स्वागतकक्ष arrow आमचे गाव arrow सांगली arrow सांगलीतील वैद्यक शास्त्राची परंपरा
सांगलीतील वैद्यक शास्त्राची परंपरा पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क डॉ. पी. जी. आपटे   

---- डॉ. पी. जी. आपटे

आपल्या भारतामध्ये आजच्या घटकेला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने जितकी वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे जवळजवळ तितकीच आपल्या सांगली मिरजेमध्येही आहे. बहुतेक सर्व प्रकारचे तज्ञ आणि अतितज्ञ डॉक्टर्स आपल्या अद्यावत ज्ञानाचा लाभ जनतेस करून देत आहेत. दिवसेंदिवस त्यात भरच पड त आहे. ही अभिमानाची व गौरवास्पद गोष्ट आहे.

अशा वैद्यकसेवेचा गेल्या शंभर वर्षांचा मागोवा घेऊ लागले की आश्चर्याचा धक्का बसतो. त्यावेळचं सांगली गांव अत्यंत छोटं. श्रींमंत अप्पासाहेब पटवर्धनांनी वसवलेलं संस्थान. छोटाशा प्रजेच्या आरोग्यकल्याणासाठी तासगांव चिंचणी येथे वास्तव्य करीत असलेल्या श्री. कृष्णाजी विष्णू जोशी या वैद्यांची मुद्दाम नेमणूक करून त्यांच चरितार्थासाठी गणपती देवालयांतील सांबाच्या देवळाची देखभाल पूजाअर्चा करण्याची जबाबदारी त्यांचेवर सोपवली. त्यामुळे जोशी हे नाव मागे पडून सांबारे हेच नाव सर्वतोमुखी झाले आणि लौकिकास पात्र ठरले. हेच कृ . वि. जोशी आबासाहेब सांबारे झाले.सांगलीच्या पंचक्रोशीतच नव्हे तर सबंध महाराष्ट्न्, कर्नाटक आणि मध्यप्रदेश, उत्तर हिंदुस्धानातही त्यांची नामवंत वैद्य म्हणून कीर्ती पसरली. प्रचंड आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, प्रयोगशीलता यांच्या जोरावर १८८५ चे सुमारास त्यांनी सांगलीत पाय ठेवले, रोवले आणि आपल्या नैपुण्याने, दुर्धर, महादुर्धर रोगांवर मोठा नावलौकिक मिळविला. लोकमान्य टिळकांसारखा महामानवही त्यांचेकडे औषधोपचार घेत असे. एवढी गोष्ट त्यांच्या लोकोत्तरतेची साक्ष म्हणून पुरेशी आहे. ४०-५० वर्षांच्या अखंड सेवेनंतर १९३२ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी १८९१-९२ पासून सुरू केलेला गणेशोत्सव लोकमान्यांपासून स्फूर्ती घेऊनच केलेला होता. आबासाहेबांचे दुसरे बंधु श्री दामुअण्णा सांबारे निष्णात नाडीवैद्य म्हणून प्रसिद्ध होते. आबासाहेबांच्यानंतर त्यांचे सुपुत्र श्री अप्पासाहेब यांनी वैद्य परंपरा १९५७ मध्ये मृत्युपर्यंत अखंड चालू ठेवली होती.

हरीपुरचे रहिवासी वैद्य ग. पां. परांजपे मोठे नामांकित वैद्य. मारुतीमंदिराचे पिछाडीस असलेल्या ओवरीतील त्यांचा दवाखाना म्हणजे रोजची एक जत्राच. लहान मुलांच्या विशेषत: काविळ,मुडदूस, उदरआंकडी इत्यादी रोगांवर त्यांच्याकडे गुणकारी औषधे मिळत. ठेंगणी, गोरीपान, घाऱ्या डोळयांची, स्वच्छ शुभ्र धोतर, बंडी अंगरखा परिधान केलेली तयांची हसतमुख मूर्ती प्रत्येक रुग्णावर प्रभाव तर पाडत असेच पण त्याचबरोबर विश्वास, दिलासाही देत असे. त्यांच्यापुढील आणखी दोन पिढ्याही वैद्यक व्यवसायातच व्यग्र आहेत. याखेरीज श्री खानापूरकर जोशी, वेलणकर हे ही वैद्यकीय करीत. वेलणकरांनी आर्युवेदिक औषधे बनवून त्यांची निरनिराळया गांवी विक्रीचीही सोय केली होती.

