स्वागतकक्ष
चंद्रावर स्वारी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क डॉ. सु. वि. रानडे   
दिनांक २२ ऑक्टोबर २००८ रोजी भारताने आपले पहिले मानवरहित चांद्रयान अवकाशात सोडले. पूर्वी भा. रा. भागवतांच्या "चंद्रावर स्वारी" या पुस्तकाची तीव्रतेने आठवण झाली. भारताचे सध्या १६ उपग्रह अवकाशात आहेत. दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रक्षेपण, पृथ्वीसंबंधीची निरीक्षणे, हवामानाचा अंदाज, दूरशिक्षण आणि आरोग्यविषयक सेवांसाठी त्यांचा उपयोग होतो. मात्र आतापर्यंत फक्त मोजके विकसित देशच चंद्राकडे आपली अवकाशयाने पाठवित होते. आता भारतही त्या स्पर्धेत उतरला आहे.
"चांद्रयान-१'च्या प्रक्षेपणासाठी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचा (पीएसएलव्ही) वापर करण्यात आला आहे. "पीएसएलव्ही'ची उंची ४५ मीटर असून, वस्तुमान २९५ टन आहे. "आयआरएस पी२' हे दूरसंवेदन उपग्रह याच "पीएसएलव्ही'च्या मदतीने १९९४ मध्ये ८२० किलोमीटर उंचीवरील कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. १९९६ ते २००५ या काळात "पीएसएलव्ही'च्या साह्याने सहा दूरसंवेदन उपग्रह, तसेच एक "मायक्रो सॅटेलाइट' अवकाशात सोडण्यात आले. जर्मनी, बेल्जियम आणि कोरिया या देशांचेही चार उपग्रह "पीएसएलव्ही'द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. १० जानेवारी २००७ रोजी "पीएसएलव्ही- सी ७' वाहकाने चार उपग्रह प्रक्षेपित केले. ते उपग्रहे पुढीलप्रमाणे भारताचे ६८० किलो वजनाचे "कार्टोसॅट २' हे दूरसंवेदन उपग्रह, ५५० किलो वजनाचे "स्पेस कॅप्सूल रिकव्हरी इक्विपमेंट (एसआरई १), इंडोनेशियाचे साठ किलो वजनाचे "लेपन ट्यूबसॅट' आणि अर्जेंटिनाचे सहा किलो वजनाचे "नॅनो सॅटेलाइट.' "पीएसएलव्ही सी४' किंवा "कल्पना१' मोहिमांमध्ये ध्रुवीय उपग्रह उड्डाण वाहकाने उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळेच चांद्रयान मोहिमेसाठीही याच "पीएसएलव्ही'ची निवड करण्यात आली.
चांद्रयान प्रक्षेपित करण्यासाठीच्या "पीएसएलव्ही'चे चार टप्पे (स्टेजेस) करण्यात आले. त्यांमध्ये घन आणि द्रव प्रणोदक (प्रोपल्शन) पद्धतीचा अवलंब आलटून पालटून करण्यात आला आहे. प्रणोदक म्हणजे उच्च ऊर्जा असलेले इंधन. उड्डाण करतेवेळी पृथ्वीच्या गुरुत्वीय शक्तीवर मात करू शकेल, इतकी ऊर्जा निर्माण करणे आवश्‍यक असते. त्यासाठी प्रणोदकांचा वापर केला जातो. "पीएसएलव्ही'च्या पहिल्या टप्प्यात घन प्रणोदक बूस्टर्सचा वापर केला गेला. त्यात १३८ टन "हायड्रॉक्‍सिल टर्मिनेटेड पॉलिब्युटॅडिन (एचटीपीबी) प्रणोदक वापरले गेले. या बूस्टरमुळे म्हणजे "४४३० केएन' इतका रेटा निर्माण होऊ शकेल. दुसऱ्या टप्प्यात "विकास इंजिन'चा वापर करण्यात आला. त्यामध्ये ४१.५ टन द्रव प्रणोदक असेल. त्यामध्ये "अनसिमिट्रिकल डाय मिथाईल हायड्रेझिन' हे इंधन, तर नायट्रोजन टेट्रॉक्‍साईड हे ऑक्‍सिडायझर आहे. त्याद्वारे आठशे केएन रेटा निर्माण होईल. तिसऱ्या टप्प्यात परत सात टन "एचटीपीबी' घन प्रणोदक असेल, तर चौथ्या आणि अंतिम टप्प्यांत द्रव प्रणोदकाची दोन इंजिने वापरण्यात आली आहेत.
