आमचा शाहू राजा.....! : पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

या पृथ्वीतलावर कोट्यावधी माणसं जन्माला येतात आणि निसर्ग नियमाप्रमाणे काळाच्या ओघात नाहिशी होतात. अशा माणसाच्या आठवणीसुध्दा जगाच्या स्मृतीपटलावरसुध्दा शिल्लक राहत नाहीत. `जन पळभर म्हणतील हाय हाय!' एवढेच त्यांच्या वाट्याला आलेले काही सुखद क्षण मृत्यूनंतरचे. अशा माणसांच्या जाण्याने समाजाचे अहित असे काही होत नाही आणि तो गेल्याने दु:ख कुटुंबियांना झालेच तर त्यामध्ये त्याच्या जगण्याच्या दु:खापेक्षा यांच्या उपभोगाच्या कल्पनांचा अतिरेक फार असतो. तसे पाहिले तर अशांच्या जीवनात आणि किड्या मुंग्यांच्या जीवनात तसा फारसा फरक असत नाही.
तथापि, या पृथ्वीतलावर अशीही माणसं जन्माला येतात की, जी नियतीच्या फेऱ्यात देहविसर्जन करुन टाकतात. परंतु काळावरही मात करुन जगतच राहतात आणि ही खरी माणसं असतात कारण त्यांचे जीवन समुद्राच्या लाटेसारखे नसते तर प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्यांचे असते. निराशा, आगतिकता, प्रवाहपतित होणे हे त्यांच्या स्वप्नातही नसते. तर संकटाचे महामेरु छेदून जाण्याची ताकद त्यांच्या ठायी असते. प्रवाहाला तडाखे देत आपला रथ नवक्षितिजांकडे झेपावत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी असते आणि अशा मार्गावर अडथळे उभे करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे धोरणी मन हा त्यांचा ठेवा असतो. गरुड झेप हा त्यांचा कानमंत्र असतो. तर माशाच्या डोळयावरची अविचल नजर हा त्यांचा ध्येयवाद असतो आणि म्हणूनच अशी माणसं सर्वसामान्य माणसांसारखी असूनही असामान्य असतात.

माणूस कुठं जन्माला आला यापेक्षा तो कसा जगला याला मोठे महत्त्व असते. कारण जगण्यालाच खरा अर्थ असतो. जर जन्माच्या ठिकाणावरुन श्रेष्ठत्व ठरवावयाचे असेल तर राजे-रजवाडे, सावकार, गर्भश्रीमंत माणसं श्रेष्ठ आणि गरीब कुटुंबात जन्माला आलेली माणसं ही नालायक ठरवावी लागतील. तथापि माणसाचे श्रेष्ठत्व जन्मावर आधारित कधीच नसते तर ते कर्मावर आधारित असते. मनुस्मृतीतील जन्मश्रेष्ठत्वाच्या कल्पनेचा आधार घेतलेल्या आणि जन्माने श्रेष्ठ ठरलेल्या भिक्षुकशाहीतील माणसं आज विस्मरणाच्या पडद्याआड नाहीशी झाली आहेत, कर्म सिध्दांताचा पुरस्कार केलेली आणि माणुसकीचा धर्म तारणहार मानणारी माणसं आजही जिवंत आहेत.

काळ हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे असे इतिहाससिध्द झाले आहे आणि त्यामुळं जी माणसं आपल्यासमोर आदर्श म्हणून आपल्यासमोर बावनकशी सोन्यासारखी उभी राहतात. त्यामध्ये जन्मत: सुख ज्यांच्या पायावर लोळण घेत होते आणि यमयातनांची दोस्ती ज्यांना जन्मत:च लाभली होती, या दोन्ही स्तरांचा समावेश होतो. पहिल्या प्रकारात राजवैभवावर लाथ मारुन मानव धर्माचा शोध घेणारा गौतम बुध्द, सम्राट अशोक, मध्ययुगीन काळातील छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचा समावेश करावा लागेल. तर यच्चयावत् ज्ञानेश्वर, तुमाराम, चोखा मेळा, नामदेव यांच्यापासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत सर्व संतमहंतांचा उल्लेख करावा लागेल. तर शुन्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद असलेला म. ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादींची नोंद घेतल्याशिवाय इतिहासाला पाऊल पुढे टाकणे शक्यच नाही.

