कोल्हापूर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
कोल्हापूर सामान्य माहिती १. शहराचे क्षेत्रफळ, क्षेत्र ६६.८४ कि.मी. २. लोकसंख्या सुमारे १० लाख ३. समुद्रसपाटी पासून उंची १८०० फूट ४. पाऊस ९०० ते १००० मि.मी.  
कोल्हापूर
महाराष्ट्राचा इतिहास सांगणारं वैभव संपन्न शहर, कलावंतांचं कलापूर, दक्षिणकाशी पंचगंगा म्हणजे तीर्थस्थान, शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालविणारं राजर्षीचं कोल्हापूर म्हणून अभिमानाने कोल्हापूर शहराचा गौरव होतो. सन १८९४ ला शाहू महाराजांच्या रुपाने कोल्हापूरला एक कर्तबगार, प्रजाहितदक्ष, दूरदर्शी व सर्वसामान्य जनतेच्या सुख दु:खाशी समरस होणारा राजा लाभला. त्यांनी प्रजेला व शहराला नवा दृष्टिकोन प्राप्त करुन दिला. याचं सारं श्रेय शाहू महाराजांना आहे.
महाराष्ट्रातील तीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून जसं कोल्हापूर मनामनांत रुजल आहे, तसं विविध कलाक्षेत्रातील अभिजात कलावंतांची मांदियाळी म्हणून अजरामर आहे. कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा सुरेख संगम आहे. पश्चिमेला रंकाळा तलाव, उत्तरेश्वर मंदीर आणि कुस्त्यांचे प्रसिध्द खासबाग मैदान आहे. या मैदानात ६० हजार प्रेक्षक बसू शकतात. श्वेताबंर जैनांच्या मुनिसूक्त मंदिरातील नक्षीकाम अप्रतिम आहे. त्याचप्रमाणे पंचगंगा घाट, जैनमठ इ. प्रेक्षणीय स्थळंही आहेत. साखर कारखाना, छत्रपती शाहू मार्केट, टेंबलाई टेकडीवरील टेंबलाई देवीचं देऊळ, शिवाजी विद्यापीठ , शिवाजी उद्यमनगर, वस्तूसंग्रहालय, चंद्रकांत मांडरे यांचे कलादालन हेही पाहण्यासारखं आहे. तेथील औद्योगिक वसाहतही पाहण्यासारखी आहे.
जवळची प्रेक्षणीय स्थळे - पन्हाळागड १८ कि.मी., विशाळगड ८८ कि. मी., ज्योतिबाचा डोंगर १२ कि. मी. , बाहुबली जैन धार्मिक क्षेत्र, कण्हेरी, सिद्धिगिरी मठ, दत्तस्थान नरसोबाची वाडी, खिद्रापूर येथील शंकराचे मंदीर, कोणार्कच्या सूर्यमंदिराइतकंच भव्य आहे. तसंच संत मौनी महाराजांचा मठ व ग्रामीण विद्यापीठ, मौनी विद्यापीठ, राधानगरी तलाव व धरण, दाजीपूर अभयारण्य व किल्ला पाहण्यासारखं आहे.
नरसोबाची वाडी - महाराष्ट्रातील तीन दत्त स्थानांपैकी एक स्थान. कृष्णा पंचगंगा संगमावरील हे ठिकाण जागृतस्थान समजलं जातं. येथे दत्ताच्या मनोहर पादुकांचे आठ खांबांचे मंदीर असून त्यावर शिखर नाही. चातुर्मास सोडून रोज १२ वाजता येथे पादुकांची पूजा व पालखी सोहळा असतो. येथून ९० कि. मी. अंतरावर खिद्रापूर येथे प्राचीन शिवमंदीर आहे. गुरुपौर्णिमेला व गुरुद्वादशीच्या दिवशी येथे यात्रा भरते. इथल्या प्रशस्त घाटावरुन नदीचं विलोभनीय रूप मनाला भुरळ घालतं. टेंबेस्वामी मंदीरही इथेच आहे. रेल्वेमार्गाने जवळचं स्थानक जयसिंगपूर हे २६ कि. मी. अंतरावर आहे. या ठिकाणाहून दिवसभर बससेवा उपलब्ध आहे. .
