स्वागतकक्ष arrow आमचे गाव arrow कोल्हापूर arrow मराठी चित्रपटांचे माहेरघर
मराठी चित्रपटांचे माहेरघर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

महाराष्ट्रातील काही शहरे आज कित्येक वर्षे आपल्या खास वैशिष्ट्यामुळे ओळखली जातात. राजर्षी शाहूरायांची ही करवीरनगरी! आपल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्वानं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचं भूषण ठरली आहे.

व्यापार, यंत्रउद्योग, शिक्षण आणि कला कौशल्य इत्यादी उद्योग व्यवसायाप्रमाणेच चित्रपट व्यवसायालासुध्दा कोल्हापुरात पाऊणशे वर्षाहूनही अधिक परंपरा आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी जसा पहिला क्रॅमेरा कोल्हापुरात तयार केला त्याचप्रमाणे प्रभात फिल्म कंपनी या नामवंत संस्थेने `अयोध्येचा राजा' हा पहिला दैदिप्यमान बोलपट कोल्हापुरातच तयार केला. पुढे नावारुपाला आलेल्या पृथ्वीराज, राजकपूर यासारख्या बुजुर्गांनी भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटात भूमिका केल्या. कितीतरी कलावंत, तंत्रज्ञ या मातीने चित्रपटसृष्टीला दिले. त्यातले बरेचजण कोल्हापूरच्या बाहेर आज चित्रपट सृष्टीत मोलाची भर घालत आहेत. आपल्या प्रतिभा सामर्थ्याने येथील कलावंतांनी अलौकिक चित्रपट महाराष्ट्राला दिले. `नेताजी पालकर', `थोरातांची कमळा', `मायभवानी', `नायकिणीचा सज्जा' असे एकापेक्षा एक ऐतिहासिक चित्रपट रसिकांना सादर करताना शिवरायांचा बालपणापासून ते अखेरपर्यंत त्यांच्या समग्र जीवनावर छत्रपती शिवाजी हा ऐतिहासिक चित्रपट काढून भालजी पेंढारकरांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक इतिहासच निर्माण केला. त्यांच्या ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणेच त्यांची सामजिक चित्रेही रसिकांच्या दीर्घकाळ लक्षात राहतील अशीच आहेत. `सूनबाई', `मीठ-भाकर', `साधी-माणसं', ही अस्सल मराठी मातीतील चित्रे मराठी रसिकांच्या काळजाला जाऊन भिडली. बाबूराव पेंटर किंवा भालजी पेंढारकर काय या कला महर्षींच्या कर्तृत्वाचा आढावा असा सहजासहजी घेणे म्हणजे कंदिलानं सूर्य दाखवण्यासारखा प्रकार होईल. हे कलामहर्षी म्हणजे जणू पुढच्या कलावंतांना मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या चित्रपटात भूमिका करणारी माणसंसुध्दा भूमिका जगणारी माणसं होती.

नानासाहेब फाटक हे वास्तविक रंगमंचावरचे कलाकार. पण `थोरातांची कमळा' चित्रपटातील त्यांचा शिवाजी न भूतो न भविष्यति ठरला. चंद्रकांत, मास्टर विठ्ठल, झुंजारराव पवार, जयशंकर दानवे, ललिता पवार, सुलोचना, सूर्यकांत, जयश्री गडकर, वसंतराव पहेलवान, बाबूराव पेंढारकर अशी किती नावे सांगावीत? या आणि त्यांच्याबरोबर कामे करणाऱ्या दुय्यम कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक युगच निर्माण केले, अशीच नोंद इतिहासाला घ्यावी लागेल.

चित्रतपस्वी शांतारामबापू यांनी आपला चित्रसंसार जरी मुंबईला थाटला असला तरी कोल्हापूरचा विसर त्यांना पडला नव्हता. ज्या मातीत आपण सुरुवातीला चित्र निर्मितीचे धडे गिरवले त्या मातीचे आपण काहीतरी ऋण लागतो याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच `पिंजरा' या भव्य चित्रपटासाठी त्यांनी कोल्हापूरचीच निवड केली. डॉ. लागू सारखा एक गुणी कलाकार त्यांनी चित्रसृष्टीला दिला.

