स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow मराठी भाषा आणि माहिती तंत्रज्ञान
मराठी भाषा आणि माहिती तंत्रज्ञान पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   


मराठी भाषा मरते की जगते अशी चर्चा श्री. राजवाड्यांपासून गेली ५०-१०० वर्षे सहज चालू आहे आणि आता ग्रामीण भागातही पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याच्या नवीन धोरणामुळे या मरण्याच्या प्रक्रियेस आपण हातभारच लावत आहोत. (हिंदीच्या प्रभावामुळे बढावा देत आहोत असे म्हणण्याचा मोह होत आहे.) एक वाक्य मराठीत बोलत असताना आपण त्यात इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषातील शब्द सहजी घुसडत असतो. त्याचे कारण ऐनवेळी आपल्याला सर्वच मराठी शब्द आठवत नसतात आणि समजा तसे आठवून आपण ते बोललो तरी समोरच्या माणसाला हे साजूक शुद्ध मराठी समजले पाहिजे ना! कारण तोही आपल्यासारखा धेडगुजरीच असतो.

पण आज अशा पद्धतीच्या शुद्ध मराठी बोलण्याच्या आग्रहापेक्षा मला वेगळा विषय मांडायचा आहे. तो असा की भाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात. तशी ती दर दहा वर्षानेही बदलते हे का बरे मांडले जात नाही? काळ जसा प्रवाही आहे तशी भाषाही प्रवाही आहे. त्यामुळे जुने रीतीरिवाज, संस्कृती, शिक्षण पद्धती, परिणामे इ. बदलतात तसतशी जुनी भाषा कालबाह्य होते आणि त्यात आता बदलत्या तंत्रज्ञानाचा झपाटा झाला आहे. त्यामुळे ही भाषा बदलते आहे. त्याची उदाहरणे आपण आता पाहणार आहोत.

तर मी दर दहा कोसांवर भाषा बदलते म्हणतो हे वाक्य आजच्या तरुणांपुढे पोहोचलेच नाही. कारण कोस म्हणजे काय ? दोन मैलांचा एक कोस होतो. पण आता अमेरिका सोडता इतरत्र मैलांचे किलोमीटर झाले. त्यामुळे कोस फारच दूर राहिला. मग आता १० कोसांचे रुपांतर करुन भाषा दर ३२ कि. मी. वर बदलते म्हणायचे का ? शिवाय मैल या एका संज्ञेवरुन आपण त्याचा विविध प्रकारे वापर करत आलो याचे काय करणार ? त्यास अजून तरी पर्याय आले नाहीत. उदा. मोटारगाडीत, आगगाडीत, विमानात वेग मोजण्यासाठी जे मीटर वापरतात त्याला मायलोमीटर म्हणतात. दर ताशी किती मैलाचे काहीही होवो हा मीटर मायलोमीटरच राहील ? उदा. एकेकाळी मुंबई-पुणे डाक घोड्यावरुन जाई. मुंबईहून सुटलेला घोडा बदलून दुसरा घोडा वापरला जाई. अशा जागेला त्या वेळी बदलापूर (कल्याण कर्जतमधील गाव, रेल्वेस्थानक इ.) म्हणत. आज डाक पाठवण्याचे मार्ग बदलले तरी गावाचे नाव बदलापूरच राहिले. तसे मैल गेले तरी मायलोमीटर हे नाव तसेच चालू ठेवावे का ? मैलावरून वापरला जाणारा वाक्प्रचार म्हणजे माईलस्टोन हा आहे. अंतरे दर्शविण्यासाठी रस्त्यावर मैलाचे दगड उर्फ माईलस्टोन असतात. आता मैल गेल्यावर ते मैलाचे दगडच राहणार का ? शिवाय संस्थेच्या आयुष्यात, माणसाच्या आयुष्यात, विज्ञानाच्या इतिहासात काही महत्वाच्या घटना घडतात त्याला आपण मैलाचे दगड म्हणतो. उदा. चाकाचा शोध हा वैज्ञानिक क्रांतीतील मैलाचा दगड आहे असे मानतात. मी मैलोन मैल चालत गेलो (म्हणजे खूप लांबवर चालत गेलो) किंवा इंग्रजीत माइलेज असा शब्द व त्यावरुन रुळलेला शब्दप्रयोगही आहे. उदा. एखाद्याचा एस. एस. सी. च्या यशामुळे त्याला खूप माईलेज मिळाले असे आपण म्हणतो.

फूट, इंच, यार्ड ही परिमाणे आपण मीटर, सेंटीमीटर, मिलिमीटरमध्ये बदलल्याने यावरुन पडलेली भाषा गेली. अगदी वसंत बापटांची इंच इंच लढवू छातीही गेली. इंग्रजीतील एक छान उद्धृत आठवले, 'दोज हू स्पीक इन यार्डस् अँड मूव्ह इन इंचेस्, बी टिन्टेड विथ फूट', 'ए, तू आता इथून फूट' हेही गेले.

