स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow भाग्ये आम्हां ऐसे गुरु लाभले
भाग्ये आम्हां ऐसे गुरु लाभले पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

भाग्ये आम्हां ऐसे गुरु लाभले

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही वास्तू आणि व्यक्ती यांचे स्थान अनन्यसाधारण असे असते. माझ्या जीवनात ते स्थान ‘विलिंग्डन महाविद्यालय’ आणि तिथे मला लाभलेले विद्वान, आदरणीय गुरुजी यांना आहे. कारण त्यांच्यामुळेच अमर्याद, विशाल आणि सुंदर अशा ज्ञानसागराचे मला दर्शन घडले. त्याची स्मृती माझ्या मनात निरंतर असतेच! पण गुरुपौर्णिमेला त्या निरांजनाचा शांत-शीतल प्रकाश अवर्णनीय असे समाधान मला देतो.

१९४२ मध्ये जून महिन्यात मी ‘विलिंग्डन’ मध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. प्रा. डॉ. वि. कृ. गोकाक त्यावेळी आमचे प्राचार्य होते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते वक्ते! इंग्रजीचे ख्यातनाम प्राध्यापक आणि कानडी भाषेतील प्रतिभासंपन्न कवी आणि लेखक! म्हणून त्यांचे नाव मी खूपच आधीपासून ऐकले होते. त्यांची गव्हाळ रंगाची, उंच, भव्य, रुबाबदार आणि सुदृढ मूर्ती दृष्टीला पडताच नकळतच माझे हात जोडले गेले. ‘रस्किन’चे पुस्तक त्यांनी इतके अप्रतिम शिकवले म्हणून सांगू! त्यांच्या अध्यापनात भावोत्कट काव्य, सखोल तत्वज्ञान, अभिजात विचारसंपदा, सच्ची देशभक्ती या आणि अशाच कितीतरी गुणांचा हृदयंगम मिलाफ झालेला असे. त्यामुळे ऐकणारा अगदी मंत्रमुग्ध होऊन जाई. काहीशा लगबगीने सर वर्गात येत, नाकावरुन किंचित ओघळलेल्या चष्म्यातून वर्गावर एक दृष्टी टाकत, अंगावरचा गाऊन सावरत आणि आपल्या शिकवण्याला सुरुवात करीत. ते स्वतः आणि आम्ही विद्यार्थी दोघेही एक शिकविण्यात आणि दुसरे ऐकण्यात इतके रंगून गेलेले असू की ना सरांना, ना आम्हाला, ना पुढचा तास घ्यायला आलेल्या प्राध्यापकांना घंटेची आठवण राहायची! ती जेव्हा होई, तेव्हा ‘ओ, आय् एम् सॉरी’ म्हणत सर वर्गाबाहेर पडत, अशी गंमत! सर माणूस म्हणून किती मोठे होते त्याची एक आठवण सांगते. १९४२ च्या ‘चलेजाव’ चळवळीने सारा देश पेटलेला होता. आम्ही विद्यार्थी तरी मग मागे कसे राहणार? बुलेटिन्स वाटणे, ग्रामसफाई करणे असे काही ना काही करण्यात आम्ही काही विद्यार्थी दंग होतो. सरांचे मानसपुत्र बॅ. पी. जी. पाटील त्यावेळी आमचे नेते होते. सरांचे आमच्याकडे लक्ष होते ती नजर कासवीची म्हणजे मायेची होती! सांगली, सातार्‍याच्या परिसरात घातपाताच्या घटना वाढत्या प्रमाणात चालू होत्या. पोलिसांना विद्यार्थ्यांचा संशय आला आणि त्यांनी एक दिवस आपला मोर्चा आमच्या महाविद्यालयाकडे वळविला. सरांना ते कळण्याचा अवकाश, घरच्याच धोतर, सदर्‍याच्या पोशाखात, काहीसे प्रक्षुब्ध होऊन ते तरातरा महाविद्यालयाच्या फाटकात येऊन उभे राहिले आणि खणखणीत आवाजात पोलिसांना म्हणाले, ‘या महाविद्यालयाचा मी प्राचार्य आहे. माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला आत प्रवेश करता येणार नाही. तुम्हाला जी काय चौकशी करायची असेल ती माझ्याकडे करा. माझ्या विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये समजले? माझे सांगणे तुम्ही दुर्लक्षून आत शिरलातच तर ‘Listen, you will have to shoot me first’.