आजपर्यंत इतिहासाने राजे-रजवाड्यांच्या जीवनसाक्षींची नोंद केली आहे. अर्थात काळाचे हे कामच आहे. काळाचे हितसंबंध कुठेही गुंतलेले नसल्याने जे घडले त्याची नोंद कोणत्याही परिणामांचा विचार न करता तो करीत असतो आणि म्हणून अशा नोंदी गौरवांकित जशा असतात तशा शोकांतिकेच्याही असतात. इतिहासाच्या नोंदीचा विचार करता अनेक प्रजाहितदक्ष राजेरजवाड्यांनी आपली हजेरी गौरवांकित कालखंडात लावली असती तर अंधाऱ्या रात्री अथांग समुद्रात दीपस्तंभासारखे प्रकाशमान होणारे आणि अक्राळ विक्राळ समुद्राची भीती मनाशी न बाळगता समुद्राचे पाणी कापत ध्येयवेडेपणाने पुढे येणाऱ्या जहाजाप्रमाणे गौरवांकित राजेरजवाड्यात स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा राजर्षी शाहू हा राजा माणूस होता.

ना सत्तेचा कैफ, ना संपत्तीची धुंदी, ना राजेशाहीची घमेंड, ना गर्व, अत्यंत सरळ स्वभावी राजर्षी खऱ्या अर्थानं राजा माणूस होता. त्यांचेकडे गुणग्राहकता होती तसेच अन्यायाबद्दल चीडही होती. शोषितांचा तो कैवारी होता. पाण्यासारखा स्वच्छ अंत:करणाचा आणि वृक्षासारखा दो दो हातांनी सतत दुसऱ्यास देत राहणारे मन असलेल्या या राजा माणसाची स्थिती पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे पिंजऱ्यातील सिंहासारखी होती. मात्र एकीकडे सतत संशयाने पाहणारे परकीय आणि दुसरीकडे या राजाचे दु:ख समजावून न घेणारे स्वकीय अशा कात्रीत सापडलेल्या शाहू महाराजांनी तशा परिस्थितीतही जी झुंज घेतली ती पाहून मन जर जन्मजात मोठेपणाच्या अहंकाराने किडलेले नसेल तर फुलूनच येईल असे म्हणावे लागेल.

राजर्षी शाहूंच्या ४८ वर्षाच्या आयुष्यात घडलेल्या बहुविध घटनांचा, मग ती घटना अत्यंत क्षुल्लक वाटणारी असो अथवा मोठी असो, मागोवा घेतला तर प्रत्येक घटनेच्या संदर्भाने झालेली कृती जमिनीतून वर येणारा प्रत्येक कोंब नवनिर्मितीच्या प्रेरणा घेऊन जसा बाहेर येतो. त्याप्रमाणे एक नवविचार घेऊन वाटचाल करीत असे असेच आढळून येईल. नवविचारांना कृतीशीलतेतून जन्म देणारा हा राजा खऱ्या अर्थाने कृतीशील विचारवंत होता. जेव्हा विचारांना कृतीशीलतेची जोड मिळते त्यावेळी तो विचार वटवृक्षाचे रुप धारण करु शकतो आणि म्हणूनच आजही या राजा माणसानं दिलेला विचार सतत आळवावा लागतो.

