स्वागतकक्ष arrow आमचे गाव arrow कोल्हापूर arrow कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळे - १
कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळे - १ पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

नवा राजवाडा (शाहू म्यूझियम) :
दसरा चौकातून शहराच्या उत्तरेकडील भागात तीन कि. मी. अंतरावर नवा राजवाडा मोठ्या डौलाने उभा आहे. या राजवाड्याचा नकाशा मेजर मँट या वास्तुशिल्पकाराने बनविला आहे. आणि तो तयार होण्यास सन १८७७ ते १८८४ असा सात वर्षाचा कालावधी लागला. त्याकाळी त्याची किंमत सुमारे सात लाख रुपये होती. याची दर्शनीय बाजू दक्षिणेला असून राजवाड्याच्या मध्यभागी असलेल्या उंच मनोऱ्यावर एक भलं मोठं घड्याळ चारही दिशेने वाढत असलेल्या करवीर नगरीची शान पाहत आहे. या मनोऱ्याची उंची १३५ फूट आहे. राजवाड्याच्या एका बाजूला दरबारगृह व बिलिअर्ड खेळण्याची खोली असून दूसऱ्या बाजूला दोन मोठ्या खोल्या स्वागत प्रतिक्षेसाठी आहेत. मागील बाजूस मोठा खुला चौक असून त्याच्या मध्यभागी एक कारंजा आहे. मुख्य राजवाडा दुमजली असून त्याच्यावर लहान मोठे मनोरे व घुमट आहेत. मिश्र शिल्पकलेचा हा एक उत्कृष्ट व तितकाच सुंदर नमुना आहे. हा राजवाडा, त्या समोरील छोटा तलाव, तलावाकाठी छोटे राखीव जंगल आणि त्यातून हिंडणारी हरणे व इतर प्राणी, वाड्याभोवतालचा रम्य परिसर मनाला मोहविणारा आहे.

श्रीमंत छत्रपतींचे हे निवासस्थान. राजवाड्याच्या काही भागात सध्या शाहू महाराजांच्या काळच्या ऐतिहासिक वस्तू व शिल्प यांचे संग्रहालय करून स्मारक म्हणून राखून ठेवले आहे. छत्रपती शाहूंची मौल्यवान छायाचित्रे व पेंटिग्ज, त्यांनी शिकारीसाठी व लढाईमध्ये वापरलेल्या बंदुका व अन्य शस्त्रे, शिकारीत मिळालेली जनावरे आकर्षक पध्दतीने मांडलेली आहेत. या राजवाड्यातील भव्य दरबार हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने चितारलेले आहेत. पूर्वी दरबार भरत असताना ज्या पध्दतीने सजवला जात असे त्याच पध्दतीने सजवून तो प्रेक्षकांपुढे मांडलेला आहे, हे दरबार हॉलचे वैशिष्ट्य. राजवाड्याचा परिसरही उद्याने व हिरवळीने नटलेला आहे. हे म्युझिअम सोमवारी बंद असते. इतर दिवशी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत खुले असते.

जुना राजवाडा (भवानी मंडप) :
शहराच्या मध्यवस्तीत व महालक्ष्मी देवालयाच्या सान्निध्यात असलेला हा राजवाडा सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधला गेला. त्यानंतर अनेकवेळा त्यात सुधारणा केल्या गेल्या. सन १८१३ मध्ये त्याचा काही भाग पुन्हा बांधण्यात आला. राजवाड्याचा पुढील भाग तर संपूर्णपणे बऱ्याच कालातंराने बांधला गेला आहे. हा राजवाडा दुमजली असून मध्यभागी मोठा हॉल आहे. येथे श्री. महालक्ष्मी (तुळजा भवानी) च्या प्रतिमेची स्थापना केली आहे. या हॉलचा उपयोग दरबारगृह व खाजगी धार्मिक विधीकरता होत असे. राजवाड्याखेरीज इतर विस्तारित भागांचा उपयोग संस्थान काळात निरनिराळया संस्थानी कार्यालयासाठी म्हणून होत असे. सध्या या विस्तारित इमारती पोलिस स्टेशन, कोर्ट, एन. सी. सी. ऑफिस, शेतकरी बझार, राजाराम हायस्कूल, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल वगैरे करिता वापरल्या जातात. राजवाड्यासमोर एक मोठा मंडप असून त्याला भवानी मंडप असे म्हणतात. भवानी मंडप हे सध्या सिटी बसेसचे एक केंद्र आहे. या राजवाड्याच्या उत्तरेला जुन्या पध्दतीची पाच मजली वास्तू आहे. याचा वापर नगारखान्याच्या वास्तूला तीन मोठ्या कमानी आहेत. मधल्या हॉलमध्ये जो पूर्वी दरबारी थाट होता तो अलिकडच्या काही वर्षात पहावयास मिळत नाही व इथून पुढे मिळणारही नाही. सध्या तेथे एक गवा रेडा आणि वाघ, सांबर आदि कांही प्राणी भुसा करुन उभे केलेले आहेत. रान- रेडा सध्याच्या छत्रपतींनी सुमारे ३० - ३५ वर्षापूर्वी मारला होता. ही एकच काय ती निशाणी राहिलेली आहे. बाकीचा सर्व वैभवी थाट लोप पावलेला आहे.

शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान :
कोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिध्द आहे. श्री. शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे. या खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या, असंख्य पैलवान या मातीत नावारुपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळयांचे पारणे फेडले. हे मैदान मंगळवार पेठेत असून जुन्या राजवाड्यापासून चालत पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मैदान अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून अशा प्रकारचे मैदान क्वचितच असेल. याचा आकार पूर्ण गोलाकृती असून मध्यभागी कुस्ती खेळण्याचा मोठा आखाडा आहे. या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कुस्त्या केल्या जातात. सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी म्हणून उतरण आहे. या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट तबकासारखा दिसतो. पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशाची सोय आहे. पूर्वेला निमंत्रित व मान्यवर व्यक्तींना बसणेकरिता मोठा मंच असून त्यावर मंडप उभारलेला आहे. या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा इतर कार्यक्रमासाठीही केला जातो. आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक अंतराच्या आत येऊ नये म्हणून दोन वर्तुळकार लोखंडी कठडे तयार केलेले आहेत. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असून त्यालगतच केशवराव भोसले नाट्यगृह आहे.

केशवराव भोसले नाट्यगृह :

सध्या कोल्हापुरात असलेले हे नाट्यगृह सुमारे ९० वर्षापासून उभे आहे. महाराष्ट्रातील हे सर्वात जुने नाट्यगृह होय. या नाट्यगृहाची उभारणी राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रेरणेने झाली. पूर्वी यास पॅलेस थिएटर या नावाने ओळखत असत. याच्या बांधकामास ९-१०-१९१३ रोजी सुरवात झाली. १४-१०-१९१५ रोजी याचे बांधकाम पूर्ण झाले. नाट्यगृहाचे रंगमंच भव्य चौकोनासारखे असून ते ७२० फूट आकाराचे आहे. रंगमंचाखाली १० फूट खड्डा असून त्यात पाणी आहे. पूर्वी ही विहीर होती असे म्हणतात. रंगमंचाखाली पाणी ठेवण्याचा उद्देश आवाज घुमावा हा आहे. हे या नाट्यगृहाचे एक खास वैशिष्ट्य आहे. पाणी खेळविण्यासाठी पक्की गटारे बांधली आहेत. रंगमंचाच्या पूर्वेकडील बाजूस दोन रंगपटगृहे आहेत. भक्कम फळया घालून रंगमंच बांधले आहे. नाट्यगृहात कोठेही खांब नाहीत त्याकाळी बांधलेल्या बहुतेक नाट्यगृहात खांब फार असत व त्यामुळे काही प्रेक्षकांना रंगमंचावरील पूर्ण भाग पाहता येत नसे. कलाकार, प्रेक्षक व आवाजाचा अंदाज घेऊन हे नाट्यगृह बांधले असल्यामुळे कोठूनही पूर्ण रंगमंच दिसतो व संभाषण चांगले ऐकू येते. पीटाच्या पहिल्या रांगेतील प्रेक्षक व रंगमंच यामध्ये सुमारे ८० फूट अंतर आहे. माडी प्रशस्त व खानदानी वाटते. बसण्याची जागा चांगली रुंद आहे. पूर्वी माडीवर दोन्ही बाजूस राज घराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी दोन चष्मे (बंदिस्त खोल्या) ठेवण्यात आले होते. गोषातील स्त्रिया येथून नाटके पाहत. अलिकडे नाट्यगृहात अंतर्बाह्य खूपच सुधारणा झाल्या आहेत.

नाट्यगृहाच्या सभोवताली प्रशस्त मोकळी जागा असलेने त्यांच्या सौंदर्यात भर पडली आहे. या आवारात कोल्हापूरचे सुप्रसिध्द अभिनेते कै. अरुण सरनाईक यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. एका कारंज्याचीही रचना केलेली होती, पण हे कारंजे सद्यस्थितीत बंद आहे. नाट्यगृह रस्त्यापासून थोडे बाजूला व रस्त्याच्या पातळीपासून खाली असल्याने बाहेरच्या गलबलाटाचा नाटकावर परिणाम होत नाही. एकंदरीत नाट्यगृहाची रचना व सोयी या दृष्टीने ज्या काळात नाट्यगृह बांधले त्याचा विचार केला तर तर अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही.

हे नाट्यगृह बांधण्यापूर्वी कोल्हापुरात लक्ष्मी प्रसाद, शिवाजी व श्री. मेंढे यांचे शनिवार थिएटर अशी तीन नाट्यगृहे चालू होती. राजश्री शाहू छ. महाराज हे कलांचे रसिक भोक्ते व उदार आश्रयदाते होते. कोल्हापुरात नव्हे तर महाराष्ट्रात नाट्य व संगीत कला यांच्या वाढीस शाहू महाराजांचे सहाय्य कारणीभूत झाले. १९०२ मध्ये शाहू महाराज विलायतीला गेले. तिकडील विशेषत: रोममधील कुस्त्यांची मैदाने व पॅलेस थिएटर यांच्या रुपाने प्रगट झाले. पॅलेस थिएटरचे उद्घाटन त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांचे हस्ते झाले. थिएटरचे अनावरण १९१५ साली दसऱ्यास किर्लोस्कर संगीत नाटक मंडळींच्या मानापमान या नाटकाचा प्रयोग होऊन झाले. किर्लोस्कर नाटक कंपनीबरोबर राम गणेश गडकरीही आले होते.

स्वातंत्र्यानंतर या नाट्यगृहाचे पूर्वीचे नाव पॅलेस थिएटर बदलून केशवराव भोसले नाट्यगृह असे ठेवण्यात आले. कोल्हापूरच्या केशवराव भोसले या नामवंत नटाचे नाव या नाट्यगृहास देऊन त्यांचा गौरव केला गेला. त्यांची दोन तैलचित्रे रंगमंचावर लावण्यात आली आहेत.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color