कोल्हापुरी मिसळ पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

प्रत्येक गावाचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या काही गोष्टी असतात. बदलत्या कालमानानुसार काही वरवर बदल झाला सारखा भासत असला तरी या गोष्टींनी परंपरा मात्र जपल्याची जाणीव होते. कोल्हापुरी फेटा, कोल्हापूरी चप्पल, पैलवान, गंगावेसच्या दूध कट्ट्यावर मिळणारे धारोष्ण दूध, याबरोबरच जिभेला चटका देणारी तेल चटणीचा भरपूर तवंग असणारा कट घातलेली मिसळ ज्या माणसाने चाखली नसेल तो जातीवंत खवैय्या म्हणताच येणार नाही. मटकीच्या मोडाची उसळ किंवा पांढरा वाटाणा, मटार यांचा तवंगदार रस्सा, त्यात शेव चिवडा, पापडी, भज्याचे तुकडे, त्यावर पांढरा कांद्याचा कीस, वर हिरव्यागार कोथिंबिरीचा साज अशी सजवलेली मिसळ, कोल्हापूरात अनेक ठिकाणी तयार होते. मात्र हरगाडीची न्यारी शिट्टी, हरगाडीचा न्यारा हात या उक्तीनुसार करणाऱ्यांच्या हातांचा धर्म वेगळा असेल आणि ती चाखणाऱ्यांच्या जिभेला वेगळी अनुभूतीही देत असेल. पण कोल्हापुरी मिसळ, ही परंपरा कोल्हापुरी फेट्याइतकीच कोल्हापुरची खासियत आहे.

कोल्हापुरी मिसळीची नक्कल अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला तरी कवी जसा जन्मावा लागतो तसाच जातीवंत मिसळ बनवणारे हात हे उपजतच असावे लागतात. त्यात अनुभवाने संपन्नता अधिक येत असेल हा भाग वेगळा! अशी मिसळीची परंपरा जपणारे, तिची मूळ लय बिघडू न देता अधिक रंग आणणारे घरंदाज गायकीच्या परंपरेतील मिसळवाली घराणीही कोल्हापुरात आपला दर्जा टिकवून आहेत.

कसबा बावडा हे कोल्हापुरचे उपनगर. तिथला छत्रपतींचा नवा राजवाडा हा जसा सर्वांच्या कुतुहलाचा, श्रध्देचा विषय. तशीच बावड्याची जगप्रसिध्द मिसळ हाही जातिवंत खाणाऱ्यांचा दुनियेतल्या माणसांचा आकर्षणाचा विषय! कसबा बावड्याचे दिनकर दत्तात्रय चव्हाण यांच्या छोटेखानी हॉटेलात तयार होणाऱ्या मिसळीने कसबा बावडा या उपनगराची ख्याती साता समुद्रापार नेली. जगाच्या पाठीवरचा माणूस हा मूळात फिरणारा आणि फिरुन खाणारा आहे आणि जातिवंत फिरस्त्याला खाणं निषिध्द नसतंच. फिरता फिरता याची नजर खाण्याच्या ठिकाणांचा शोध घेत असते. असे खाणारे फिरस्ते दिनकर चव्हाणांच्या मिसळीचा आस्वाद घेत असतात. आणि आपल्या जिभेचं इहलोकी सार्थक करतात. कसबा बावड्याची ही मिसळ रशिया, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी येथील परदेशी फिरस्त्यांनी चाखली आहे.

कसबा बावड्याच्या मिसळीच्या बरोबरीनेच खास मिसळीचाच व्यवसाय करणारे, त्याचसाठी प्रसिध्द असणारे महाद्वार रोडवर असलेले चोरगे मिसळ गृह हे मिसळ रसिकांच्यासाठी असणारं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण. त्याचप्रमाणे स्वत:चे खास वैशिष्ट्य अशी कोल्हापूरच्या उद्यमनगरातील पार्वती चित्र मंदिराच्या परिसरातील फडताऱ्यांची मिसळ हीही रसिकांच्या दरबारातील खास पसंती! या पसंतीची मनमोकळी दाद हॉटेल न्यू आनंदाश्रमच्या मालकांचे सुपुत्र चंद्रकांत यांनी दिलखुलासपणे दिलेली आहे. गंगावेशीत अर्बन बँकेसमोरचे हे हॉटेल न्यू आनंदाश्रम हे दिनकर हरी पाटील गेल्या ४० वर्षापासून चालवत आहेत. त्यांच्याच परिवारातील एस. टी. स्टँडसमोरचे जय भवानी हॉटेल व उमा चित्र मंदिरनजीकचे दिलबहार ही मिसळीसाठी खास स्वत:चा दर्जा असणारी ठिकाणं आहेत.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color