स्वागतकक्ष arrow सय arrow गाथा इराणी - मीना प्रभु
गाथा इराणी - मीना प्रभु पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   
‘गाथा इराणी’ हे मीना प्रभु यांचे एप्रिल २००८ ला प्रसिद्ध झालेले हे पुस्तक आमच्या सांगली नगरवाचनालयात नव्यानेच दाखल होत होते. वाचकाला खिळवून ठेवणार्‍या अनेक गोष्टी त्यात हातात हात गूंफून बालपणीच्या मैत्रिणींप्रमाणे हितगूज करताना आढळतात. ज्याप्रमाणे एखादी साडी गिर्‍हाईकाच्या पसंतीस उतरण्यासाठी तिचा पोत, आकर्षक रंग, त्यावर खुलून दिसणारी नाजुकशी नक्षीदार वेलबुट्टी, काठपदराची रंगसंगती व तिचे मनभावन वेष्टन या सर्वच गोष्टी जुळून याव्या लागतात. त्याप्रमाणे पुस्तकाचे मुखपृष्ठ इतर पुस्तकांपेक्षा खचितच अधिक देखणे आहे. भरभक्कम ३७६ पृष्ठसंख्येतून इराणची गाथा लेखिकेने अतिशय समर्थपणे उलगडून दाखविली आहे. मनोगताचे सादरीकरण मोठ्या दिमाखात, झोकात झालेले आहे. मऊसूत चंदेरी पानांवरील मनोगत वाचताना त्याच्या गर्भरेशमी स्पर्शाने मनही हळुवार बनते. पुस्तकाची एकंदर धाटणी बघून भरजरी पैठणी नेसलेल्या मीना प्रभुच माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

गाथा इराणी
लेखिका - मीना प्रभु
मौज प्रकाशन
किंमत - ३०० रु.
लेखिकेने इराणमध्ये दोन महिने वास्तव्य केले. स्वतःचे कोणीही नातेवाईक तेथे रहात नसताना, सोम्यागोम्याची ओळख काढून परक्या देशात पर्यटनासाठी म्हणून जाणे आणि तेही एकटीदुकटीने हे सुद्धा, नाही म्हटले तरी, धाडसाचेच ! तेथील जनजीवनाची प्रत्यक्ष ओळख करून, इराणचे सांगोपांग दर्शन घडविण्याचे वैशिष्ट्यपूर्ण काम मीनाताईंनी आपल्या अंगहुशारीमुळे सहजी पार पाडले आहे. चीन, मेक्सिको, ग्रीस, तुर्कस्तान, इजिप्त, इंग्लंड इत्यादी देशांबद्दलही अशीच सुंदर पुस्तके लिहिणार्‍या खुद्द मीनाताईंना इराणला जायची ओढ तर होतीच पण आप्तेष्टांच्या काळजीयुक्त सुरांमुळे थोडी धाकधुकही होती. प्रत्यक्ष आलेल्या सुखद अनुभवांमुळे इराणमध्ये त्यांचं मन इतकं खोलवर कसं व कधी रुजलं ते त्यांचं त्यांनाही समजलं नाही. चष्म्याच्या काळ्या काचा गुलाबी झाल्या त्याबाद्दल आपल्याला भेटलेल्या इराणी लोकांच्या ‍ऋणाचा उल्लेख त्या आठवणीने करतात.
इराणच्या सफरीत भेटलेल्या व्यक्तींनी लेखिकेचं अनुभवविश्व समृद्ध केलं. एवढंच नव्हे तर लेखिकेच्या मनात घर करून रहिली ती माणसं ! आपल्या मनात जपलेल्या त्यांच्या तजेलदार आठवणींबरोबर लेखिकेने त्या त्या व्यक्तींचे फोटोही छापले आहेत पुस्तकात. पण त्या फोटोखाली आपले नाव न घालण्याचा त्यांचा आग्रह मात्र लेखिकेला मान्य करावा लागला. आदरातिथ्य, प्रेमळपणा व उदार वृत्ती जगात शोधून सुद्धा सापडणार नाही असे लेखिकेचे प्रांजळ मत बनले. तेल व फळफळावळ यांनी समृद्ध असलेला हा मूळचा ‘पर्शिया’ होता. झोराष्ट्रीय धर्माचा पगडा असलेल्या या देशावर अरबांनी आपली सत्ता स्थापून मुस्लिम धर्म व फार्सी भाषा वापरायला लावली. झोराष्ट्रीयांच्या ‘अवेस्ता’ या धर्मग्रंथाची जागा कुराणाने घेतली. समस्त स्त्रीवर्गाला जाचक बंधने पाळावी लागली.