निर्वाणीचे आणि धडाडीचे बोलणे ऐकून पोलीस आलेल्याच पावली परत गेले. सरांचे विद्यार्थ्यांबद्दल हे अपत्यनिर्विशेष प्रेम पाहून आनंदाभिमानाने आणि कृतज्ञतेने आमची अंतःकरणे भरुन आली! स्वातंत्र्यसैनिकाने बलिदानालाही तयार असले पाहिजे, हा बहुमोल धडा सरांच्या धीरोदात्त वर्तनाने आम्हाला शिकवला. व्यवसायानिमित्त कालांतराने सरांनी सांगलीचा निरोप घेतला खरा पण आपल्या विद्यार्थ्यांना ते कधीच विसरले नाहीत. त्यांचे जे पत्र त्यांच्या निधनापूर्वी काही दिवसच आधी मला आले होते. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘Malatibai, I pray god, He should bless you with choicest blessings’. केवढी ही हृदयाची श्रीमंती! सरांचा आशीर्वाद मी कधीतरी विसरेन का?

प्रा. वि.ना.ढवळेही आम्हाला इंग्रजीच शिकवत. त्यांचे नेटके, रेखीव आणि संपन्न ज्ञानाचा ठायीठायी प्रत्यय देणारे अध्यापन हा एक अपूर्व आनंदाचा ठेवा होता. शेक्सपियर शिकविण्यात तर त्यांचा विलक्षण हातखंडा! त्यांच्यावरच इंग्लंडमध्ये अभ्यास करुन त्यांनी डॉक्टरेट मिळविली. पुस्तक किती का जाड असेना ते दुमडून उजव्या हातांत घेऊन डावा पंजा हलवीत शिकविण्याची त्यांची लकब होती. सरांची चण लहानशी, कृश अशी! स्वभाव मितभाषी (आणि मिश्कीलही!) तसाच गंभीर. वर्गात शिकवताना एखादा विनोद प्रसंग आला की ते म्हणत, ‘Students, here you have something to laugh at.’ स्वतःचे ओठ मात्र घट्ट मिटलेले! मुलींकडे पाहण्याचे नाव नाही, मग त्यांच्याशी बोलण्याची बात दूरच! म्हणून एकदा माझ्या मैत्रिणींशी पैज मारुन मी सरांना तिळगूळ दिला आणि ‘Thank you’ एवढे दोन शब्द त्यांना माझ्याशी बोलायलाच लावले! त्यांची व्यावसायिक नीतिमत्ताही फार निर्मळ होती. इंटरची आमची परीक्षा (वार्षिक) चारपाच दिवसांवर येऊन ठेपलेली! दुसर्‍या एका नव्यानेच आलेल्या प्राध्यापकांनी शिकवलेले पुस्तक आम्हांला ढिम्म काही कळले नव्हते. आता काय करणार? सर जवळच राहत होते. त्यांना आम्ही ते पुस्तक शिकवण्याची विनंती केली. सरांनी काय म्हणावे? दुसर्‍या प्राध्यापकांनी शिकवलेले पुस्तक त्यांच्या परवानगीशिवाय मी कसा शिकवू? ते योग्य नाही. पण आमच्या वाहणार्‍या डोळ्यांनी त्यांना दया आली असावी. मग दोन-तीन दिवस रोज त्यांनी स्वतःच्या घरीच आमचे तास घेतले आणि सर्व निबंध इतके छान समजावून दिले की आजही ते चांगले ध्यानात आहेत. काही महिन्यापूर्वीच मी पुण्याला गेले होते. सर बरेच आजारी आहेत असे कळल्यामुळे मी आवर्जून त्यांना भेटायला गेले. माझ्या हातात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहेत असे एक सुंदर चित्र होते. ते सरांच्या पायाशी ठेवून मी त्यांना वाकून नमस्कार केला. क्षीण आवाजात मंदसे हसून सर म्हणाले, ‘हे कशाला आणले बरे?’ आणि उषाताईंना सांगून मी निघाले तेव्हा आपल्या नव्या पुस्तकाची प्रत त्यांनी मला भेट म्हणून दिली. घरातून बाहेर पडताना माझे मन म्हणत होते, सरांची पुनः कधी भेट होईल का? की....’ या आमच्या ढवळेसरांवर तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान शिकविणारे प्रा. डी. डी. वाडेकर या महान पंडितांचा पुत्रवत् लोभ होता. हे मी एवढ्याचसाठी सांगते आहे की, एरवी वाडेकर सर म्हणजे बापच होते! वर्णाने गोरे, प्रकृतीने दणकट! उंची छानच आणि त्याला शोभेलशी रुंदीही! दुटांगी धोतर, सदरा, लांब कोट, टोपी, पायात वहाणा किंवा भारतीय पध्दतीचे बूट, असा पोशाख. स्वभाव करारी आणि विलक्षण शिस्तप्रिय, प्रथमदर्शनी पाहणार्‍याला त्यांचा दराराच वाटायचा! आवाज चांदीच्या रुपयांची चळच ओतावी असा दणदणीत, खणखणीत! वर्ग सुरु झाला की त्याचे दरवाजे बंद! विद्यार्थी असो की विद्यार्थिनी, रहा बाहेर उभे! अभ्यासू आणि कष्टाळू विद्यार्थ्याला मात्र मदतीसाठी मुक्तद्वार! शिकवणे कळकळीचे आणि मन जिंकून घेणारे. सर मासिकाचे संपादक असताना कुणा एका विद्यार्थ्याने एका प्रसिध्द इंग्रजी लेखकाचा उतारा स्वतःचा आहे, असे सांगून त्यांच्याकडे छापण्यासाठी दिला. असले तप्त या जमदग्नीपुढे कसे टिकावे? मग त्यांनी त्या विद्यार्थ्याला जन्मभर आठवण राहील असे चापले! सरांचे वागणे रामशास्त्री बाण्याचे, निःस्पृह असे. तत्वज्ञानकोशाचे, त्यांचे काम संपताच त्यांच्याशी संबंधित कागदाचा एक कपटाही त्यांनी स्वतःच्या घरात ठेवला नाही. सर्व सामान त्यांनी त्याच दिवशी संबंधितांकडे पोहचविले! सर मराठी भाषेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी विशेषच भक्तिभाव आहे.

