फॉर हिअर ऑर टु गो? पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   
फॉर हिअर ऑर टु गो?
लेखिका - अपर्णा वेलणकर
प्रकाशक - मेहता पाब्लिशिंग हाऊस
प्रथम आवृत्ती - २००७
किंमत - रु. २२५/-

 

एखाद्या पक्ष्याचे सुमधुर गुंजन कानी पडताच ते सतत मनात रुंजी घालत राहते. पण प्रत्यक्षात तो पक्षी मात्र नजरेस न पडता हुलकावणी देत राहावा तशी काहीशी माझी अवस्था झाली होती. त्याचा हिरवा-निळा रंग, सुबक पांढरी चोच, पंखांवरील काळे-भुरे ठिपके इत्यादी त्याचे वर्णनही ऎकून पाठ झाले होते. त्याची शीळ कानी पडत होती खरी पण तो मात्र दिसत नव्हता. ‘फॉर हिअर ऑर टु गो?’ या ‘अपर्णा वेलणकर’ यांच्या पुस्तकाबद्दल माझे काहीसे असेच झाले होते. बर्‍याच जणांकडून या पुस्तकाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया ऎकल्या होत्या. त्यामुळे कधी एकदा ते माझ्या हाती पडेल असे झाले होते. नगरवाचनालयातील सारखे फिरतीवर असलेले ते पुस्तक माझ्या खात्यावर येण्याचा योग काही केल्या येत नव्हता. आणि अगदी अनपेक्षितपणे आठ दिवसांपूर्वी ते माझ्या हाती आले, तेही मी अमेरिकेत-कॅलिफोर्नियात मी मुलीकडे गेले असताना.

पुस्तकाचे सार्थ नाव व आकर्षक मुखपृष्ठ बघताक्षणीच वाचकाच्या मनाची पकड घेते. अथांग पसरलेला महासागर, त्यापलिकडे जाण्यासाठी लागणारा अमेरिकन पासपोर्ट, पांढर्‍या शुभ्र रंगातील पुस्तकाचे नाव आणि त्याच्या आरपार असलेले पक्ष्यांचे थवे बरंच काही सांगून जातात. अमेरिकेचा इतिहास दोन अडीचशे वर्षांपूर्वीचा! ब्रिटिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन, जपानी, चिनी, स्पॅनिश असे विविध देशातील स्थलांतरित लोक अमेरिकेत येऊन स्थायिक झाले. पण सुशिक्षित भारतीयांची लाट येथवर येऊन पोहोचायला मात्र थोडा उशीर झाला. यापूर्वी अमेरिकेला गेलेल्या व लक्षात राहण्याजोग्या, बोटांवर मोजण्याइतक्याच व्यक्ती असल्या तरी त्यापैकी डॉक्टर होण्यासाठी १८८३ साली गेलेल्या ‘आनंदीबाई जोशी’ व १८९३ साली वैश्विक धर्मपरिषदेसाठी गेलेले ‘स्वामी विवेकानंद’ यांचा उल्लेख आवर्जून केलेला दिसतो. तसं पाहिलं तर आपला देश सोडून नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने दुसर्‍या देशात-विशेषतः अमेरिकेत जाऊन राहणे ही सध्याच्या काळात जरी नेहमीची बाब वाटत असली तरी १९५०-६० च्या सुमारास ती तशी अप्रूप वाटणारीच नव्हे तर अत्यंत धाडसाची बाब होती.

सुशिक्षित भारतीयांची लाट जी अमेरिकेत-उत्तर अमेरिकेत आली तिचा मागोवा, कारणपरंपरा शोधून काढण्याचा लेखिकेने यशस्वी प्रयत्न केलेला आहे. केवळ एकाच गावात राहून शितावरून भाताची परीक्षा केली असे नव्हे तर त्यासाठी तिने पूर्वपश्चिम, दक्षिणोत्तर अशी सारी अमेरिका न कंटाळता पालथी घातली. ६०-७० कुटुंबात स्वतः राहून त्यांना ‘बोलतं’ केलं. त्यांना आलेल्या बर्‍या-वाईट अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधली. यात ९० वर्षाच्या ताराबाई पटवर्धनांपासून ते अगदी ABCD म्हणजे ‘अमेरिका बॉर्न कॉन्फिडण्ट देसीज’ पर्यंत सहजपणे लेखिका पोहोचलेली दिसते. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारी ‘एकता’, ‘बृहन्महाराष्ट्रवृत्त’, इत्यादी प्रकाशनांबरोबरच माणूस, किर्लोस्कर, स्त्री अशा मराठी मासिकांचाही आधार घेतला. तसेच ३०-३५ मराठी पुस्तके व १०-१५ इंग्रजी पुस्तके संदर्भासाठी वापरलेली आहेत.