शिकलगार समाजातील श्री. समशेरजी शिकलगार खालच्या वर्गाच्या रोग्यांचे आधारस्तंभ. त्यांच्या कुवतीप्रमाणे खूप वर्षे त्यांनी जवळपास विनामूल्य औषधोपचार केले होते. युनानी, होमिओपॅथी इत्यादी इलाज करणारे त्यावेळी कुणीही नव्हते तसेच मुस्लिम समाजातील कुणीही वैद्य नव्हते ही नमूद करण्याजोगी बाब.

पाश्चात्य वैद्यकशास्त्राचा रीतसर अभ्यास करून १९०८ साली सांगली संस्धानात असिस्टंट सर्जन म्हणून रुजू होणारे पहिले डॉक्टर म्हणजे डॉ. व्ही. एन्. देसाई. कांही वर्षांनंतर मतभेद झाल्याने नोकरी सोडून १९१३-१४ पासून वखारभागात सध्याच्या पटेल चौकात त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. दवाखाना हे सेवामंदिर आहे, रोग्यास रोगमुक्त करणे हेच चिकित्सकाचे कर्तव्य. हीच परमेश्वर सेवा या भावनेने त्यांनी १९५३ साली देह ठेवेपर्यंत व्यवसाय केला. त्यांचे चिरंजीव डॉ. देवीकुमार देसाई हे सांगलीतील पहिले एम्. डी. मेडिसिनमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले. १९४८ पासून वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून, वैद्यकी हा व्यवसाय आहे, धंदा नव्हे ही जाण ठेवून ९० सालापर्यंत सतत करीत होते. नीतीयुक्त वैद्यकी कशी करता येते याचा उत्कृष्ट आदर्श वस्तुपाठच त्यांनी आपणासमोर ठेवलेला आहे. कुठलेही काम करण्यात कमीपणा न आणणारी, सार्वजनिक कामांत स्वत:स झोकून देणारी ही व्यक्ती कायमचीच आदरणीय ठरावी.

१९१०-१२ च्या सुमारास डॉ. के. पी. बापट यांनी माधवनगर येथे राहून सांगलीस हरभट रोडवरील कोल्हटकर वाड्यात व्यवसाय सुरू केला असावा. त्यांचे बंधू सांगली संस्धानातील कारभारी होते. उणीपुरी सहा सव्वासहा फूट उंची, गोरापान वर्ण, घारे डोळे, लांबसडक नाक व पँट, शर्ट, टाय, बूट घातलेले डॉ. बापट युरोपियनच भासत. भीतीयुक्त आदर वाटायचा, रुग्णांना. शिस्तप्रिय, नेमस्त, स्वभावाने त्यांनी व्यवसाय उत्तम सांभाळला व कित्येक वर्षांच्या सेवेनंतर आपले चेले डॉ. के. डी. उदगांवकर यांचेकडे सुपूर्त केला. निवृत्त जीवन माधवनगरांत सुखासमाधानांत घालविले. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही या भावनेने, भक्तीने, डॉ. बापटांकडून मिळालेला हा प्रसादच आहे अशा जाणिवेने डॉ. उदगांवकरांनी अहोरात्र, वर्षानुवर्षे ही वीणा खाली न ठेवता अखेरपर्यंत सांभाळली. उदगांवकरांच्या घरगुती व्हिजिट म्हणजे मध्यरात्रीपासून पहाटे तीन तीन वाजेपर्यंत चालायच्या. शेखर कंपौंडर याचे साक्षीदार आहेत.

डॉ. अप्पासाहेब परांजपे हे एम्. बी. बी. एस्. झालेले डॉक्टर. त्यांनी १९२४-२५ पासून राजवाडा चौकांत प्रॅक्टीस सुरू केली. त्यांचे व्यक्तिमत्वानेच रोग निम्मा बरा व्हायचा. गरीबांचे डॉक्टर म्हणून त्यांना सर्वजण मानत. खेड्यापाड्यातील, बायाबापड्या, लहान मुले इत्यादींची ही गर्दी असायची. आपलं काम बरं आणि आपण बरं असं मानणारी, ही मानवदेहधारी देवमूर्तीच जणूं. त्यावेळच्या उपलब्ध असलेल्या हत्यारांच्या सहाय्याने छोटी ऑपरेशन, क्रॅटरॅक्ट सर्जरी इत्यादी ते करीत असत. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन १९५७-५८ पासून तयांचे चिरंजीव वाय. एम्. तथा भैय्यासाहेब नेत्रतज्ञ म्हणून अखिल भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून सांगलीचे नांव जागतिक नकाशावर फडकवून राहिले आहेत. अनिलही अधिकाधिक यश संपादन करीत आहेत.

