कॉलनी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

कॉलनी लेखक - सिद्धार्थ पारधे किंमत - १५० रू. प्रथमावृत्ती - २२ ऑक्टोबर २००८

 

पुस्तकाचे नाव व लेखकाचे नाव यावरून प्रथमदर्शनी त्यातील मजकुराबद्दल काहीच अंदाज आला नाही. पण मलपृष्ठावरील विं. दा. करंदीकरांच्या अभिप्रायाने सदर पुस्तकाला बर्‍याच मोठ्या उंचीवर नेण्याचे काम सहजी केले आहे. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारप्राप्त विं. दा. यांचा एवढा मोठा अभिप्राय मिळणे हे तसे पाहिले तर सामान्य माणसाचे काम नाही. त्यामुळे ‘कॉलनी’ हे पुस्तक मुळातून वाचण्याची माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. पुस्तक वाचल्यावर ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे’ या वचनाची सत्यता पटली.

कोळशाच्या खाणीतूनच हिर्‍याची प्राप्ती होते. त्याप्रमाणे अत्यंत हलाखीचे जीवन जगणार्‍या कुटुंबातून सिद्धार्थसारखा तेजस्वी हिरा समाजाला मिळाला आहे. लक्ष्मण भागाजी पारधे एक मोलमजुरी करणारा सामान्य माणूस आपल्या बायकामुलांसह दारोदार भटकत, वेळप्रसंगी केवळ पाण्याच्या घोटावर दिवस काढीत अखेरीस मुंबईत वांद्रे येथील ‘साहित्य सहवास’ सोसायटीचा पहारेकरी म्हणून स्थिरावतो. पत्नी कोंडाबाई सोसायटीत - कॉलनीत - राहणार्‍यांकडे धुण्याभांड्याची कामे करून चार पैसे मिळवायला मदत करणारी, कॉलनीतील मोठ्या लोकांनी केलेल्या मदतीची सदैव जाणीव असणारी, स्वतः शिकली नसली तरी मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणारी. सिद्धार्थ, रमेश ही दोन मुले व भिकू, कमल आणि विमल अशा तीन मुली. केवळ नशिबावेच साथ दिल्यामुळे जगलेला सिद्धार्थ हा पुढे मोठा एल. आय. सी. अधिकारी होऊन ‘कॉलनी’ नावाचे स्वतःचा जीवनपट प्रामाणिकपणे उलगडून दाखविणारा दर्जेदार लेखक म्हणून नावारूपास येईल असे कुणास सांगून सुद्धा खरे वाटले नसते.
याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे संगती किंवा सहवास. सज्जनांच्या सहवासात राहिलेला माणूस सज्जनच होतो. गरिबी म्हणजे काय व कशी असते याचा प्रत्यक्ष अनुभव लेखकाने स्वतः घेतलेला आहे. त्या वास्तवाची दाहकता, भीषणता ही सदर पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात लेखकाने बिनधास्तपणे वाचकासमोर मांडली आहे. दरिद्र्याचे चटके खाऊन तावून सुलाखून बाहेर पडल्यावर मात्र त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. लहान मूल सतत आईच्या सहवासात असल्याने जसे प्रथम आई म्हणावयास शिकते तसेच काहीसे लेखकाचे झालेले दिसते.
लहानपणापासून सिद्धार्थ साहित्य सहवासच्या कॉलनीत वाढला. या ना त्या कारणाने, त्याच्या कानावर ‘कॉलनी’ हा शब्द सतत पडत असल्याने ‘कॉलनी’ म्हणतच त्याने प्रथम बोलायला सुरुवात केली. तात्पर्य, इतके अनन्यसाधारण महत्व लेखकाच्या दृष्टीने ‘कॉलनी’ ला होते, नव्हे अजूनही आहे हे सर्वांसमक्ष कबूल करण्यास लेखकाला कमीपणा वाटण्याऎवजी त्याचा अभिमानच वाटतो. साहित्य सहवासात म्हणजे ‘कॉलनीत’ राहणार्‍या इतर मुलांबरोबर खेळत खेळत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. ‘कॉलनीत’ राहणार्‍या सर्वांचीच लहानमोठी कामे तो अतिशय आनंदाने करीत असे, मग ते दुधाच्या पिशव्या टाकण्याचे असो किंवा झाडलोट वा फरशी पुसण्याचे असो. कोणतेही काम करण्यात हयगय, कुचराई त्याने कधीच केली नाही. याउलट तेथील रहिवाशांकडून शाबासकी कशी मिळवता येईल यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असायचा.