संस्कृतचे एम.जी.माईणकर सर आम्हां सर्वाचे फार आवडते गुरुजी. ‘संस्कृत’, ‘इंग्रजी’ आणि ‘मराठी’ या तिन्हीही भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व. त्यांचे शिकवणे स्वतंत्र दृष्टीचे, मूलगामी आणि विद्यार्थ्याला विचार करायला प्रवृत्त करणारे असे. त्यांना सुरेख कापडाचे कपडे घालायला आवडायचे. सर गोरेपान, जरासे स्थूल, गुजराती वाटावेत असे होते. शांत आणि फार अतिथ्यशील म्हणून त्यांची ख्याती होती. पुढे सर डी. लिट्. झाले आणि दोन सुरेख भावसधन संस्कृत खंड काव्येही त्यांनी लिहिली! सर टेनिसचे चॅंपियनही होते. माईणकर सरांप्रमाणेच डॉ. र. श्री. मुगळी सरांनीही आम्हाला संस्कृत शिकविले. आपल्या मंजूळ आवाजात त्यांनी शिकवलेले ‘मालविकाग्निमित्र’ नाटक आम्हाला खूप आवडले. त्यांच्या इंग्रजीला एक गोड कानडी झोकाही असायचा. वर्षानुवर्षे सायंकाळी ६ ते ९ या वेळी सर वाचनालयात अभ्यासासाठी जात. त्यात कधीही खंड पडला नाही. एकदा दोन ताजी गुलाबाची माझ्या घरची फुले मी त्यांना भेट म्हणून पाठविली तर अर्ध्या तासांत ‘Two Red Roses, Too Red Roses’ नावाची कविता त्यावर लिहून त्यांनी माझ्याकडे धाडली. महाराष्ट्रातच त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य झाले. त्यामुळे पुढे पुढे ते मराठीतही चांगली काव्यरचना करु लागले. सरांची अंगकाठी रोड, चालणे मात्र जलद! सर म्हणजे मूर्तीमंत मृदुता आणि गोडवा! आमचे हे सरही कानडीतले प्रख्यात लेखक! त्यांचा आम्हाला अभिमान वाटे. टी. एम. जोशी म्हणजे वामन मल्हार जोशांचे सख्खे पुतणे! किचकट वाटणारे अर्थशास्त्र ते कवितेप्रमाणे सोपे करुन शिकवायचे. गुणगुणत वर्गात यायचे, रोलकॉल घ्यायचे. पाच मिनिटे मागची उजळणी व्हायची की लगेच अभ्यास सुरु करायचे. अमेरिकेतही त्यांचा प्रबंध नावाजला गेला. दिसायला, वागायला सर फार उमदे आणि प्रसन्न होते.

