स्वागतकक्ष arrow सय arrow स्वर आले जुळुनी
स्वर आले जुळुनी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

स्वर आले जुळुनी

बेळगावच्या दिशेने आगगाडी चालली होती. दिवस ऎन पावसाळ्य़ाचे. वेळ संध्याकाळची. गाडीच्या खडखडाटातूनही पावसाचा आवाज ऎकू येत होता. आणि सुखद वाटत होता. बाहेर नजर टाकावी तिकडे हिरवेगार झालेले. स्टेशन जवळ येऊ लागले म्हणजे लहान-मोठी घरे, शेतमळ्यात वावरणारी गुरे-वासरे आणि माणसे दिसू लागत, पायवाटांची व रस्त्यांची वळणे भेटत. खूप ठिकाणी काळे काळे आणि कुठे कुठे भुरे भुरे झालेले आकाश मन वेधून घेई. अशा वेळी प्रवास करायला मला खूप आवडे.

त्या दिवशी फर्स्ट क्लासच्या डब्यात मी एकटीच राहिले होते. एकच सहप्रवासी होता. तोही गेला होता वाटेत ‘उगार’ला उतरून. एकटेपणामुळे मनस्वी अगदी मोकळे मोकळे झाले आणि गाडीच्या आवाजात आपला आवाज मिसळून गाणी-कविता म्हणत बसायच्या छंदाला चांगला अवसर मिळाला.

बालकवींचे काव्यचरण ओठावर आले, "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे! क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे!" किती तरी वेळ याच दोन ओळी मी गुणगुणत होते. आपल्याच नादात, आपल्याच तंद्रीत. पण अचानक ती तंद्री भंगली, ओळी ओठातच थबकल्या. एकदम तीव्रतेने आठवण झाली ती ‘वनमाले’ची. ही माझी इंग्रजी दुसरीतली मैत्रीण. गोरी गोरी पान, फुगीर गोबर्‍या गालांची. दोन वेण्या पुढे घेऊन ऎटीत चालणारी. फुलांची नि फुलपाखरांची नादिष्ट असणारी. इतकी की झग्या परकरालाही तिला तसल्याच डिझाईनचे कापड आवडायचे. तिचा गळा अतिशय मधुर. जणू पेढे-बत्तासे नाहीतर साय-मध यांनीच बनला आहे, असे वाटावे असा. ‘श्रावणमासी . .’ ही तिची अगदी ‘पेट्ट’ कविता! भेंड्या लावायच्या असोत की पिकनिकला जायचे असो. "वनमाला म्हण की गं एखादे गाणे" असे कोणी हिला सांगितले की तिने सुरूवात करायची तीच मुळी "श्रावणमासी हर्ष मानसी" या शब्दांनी. लडिवाळ स्वरात भिजलेली तिची कविता ऎकतान रंग गंधांनी आणि मोह विभ्रमांनी सजलेली सृष्टी श्रोत्यांच्या कानामनांना आणि डोळ्यांना जाणवू लागायची. अंगोपांगातून उल्हास नाचू लागायचा. आज त्या ओळी गुणगुणताना निळ्या डोळ्यांची, कुरळ्या केसांची धिटुकली ‘वनमाला’ माझ्या मनःश्चक्षूंसमोर उभी राहिली. इंग्रजी दुसरीनंतर ती आमचे बोर्डिंग सोडून गेली. तिचे वडील व्यापारी पेशातले. ते आफ्रिकेत कुठेसे स्थायिक झाल्याचे ऎकले. पण शाळा सोडल्यनंतर पुन्हा तिची गाठच पडली नाही. काही वर्षांपूर्वी जुन्या इंग्रजी वर्तमानपत्रांची फाईल चाळत असताना तिचा फोटो अकस्मात दृष्टीस पडला आणि सोबतच्या वर्णनावरून तिने तिकडे उत्तम गायिका म्हणून नाव मिळवल्याचे समजले. फार आनंद आणि अभिमान वाटला मला, पण तो फार कळ टिकला नव्हता. वर्षभरापूर्वीच हिंगण्याच्या शाळेतल्या बाई भेटल्या. बोलण्याच्या ओघात त्यांच्याकडून कळले की जलशाच्या एका कार्यक्रमाला ती निघाली असता तिच्या वाहनाला अपघात होऊन त्यातच ती दगावली.

कविता म्हणताना मी अडखळले याच दुःखद आठवणीमुळे!

