स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow आपली मायबोली - मराठी
आपली मायबोली - मराठी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

माणसाच्या जीवनांत मातेचे स्थान जेवढे आदरणीय, परमोच्च असते तेवढेच मातृभाषेचेहि असावयास पाहिजे. पण आज तिच्याबाबत जे चित्र दिसते ते दुर्दैवाने फार वेगळे, मन उदास आणि उद्विग्न करणारे आहे. ते प्रयत्नपूर्वक बदलण्याची जबाबदारी या पृथ्वीतलावर जिथे जिथे म्हणून मराठी माणूस राहतो आहे, त्या प्रत्येकाची आहे. पण या कर्तव्याचाच आज बहुतेकांना विसर पडलेला दिसतो. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे इंग्रजी भाषेला दिले जाणारे `अवास्तव' महत्व !

आम्ही बहुसंख्य माणसे इंग्रजी भाषेच्या इतके आहारी आज गेलेलो आहोत की मराठी भाषा लिहिणे, वाचणे, बोलणे, तिच्या अभ्यासासाठी आणि सर्व जीवन व्यवहारांसाठी माध्यम म्हणून उपयोग करणे यात आम्हाला अभिमान आणि आनंद वाटण्याऐवजी फार कमीपणा वाटतो. आमच्या मुलाबाळांना, नातवंडांना एकूणच पुढच्या पिढ्यांना रामायण-महाभारत या आमच्या श्रेष्ठ सांस्कृतिक ग्रंथांची ओळख इंग्रजीतून करुन देण्यात आम्हाला प्रतिष्ठा वाटते !

वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरदर्शन या माध्यमांतून कमालीची अशुध्द, व्याकरणदृष्ट्या सदोष अशी भाषा छापली, बोलली जाते. चांगल्या वर्तनाची असणारी `सु-शीला' चांगला दगड अशी `सु-शिला' होते. प्रकाश देणारा `दीप' `दिपक' होतो. त्याबद्दल ना आम्हाला खेद ना खंत! मराठीचे राजराजेश्वर ज्ञानेश्वर. त्यांचे नांव देऊन `शिंपीकामाचे दुकान' न निघता `टेलरिंग फर्म' अस्तित्वात येते. या सगळया कारभाराला काय नांव द्यावे ? शासन दरबारीहि `तिच्या मस्तकावर मुकुट आणि अंगावर जीर्ण वस्त्रे' हीच स्थिती आहे. त्यासाठी शासनाचा निषेध होणे आवश्यक आहे असे माझे प्रांजल मत आहे. जगातल्या कोणत्याहि अन्य देशांत मातृभाषेला असे गौण, उपेक्षित स्थान दिलेले आढळत नाही. यावरुन आमचे `शासन' आणि आमचा `समाज' काही धडा घेणार की नाही? कधी घेणार?

इंग्रजी भाषा ही जगातील एक समर्थ, सुंदर, संपन्न, महत्वाची , रसाळ भाषा आहे. याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. त्या भाषेचा दुस्वास वा द्वेष करण्याचे तर मुळीच कारण नाही. पण कुटुंबातली आईची जागा ही आईचीच आणि मावशीचीच जागा मावशीला हे जसे अलिखित सूत्र आहे तसेच ते भाषेच्या बाबतीतहि असले पाहिजे म्हणूनच आज आपल्या समाजातला सर्व व्यवहार हा मराठीतून व्हायला पाहिजे. प्रेमाने, श्रध्देने, पूर्ण विश्वासाने आणि अभिमानाने व्हायला पाहिजे आणि `जय जय मराठी' असाच घोष आमच्या मनात-मुखात सदैव गर्जत राहिला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी `ती अमृतालाही जिंकणारी भाषा आहे' असे मराठी भाषेला दिलेलं सुवर्ण रत्नजडित प्रशस्तिपत्र कधीतरी खोटे ठरेल काय?

श्रीमती मालतीबाई किर्लोस्कर
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color