मानवाच्या आयुष्यात वेगळे वळण देणारी अशी एखादी घटना घडते की, त्यामुळे संपूर्ण आयुष्यकार्यालाच वेगळी दिशा लाभते. साधारणत: प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा घटना घडतात, तथापि वेळीच या घटनेची चाणाक्षपणाने आणि जाणीवत: नोंद घेणारी माणसं मात्र कमी सापडतात. राजर्षींच्या आंतरिक मनामध्ये विचारांचे काहूर माजू लागले, वैचारिक आंदोलन सुरु झाले आणि वर्णाश्रमाच्या उतरंडीवर असलेल्या समाजव्यवस्थेला त्यांनी आव्हान दिले.

राजर्षींची हिंदू धर्मावर श्रध्दा होती आणि त्यामुळे दररोज सकाळी शिवपूजा करण्याचा त्यांचा परिपाठ सातासमुद्राच्या मर्यादांच्या पलिकडेही अखंडपणे सुरु असायचा. १९०० सालातील ऑक्टोबर, नोव्हेंबर(कार्तिक) महिन्यातून एका सूंदर आणि विलोभनीय सूर्योदयाच्या प्रहरी आपल्या नेहमीच्या परिपाठाप्रमाणे राजर्षी पंचगंगा नदीच्या पात्रात येथेच्छ डुंबत धार्मिक रीतीरिवाजास अनुसरुन स्नान करीत होते आणि मनुभक्त श्री राजोपाध्ये, राजाचा वंशपरंपरागत भट, आशिर्वादपर मंत्रोच्चार करीत होते. भटजीबुवांचे वेदांचे मंत्रपठण श्रवण शुद्रांना बंद केले, या अविर्भावात चालले होते आणि त्यामुळे वेदोक्ताऐवजी पुराणोक्तांचा पाढा वाचला जातो. शास्त्राधाराप्रमाणे वैदिक मंत्र ऐकण्यास ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना मोठ्या मोठ्या मानभावीपणाने मिळालेली मान्यताही स्वजातीचे श्रेष्ठत्व सिध्द करण्यास निघालेल्या तथाकथित शास्त्रांनी स्वकर्तृत्वावर काढून घेऊन पुराणोक्तांसाठी क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची योजना केली आणि राजर्षी शूद्रच असल्याने पुराणोक्ताचाच वापर अटळ आहे, असे मनुप्रणित मानवनिर्मित सिध्दांताप्रमाणे विश्वपुरुषाच्या मुखातून बाहेर पडलेल्या या ब्राह्मणांनी असा घात घातल्याचे आढळते. वैदिक आज्ञेच्या विरोधात चाललेला हा राजरोस प्रकार महाराजांच्यासमोर उपस्थित असलेल्या आणि ब्राह्मणांनी न ग्रासलेला राजारामशास्त्री भागवत या संस्कृत पंडिताच्या लक्षात आल्याने महाराजांचे लक्ष त्याकडे वेधण्यात आले. तसेच महाराजांसाठी मंत्र म्हणणारा ब्राह्मण आंघोळ न करताच हे काम करीत होता. हे ही महाराजांच्या निदर्शनास आणले गेले. त्यावेळी जगी सर्वश्रेष्ठ असा कोण आहे, या ताठ्यात वेदोक्त फक्त ब्राह्मणांसाठी असलेल्या आणि शाहूराजा शूद्र असल्याने पुराणोक्त संयुक्तिक आणि पुराणोक्तांसाठी ब्राह्मणाने आंघोळ करण्याची गरजच काय असा उर्मट सवाल महाराजास केला आणि या प्रसंगातून निर्माण झालेल्या वादळाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक अभिसरणाच्या प्रक्रियेस चालना मिळाली. तथापि, यामधूनच एका नवीन वादळाने जन्म घेतला. त्या वादळाने मानवनिर्मित कृत्रिम समाजव्यवस्थेला तडाखे देत संपूर्ण समाजजीवन ढवळून काढले. नवसमाजनिर्मिती गतिमान झाली आणि मरगळलेल्या समाजात नवचैतन्य निर्माण झाले. १९व्या शतकात महात्मा फुले यांनी हाती घेतलेल्या कार्याची धुरा महाराजांच्या हाती आली आणि त्यांनी आपल्या सर्व शक्तीनिशी महाकाय अशा चातुर्वर्ण्याला आव्हान दिले. त्यादृष्टीने आपल्या संस्थानच्या कारभारास, ध्येयधोरणास दिशा देण्याचा प्रयत्न केला.