इराणला जाण्यासाठी आलेल्या सर्व अडीअडचणी, अगदी बारीकसारीक तपशीलासह, वाचकांसमोर साळढाळपणे मांडताना लेखिकेने हात आखडता घेतलेला नाही. तेहरानला पोहोचल्यापासून ते भारताला परत येईपर्यंत इराणी लोकांच्या दुसर्‍याला मदत करण्याची वृत्तीने लेखिकेला पूर्णपणे भारावून टाकले. भेटलेला प्रत्येक माणूस पाहताक्षणीच इतक्या सलगीने वागत असे की जणू साता जन्माची ओळख ! इराणमधील बहुतेक सर्व मोठी शहरे व तेथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी सर्वांनी मनापासून सर्वतोपरी मदत केली. अगदी एका गावाहून दुसर्‍या गावाला गेल्यावर तेथे बस, रेल्वे, वा विमान कोणत्याही वाहनातून उतरवून घेण्यापासून तेथे राहण्याची, जेवणखणाची अगदी वाटाड्याची सुद्धा सोय आनंदाने केली गेली. ऎतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, वैचारिक भाषिक या सर्व दृष्टीकोनातून इराणचे समग्र यथायोग्य दर्शन घडविण्यावा लेखिकेचा प्रयत्न अतिशय स्तुत्य वाटतो.
इराणी लोकांच्या अदबशीर वागण्याच्या मोहात पडून पुन्हापुन्हा इराणला जावेसे वाटणार्‍या लेखिकेने एका गोष्टीचे मात्र परखडपणे प्रतिपादन केले आहे. ती म्हणजे स्त्रियांवरील बंधने. विशेषतः त्यांच्या पोषखावरील बंधने. घरातून कोठेही बाहेर पडताना त्यांनी स्वतःचे सर्व अंग झाकूनच गेले पाहिजे. त्यासाठी तो ठराविक रंगाचा काळा ‘मॉतो’ म्हणजे पायापर्यंत येणारा घोळदार डगला. एवढेच नव्हे तर स्त्रियांनी आपले डोके, मान, केसही झाकले जातील असा ‘हिजाब’ म्हणजे रुमाल बांधलाच पाहिजे. थोडे जरी केस दिसले तरी पोलिस ‘बॅड हिजाब’ असे म्हणून पकडून न्यायला कमी करणार नाहीत. ही सक्ती केवळ मुस्लिम स्त्रियांपुरतीच मर्यादित नसून अगदी परदेशी, परधर्मीय व्यक्तीलाही या सर्व अटी पाळाव्याच लागतात. भारतातून तेहरानला जाण्यासाठी विमानात चढतानाच लेखिकेला या अटींचे काटेकोर पालन करावे लागले. लेखिकेला या गोष्टीचा विलक्षण संताप आला. एरवी सर्व बाबतीत अत्याधुनिक असलेल्या, अमेरिकेशी कट्टर वैर असलेल्या या देशात स्त्रियांच्या बाबतीत एवढा मागासलेपणा कसा काय ? इतकी धर्मांधता कशी काय खपवून घेतली जाते असा रोकडा सवाल लेखिकेने केला आहे.
हे पुस्तक वाचल्यावर मनात ठसले ते पहिल्या पानावरील चित्र. संपूर्ण काळ्या पार्श्वभूमीवर काळ्या वस्त्राने अंग झाकून घेऊन तन्मयतेने पुस्तक वाचणारी महिला ही अख्ख्या इराणी स्त्री वर्गाचे प्रतीक होय . तसेच भूकंपाअगोदरचा वैभवसंपन्न इराण व भूकंपानंतरचा भग्नावशेषातील इराण हे चित्र मोठं सूचक वाटलं. इराणवर दोन प्रकारची संकटं आली. एक नैसर्गिक तर दुसरं धार्मिक. नैसर्गिक संकटावर मात करून इराण पुन्हा समृद्ध झाला आहे. आज ना उद्या या धार्मिक जोखडातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य या प्रेमळ, आदरातिथ्यशील इराणी नागरिकांच्या चांगुलपणात उदयास येईल. पूर्वीचा वैभवसंपन्न इराण बंधुभावाचा संदेश देण्याचे काम करण्यासाठी जागतिक स्तरावर पुढे येईल असा मला विश्वास वाटतो.
 
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color