दुसरी गोष्ट - फार पूर्वी छोट्या वजनांसाठी गुंजा, मासा वापरीत आणि तोळाही. (१६ गुंज = १ तोळा, ९६ तोळे = १ शेर (अंदाजे १ किलो)) वैद्य लोक पूर्वी ही मापे औषधे देताना वापरत. त्यामुळे ती भाषा त्यांच्या तोंडात होती. त्यावरुन एखाद्या रुग्णाची तब्येत खूप नाजूक झाली असेल तर त्याचे वर्णन अमूक एखाद्या रुग्णाची तब्येत तोळा-मासा झाली आहे, असे म्हणत. आता गुंजा पिचत पहायला मिळत असल्याने दारू प्यायलेल्या माणसाचे डोळे गुंजेसारखे लाल झाले असे म्हटले तर म्हणणार्‍यालाच दारुबाज म्हणेल, तू काय म्हणतोस ते मला समजत नाही. तू काही गांजा-भांग घेतली आहेस का ? पावशेर किंवा पाव किलो वा पाव लिटर, पाव म्हणजे एक चतुर्थांश राहिले पण पावावरुन अदपाव (अर्धा पाव) आणि छटाक (पावचा पाव अथवा पावाचा एक चतुर्थांश) ही मापे गेली. पण पूर्वी दारु पिऊन आलेल्याला काय रे पावशेर मारून आला का म्हणत तेही गेले.

१६ आणे = एक रुपया होता. त्यावरुन डॉक्टर, वैद्य एखाद्याची तब्येत ५० टक्के बरी झाली म्हणायच्या ऐवजी आठ आणे सुधारली म्हणत. एखाद्याचे काम १०० टक्के झाले की १६ आणे काम फत्ते म्हणत. दुष्काळामुळे ७५ टक्के पीक गेले तर ४ आणे पीक वाचले म्हणत.

तंत्रज्ञानामुळे जुन्या गोष्टी संपून नव्या आल्या जसे कार्बन पेपर जाऊन आता झेरॉक्स आले तेव्हा अमूक एक माणूस दुसर्‍या सारखाच आहे म्हणताना तो त्याची कार्बन कॉपी आहे असे आपण म्हणत असू. कॉपिंग पेन्सिल गेली. सायक्लोस्टाइलिंग गेले. टाईपरायटर कॉम्प्यूटरवर चढला पण टाइपरायटरची ओळ संपत येताना घंटा वाजे ती घंटाही गेली. कै. न. चि. केळकरांची एकसष्ठी साजरी झाली तेव्हा मी आता म्हातारा झालो म्हणायच्या ऐवजी मला आता टाईपरायटरची घंटा ऐकू येऊ लागली, असे ते म्हणत होते.घरातल्या पितळेच्या-पत्र्याच्या बादल्या गेल्या. तांब्याची घंगाळी, बंब गेले, पाट गेले. काही पाटांना कोपर्‍यावर पितळेच्या चक्राकार फिरक्या बसवत.

तसेच ५०-१०० वर्षापूर्वीचे साहित्य आणि त्यांचे लेखक ही कालबाह्य झाले. एका मुलाच्या घरी त्याला पहायला माणसे आली. मुलाचे वडील बाहेर गेले होते. दरम्यान काकांनी कारभार सांभाळला. मुलाचे वडील आल्यावर ते पाहुण्यांना म्हणाले, 'हाच मुलाचा बाप' सर्व हसले. पण छोट्यांना मामा वरेरकरांचे या नावाचे नाटक होते हे काय माहीत?

अशी जुनी भाषा कालबाह्य होताना पोकळी रहात नाही. नवी भाषा, नवे तंत्रज्ञान, नवे री तीरिवाज त्यात डोकावतात. उदा. आजची मुले तुझा फंडा क्लिअर नाही म्हणतात. उशिरा लक्षात येणार्‍याला, त्याची ट्यूबलाईट आता फकफकली म्हणतात.

प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक डॉ. स. ह. देशपांडे यांच्या लिखाणात काही जुने शब्द आवर्जून येतात. एकदा मी त्यांना विचारले सुद्धा की हे सध्या लोकांना न समजणारे शब्द तुम्ही का वापरता? तर ते म्हणाले, असे शब्द मी वापरले नाहीत तर ते चलनातून निघून जातील.

संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस कमी होत चालल्याने मराठी भाषेतील संस्कृतोद्भव शब्दही संपत चालले आणि मग वैविध्य ऐवजी विविधता वापरण्यावर भर येत चालला.

एक इंग्रजी भाषाच, पण ती जगात सगळीकडे समजते असे आपण धरून चालणे किती चुकीचे ठरते बघा.

एका जाहिरात कंपनीला एका संस्थेने एक जागतिक सर्वेक्षण करायला सांगितले होते. सर्वेक्षणासाठी दिलेले वाक्य होते, 'प्लीज, गिव्ह अस युअर ओपिनिअन ऑन द लॅक ऑफ फूड इन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड'. पण लोकांचा प्रतिसादच न आल्याने सर्वेक्षणाची मोहिम वाया गेली कारण, आफ्रिकेत फूड म्हणजे काय हे कोणाला समजेना. पश्चिम युरोपमध्ये 'लॅक' म्हणजे काय हे कोणाला समजेना. पूर्व युरोपमध्ये ओपिनियनचा अर्थ लोकांना समजेना. दक्षिण अमेरिकेत प्लीजचा अर्थ कोणाच्या ध्यानात येईना आणि यू. एस. ए. मध्ये लोकांना 'रेस्ट ऑफ द वर्ल्ड' समजेना.

याचा अर्थ भाषेसारखा मोठा विषय पण तो अगदी त्या त्या भागापुरता, त्या त्या काळापुरता, त्या त्या जातीपुरता, त्या त्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक पातळीपुरता रहातो की शेवटी तो सांकेतिक ठरतो अशी शंका यावी.

श्री. अ. पां. देशपांडे
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color