वेदोक्त प्रकरणाने शाहू राजा अंतर्मुख झाला होता आणि जर माझ्यासारख्या राजाची स्थिती अशी असेल तर सर्वसामान्य माणसांचे काय? हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता. वर्षानुवर्षे जातवर्णाच्या नावाखाली दडपला गेलेल्या बहुजन समाजास शोषण मुक्त व्हावयाचे असेल तर समाजव्यवस्थेला लागलेला जातीयतेचा रोग समूळ नाहीसा करावा लागेल याची त्यांना आता खात्री झाली होती. सामाजिक, आर्थिक विषमता नाहीशी करणे आणि माणसास माणसासारखी माणसाकडून वागणूक मिळावी यासाठी आता या नृपतीने लक्ष केंद्रित केले.
`मानव सारिखे निर्मिके निर्मिले । कमी के नाही केले ।। कोणी एक ।।' या विचारांने राजर्षी प्रभावित झाले आणि `ख्रिस्तास, महमंद, मांग, ब्राह्मणासी । धरावे पोटाशी बंधुपरी ।।' अशी समाजव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी ते प्रयत्नशील झाले.

निसर्गानियमाप्रमाणे सर्व मानव समान असतात हा सिध्दांत पुनर्स्थापित करावयाचा असेल तर मानवनिर्मित मानवी विषमतेच्या उतरंडीची तोडफोड करण्यास पर्याय नाही. शाहू राजा होता. राजा म्हणून असलेल्या अधिकारांचा वापर करुन हुकूमशाही मार्गाचा अवलंब करुन शासकीय फतवा काढून यच्चयावत् जातीयता मानणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा देण्याचे फर्मान प्रसारित करण्याबाबत विचार करता आला असता. तथापि, गुलामगिरी ही माणसाच्या मनातून काढून टाकावी लागते आणि त्यासाठी कायद्यापेक्षा मन:परिवर्तनाचा मार्ग स्वीकारावा लागतो हे या चाणाक्ष राजाला माहित होते. कारण कायद्याने माणसांची मने बदलणे अशक्य असते म्हणूनच जातीयतेचे भूत गाडून टाकण्यासाठी शाहू राजाने कृतिशीलतेचा अवलंब केला. यथा राजा तथा प्रजा हा त्यांच्या विचाराचा मूलाधार होता. समाजव्यवस्थेत मूठभर स्वत:ला शहाणे समजणारे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक सोडले तर बहुसंख्यांकांना नवविचारांचे स्वागत करण्याचा उत्साह असतो. फरक एवढाच असतो अशा सामन्यांकडे तेवढे धाडस नसते, विचारांची परिपप्ता नसते, वैचारिक अधिष्ठानाचा अभाव असतो, सामान्यांपासून वरिष्ठांपर्यंत भीतीने तो ग्रासलेला असतो आणि त्यामुळे त्यास पाठबळ देणाऱ्या समर्थ नेतृत्वाची गरज असते. अर्थात, याचा अर्थ असा नव्हे की, जादूची कांडी फिरवावी आणि कायाकल्प व्हावा असे परिवर्तन समाजात घडून येते. कारण हजारो वर्षांचे कुसंस्कार पुसून टाकण्यासाठी काही कालावधी लागतोच.

