झाले कोकण पारखे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

पार्श्वभूमी :-

एक साधे, संवेदनशील, नोकरी करणारे गृहस्थ. ह्यांची एक वृध्द आत्या कोकणात होती. मूल-बाळ कोणी नसल्यामुळे, नवरा गेल्यानंतर, त्यांच्या कोकणातील खेड्यात एकट्याच राहायच्या. वडिलांकडील दुसरे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे, हे गृहस्थ दर उन्हाळयात, आपल्या बायका-मुलांसोबत आपल्या आत्याला भेटायला कोकणात अगदी आवर्जून जायचे. आत्याची मायेची भेट व मनाला तजेला आणणारे कोकणच्या मनोहारी निसर्गाचे दर्शन, ह्या दोन्ही गोष्टी, ह्या कोकण-यात्रेत साध्य होत.

अलिकडेच आत्याबाई देवाघरी गेल्या, आणि ह्या गृहस्थांची, आपल्या आत्याला तिलांजली द्यायला, शेवटचीच कोकण-वारी घडली. आता परत कोकणची भेट होणार नाही, ह्या विचाराने त्यांचे मन विषण्ण झाले. ह्या प्रसंगाला सामोरे जाताना ह्या गृहस्थांच्या मनात ज्या भावना उमटल्या, त्या काव्यबध्द करण्याचा हा एक प्रयास !

साध्या, सरळ माणसाच्याभावनाही साध्या, सरळ ! म्हणून काव्य रचनाही साधी, सरळच करण्याचा प्रयत्न केला आहे.

- जयंत खानझोडे पो. - भिवंडी

झाले कोकण पारखे

झाले कोकण पारखे
आता पुन्हा भेट नाही !
आत्याबाईच्या मायेची,
आता पुन्हा गाठ नाही ! ।१ ।

आता नाही व्हावयाचा,
हवा-हवासा प्रवास !
आता जाईल उन्हाळा,
कसा उदास-उदास ! ।२ ।

नाही पोफळीच्या बागा,
अन् नारळाची झाडे !
आता दर्शन ह्यांचे का,
फक्त स्वप्नातून घडे ? ।३ ।

निळे-हिरवे डोंगर,
आता नाही दिसायचे !
झुळझुळत्या झऱ्यात,
पुन्हा कधी नहायाचे ? ।४ ।

कैक वर्षांचा शिरस्ता,
बघा आता चुकणार !
मने ताजी करणारी,
यात्रा नाही घडणार ! ।५ ।

आता शेवटची खेप,
द्याया तिला तिलांजली !
कोकणची माती आता,
लागणार नाही भाळी ! ।६ ।

योग सरता भेटीचा,
कधी भेटते का कोणी ?
आता राहतील फक्त,
कोकणच्या आठवणी ! ।७ ।

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color