डॉ. भास्कर गणेश जोशी हे साधारणत: याच सुमारास २०-२२ साली एम्. बी. बी. एस्. झालेले. मेनरोडवरील गाडगीळ सराफांच्या वाड्यांत दवाखाना सुरू केला. मस्त गोष्टी वेल्हाळ माणूस, मध्यमवर्गीयांचे जिव्हाळयाच डॉक्टर. इंजेक्शने देण्यावर फारसा भर न देणारे, फीबद्दल कधीही विचारणा न करणारे, वक्तशीर, टांगा, सायकल, असेल त्या वाहनाने केंव्हाही व्हिजिटला कुरकुर न करता जाऊन उपचार करणारे. ब्रिजचे पत्ते हा त्यांचा वीक पॉइंट. त्यांच्या घरांतील ब्रिजचा अड्डा हा प्रसिध्दच होता. भारतीय सेनेमधील नोकरी संपवून डॉ. जी. एच्. कोटणीसांनी हरभट रोडवर कुंटे वाड्यात १९४५-४६ चे सुमारांस दवाखाना सुरू केला. वक्तशीरपणाबद्दल कोटणीसांची तुलना न्या. मंडलिकांशीच व्हावी. घड्याळे बरोबर चालत नसतील तर वेळ बरोबर करुन घ्यावी इतके काटेकोरपणे वागणे. थोडासा फटकळ, शिवराळ पण फणसाप्रमाणे गोड अंतरंगाचा प्रेमळ शिस्तप्रिय डॉक्टर त्यावेळी सांगलीने प्रथमच पाहिला असावा. डॉ. जी. एस्. तथा बंडोपंत पटवर्धन यांनी ४० च्या दरम्यान मारुती मंदिराचे मागे केशवनाथ मंदिरासमोर व्यवसाय सुरू केला. शांत, गंभीर स्वभावाचे स्वच्छ परीटघडीचे पाटलोण, ढगळ शर्ट, मॅनिला घातलेले उंचेपुरे गोरेपान व्यक्तिमत्व. गांधीवधानंतर सर्वस्वाचा विध्वंस झालेला बघूनही विचलित न होता पुनश्च हरि: ओम् म्हणत शेवटपर्यंत सचोटीने, वैऱ्याशीही वाकुडेपणा न बाळगता रुग्णसेवा करणारे हे आदरणीय सद्गृहस्थ.

सांगलीच्या सरकारी रुग्णालयाचे प्रमुख म्हणजे सिव्हील सर्जन म्हणून उत्तम कामगिरी करणारे डॉ. जी. के. आपटे. कट्टर संघनिष्ठ पण त्याहीपेक्षा रुग्णनिष्ठ, व्यवसायनिष्ठ होते. पेनिसिलिनसारखी औषधे अस्तित्वात नव्हती तेंव्हादेखील टॉन्सिल्स, हर्निया, अपेंडिक्स अशासारखी ऑपरेशन्स ते धाडसाने करीत असत. निखळलेले सांधे, मोडलेली हाडे बसविण्यात ते निष्णात होते. नोकरीतील निवृत्तीनंतर गणपतीपेठेत दवाखाना व रुग्णालय सुरू करून त्यांनी सेवा चालू ठेवली होती. ते आता ८९-९० व्या वर्षी संघकार्यात मग्न आहेत.

श्रीमती आशाराणी देसाई यांनी स्त्रीरोगचिकित्सक म्हणून १९४४-४५ चे सुमारांस पटेल चौकात दवाखाना सुरू केला. त्या एक थोर समाजसेविका म्हणून मानमान्यता पावलेल्या आहेत.

सांगलीत प्रसूतिगृह प्रथम सुरू केले ते डॉ. श्रीमती मनोरमाबाई थत्ते यांनी. १९३७-३८ चे सुमारास हरभट रोडवर कुंटे वाड्यात त्यांचेकडे नर्सचे काम करणाऱ्या श्रीमती अंबूताई मेहेंदळे यांस प्रशिक्षित करून त्या मुंबईस गेल्या. त्यानंतर कित्येक वर्षे, धडाडीने अंबूताईनी हेे रुग्णालय चालविले, नावलौकिकास आणले. अंबूताई म्हणजे सांगलीच्या 'लीजंडरी पर्सनॅलिटी'. राधाकृष्ण वसाहतीत पुढे त्यांनी अनाथाश्रम काढला तो अद्यापही चालू आहे. निरलस, निरपेक्ष रुग्णसेवा करण्यासाठी िख्र्तासी न होण्याची मुळीच आवश्यकता नाही हे ठामपणे सांगणारी व आचरणाने दाखवून देणारी आमची अंबूताई प्रात:स्मरणीय ठरावी.

