द ब्रेडविनर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

द ब्रेडविनर, लेखिका - डेबोरा एलीस, अनुवाद - अपर्णा वेलणकर
प्रथमावृत्ती - सप्टेंबर २००२ , पुनर्मुद्रण - फेब्रुवारी २००७
पुस्तक परिचय - सौ. शुभांगी सु. रानडे

अफगाणिस्तानमधील निर्वासितांसाठी उभारलेल्या छावण्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करताना कॅनडामधील डेबोरा एलीस ह्या सुप्रसिद्ध लेखिकेने ऎकलेली काबूल शहरात राहणार्‍या अकरा वर्षाच्या एका लहान मुलीची-परवानाची शौर्यकथा कथा जगासमोर आणली. तालिबानी क्रूर व जुलमी राजवटीत आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी परवानाने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा व ते करीत असताना तिने बघितलेली साधीसुधी सुंदर स्वप्ने यांचे ह्रदयस्पर्शी वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे. तालिबानी राजवटीच्या छळामुळे मोठी माणसे त्रस्त झालेली असताना - तिने दाखविलेल्या जिद्दीमुळे तिला जगासमोर आणण्याची लेखिकेला प्रेरणा मिळाली.

काही देश नकाशावर छान दिसतात. पण आतून मात्र धाकधपटशाने किती पोखरलेले असतात हे लांबून पाहणार्‍याला कळत नाही. दुरून डोंगर साजरे हेच खरे. अफगाणिस्तानातील काबूलसारखे चैतन्याने सळसळणारं आधुनिक शहर संपूर्ण मध्य आशियात शोधून सुद्धा सापडणार नाही. वास्तविक पाहता अफगाणी माणूस हा मुळातच अत्यंत शूर, धाडसी व सौंदर्याचा उपभोक्ता. पण २० वर्षापासून सतत होणार्‍या परकीय आक्रमणांनी गळाठून गेला. ‘तालिबानी’ म्हणजे धर्माचरणाचे पालन करणारा विद्यार्थी. मात्र धर्माचा चुकीचा अर्थ लावून अत्यंत जुलमी अशा तालिबानी राजवटीने अफगाणी माणसाला विशेषतः स्त्रियांना अगदी जेरीस आणले. सुशिक्षित, नोकरी करणार्‍या स्त्रियांना घरात डांबून ठेवण्यात आले. त्यांना बाजारात जायची सुद्धा बंदी घालण्यात आली. मुलींच्या शाळासुद्धा बंद करण्यात आल्या. बुरख्याची सक्ती करण्यात आली. इंग्रजी पुस्तके वाचणे हा सुद्धा गुन्हा ठरविला गेला. अनेक कुटुंबांची यात वाताहात झाली.
अशा परिस्थितीत आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ११ वर्षाच्या एका कोवळ्या परवानाच्या अंगावर पडली. तालिबानी क्रूर, राक्षसी नजरेतून निसटण्यासाठी डोक्यावरचे केस कापून तिने पुरुषी कपडे परिधान केले. बाजारातून सामानसुमान आणण्यासाठी आणि थोडीफार कमाई करण्यासाठी एवढ्य़ाशा लहान वयात अतोनात कष्ट सोसून चिवटपणे या परिस्थितीशी तिने झुंज दिली. अशी महान शक्ती या मुलीत आली तरी कुठून ? असा प्रश्न प्रत्येक सुजाण वाचकाच्या मनात आल्याशिवाय राहता नाही. लहानपणी आईवडिलांनी तिच्यावर केलेले संस्कार व गोष्टीरूपाने संगितलेला अफगाणचा इतिहासामुळेच तिला सर्व प्रकारच्या संकटांवर मात करण्यास मदत करतात याचा प्रत्यय येतो.
दुसर्‍याच्या दुःखाने स्वतः दुःखी होणारी माणसे सहृदय असतात असे म्हणतात. लेखिका डेबोरा एलीसजवळ हा गुण असल्याने परवानाचे दुःख अधिक प्रभावी शब्दात मांडण्यात ती यशस्वी झाली आहे. अपर्णा वेलणकर यांनी या पुस्तकाचा उत्तम अनुवाद करून मराठी वाचकांना इ. स. २००० च्या काबूलमधील भीषण परिस्थितीविषयी व तेथील संघर्षाची माहिती करून दिली आहे.
‘जगी सर्वसुखी असा कोण आहे’ या रामदासांच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक माणसाला काही ना काही दुःख असतेच. काही माणसांना आपल्या लहानसहान दुःखाचा राईचा पर्वत करण्याची सवय असते. सतत आपले दुःख उगाळत बसणे यातच धन्यता वाटते. अंगात जिद्द असेल तर माणूस दुःखाचे डोंगर सुद्धा सहज ओलांडून जाऊ शकतो, संकटांवर स्वार होऊ शकतो, आणि त्यातूनही मार्ग काढू शकतो. एका पाठोपाठ एक संकटे आली तरीही न घाबरता धाडसाने सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करणारी माणसे कशी असतात ते समजण्यासाठी ‘द ब्रेडविनर’ हे प्रस्तुत पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color