स्वागतकक्ष arrow व्यक्तिपरिचय arrow साहित्यिक arrow कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
पान 2
मराठी गद्य रंगभूमीचे जनक, लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि नवाकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म सांगली येथे २३ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला. १८५७ ते १८७२ चा कालखंड स्वराज्यासाठी प्रयत्नांची झालेली सरुवात असली तरीही पारतंत्र्याचा अंधकार सर्वत्र पसरला होता. याच काळात काकासाहेब खाडिलकरांचा जन्म झाला. जन्म जरी पारतंत्र्यात झाला तरी त्यांचा मृत्यू मात्र स्वातंत्र्य पाहूनच झाला.

खाडिलकर मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील `नारिंगे गावाजवळील गिरावळ'चे समुद्राच्या खाडीने हा परिसर वेढलेला म्हणूनच या गावाच्या लोकांनी आपल्याला `खाडिलकर ` म्हणवून घेण्यास सुरवात केली. पेशवाईत खाडिलकर मंडळी देशावर आली. कर्नाटकात नरगुंदजवळील काही जमिनी खाडिलकरांना इनाम मिळाल्याचा उल्लेख सापडतो. कृष्णाजीपंताचे वडील प्रभाकरपंत. पटवर्धन संस्थानातील कृष्णाकाठच्या हरिपूर गावी प्रथम आले. या गावची `मोकाशी' खाडिलकरांकडे होती. त्यावेळी सांगली संस्थानात श्रीमंत तात्यासाहेबांची कारर्कीद होती. प्रभाकरपंताना उगार येथील जमीन जुमल्याचे व्यवस्थापक नेमण्यात आले. पण प्रभाकरपंतांनी आपले बंधू काशीनाथपंत यांना कोकणातून आणून उगारला पाठविले व स्वत: सांगली संस्थानात जमीन-महसूल खात्यात प्रवेश मिळवून संस्थानच्या प्रमुख कारभार्‍यापैकी एक झाले. त्यांच्या काळात गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत अन्नदानाची प्रथा व भोजनदक्षिणा सुरू झाली. त्यावेळी ते सांगलीतील लक्ष्मीबाईंर्च्या वाड्यात रहात असत. पुढे तो वाडा उकिडवे वाडा म्हणून प्रसिद्धीस आला. पण `कृष्णाजी' चा जन्म, प्रभाकरपंतांच्या मृत्यूनंतर झाल्याने त्यांना मातृसुखाचा प्रारंभी लाभ झाला नाही. तरीही नंतर आईची माया त्यांना लाभत गेली. काकांचा स्वभाव लहानपणापासून हट्टी व तापट होता. म्हणूनच असेल कदाचित आईचे प्रेम त्यांच्यावर सर्वात अधिक होते. आईने सांगितलेल्या गोष्टींचा ठसा त्यांच्या कोवळ्या मनावर उमटला. नंतरच्या काळात खाडिलकरांचे बिऱ्हाड कोल्हटकरांच्या वाड्यात आले. लगतच्या कुंटेवाड्यात पटवर्धनांचे बिर्‍हाड होते. दोन्ही वाड्यात एकदम नाटके चालत. त्याचाही काकांच्या बालमनावर परिणाम झाला. तसेच सांगली हायस्कूलमध्ये त्याचवेळी श्रीनिवास भिकाजी ऊर्फ बापू सरदेसाई नावाचे शिक्षक नव्याने रुजू झाले होते. त्यांचा ही प्रभाव काकांच्या पुढील आयुष्यावर झाला. काका वर्गात हुषार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. शाळेच्या वादविवाद मंडळात भाग घेत. खेळातही त्यांचा सहभाग असे, भवभूतीचे उत्तररामचरित त्यांना फार आवडे. पुढे ते नाटक त्यांनी मुखोद्वतच केले. सरदेसाई व वेदशास्त्रसंपन्न आप्पाशास्त्री गोडबोले यांच्यामुळे `कृष्णा `च्या मनात देशभक्तीला व नाट्य गुणाला अनुकूल वातवरण तयार झाले.

सांगली हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाल्यानंतर तेथेच कांही काळ ते शिक्षकही होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना नाट्यवाङ्मयाचा सूक्ष्म अभ्यास केला. तत्वज्ञान हा त्यांचा खास विषय होता. `सवाई माधवरांचा मृत्यू `हे नाटक लिहून त्यांनी आपल्या नाट्यलेखनास प्रारंभ केला. काकासाहेब वकील व्हावे या उद्देशाने मुंबईस अभ्यासासाठी गेले होते. पण राजकीय जागृतीच्या शिक्षणाचा जनतेत प्रसार करण्याची कामगिरी सुशिक्षित तरुणांनी अवश्य केली पाहिजे असे काकांना वाटत होते. त्यामुळेच ते टिळकभक्त झाले. गौतमबुद्ध हा तत्वज्ञानावरील चरित्रपट प्रबंध विविध ज्ञानविस्तार मासिकांत प्रसिद्ध झाला. पुढे काका लो.टिळकांना भेटले. पहिल्या भेटीत काकांना केसरीसाठी लेख लिहण्यास त्यांनी सांगितले. १ सप्टेंबर १८९६ रोजी काकासाहेबांचा हा पहिला लेख अग्रलेख म्हणून टिळकांनी प्रसिद्ध केला. पहिल्याच लेखाला अग्रलेखाचा मान मिळाला. लेखाचा विषय होता. `राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता `. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color