‘दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्‌’ हे संस्कृतमधील सुभाषित त्याला ठाऊक नसले तरी त्याचा प्रत्यक्षात उपयोग मात्र तो बरोबर करीत असे. त्यामुळेच तेथे राहणार्‍या विं. दा. करंदीकर, नारायण आठवले, अरूण साधु, डॉ. बाळ फोंडके, के. जी. पुरोहित, गिरिजा कीर, इत्यादी सर्वांचा यो आवडता झाला होता. गणपती उत्सवाच्या वेळी साहित्य सहवासात घरोघरी होणार्‍या आरत्या व प्रसाद यांनी लेखकाच्या बालमनावर चांगलेच संस्कार केले व मातीच्या घड्याचे सुबकशा मूर्तीत रूपांतर घडवून आणले. आपल्यावर झालेल्या या सुसंस्कारांची व वेळोवेळी या सर्व मोठ्या लोकांनी केलेल्या मदतीची जाणीव लहानपणापासून लेखकाला असल्याचे दिसते. अभ्यासातही प्रगती करून लेखकाने गाठलेले यशाचे शिखर पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अतिसामान्य परिस्थितीतील मुलगा एम‍. कॉम. होऊन एल. आय. सी. अधिकारी म्हणून उच्च पदाधिकारी होतो, ‘कॉलनी’ शेजारीच स्वतःचा फ्लॅट , गाडी घेऊन राहतो आणि तरीही ‘कॉलनी’चा विसर पडू देत नाही ही अतिशय महत्वाची, उल्लेखनीय बाब आहे. आभाळाला हात टेकले तरी जमिनीवर घट्ट पाय रोवून उभा राहतो, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्यांसारखी तो कधीही वर्तणूक करीत नाही ही जमेची गोष्ट आहे. साहित्य सहवासातील लोकांप्रमाणे वागणे, चालणे, बोलणे तर त्याने घेतलेच पण त्यांच्यासारखे लिखाण करण्याचे कसबही मिळविले याबद्दल करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. गणपती विसर्जनाच्या प्रसंगाचे वर्णन वाचल्यावर त्याच्या साहित्यिक कौशल्याची कल्पना येते. सर्वोत्कृष्ट ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाल्यानंतर विं. दा. करंदीकर यांच्यावर समाजातील सर्वच लोकांकडून अभिनंदनपर पत्रांचा वर्षाव झाला. पण लेखकाने म्हणजे सिद्धार्थ पारधे यांनी भाऊंना म्हणजे विं. दा. करंदीकर यांना पाठविलेले पत्र जे १५ जानेवारी २००६ च्या लोकसत्तामध्ये अग्रक्रमाने छापून आले त्याची लज्जत काही औरच ! त्या पत्रामुळे भारावून जाऊन अनेकांनी लेखकाला पाठविलेली शुभेच्छासुमने प्रस्तुत पुस्तकात वानगीदाखल पुस्तकाच्या अखेरच्या भागात घातली आहेत. सुप्रसिद्ध क्रीकेटपटू सचिन तेंडुलकर हाही साहित्य सहवासात राहत असल्याने लहानपणापासून सिद्धार्थचा मित्र होता. शुभेच्छासुमनात असलेले सचिनचे पत्र त्या दोघांच्या मैत्रीची जाणीव करून देते. अजूनही सचिनच्या सोबत त्याचा खास दोस्त म्हणून सिद्धार्थचीच वर्णी लागते.
जन्मदात्यांच्या ऋणाप्रमाणेच साहित्य सहवासचे ऋणही फेडणे केवळ अशक्य आहे असे लेखक प्रांजळपणे कबूल करतो. पारधे परिवारासाठी साहित्य सहवास म्हणजे परमेश्वराचे मंदीरच होय अशी त्यांची दृढ श्रद्धा असल्याने साहित्य सहवासाला कोटी कोटी प्रणाम करीत पुस्तकाची सांगता केलेली आहे. साहित्य सहवासने जसे लेखकाचे जीवन उजळून टाकले तोच कित्ता लेखक आपल्यासारख्या इतर गोरगरिबांच्या बाबतीत गिरवत असेल यात शंकाच नाही. या त्याच्या प्रयत्नातून अनेक सिद्धार्थ उदयास येतील असे वाटते. 
  - सौ. शुभांगी सु. रानडे,
ज्ञानदीप, सांगली
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color