बाहुबली - कोल्हापूर -मिरज मार्गावरील जैनांचे हे पवित्र क्षेत्र आहे. टेकडीवर श्वेतांबर जैन मंदीर व पायथ्याशी दिगंबर जैन मंदीर आहे. येथे भगवान बाहुबलीची उंच मूर्ती आहे. हातकणंगले हे जवळंच रेल्वे स्थानक असून पुणे - मिरज कोल्हापूर मार्गावर आहे. येथून कोल्हापूर २१ कि. मी. आणि मुंबई ४९८ कि. मी. अंतरावर आहे.  
ज्योतिबा - कोल्हापूर - मलकापूर - रत्नागिरी मार्गावर वाघबीळ खिंडीजवळ केर्ले गावी उतरुन उत्तरेला ज्योतिबाचा डोंगर (९५० मी.) आहे. माथ्यावर मंदिरात ज्योतिबाची डमरु, खड्ग, त्रिशूळ, अमृतकलश घेतलेली चतुर्भुज निळसर रंगाची मूर्ती आहे. जवळच त्याचे वाहन घोडा आहे. आधी काळभैरवाचे दर्शन घेऊन मगच ज्योतिबाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. श्रावण शुद्ध षष्ठी व चैत्र पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची पालखी काढण्यात येऊन ती यमाई देवळापर्यंत जाते. राहण्यासाठी शासकीय विश्रामगृहात सोय होऊ शकते. कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदीर म्हणजे करवीरनगरीला सौदर्यांचा उत्कृष्ट नजराणा आहे. देवी भागवत, स्कंद पुराण मार्कंडेय पुराण, हरीवंश या धर्मग्रंथातून या शक्तिपीठाचा उल्लेख आहे. करवीरनिवासिनी म्हणजे वैभवसंपन्नतेची अधिदेवता होय. समृद्ध व संपूर्ण देवस्थान म्हणून हे प्रसिध्द आहे. मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी पध्दतीचं असून प्राचीन शिल्पकलेचा, स्थापत्यकलेचा नमुना आहे. मंदिरात अनेक छोट्या मंदिरांचा समावेश आहे. मुख्य प्रवेशद्वार पश्चिम बाजूस असून त्यावर देवीचा नगारखाना आहे. तर दक्षिण, पूर्व, उत्तर तिन्ही बाजूंना दरवाजे आहेत. उत्तर दरवाजावर मूर्तीकडे जाण्यासाठी मोठी कमान असून तिथे दोन सभा मंडपांचा समावेश आहे. एकास गरुडमंडप म्हणतात. मंदिराला पाच शिखरं असून मुख्य शिखराखाली गाभाऱ्यात चमकदार हिरकखंडमिश्रित रत्नशिलेची वजनदार व चमकदार मूर्ती आहे. उत्तरायण व दक्षिणायन, जून व डिसेंबरमध्ये तीन दिवस सूर्यकिरण देवीवर पडतात. किरणोत्सवाच्या वेळी मंगलमय, पवित्र उत्साहाने वातावरण फुलून जाते. हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे. मंदिरात दगडी फरसबंदी असून आवाराभोवती दगडी भिंत आहे.
शहराच्या सौदर्यांत भर घालणारा जुना राजवाडा मंदिराच्या मागील बाजूस आहे. भव्य कमान व जुन्या पध्दतीचं घडीव बांधकाम अतिशय मजबूत आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी छत्रपती या वास्तूत राहात. राजवाड्यात भवानी मंडप राजवैभवाने नटलेला असून वाड्याला सहा चौक आहेत. अंबाबाई चौक उल्लेखनीय आहे. वाड्याच्या मध्यभागी दरबार भरत असे. राजवाड्याच्या उत्तरेस एक पाच मजली इमारत आहे. तिचा उपयोग नगारखान्यासाठी केला जात होता. या इमारतीला तीन भव्य कमानी आहेत. मधल्या कमानीचा उपयोग वाहतुकीसाठी केला जातो. शाहू महाराजांचं वैभव, शौर्य, शिस्त, ऐतिहासिक कलेची भव्यता यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे न्यू पॅलेस शाहू म्युझियम उल्लेखनीय आहे. दसरा चौकाच्या उत्तरेकडील पॅलेसमध्ये छत्रपतींचं निवासस्थानं आहे. या म्युझियमची रचना दोन मजली असून याला मनोरे व घुमट आहेत. मध्यभागी अनेक कारंजी आहेत. राजवाड्याभोवती भव्य बगीचा तसेच तलावही आहेत. अजूनही प्रत्यक्ष हरीण, काळवीट यासारखे प्राणी इथे पाहता येतात.
