स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow पुन्हा एकदा कारगिल भाग-२
पुन्हा एकदा कारगिल भाग-२ पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क श्री. ल. गो. गोळे   
अशी प्रत्येक कंपनी म्हणजे एक परिपूर्ण असे युनिट असते. त्यात साधारणपणे २५० माणसे असतात आणि त्यामध्ये दर्जी, मोचीपासून सर्व प्रकारचे कुशल आणि अकुशल कामगार असतात. शिवाय ५-६ मोठाल्या ट्रक्स, ५-६ वन टनर्स (म्हणजे टेम्पो) आणि ५-६ निळया निस्सान जीप्स असतात. अशाच निस्सान जीपवर माझे ड्रायव्हिंगचे शिक्षण झाले. वाहनांच्या देखभालीसाठी छोटे वर्कशॉपही असावयाचे.
ही मुख्य युनिटस्‌. त्यांचे मदतीसाठी म्हणून निरनिराळी युनिटस्, सिग्नल युनिटस्, पायोनियर युनिटस्‌‍ इत्यादि असतात. या सर्वांचे साहाय्य घेऊन कामे केली जातात. पायोनियर कंपनीमध्ये प्रामुख्याने मजूरांचा भरणा असावयाचा. त्यावेळी १५८७ पायोनियर कंपनीचा कमांडर चांदगीराम हा गोरापान, उंचापुरा आणि तगडा ऑफिसर होता; पण तरीही मृदु मनाचा होता. ’जो वादा किया वो निभाना पडेग” हे त्यावेळचे प्रसिद्ध सिनेगीत मोठ्या ठेक्यात म्हणून जवानांना कामाची व कर्तव्याची जाणीव आणि प्रोत्साहन देत असे.
या सर्व युनिटसाठी आपला नेहमीसारखा गाव-जिल्हा-पिन असा पत्ता नसतो तर आर्मी पोस्ट ऑफिस असा असतो. भारतातील पश्चिमेकडील भागासाठी ५६ एपीओ आणि पूर्वेकडील भागासाठी ९९ एपीओ असाच असतो. युनिटस्मधून खाजगी पत्रे बाहेर जाताना सेन्सॉर होतात.
मी जून १९६१ मध्ये सांगली याथून बी.ई. (सिव्हिल) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काही दिवस एमईएस येथे नोकरी केली. आणि २४/११/६२ रोजी कॅप्टन म्हणून त्यावेळचे प्रथेप्रमाणे तीन वर्षे कालावधीसाठी ग्रेफमध्ये दाखल झालो. त्यादिवशी रुरकी (उ. प्रदेश) येथील ग्रेफ सेंटरमध्ये रुजू झालो. माझ्याबरोबरच माझा आणखी एक वगेमित्र श्री. पुसाळकर हाही कॅप्टन म्हणून जॉईन झाला. त्याशिवाय श्री. बन्सीलाल तिकू आणि श्री. जे. एल्. भोर हे दोघे वर्गमित्रही त्याच सुमारास कॅप्टन म्हणून ग्रेफमध्ये रुजू झाले. त्यापैकी श्री. तिकू हे सध्या मे. जनरल म्हणून अतिउच्चपदस्थ अधिकारी आहेत हे मी आपणास सांगितलेच आहे. श्री. भोर हे ब्रिगेडियर चीफ इंजिनीअर म्हणून ग्रेफमधून नुकतेच निवृत्त झाल्याचे समजले.
रुरकी सेंटरमध्ये आमचे आवश्यक ते प्रशिक्षण झाले. ऑफिसर्स मेसमधील त्यावेळची एक आठवण सांगतो. एकदा जेवण सुरू असताना ऑर्डरलीने माझी प्लेट अचानक उचलून नेली आणि मी चक्रावून गेलो. तर आणखी एका वेळी माझे जेवण संपले होते तेंव्हा ऑर्डरली माझी प्लेट उचलून नेईल व स्वीट डिश घेऊन येईल म्हणून मी वाट पहात तरंगत बसलो होतो. शेजारच्या सहकारी ऑफिसरने माझी अडचण ओळखली व माझ्या प्लेटमधील काटे चमचे एका विशिष्ट पद्धतीने लावून ठेवले. त्याबरोबर लगेच माझी प्लेट उचलली गेली आणि स्वीट डिशही आली. तेंव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला; असे आहे तर ! काटे चमचे एका विशिष्ट पद्धतीने मांडून ठेवणे ही जेवण संपल्याची खूण होती तर ! प्रशिक्षणाचा हाही एक भाग अशा रीतीने पार पडला.
त्यानंतर आमचे पोस्टिंग होऊन आम्हाला बीकन प्रोजेक्टमध्ये पाठविले गेले. बीकन प्रोजेक्टचे मुख्यालय श्रीनगर येथील सुप्रसिद्ध दाल सरोवराचे काठावर आहे. त्याचे प्रमुख म्हणून चीफ इंजिनिअर ब्रिगेडियर ब्रिजमोहन नारायण दास हे काम पहात होते. हे पुढे १९९४ च्या सुमारास लेफ्टनंट जनरल होऊन भारताचे इंजिनिअर इन चीफ बनले. तेथून माझे ५ बीआरटीएफ मधील ११७ कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पोस्टींग झाले. ५ बीआरटीएफचे प्रमुख म्हणून ले. कर्नल पी. आर्. पुरी हे कमांडर होते. पठाणकोट हे त्याकाळचे रेल-हेड म्हणून लडाखचे प्रवेशद्वार होते.सध्या जम्मू-तावी हे रेल-हेड आहे. ११७ कन्स्ट्रक्शन कंपनी त्यावेळी पठाणकोटला येथे होती. मेजर पी. व्ही. मेनन हे कंपनी कमांडर होते. त्यांचे हाताखाली ४/१२/६२ रोजी कॅप्टन प्लॅटून कमांडर म्हणून मी रुजू झालो. आमचेकडे बीकन बेस डेपोचे वर्कशॉप बांधकाम सोपविण्यात आले होते. साधारणपणे सप्टेंबर - ऑक्टोबर ते पुढील मार्चपर्यंत हिवाळयात हिमालयात बर्फामुळे कामे करणे पूर्णपणे अशक्यप्राय होते, अशावेळी इतर कामे सोपविली जात असत. तसेच हे काम होते. पुसाळकर हा ११२ कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये प्लॅटून कमांडर होता. त्यावेळी आमचे टास्कफोर्स कमांड आणि सर्वच युनिटस् तंबूमध्ये होती; निवास आणि ऑफिसे सुद्धा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color