सांगलीच्याच परिसरात माधवनगरांत राहणारे डॉ. एस्. एन्. भावे व डॉ. रा. वि. फडणीस. फडणीसांनी कुरुंदवाड संस्थानातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सांगलीस व माधवनगरांत दवाखाने घातले व खूप वर्षे आपल्या मृदु स्वभावाने, अभ्यासाने रुग्णसेवा केली. डॉ. भावे यांचे व्यक्तिमत्व अलौकिक असावे. दुटांगी धोतर, स्वच्छ भट्टीचा पांढरा शर्ट, निळा कोट, तपकिरीची डबी यासोबतच रोग्यासाठी केव्हांही, कोठेही चालत, भिजत सायकलने, गाडीने जायची तयारी. नांद्रे, वसगडे, कवलापूर इत्यादी खेड्यापाड्यांतील लोकांचे देवच जणूं. माधवनगरात तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी आपल्या सौ. च्या मदतीने छोटे प्रसूतिगृह, शुश्रुषागृह त्यांनी चालू केले व गरीब रुग्णांची फार मोठी सोय केली.

यानंतरच्या पिढीतील नांव घेण्याजोगे डॉ. जी. एस्. जोशी, डॉ. एस्. बी. कुलकर्णी आणि डॉ. आर. के. दिवाण. हे तिघेही पोष्टग्रॅज्युएट डिप्लोमा मिळवलेले स्पेशालिस्ट. पण तिघांनीही जनरल प्रॅक्टिस पत्करली आणि नांवारुपास आणली. अद्याप पावेतों पूर्ववत त्यांची योगसाधना सुरूंच आहे. डॉ. निसरगुंडांचा मुद्दाम उल्लेख केलाच पाहिजे. अगदी आवर्जून. त्यांच्या अकाली निधनाने सांगलीच्या परिसरांतील गरीब जनतेचं आधारछत्रच नाहिसं झालं आहे. डॉ. धालेवाडीकर, डॉ. शिराळकर, डॉ. खानापूरकर, डॉ. चौगुले हे सर्व अकालीच गेले. सांगलीत डॉ. कुमार देसाई हे जसे कन्सल्टंट फिेजशियन तसेच येथे सर्व सुविधांनी परिपूर्ण असे रुग्णालय सुरू करणारे डॉ. पी. जी. पुरोहित हे एम्. एस्. झालेले तज्ञ सर्जन. १९५९ च्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिमखाना कॉर्नरसमोर त्यांचे रुग्णालय सुरू झाले. सांगलीला एक उत्तम शस्त्रक्रियातज्ञ लाभला. हे सांगलीचे भाग्यच. याच सुमारांस डॉ. एस्. टी. वाटवे एम्. डी. यांनी स्त्री रोगतज्ञ म्हणून डॉ. परांजपे यांचे मदतीने हॉस्पिटल चालू केले व आणखी एक स्पेशालिटी सांगलीस मिळाली. आता डॉ. पुरोहित व डॉ. वाटवे यांची मुलेही याच व्यवसायात सुपर स्पेशालिस्ट म्हणून कार्य करीत आहेत.

दंतवैद्य डेंटिस्ट म्हणून सांगलीत प्रथम डॉ. पी. बी. लिमये यांनी सुरुवात केली. २५-२६ चे सुमारास कायम-कवळी करण्याची त्यांची हातोटी वाखाणऱ्याजोगीच असे. त्यांचा मुलगा, नातू अशा तीन पिढ्या आता ही ते का जाणिवेने करीत आहेत. डॉ. पद्मश्री विजय शहा, डॉ. काटे, डॉ. घाटे, डॉ. खोत, डॉ. मिरजकर ही मागच्या पिढीतील निष्णात मंडळी. आणखीही काहीजणांचा नामोल्लेख अनवधानाने राहिलेला असेल.

संस्थान काळांत नगरपालिका नव्हती. तेंव्हा कमेटी असे. गटार, रस्ते सफाई इत्यादी कामे करणारी मंडळी काम चोख करत असायची. नदी वाहती असायची. शेरीनाला नव्हता. बंधारे, धरणे नव्हती. त्यामुळे रोगांचे प्रमाण कमीच होत. घरांमागे उकिरडे असायचे, त्यांत साठलेला कचरा खतासाठी शेतकरी आपण होऊन गाड्या भरभरून घेऊन जायचे. जाता जाता एक उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो तो डॉ. देशपांडे यांचा. त्यांनी स्वत: लक्ष घालून सांगलीत बागा उभ्या केल्या, वाढवल्या. पर्यावरण हा शब्द माहित नसलेल्या त्या काळांत.

ह्या सर्व महापुरुषांस विनम्र अभिवादन.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color