आजकाल जवळजवळ घरटी एक व्यक्ती उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी म्हणून अमेरिकेला जाताना दिसतात. म्हणजे १९६० सालापासून तीन पिढ्या ही भारतीय मंडळी उत्तर अमेरिकेत येऊन स्थायिक झालेली दिसतात. एकमेकांच्या खाद्यांवर उभ्या राहिलेल्या पिढ्यांची अशी ही शिडी तयार झाली आहे. पण मुख्य प्रश्न आहे तो पहिल्या पिढीचा. त्यांना स्थिर होण्यासाठी किती अडचणी आल्या, कष्टाचे डोंगर कसे उपसावे लागले, कोणकोणत्या जटिल समस्यांना तोंड द्यावे लागले आणि तरीही डगमगून न जाता धैर्याने तोंड देऊन घट्टपणे पाय रोवून उभे राहण्यात ही मंडळी किती यशस्वी झाली याचे समालोचन लेखिकेने केलेले आहे. न्यायदेवतेसारखे ‘कमावले काय नि गमावले काय’ हे सांगताना लेखिकेने डॉ. प्रकाश भालेराव, मनोहर शिंदे, श्रीकांत ठाणेदार, सुभाष गायतोंडे, डॉ. तलाठी, तारा पटवर्धन, दिलीप चित्रे यांबरोबरच शंकर हुपरीकर, काशिनाथ घाणेकर, विनायक गोखले, डॉ. जगन्नाथ वाणी इत्यादी अनेक व्यक्तींचा नामोल्लेख करून त्यांच्या मनातील विचार प्रत्यक्ष मांडून आपल्या पुस्तकाला ‘बोलकं’ केलेलं आहे.

‘अंतर’ ही मध्यवर्ती कल्पना घेऊन ती अनेक गोष्टीतून उलगडून दाखवलेली दिसते. हे ‘अंतर’ दोन व्यक्तींमधलं, दोन मनांमधलं, कुटुंबातलं, पिढ्यातलं, रीतीभातीतलं, गावातलं, भाषांमधलं, देशांमधलं, शररीराच्या रंगसंगतीमधलंही असू शकतं. ते ‘अंतर’ पार करताना येणार्‍या अडचणी, होणारी तिरपीट, घालमेल, यशापयशाची चढ-उतार याची दखल घेत त्यालाही कौतुकाची दाद दिलेली दिसते. लेखिकेचा वृत्तपत्रव्यवसायातील मोठा अनुभव, अनेक प्रथितयश पुस्तकांचे मराठीत केलेले उत्कृष्ट अनुवाद जमेशी धरता त्यानंतर लिहिलेले हे स्वतंत्र पुस्तक तिला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचविण्यास खात्रीने मदत करेल असे वाटते.
पुस्तकातील डॉ. हुपरीकर व सौ. जयश्री हुपरीकर यांचा उल्लेख वाचताच मला त्यांची व आमची पुण्यात झालेली भेट आठवली. त्यावेळी शिकागो येथील त्यांच्या महाराष्ट्र मंडळातर्फे बसवण्यात येणारी मराठी नाटके ही नाट्यस्पर्धेसाठी घेऊन येण्याचा त्यांचा बेत असल्याचे सांगितल्याचेही स्मरते. तसं म्हटलं तर आमचीही अमेरिकेला काही ना काही कारणाने चारपाच वेळा वारी झाली मनात येऊनही अभ्यास करून साधक बाधक लिखाण करणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. भले मोठे पंख असलेला, उंच भरारी घेऊन अफाट आकाशाला गवसणी घालणारा गरूड मी नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे. पण अगदी लहानसहान पाखरूही आकाशात उडतंच ना! भले त्याची झेप मोट्ठी नसेल! पण म्हणून उडायचंच नाही असं तर ते करत नाही. तसंच काहीसं माझं झालेलं आहे. मी पुस्तक लिहू शकले नाही तरी ते वाचल्यावर माझ्या मनात आलेल्या विचारतरंगांना अभिप्रायाचे रूप देण्याचा लहानसा प्रयत्न मी केला आहे. आमच्यासारख्या असंख्य आईवडिलांच्या आणि येथे राहणार्‍या बहुतांश लोकांच्या मनात येणार्‍या प्रश्नांना, शंकाकुशंकांना योग्य ती दिशा व उत्तरे मिळण्याचा एक महत्वाचा संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल.

 
पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color