राजर्षी शाहू महाराजांनी विषमतेवर पहिला भीमटोला टाकला तो जातीयतेच्या राक्षसाला आव्हान देऊन गंगाराम कांबळयाच्या हॉटेलात जाऊन स्वत: चहा घेतला आणि राजा जर अस्पृष्यता पाळत नाही तर समाजाने का पाळावी हा संदेश देऊन टाकला. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून या राजाच्या हिमालयाएवढ्या उंच मनाची कल्पना येते. खरं तर पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे हा माणूस आकाशाएवढा मोठा वाटायला लागतो. शिवाशिव आणि विटाळासारख्या खुळचट कल्पनांना त्यांनी विरोध केला. जे पाणी सर्व माणसांचे प्राण वाचविण्याचे काम करते ते पाणीही ब्राह्मणाने दिले तरच शुध्द आणि तेच पाणी अस्पृष्याने दिले तर अशुध्द असा रिवाज पाळला जात होता. एवढेच नव्हे जमिनीतून येणारा पाझर अस्पृष्यांच्या स्पर्शाने विटाळला जाईल अशी सर्वमान्य गैरसमजूत स्वार्थी लोकांनी आपली लायकी नसतानाही सर्वश्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवण्यासाठी पसरवली होती. तथापि, राजपूतवाडी कँम्पामध्ये अस्पृश्याच्या हातून पाणी पिऊन या विटाळास शाहू राजाने तिलांजली दिली. हा प्रसंग त्यांच्या आंतरिक प्रेरणांवर प्रकाश टाकण्यास समर्थ आहे आणि याच आंतरिक प्रेरणेने प्रभावित होऊन राजर्षी शाहू जातीभेदाची शिकार झालेल्या बांधवांच्या पाठीमागे आईच्या ममतेने आणि पित्याच्या कर्तव्यनिष्ठेने उभे राहिले. राजर्षी शाहूंची याबाबतची भूमिका अत्यंत निकोप आणि सिध्दांताधिष्ठित होती. हे समजावून घेण्यास त्यांच्या एका भाषणामधील पुढील उतारा पुरेसा आहे.

`जातीभेद असू द्या पण जातीव्देष नको असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे मत प्रामाणिकपणाचे असल्यास त्यांच्या अज्ञानाची कीव केली पाहिजे. कारण जातिभेदाचे कार्य जातीद्वेष आहे. तेव्हा कार्य नाहीसे करावयाचे तर कारणही काढून टाकले पाहिजे. या जातीद्वेषाची उचलबांगडी करावयाची असेल तर जातीभेदच मोडला पाहिजे. जातीभेद मोडून केवळ जन्माच्या सबबीवर दुसऱ्यास हीन मानण्याची प्रवृत्ती नाहीशी होईल आणि अशा रीतीने जातीद्वेषाचा नायनाट होईल तो सुदिन.'

जातीभेदाच्या निर्दालनासाठी शाहू महाराज भूमीची मशागत जातीवंत शेतकऱ्याप्रमाणे करीत होते आणि त्याचबरोबर फासेपारध्यांच्या पंगतीला बसून, महारांच्या घरी जेवण घेऊन, धनगरांची डांगर भाकरी खाऊन तथाकथितांच्या भाषेतील शूद्राच्या हातून पाणी पिऊन तर गंगाराम कांबळयाच्या हॉटेलात चहा पिऊन जातीभेद स्वत: मोडून टाकत होते. तथापि, शाहूरायास कल्पना होती की, आपण राजा आहोत म्हणून आपण आहोत तोपर्यंत मला लोक जरी घाबरत असेल आणि माझ्या पाठीशी उभ्या असलेल्या राजसत्तेला घाबरुन ज्यांनी नेहमीच सत्ताधिशांसमोर लाचारीने वागून स्वत:ची तळी भरुन घेण्याचे काम केले अशी स्वार्थी वरिष्ठ जमातीतील मंडळी आपल्या पश्चात दुप्पट वेगाने समाजास रसातळास नेण्यास कमी करणार नाहीत, यासाठी शाहूराजास माणसामधील माणूस जागा करावयाचा होता. त्यांचा स्वाभिमान जागवून मेलो तरी बेहत्तर परंतू स्वाभिमान सोडणार नाही, जगेन तर शेळीचे जिणे टाकून देईन आणि सिंहासारखा जगेन हा आत्मविश्वास लोकांच्या मनात निर्माण करावयाचा होता. याकरिता समाजाची मानसिकता जाणीवपूर्वक घडविणे आवश्यक होते. शारीरिक गुलामगिरी ताकदीच्या बळावर निपटून टाकता येईल परंतू मानसिक गुलामगिरी नाहीशी करावयाची असेल तर तशा मनांची बांधणी करावी लागते. अशा मनांची बांधणी व्हावयाची असेल तर त्यांच्या मनाचा विकास होऊन माणसांना विशाल दृष्टी प्राप्त झाली पाहिजे.