निर्मिती दिग्दर्शनाबाबत दिग्दर्शक किती जागरुक असावा लागतो याची प्रचिती आम्हा लहान थोर कलाकारांना चित्रीकरणाच्या वेळेस नेहमीच येत असे. माझी त्यात फौजदारांची तशी छोटी भूमिका, पण माझा मेकअप विशेषत: मिशा व्यवस्थित लागलेल्या आहेत की नाहीत हे शांतारामबापू स्वत: मेकअप रुममध्ये येऊन पहात असत. बऱ्याच वेळेला त्यांनी माझ्या मिशा स्वत: लावून मेकअपमनची चूक त्याला समजावून दिली आहे. मला तर मनापासून असे वाटते, शांतारामबापूंच्याकडे काम केलेला कलाकार पृथ्वीतलावर कुठेही गेला तरी अभिनयात ते तसूभरही कमी पडणार नाही.

भालजींच्या प्रमाणे अनंत माने, गोविंद कुलकर्णी हे निर्माते - दिग्दर्शकही कोल्हापूरात स्थिर झाले आणि त्यांनी उत्कृष्ट चित्रपट निर्मितीची परंपरा जोपासली. तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांच्या माथी उगीचच बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करुन दिला.
`काय हो चमत्कार' यासारखा चित्रपट मराठी प्रेक्षकांना ग्रामीण वातावरणात घेऊन जातो. चंद्रशेखर यांचं काव्यच त्यांनी रुपेरी पडद्यावर मूर्तिमंत साकार केले आहे.

`सांगू कशी मी', `असला नवरा नको गं बाई', `तोतया आमदार', `बंधन', `झेड. पी.', अशी समस्याप्रधान चित्रे देऊन माने यांनी स्वत:च्या प्रतिभेचा एक खास ठसा उमटवला. `एक गांव बारा भानगडी', `सवाल माझा ऐका', `केला इशारा जाता जाता' हे तर त्यांचे अविस्मरणीय महोत्सवी चित्रपट. अरुण सरनाईक सारखा एक उमदा नायक त्यांनीच चित्रपटसृष्टीला दिला. लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक यांना नायिका त्यांनीच बनविले आणि माझ्यासह कोल्हापूरातील कितीतरी दुय्यम कलाकार नावारुपास आणले. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे ऐकमेव दिग्दर्शक असावेत असे धाडसाचे विधान मी केले तर ते चुकीचे ठरु नये.

`बारा वर्षे सहा महिने तीन दिवस', `वारणेचा वाघ', `सुगंधी कट्टा', `पाच नाजूक बोटे', `दगा' इत्यादी दर्जेदार चित्रपट पेंटरांनी दिले. यशवंत दत्त सारखा एक प्रतिभाशाली कलाकार त्यांनीच प्रकाशात आणला. उत्कृष्ट चित्रकार आणि उत्तम तंत्रज्ञान यांचा संयोग वसंत पेंटर यांच्यात असल्याने त्यांची सर्वच चित्रे लोकप्रिय ठरली. शांतारामबापूंपासून ते कमलाकर तोरणे यांच्यापर्यंत सहदिग्दर्शक म्हणून उमेदवारी करीत असलेले गोविंद कुलकर्णी हे आणखी एक कर्तबगार निर्माते दिग्दर्शक. त्या दिग्दर्शकाला हाताशी धरुन दादा कोंडके यांनी सुरुवातीचे `सोंगाड्या', `एकटा जीव सदाशिव' हे चित्रपट निर्माण केले. त्याशिवाय `चुडा तुझा सावित्रीचा', `बन्या बापू', `मुरळी मल्हारी रायाची', `दैवत', `मर्दानी', `शपथ तुला बाळाची' इत्यादी अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केले.