डॉ. स. वा. कोगेकर म्हणजे आनंदोत्सहाचा निखळ झरा...! ‘Administration is a sort of machine’  असे आपल्या फुगर्‍या गालांनी सांगून ते मशीन त्यांनी आम्हाला उत्तम खोलून दाखवले. ते सदैव काळा कोट सदरा-धोतर या पोशाखात असत. सांगलीतून सायकलवरुन महाविद्यालयात येत. इतके सोपे! त्यांचा विवाह आमच्या महाविद्यालयातल्याच एका सुस्वरुप विद्यार्थिनीशी झाला. माझ्या माहितीप्रमाणे सांगली संस्थानांतले तेच पहिले ‘रजिस्टर लग्न’ पण त्या दिवशीदेखील सरांनी आपला तास चुकविला नाही. मात्र, दुसर्‍या दिवशी ते नेहमीप्रमाणे काळ्या रंगाचा कोट न घालता चॉकलेटी रंगाचा कोट घालून आल्यावर आम्ही विद्यार्थ्यांनी प्रचंड स्टॅंपिंग करुन वर्ग अक्षरशः डोक्यावर घेतला! त्या हास्यकल्लोळात सरही मजेत सामील झाले.
आमचे लॉजिकचे सर ख्रिश्चन होते. नाव ‘स्वामीदासन.’ रंग शंभर नंबरी पक्का काळा आणि तोंडात अखंड सिगारेट! म्हणून मुले त्यांना उदबत्ती म्हणायचे. प्रथम सरांचे इंग्रजी आम्हाला नीट कळायचे नाही. पण पुढे छान अभ्यास जमला. लहान वयातच ते एम्.ए.एल्.एल्.बी. झालेले असे हुशार! वर्षभराने ते मुंबईस परतले. त्यावेळी जाताना त्यांनी आमच्या वर्गाला भरघोस ‘हाय टी’ दिला आणि आम्हा मुलींना तर निशिगंधाच्या वेण्या दिल्या. त्या घालताना लाजून लाजून आमची अगदी पुरेवाट झाली.

कवी गिरीशांनी रेव्हरंड टिळकांची कविता मनापासून शिकवली. करुणरसपर कविता वाचताना त्यांचे डोळे भरुन यायचे! सरांची टापटीप, शिस्त, स्वावलंबन कायम लक्षात राहिली आहेत. अनेक गरजू मुलांना वार लावून जेवायला घालून त्यांनी व माईंनी त्यांच्या आयुष्याला वळण लावले. त्यातली कितीतरी मुले पुढे नावलौकिकास चढली! एका मध्यमवर्गीय शिक्षकाची ही तळमळ खरोखरच वंद्य आहे. ‘बाणभट्ट’ हा संस्कृत लेखक म्हणजे आम्हाला जणू दैत्यच वाटायचा! त्याच्या समासप्रचुर भाषेने आमचे डोके भणभणून जायचे नि घाम फुटायचा. पण एम्.व्ही. पटवर्धन सरांनी त्याला आमच्यापुढे वाकवले. शब्द नि शब्द सुटा करुन समासाचे जंगल तोडून राजरस्ता दाखवला. मनाने सरळ वत्सल असे आमचे हे सर आता या जगात नाहीत याचे वाईट वाटते.