"पीएसएलव्ही'चे अद्ययावत स्वरूप असलेल्या "पीएसएलव्ही-सी११'च्या मदतीने १३०४ किलोंचे यान प्रथम २४० बाय २४००० किलोमीटर कक्षेत सोडले जाईल. यान प्रक्षेपित केल्यानंतर त्याचे पृथ्वीपासूनचे किमान अंतर २४० किलोमीटर, तर कमाल २४ हजार किलोमीटर असेल. या कक्षेला "जिओसिंक्रोनस ट्रान्स्फर ऑरबिट' (जीटीओ) म्हणतात. त्यानंतर चांद्रयानाचे पृथ्वीपासूनचे कमाल अंतर वाढविले जाईल. म्हणजे त्याची भ्रमणकक्षा अंडाकृती होईल. या कक्षेला "एलिप्टिकल ट्रान्स्फर ऑरबिट' (ईटीओ) म्हणतात. या भ्रमणकक्षेत पृथ्वीजवळ असताना चांद्रयानाचे रॉकेट प्रज्वलित केले जाईल आणि चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करेल. साडेपाच दिवसांनंतर हे यान चंद्राजवळ पोचेल. त्यानंतर ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. सुरवातीला चंद्रापासूनच्या एक हजार किलोमीटरवरील कक्षेत ते भ्रमण करेल. तेथे चांद्रयानावरील सौरपंखे उघडले जातील आणि त्यांद्वारे चांद्रयानातील यंत्रणेला विद्युत पुरवठा सुरू होईल. मग हळूहळू चांद्रयानाची भ्रमणकक्षा चंद्रापासून शंभर किलोमीटरपर्यंत आणली जाईल. चंद्रापासून १०० बाय १०० किलोमीटर कक्षेत यान भ्रमण करू लागल्यानंतर त्याचे वजन ५९० किलो होईल. कारण चंद्रापर्यंत पोचण्याच्या प्रवासात यानातील इंधन जवळजवळ संपुष्टात आले असेल.
चांद्रयान घन आकाराचे आहे. त्याची प्रत्येक बाजू दीड मीटरची आहे. त्यामध्ये सुमारे ४५ किलो वजनाची भारताची वैज्ञानिक उपकरणे, दहा किलो वजनाची पाश्‍चात्त्य देशांची उपकरणे आणि ४५ किलो वजनाचा "इम्पॅक्‍टर' आहे. हा "इम्पॅक्‍टर' चांद्रभूमीला धडक देणार आहे. तो चांद्रभूमीत खोलवर जाऊन बसावा, अशी अपेक्षा आहे. चांद्रयानाच्या आतील यंत्रणा यानाला स्थिरता देणार आहे. हे यान चांद्रभूमीपासून विशिष्ट अंतरावर राहील, याची काळजीही ती घेणार आहे. सौरपंख्यांद्वारे चांद्रयानाला साडेसातशे मेगावॉट वीज मिळेल. अंधारात असताना त्याला लिथियम आयन बॅटरीद्वारे वीजपुरवठा केला जाईल. अशा प्रकारे हे यान चंद्राभोवती दोन वर्षे भ्रमण करेल. .
"चांद्रयान-१' पाठविण्यासाठीचा खर्च ३.८६ अब्ज रुपये (७.९ कोटी डॉलर) एवढा असला तरी तो इतर देशांनी यासाठी केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी कमी आहे. केवळ संशोधनासाठीच नव्हे तर इतर देशांना अवकाशक्षेत्रातील सेवा देण्यासाठी याचा भारताला उपयोग होणार आहे व परकीय चलन तसेच नव्या उच्च दर्जाच्या नोकर्‍याही उपलब्ध होणार आहेत. भारताचे या यशाबद्दल अभिनंदन
 
पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color