सर्वसामान्य माणसांचे विश्व हे डबक्यासारखे छोटेच राहिले आहे आणि त्यामुळे डबक्याबाहेर व्यापक विश्व आहे याची कल्पनाही त्यास असत नाही. इतिहास असे सांगतो की, सर्वसामान्य माणसं डबक्यात राहिली तरच आपले तथाकथित श्रेष्ठत्व टिकून राहील, याची पूर्ण जाणीव असलेल्या ब्राम्हण वर्गाने नेहमीच त्यांना डबक्यातच राहू दिले. नव्हे ते डबक्यातून बाहेर पडू नये यासाठी व्यूहरचना केली. त्यातूनही एखादा डबक्यातून बाहेर पडू पाहू लागला तर पेटता अग्नी सहन न झाल्याने मृत पतीच्या चितेवरुन बाहेर पडू पाहणाऱ्या सतीस जसे चारी बाजूंनी काठ्यांनी बडवून त्यातच ढकलून तिच्या आयुष्याची राख केली जायची त्यापध्दतीने या अज्ञानाच्या डबक्यात बहुजन समाजास बेमुर्वतखोरपणाने त्यापध्दतीने अज्ञानाच्या डबक्यात ढकलून देण्यास ब्रह्मवृंद तयार असतात. हे डबके होते अज्ञानाचे, विद्याहीनतेचे आणि त्यामुळे म. जोतिबा म्हणतात.

विद्येविना मति गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
ही दु:स्थिती समाजाची बनली.

समाजातील शेवटच्या माणसाला माणूसपणाची शिकवण देऊन माणूस धर्म समजावून द्यावयाचा असेल तर त्याच्या मनाने क्षितिजाकडे ताठ मानेने पाहण्यास शिकले पाहिजे आणि त्या दिशेने शाहू राजाने टाकलेले पाऊल म्हणजेच अंत्योदयाचे तत्वज्ञान होय. समाजास लागलेल्या मानवनिर्मित कृत्रिम उच्चनीचतेच्या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हा मुळात रोग नाहीच, तो तर दिखावा आहे हे लोकांच्या ध्यानी येणे आवश्यक होते. अंधारात रस्त्यावर पडलेल्या दोराच्या तुकड्यास साप म्हणून घाबरुन जाण्यासारखेच जातीयतेचा भूलभुलैय्या निर्माण करुन त्याला चुकीचा शास्त्राधार देऊन बहुजन समाजास घाबरवून सोडले होते. म्हणूनच यावर रामबाण उपाय होता तो म्हणजे ज्या शास्त्रांचा आधारावर जातीयतेचे राक्षस अश्वमेधाच्या ऐटीत स्वार नसून गाढवावरुन मिरवत आहे अशा निराधार शास्त्रांचा बुरखा फाडण्याचा, यासाठीचा मार्ग फक्त एकच आहे आणि तो म्हणजे `शहाणे करु सकलजना.'