इतिहास हा माझा विशेष आवडीचा विषय. तो प्रा. जी. एस्. दीक्षित या कानडी भाषिक सरांनी अतिशय जिव्हाळ्याने शिकवला. आमची अडचण व्हायची थोडी ती त्यांच्या अपरिचित उच्चारामुळे. सर हाडाचे सालस आणि निगर्वी! सध्या ते बेंगलोरला राहतात. फिजिक्सचे आर. एन. जोशी सर म्हणजे चालता-बोलता ज्ञानकोश होते. किराणा घराच्या गवयापासून आईनस्टाईनच्या संशोधनापर्यंत कोणत्याही विषयाची माहिती विचारा, शंका विचारा त्याचे उत्तर त्यांच्या जिभेच्या टोकावर! कसेबसे गुंडाळलेले धोतर, सदरा आणि वर रुमाल किंवा टोपी असा यांचा पोशाख असे. स्वारी घरीदारी पुस्तकांच्या ढिगार्‍यात बुडालेली! एकदा तर महाविद्यालयाचा नोकर लायब्ररीला बाहेरुन कुलूप घालून गेला तरी यांना त्याचा पत्ताच नाही. डोळे घारे, रंग गोरा, उंची जेमतेम पाच फूट! या ज्ञानर्षीला सर्वजण पितृतुल्य मानत असत.

तर असे हे आमचे सगळे गुरुजन! त्यांच्यावर किती बोलावे, लिहावे? आजचे भ्रष्टाचाराचे बरबटलेले सत्ता-संपत्तीसाठी, सुंदोपसुंदी करणारे ज्ञानोपासनेचा कंटाळा करणारे, नव्हे उपहासही करणारे आजचे शिक्षकविश्व पाहिले की मन संतप्त होते. सगळ्या क्षुद्रपणाची, ओंगळपणाची घृणा येते आणि पुनः पुन्हा आमच्या गुरुजनांचे स्मरण होते. मन म्हणते, आपले गुरुजन म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रातली हिमालयाची उत्तुंग शिखरे होती. ऐहिक वैभवाकडे स्वेच्छेने पाठ फिरवून ज्ञानाची निर्मळ उपासना करण्यात ते खरोखरीच रमले होते. ते ज्ञानपंढरीचे वारकरी होते. उदरभरण नव्हे तर ‘यज्ञ’ म्हणून, व्रतस्थवृत्तीने अध्ययन-अध्यापन केले. छात्रांना ज्ञानावर भक्ती करायला शिकवली. उदंड कीर्तीचे धनी होऊनही आपल्या चित्ताला त्यांनी अहंकाराचा वारा लागू दिला नाही. त्यांची अहर्निश धडपड होती ती आपला विद्यार्थी एक ‘चांगला माणूस’ व्हावा यासाठी ! त्यासाठी आपले ज्ञान मुक्त मनाने, आनंदाने, त्यांनी भरभरून वाटले. त्याला पूजा करायला शिकवली ती ज्ञानसूर्याच्या प्रकाशाची! ती करताना त्याला जन्मभर पुरेल अशी सुसंस्काराची, सदाचाराची शिदोरी बांधून द्यायला ते विसरले नाहीत. त्यांचे ऋण कोणत्या शब्दांत मानावे? अंधाराने ग्रासलेल्या आजच्या शिक्षणक्षेत्रात ‘चंद्रमेजे अलांछन! मार्तंडजे तापहीन’ असणार्‍या आमच्या गुरुजनांसारखे गुरुजन पुनः कधी दिसतील? भेटतील? म्हणून संतांच्या शब्दात थोडा बदल करुन इतकेच म्हणते, ‘भाग्ये आम्हां ऐसे गुरुजन देखिले, म्हणून तस्मै श्री गुरवे नमः’

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color