`बाई मी भोळी', `औंदा लगीन करायचं', `बोला दाजिबा' अशा काही ग्रामीण चित्रपटांची निर्मिती कृष्णा पाटील या अनुभवी दिग्दर्शकाने केली. पण नंतर मात्र त्यांची चित्रनिर्मिती खंडित झाली. आघाडीचे चित्रपटकवी असा नावलौकीक मिळविलेल्या जगदीश खेबुडकरांचे देखील हेच घडले. `देवघर' या कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती करुन त्यांनी निर्मिती क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकले खरे, पण चित्रपट चांगला असूनही आर्थिक अपयश आल्यामुळे त्यांच्या चित्रपट निर्मितीची वाट अजून तरी बंद आहे.

सुधीर ससे, शांताराम चौगुले, पितांबर काळे, रविंद्र पन्हाळकर, भास्कर जाधव, सतिश रणदिवे, यशवंत भालकर यासारखी मंडळी आपापल्या परीने चित्रपट निर्मितीचा प्रयत्न करीत आहेत. सर्व नामावलीत आणखी एका बुजुर्ग व्यक्तीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे आणि ती व्यक्ती म्हणजे दिनकर द. पाटील. मास्टर विनायकांचे हे शिष्य लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत अजूनही आपला खास ठसा उमटवीत आहेत. `रामराम पाव्हणं' पासून अलिकडच्या `शिवरायांची सून' पर्यंत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनामोल चित्रांची भेट दिली आहे.

रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या `जय मल्हार', `देवाघरचं लेणं', `सासर-माहेर' इत्यादी चित्रपटांचे ज्येष्ठ दिग्दर्शक द. स. तथा तात्या अंबपकर आज दुर्दैवाने हयात नाहीत. अलिकडे कोल्हापूरच्या यशवंत भालकर या तरुण दिग्दर्शकाने `पैज लग्नाची' या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे राज्य पारितोषिक मिळवून कोल्हापूरची खंडित झालेली परंपरा जिवंत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोल्हापूरच्या भूमीला निसर्गाचं वरदान आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांनी कोल्हापूरचा परिसर बहरला आहे. म्हणून मुंबईचे निर्माते सुध्दा शुटिंगसाठी कोल्हापूरच पसंत करतात. महेश कोठारी, सचिन अरविंद सामंत, सय्यद देसाई, विश्वास सरपोतदार, दादा कोंडके, स्मिता तळवळकर इत्यादी अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट कोल्हापूरातच निर्माण केले आहेत. आणि तरीही मनात शंकेची पाल चुकचुकते की मराठी चित्रपट निर्मितीचे हे माहेरघर हळूहळू खचत जाणार काय? काही वेळा मन विषण्ण होतं आणि वाटायला लागतं, मराठी चित्रपटांचं भवितव्य काय? नवीन निर्मात्यांचे प्रयत्न काही फारसे यशस्वी झाल्यासारखे दिसत नाहीत. स्टुडिओत शूटिंग करण्याची प्रथा इतकी कमी होऊ लागली आहे की कोल्हापूरातील दोन्ही स्टुडिओ महिनोन महिने ओसच पडलेले असतात. कोल्हापूरातील निर्मात्याप्रमाणेच कलाकारांचीही वाणवाच आहे. त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरला कलावंत आणण्यापेक्षा मुंबईला शूटिंग करणे बरे असाही काही निर्मात्यांचा कल असतो. म्हणून आमचं माहेरघरच पोरकं झालं आहे. पण असं होता कामा नये. मराठी चित्रपटसृष्टीचा संसार पुन्हा इथं बहरला पाहिजे. बाबूराव पेंटरांचं डिस्नेलँडचं स्वप्न साकार करण्यासाठी कूर्मगतीनं होऊ घातलेली चित्रनगरी द्रुतगतीने पुरी झाली पाहिजे. मराठीच्या प्रभात कालाचा उदय पुन्हा कोल्हापुरात झाला पाहिजे.

 
पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color