शाहू या राजा माणसाने हे पक्केपणाने हेरले आणि आपल्या संस्थानात मन बांधणी करण्याची सुरुवात केली. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा म्हणून सर्वांना शिक्षणाची समान संधी देण्यास त्यांनी अग्रक्रम दिला. वर्षानुवर्षे ज्यांना शाळेच्या आवाराजवळही त्यांच्या सावलीचा विटाळ होईल म्हणून फिरकू दिले जात नव्हते, अशा समाजास शिक्षणाची संधी शाहूरायाने प्राप्त करुन दिली. परिस्थितीने ग्रासलेल्या पालकाच्या मुलांची राहण्याची अडचण होऊ नये, पोटापाण्याची आबाळ होऊ नये म्हणून कोल्हापूर संस्थानात वसतीगृहांची स्थापना केली आणि ज्यांच्या अंगी गुण आहेत, शिकण्याची प्रबळ इच्छा आहे, नवीनतेची ओढ आहे अशांना हेरुन अशा शाळांमध्ये स्वत: लक्ष घालून प्रवेश देवविला. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तथापि, एवढ्यावर कार्यसिध्दी होणार नाही याची जाणीव होताच आपल्या राजेपदांच्या अधिकारांचा वापर करुन १९१६ ला सप्टेंबर महिन्यात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. उद्देश एवढाच की, आपली प्रजा शिकून शहाणी व्हावी, धार्मिक अंधश्रध्देतून मुक्त व्हावी.

शिक्षणाच्या सोयी सवलती उभ्या करीत असताना शाहूंच्या कार्यात कोलदांडा घालण्याचे काम स्वभावधर्मास अनुसरुन ब्राह्मण पंतोजी करीत होतेच. अशावेळी माळया, कुणब्यांच्या मुलांना शिकवा आणि त्यांचीच शिक्षक म्हणून नेमणूक केली तरच शूद्रांचे शिक्षण होऊ शकेल या महात्मा फूले यांच्या दूरदर्शी प्रतिपादनाची आठवण प्रकर्षाने येते. त्यावेळी वरिष्ठांसाठी आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र अशा शाळा होत्या अशा शाळांमधून लौकिकार्थाने शिक्षण तर होईल परंतू ज्या जातीयतेला मूठमाती देऊन समाजात नवचैतन्य निर्माण करावयाचे आहे त्या ध्येयाप्रत पोहचता येणार नाही याची जाणीव शाहूरायास झाली आणि यामधून अस्पृश्य व बिगर अस्पृश्य शाळांच्या एकत्रीकरणाच्या विचाराने जन्म घेतला. १९१६ च्या सुमारास काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, करवीर इलाख्यात (जहागिरी सोडून) अस्पृश्य लोकांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा असतात. त्या सर्व शाळा येत्या दसऱ्यापासून बंद करण्यात याव्यात व अस्पृश्यांच्या मुलांस सरकारी शाळातून इतर लोकांचे मुलांप्रमाणेच दाखल करुन घेत जावे. सरकारी शाळातून शिवाशिव पाळणेची नसल्याने सर्व जातींच्या व धर्माच्या मुलांस एकत्रित बसविले जावे.

स्वतंत्र्य भारताच्या राज्यघटनेत समानतेचे शैक्षणिक तत्वज्ञान जे आले आहे त्याचा उगम हा याच ठिकाणी तर झाला नाही ना? दूरदर्शी राजाचीच ही लक्षणे होती. तथापि, शाहूराजे एवढ्यावरच थांबले नाहीत कारण आपण जो आदेश देत आहोत. त्यावरील परिणामांची जाणीव होण्याऐवढी प्रगल्भ बुध्दिमत्ता त्यांच्याकडे होती. मनुचे वंशज यामधूनही अस्पृश्य मुलांची मानहानी करण्यास कमी करणार नाहीत याची खात्री त्यांना असल्याने आपल्या आदेशात पुढील इशारा दिला.

