाद्या घरच्या कार्यासारखेच ! म्हणूनच आमचे नाटक न करण्याचे ठरवले. कारण मग कामाचा भार कुणी पेलायचा ? पण नंतर शिकागोकरांना अधिवेशनात कधीही नाटक करण्याची संधी दिली गेली नाही याची खंत वाटते खरी !
सगळी तयारी सुरळीत चाललीय तोच शंकरराव चव्हाण अपरिहार्य कारणाने येऊ शकत नसल्याचे कळले. पुन्हा धावाधाव ! शेवटी कथाकार द. मा.मिरासदारांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली.
ही मराठीची हाक, आईच्या मायेची
जुळवुनी आणा तुम्ही भेट सकळांची

जूनच्या वृत्ततून ही कळकळीची हाक दिल्यानंतर आम्ही त्या घटकेची वाट पाहत होतो.
तो दिवस उगवला. पहिलेवहिले अधिवेशन गुढ्यातोरणांसह उत्साहात पार पडले. सुमारे २७५ उपस्थिती होती. भरगच्च कार्यक्रम. लहान-मोठ्यांचे रंगलेले चर्चासत्र, आनंदगंधर्वचे सुरेल गायन, लक्ष्मण देशपांडे यांचे `वऱ्हाड चाललंय लंडनला' चा प्रयोग, द. मा. मिरासदार यांचे खुमासदार कथाकथन. त्याशिवाय इतर अनेक मान्यवर बोलले, इथल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाची आखणी इतकी योग्य होती, की अजूनही अधिवेशनात तसेच कार्यक्रम असतात. उपस्थितांना निघताना भारावून आले होते. दोन दिवसांतील गाठीभेटींनी मने जुळून आली होती. नव्हता कुठे बिग स्क्रिन टीव्ही किंवा नव्हत्या राखीव खुर्च्या की नव्हता कसलाही थाटमाट. होता गाठी आपुलकीचा ओलावा आणि कौतुकमिश्रित अभिमान आणि डोळयांत निरोपाची आर्तता ! लोकांना अधिवेशने इतकी आवडतात, की सॅन्फ़्रॅसिस्कोoला ५००० उपस्थिती होती. गेल्या वर्षी क्रॅलगिरीला अधिवेशन होते. पुढील वर्षी न्यूयॉर्कला होणार आहे. वैद्य, गोडबोले, हुपरीकर यांनी शिकागोत पेरलेल्या रोपाचा मोठा वृक्ष झालाय खरा !
पंधरा वर्षानंतर पुन्हा वृत्ताची जबाबदारी घेतली आहे ती केवळ आवड म्हणून ! मंडळाची महत्वाकांक्षी योजना आहे ती मराठी विज्ञान परिषदेच्या सहाय्यानेo सुरू करण्याची ! तंत्रयुगाची ही पायरी सयुक्तिकच आहे.त्याचा मराठी लोकांना जगभर उपयोग होईल, याची खात्री वाटते. त्यासाठी सर्व कार्यकाीरणी पडेल ते काम करणार आहे. त्याबरोबरच पुढील अधिवेशनाची तयारी सुरू आहेच.
मराठीपण जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत, तरी इथे राहिल्याने कधी-कधी पुरेसे मराठी वाचन होत नाही.

जयश्री हुपरीकर, स्कोकी, इलिनॉय् , अमेरिका. (उत्तररंग दिवाळी २००२ वरून साभार )
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color