स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow नात्यातला अभ्यासक्रम
नात्यातला अभ्यासक्रम पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

नात्यातला अभ्यासक्रम

"जोशांच्या कुमुदचा दोन वर्षातच घटस्फोट झाला म्हणे!" "रवींद्र देशपांडेने त्याच्या आईचे व पत्नीचे पटत नाही म्हणून आईला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला." अशा प्रकारच्या बातम्या हल्ली बर्‍याच वेळा ऎकण्यात व वाचण्यात येतात. जीवनातल्या वेगवेगळ्या नात्यात आता पूर्वीचा ‘गोडवा’, ‘संवाद’ उरलेला नाही. जिव्हाळ्याचा गारवा आणि आपुलकीवी ऊब झपाट्याने कमी होत चालली आहे, ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. जो-तो आपापल्यापरीने त्याची कारणमीमांसा करीत राहतो. विभक्त कुटुंबपद्धती, सत्ता आणि संपत्तीला मिळालेले फाजील महत्व, त्याचा अनिवर लोभ, व्यक्तिस्वातंत्र्याच्या विपरीत कल्पना, ही त्यापैकीच काही कारणे! नात्यातल्या दुराव्याचा विचार करताना खूप वर्षापूर्वी वाचलेलं एक सुभाषित मला आठवतं. ते मूळ इंग्रजीत आहे. लेखकाने त्याला A short course in human relation. असे म्हटले आहे. मानवी मनाच्या जुळणीसाठी त्याने सहा शब्दांपासून एक शब्दापर्यंत काही अतिशय मौल्यवान, अर्थघन शब्द सुचवले आहेत. ‘मानवी मनाच्या नात्याचा हा छोटासा अभ्यासक्रम’ असा आहे.

सहा अतिशय महत्वाचे श्ब्द म्हणजे "मी मान्य करतो, चूक माझी आहे." (I Admit I made a mistake) पुढील शब्द अनुक्रमे असे, "तुम्ही चांगले काम केले आहे" (You did a good job). चार महत्वाचे शब्द "तुमचे मत काय आहे?" (What is your opinion). तीन महत्वाचे शब्द, "कृपा करून तुम्ही" (Will you please). दोन महत्वाचे शब्द, "फार आभार", (Thanak you). एक मोलचा शब्द ‘आपण’ (We).आणि सर्वात कमी महत्वाचा शब्द म्हणजे ‘मी’ (I). ‘भगवद्गीता’ व मनाचे श्लोक यातून मानवी स्वभावाचे जे मार्मिक दर्शन घडते, तेच या सोप्या, सुंदर शब्दातूनही घडते.

जीवनात दुःख व संघर्ष हे अटळच असतात. त्यातल्या संघर्षावर मात करायची असेल, तर संघर्षातील एका बाजूच्या व्यक्तीने जर मनापासून म्हटले की, माझी चूक आहे, हे मला मान्य आहे, तर प्रतिपक्षाचा पारा खचितच खाली येईल. कारण माणूस हा मूलतः (अपवाद सोडून) सहृदय असतो. परिस्थिती बर्‍याचदा त्याला दुष्ट किंवा विकारवश बनविते. एखाद्या प्रतिभावंत कलावंतापासून साध्या लाकूडतोड्यापर्यंत "तुम्ही चांगले काम केलेत" या शब्दात आपण त्याची प्रशंसा केली, तर त्याला आनंद वाटल्याशिवाय कसा राहील? कारण कोणताही माणूस दोन आपुलकीच्या शब्दांचा भुकेला असतो. एखाद्या गृहस्थाने आपल्या पत्नीला आवर्जून विचारले, "आपल्या बाळाला डॉक्टर करुया की इंजिनिअर? तुझे काय मत आहे?" तर आनंदाभिमानाने तिचा ऊर भरून येईल. पतीला आपले मत मोलाचे वाटते, त्या भावनेने तिला आत्मसन्मानाचे सुखही मिळेल. पुढच्या सगळ्या शब्दांबाबतही आपण असेच जागरूक असायला हवे. एखाद्याला आपले काम करायची विनंती करताना, "कृपा करून तुम्ही" या तीन शब्दांचे अत्तर त्यावर शिंपडावे. काम फत्ते होणारच, शिवाय आपली नम्रताही त्याला जाणवणार. आपली मौल्यवान वस्तूंची रिक्षात विसरलेली पिशवी रिक्षेवाल्यानं प्रामाणिकपणे परत केल्यावर, ‘फार आभार’ मानायला विसरून कसे चालेल? कोणतेही कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक मोठे काम एकटदुकटा कसा करू शकणर? तिथे "आपण करूया" असे म्हटले की, एकोप्याने व गुण्यागोविंदाने काम पार पडते. हां, मत्र ‘मी’ या एका शब्दरूप शत्रूला मात्र निःशेष गाडून टाकायला हवे. तसे केल्यावर ईश्वराच्या शोधासाठी इतरत्र जायलाच नको. तो हृदयस्थच असतो.

माणसांची मने जोडणारा, हसत खेळत जोडणारा हा अभ्यासक्रम आपले सारे जगणेच सुगंधी करून टाकील.   

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color