सरकारी मदत मिळणाऱ्या कोणत्याही शाळेत एखादा अस्पृश्य वर्गाचा विद्यार्थी आला तर संभावित गृहस्थाप्रमाणे आदरपूर्वक वागवून त्याला शाळेत घेण्यात यावे. शाळाखात्यातील कोणत्याही इसमाची अशी करण्याची हरकत असेल त्याने हा हुकूम झाल्यापासून सहा आठवड्याच्या आत आपला राजीनामा पाठवावा. तर त्याला पेन्शन मिळणार नाही. जर या कायद्यास, मदत मिळणाऱ्या शिक्षण संस्थांची हरकत असेल तर त्यांचीही ग्रँट किंवा इतर मदत दरबार बंद करील. याचबरोबरीने शाहू महाराजांनी मल्लविद्या, संगीत, नाट्य, सहकार, शेतीसुधार, औद्योगिकरण अशा विविध क्षेत्रात नवविचारांची दालने उभी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आपल्या अवघ्या ४८ वर्षांचा आयुष्यातील प्रत्येक क्षण संस्थानातील जनतेच्या हितार्थ खर्ची घातला. राजा म्हणून त्यांना इतर क्षेत्रातील कार्य सहजसुलभ पध्दतीने करता येत होते. परंतू या राजाचे मोठेपण त्याने निवडलेल्या वाटावरुन सिध्द होते. हा राजा रुळलेल्या वाटेवरुन चालण्यास तयार नव्हता. इतर राजांप्रमाणेच राजवैभवाच्या सुखोपभोगात रमणारे त्याचे मन नव्हते. समाज उत्थापनाच्या चळवळीत हा राजा सर्वस्वाने सहभागी झाला यातच खऱ्या अर्थाने या राजाचे मोठेपण आहे असे माझ्यासारख्यास वाटते.

शाहू राजाने जे काही केले यासाठी त्यांच्या अभ्यासाची असलेली जोड नाकारता येणार नाही. तथापि, सर्व विद्वान मंडळी असा मार्ग का स्वीकारत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे कारण असे की, पढीक विद्वान आणि कार्यकर्ता यांच्यात भेद हा असतोच. कार्यकर्त्याला डोळस ज्ञानाची जोड मिळाली तर त्यामधून नवनिर्माण होते. शाहू राजांच्या कार्याची मूळ प्रेरणा त्यांचा आपल्या बांधवाप्रती असलेला मायेचा ओलावा होता. जे अंत:करणातून उचंबळून बाहेर पडते त्यामधील स्वाभाविकता दुसऱ्या कशात नसते आणि त्यामुळेच दास्यत्वाच्या युगानुयुगाच्या शृंखला तोडण्यासाठीचे मानसिक बळ त्यांना प्राप्त झाले.

राजर्षी शाहूंना तथाकथित ब्राह्मणांनी जरी त्रास दिला असला तरी या गुणग्राहक राजाने ब्राह्मणांचा कधी द्वेष केला नाही. कारण तो मनस्वी राजामाणूस होता. त्यांनी जे केले ते ब्राह्मणास विरोधासाठी केले, ब्राह्मणी पद्धतीवर प्रहार केले आणि त्यामुळेच त्यांचे आणि लोकमान्य टिळकांचे आपुलकीचे संबंध इतिहासाने टिपून ठेवले आहेत. प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या या राजाने त्यांना आईची ममता दिली. हा राजा गाईसारखा दिलदार, सिंहासारखा स्वाभिमानी, हत्तीसारखा शक्तीवान अन्यायाच्या विरोधात उभा राहिला तर वाघासारखा असला तर प्रथमत: तो माणूस होता आणि नंतर राजा होता. त्यामुळेच सामान्य माणसांची सुखदु:खे तो पाहू शकला. राजा म्हणून आपल्या अधिकारात त्यांच्या दु:खांचा भार कमी करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच या राजामाणसाचे कार्य आजही दीपस्तंभासारखे आपल्याला दिशा दाखविण्यास समर्थ आहे.

अशा या दुरदृष्टीच्या युगप्रवर्तक राजाचा कोल्हापूरवासियांना साहजिकच `आमचा राजा' म्हणून अभिमान आहे.

 
< मागील

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color