न्यू पॅलेस शाहू म्युझियम म्हणजे ऐतिहासिक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह होय. दर्शनी भागात कोल्हापूरचे क्रांंतीवीर चिमासाहेब महाराज यांचा पुतळा आहे. पगड्या, कोल्हापूर जिल्ह्याचा नकाशा, छत्रपती राजाराम महाराज यांचं तैलचित्र आहे. तसचं हत्तीवरील चांदीची अंबारी, दागिने, चांदीचा हौदा, आणि छत्रपतींचा जरीपटका आहे. याशिवाय घोडयांचं चांदी-सोन्यांचं सामान, सोन्याच्या चक्का, मोर्चली, सूर्यपान, अब्दगिरी, चांदीची आसने आणि छत्रपतींची राजचिन्ह आहेत. याच ठिकाणी शिवाजी महाराज, महाराणी ताराबाई आणि कोल्हापूरच्या छत्रपतींची चित्रं आणि भरजरी पोशाख आहेत. आजही पूर्वीच्या राजघराण्याच्या नातेवाईकांची चित्रं आणि नक्षीदार फेर्नचर आहे. तसल तलवारी, बंुदका, जांबिये, खंजीर, भाले, कुकऱ्या, वाघनखं, परशू, छोटया तोफा, युध्दावरील पोशाख, शिरस्त्राणं यांचा समावेश आहे. यात सोन्याची बंदूक, राजदंड व कट्यारीवर कोरलेले नवग्रह विशेष उल्लेखनीय आहे. दरबार हॉलमध्ये सिंहासन असून तिथे शिवरायांच्या जीवनातील प्रसंगही चित्रित आहेत. म्युझियममध्ये पशुपक्षी, गेंडा , सिंह, बर्फाळ प्रदेशातील प्राणी, वाघ यांची आकर्षक पध्दतीने रचना केली आहे. या ऐतिहासिक स्मृती आजही प्रेक्षकांच्या समोर उभ्या आहेत. हेच दरबार हॉलच वैशिष्टय आहे. आजही कोल्हापूरचं वैभव शाहू म्युझियमने जोपासलं आहे.
करवीर रसिकांनी लोकाश्रय व राजर्षिंनी राजश्रय दिल्याने कोल्हापुरी कुस्त्यांचं नाव दिगंतात पोहेचलं. आजही ही वैभवशाली परपंरा जोपासली आहे. खासबाग शाहू मैदानाने भवानी मंडपातून काही अंतरावर हे मैदान असून चाळीस ते साठ हजार कुस्तीशौकीन बसतील एवढी याची क्षमता आहे. कोल्हापूरच्या पूर्वेस बगल मारुन देवी त्र्यंबोलीचं मंदीर आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. त्र्यंबोली दर्शनास गेल्यास रात्रीच्या वेळी करवीर नगरीचं दर्शन म्हणजे तारे कुशीत घेतल्याप्रमाणे विलोभनीय दिसतं.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेत भर घालणाऱ्या सुप्रसिध्द दसरा चौक आपल्या आगळयावेगळया वैभवाचं जतन करत आहे. चौकामध्ये शाहू महाराजांचा पुतळा असून, विजयादशमीला शिलंगणाचा कार्यक्रम शाही इतमानाने साजरा होतो.
कोल्हापूरच्या नगरीत आधुनिक ज्ञानाची द्वारं खुलं करणारे शिवाजी विद्यापीठ असून ते छत्रपतींच्या पुण्याईने साकारलेलं आहे. विद्यापीठ आवारात विराजमान झालेला शिवाजी महाराजांचा पुतळा असून सभोवताली सुंदर बाग आहे. प्रेरणादायी व उत्साही वातावरणात ज्ञानपिपासूंना अविरतपणे ज्ञान संपादन करता येतं.
कोल्हापुरी माणूस जसा कलासक्त तसाच पट्टीचा खवय्याही आहे. कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी रस्सा, मटण, कोल्हापुरी भेळ, लोणची, मासांहार, आईस्क्रिम, कट्ट्यावरील धारोष्ण दूध यांचा आस्वाद आजही जिभेवर रेंगाळत असतो
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color