मजेत जगावं कसं ? पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   
मजेत जगावं कसं?
लेखक - शिवराज गोर्ले
राजहंस प्रकाशन, प्रथम आवृत्ती - २००४
किंमत - रु.२२५\-

‘मजेत जगावं कसं?’ हे शिवराज गोर्ले यांचं पुस्तक बरेच दिवस झाले तरी माझ्या वाचनाचा योग काही आला नाही. पण नुकतेच ते मी वाचले आणि ‘प्रथम तुज पाहता’ अशी माझी स्थिती झाली. वाचता वाचता मी त्यात पार बुडून गेले. पुस्तकाच्या मुखपृष्ठाची रंगसंगती आगळीवेगळी, आकर्षक आहे. त्यावरील हसतखेळत बोलणारी भावमुद्रा (बहुधा लेखकाचीच असावी) मनोवेधक आहे. तसेच मुखपृष्ठावरील पुस्तकाच्या नावाशेजारील ‘स्मायली फेस’ हा प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीसच वाचकाच्या स्वागताला सज्ज असलेला दिसतो. प्रस्तुत पुस्तकाला सुरुवात करण्याअगोदर लेखकाने मुळात ‘मजेत जगणं म्हणजे काय’ हे थोडक्यात स्पष्ट करुन सांगितले आहे.
"जिओ तो ऎसे जिओ, जैसे सबकुछ तुम्हारा है।
मरो तो ऎसे मरो, जैसे तुम्हारा कुछ भी नहीं ।"
असा शेर सांगून त्याची सांगता केली आहे. त्यामुळे हे पुस्तक ताबडतोब वाचण्याची दुर्दम्य इछा वाचकाला होते.

राजहंस प्रकाशनने आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अत्यंत नीटनेटके व सुबक प्रकाशन करून प्रस्तुत पुस्तकाला खास ठेवणीतल्या वस्तूचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. ‘राजहंस प्रकाशन आहे ना मग डोळे मिटून पुस्तक घ्या’ अशीच वाचकांची प्रतिक्रिया सर्वत्र पाहायला मिळते. निवडक पुस्तकांचे प्रकाशन करणार्‍या राजहंस प्रकाशनबद्दलची ही प्रतिक्रिया खूपच बोलकी व बरंच काही सांगून जाणारी आहे.

या पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाची मांडणी मुद्देसूद रीतीने केली आहे. प्रत्येक मुद्दा दोन-तीन शब्दात पण ठळक अक्षरात लिहिल्याने एकदम नजरेत भरतो. त्याखाली त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण केलेले आहे. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणांची योजना केली आहे. जगप्रसिद्ध व्यक्तींचे नावासकट उल्लेख केलेले आहेत. तसेच त्या संदर्भातल्या विविध घटना, त्याबद्दलचे त्यांचे विचार, सुव्यवस्थितपणे, समर्पक रीतीने मांडलेले दिसतात. ‘आनंदाचं रहस्य’ व ‘यशाचं तंत्र’ही दोन प्रकरणे मला अधिक भावली. वाचकाला बोट धरून आपल्याबरोबर घेऊन जाणार्‍या लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. लेखकाने केलेले आनंदाचे अनालिसिस पाहून ‘अरे, खरंच की !’ असे उद्‌गार आपल्या तोंडातून अभावितपणे बाहेर पडतात व मन त्या आनंदाच्या तरंगावर सहजपणे डोलू लागते. केवळ आर्थिक किंवा आत्मिक समाधानानं माणूस आनंदी होत नाही. आयुष्यात हवं ते मिळवावं कसं व आहे त्यात आनंद मानावा कसा हे सांगताना जॉन ग्रे यांचं समर्पक उदाहरण दिले आहे. आनंदाचे उगमस्थान, अस्तित्वाचा आनंद, आनंद हा मानण्यावर, ‘खरा’ आनंद, सुख आणि आनंद, ये रे आनंदा, आनंदाचे बहाणे, आनंदाचा गुणाकार असे विविध मुद्दे घेऊन आनंदचा सांगोपांग विचार केला आहे. त्यासाठी रविंद्रनाथ टागोर, ओशो, अब्राहम लिंकन, ग.दि.मा., डॉ. राजीव शारंगपाणी, विमला ठकार इत्यादींचे विचार थोडक्यात समर्पकपणे उद्‌धृत केले आहेत.

तीच गोष्ट ‘यशाचं तंत्र व मंत्र’ या प्रकरणाची. यश हे कधीच आकाशातून पडत नाही. गरीब वा श्रीमंत, उच्च वा नीच कोणीही असला तरी त्याला कष्ट केल्याशिवाय यशप्राप्ती झाली आहे असं कधी होतंच नाही. ‘कारण तुका म्हणे अभ्यास’ या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करणे म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे होय, असे स्वतः तुकाराम महाराजच सांगून गेले आहेत. तेव्हा यश मिळवायचे असेल तर आनंद ही त्याची पहिली पायरी आहे हे सांगताना आनंदाने कष्ट केल्यास आत्मविश्वास बळावतो व आज ना उद्या यश हे मिळतेच हा मंत्र लेखक वरचेवर देतो. यश म्हणजे काय, ते कसं असतं, त्याची व्याप्ती, खरं यश, ते टिकवणं व पचवणं, यशासाठी काय हवे ? कर्म व नशीब, यशस्वी व्यक्तिमत्व याचा साधकबाधक विचार केलेला दिसतो. तसेच यश मिळवायचे असेल तर निर्णयक्षमता, अथक प्रयत्न, एकाग्रता, चिकाटी हे महत्वाचे गुण अंगी बाणवणे जरूरीचे असल्याचे प्रतिपादन केले आहे. हा मुद्दा पटवून देण्यासाठी क्रिकेटमधील गाजलेल्या अनेक फलंदाजांची व गोलंदाजांची उदाहरणे लेखकाने वानगीदाखल दिलेली आहेत. तसेच कार्पोरेट जायंट आयोकोका, अब्राहम लिंकन, आयन रॅंड, मायकेल ऎंजेलो, यांच्याबरोबरच लता मंगेशकर, डॉ. श्रीराम लागू, माधुरी दीक्षित यांचीही आठवण करुन दिली आहे. महाभारतातील धनुर्धर अर्जुनालाही तो विसरला नाही.

आयुष्यात निराशावादी सूर, नकारात्मक विचार याला कडाडून विरोध केलेला असून सकारात्मक विचारसरणीचा जोरदारपणे पुरस्कार केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतः आनंदी राहून स्वतःबरोबरच इतरांनाही आनंदी करावे हा मोलाचा सल्ला दिलेला आहे. ‘सुख सुख म्हणतात ते हेच’ असे सूचित केले आहे. साधे, सोपे, सुबोध,सुटसुटीत लिखाण त्याबरोबरच खुमासदार लेखनशैली या लेखकाच्या गुणवैशिष्ट्यांमुळे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. या सर्व गोष्टी बघता असे ध्यानात येते की प्रस्तुत पुस्तक लिहिताना स्वतः लेखकानेही अनंत कष्ट घेतले आहेत. संदर्भासाठी विविध भाषातील पुस्तकांचे वाचन, टिपण करून त्याचा यथायोग्य उपयोग करून घेतला आहे.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color