‘वनमाले’वरून अशाच अनेक आठवणींना उजाळा मिळाला. ‘सुलभा’ ही माझी सोलापूरच्या शाळेतली सखी. शिडशिडीत बांध्याची, सावळी पण अगदी स्मार्ट! काळेभोर डोळे आणि गालाच्या खळ्य़ा तिच्या सौंदर्यात भर घालीत. ही म्हणजे मुलखाची लाजाळू आणि भित्री. हिला छान गाता येते हे एक गमतीदार योगायोगानेच मला कळले. एक दिवस आमचे गणिताचे मास्तर तासाला आले नव्हते आणि तास मिळाला आम्हाला ‘ऑफ’. तशी वर्गातल्या मुलमुलींनी काय बूट काढला की आज वर्गात बसून आळीपाळीने प्रत्येकाने कविता-गाणे-असे काहीतरी म्हणून दाखवावे आणि मजेत वेळ घालवावा. झाले, कल्पना सुचायचाच अवकाश! ‘मनाच्या श्लोकापासून’, ‘हरीच्या घरी शेवया तूपपोळ्या’,पर्यंत आणि ‘रामरक्षे’पासून ‘वृत्ति वसंततिलका त-भ-जा-ज-गा-गा’ पर्यंत ज्याला, जिला जे जे , जसे आले आठवले तसे त्याने-तिने म्हणून टाकले. ‘सुलभा’चा नंबर येताच ती उभी राहिली. अतिशय कावर्‍याबावर्‍या नजरेने तिने वर्गाकडे पाहिले, त्याचा अर्थ उघड होता, पण आमचे वर्गबंधु-भगिनी कसले वस्ताद! ते म्हणू लागले, "म्हटलं, आम्हाला तरी येत होतं का गाणंबिणं म्हणायला? आमची आली का कुणाला दया? दिलं का कुणी कन्सेशन आम्हाला? ते काही नाही. गाणे-कविता हवीच आम्हाला." माझ्य़ा मागच्याच बाकावर ती बसायची मी हळूच तिला म्हटले, "टाक गं म्हणून काहीतरी". तरीही क्षणभर ती तशीच उभी रहिली. टाचणी पडली तरी ऎकू येईल इतकी शांतता वर्गात निर्माण झाली आणि एकदम रेशमाची लड उलगडावी तसे काहीशा उंच सप्तकातले शब्द आमच्या कानावर पडले, "माझी आगबोट चालली दरियात गं, दरियात गं..." तिच्या आवाजाची मधुर लपेट कनावर पडली मात्र सार्‍या वर्गाने दाद दिली ‘वाऽऽ वाऽ!’ या उत्तेजनाने तिची भीड चेपली असावी ती खुल्या गळ्याने कडव्यामागे कडव म्हणू लागली. सागरावर डुलणार्‍या नौकेचे सुख आम्ही अनुभवू लागलो. त्या स्वराने सगळेचजण इतके मंत्रमुग्ध झाले की टाळ्य़ा वाजविण्याचेही भान आम्हाला राहिले नाही. तिने वर्गाकडे पुन्हा दृष्टी टाकताच टाळ्यांचा एकदम कडकडाट झाला. मग तिच्यामाझ्यात एक अलिखित करारच झाला म्हणानात, आम्हाला रिकामा वेळ मिळाला की मी म्हणावे, "गडे सुलभा, म्हण की तुझे ते बोटीचे गाणे!" तिने हसून उत्तर द्यावे, "किती गं तुझा आग्रह मालती?"

नववीचे वर्ष संपवून आम्ही दहावीत गेलो. ‘सुलभा’ दुर्दैवाने मागच्याच वर्षात राहिली. सुट्टी संपवून आम्हा मैत्रिणींना कळले की, तिला टायफॉईड झालाय म्हणून. मग तिला भेटायला, बघायला गेलो घरी. मंद निळ्या कापडाचे पडदे लावलेल्या, किंचित एका बाजूला असलेल्या खोलीत तिचा बिछाना घातला होता. तापाने ती चांगलीच थकलेली दिसत होती. तापाची ग्लानी जरा ओसरल्यावर डोळे उघडून तिने बघितले, क्षीणपणे हसली. आणि माझ्याकडे वळून म्हणाली, "तू भेटलीस ना की ‘आगबोटीचं गाण’ आठवतं. आजही दाखवू का तुला म्हणून? तुझं मन मोडवत नाह मला कधी." आणि मी हो-नाही म्हणण्यापूर्वीच तापात, ओढलेल्या स्वरात ती म्हणू लागली, "माझी आगबोट चालली आगबोट चालली दरियात गंऽऽ" . आता पुरे म्हणून मी खूण करणार तो तीच निराश चेहर्‍याने म्हणाली, "मालती, माझी आगबोट आता दरियातच चालली आहे गंऽऽ" तिच्या त्या शब्दांनी माझ्या काळजात चर्रर्र झाले. दुर्दैवाने सुलभाचे शब्दच खरे ठरले. त्याच दुखण्यात ती देवाघरी गेली. चाळीस वर्षे होऊन गेली या गोष्टीला! ‘कविवर्य बोरकरां’ची ही माझी आवडती कविता मी एकांतातही पुन्हा म्हटली नाही, मला म्हणवतच नाही.
-------------------
‘लीला’ची ओळख फर्ग्युसन कॉलेजातली. मोठ्या निकोप मनाची, सुदृढ शरीराची अशी ही माझी खेळकर, खट्याळ मैत्रीण सदैव उमललेल्या सुगंधी फुलासारखी प्रसन्न आणि टवटवीत. नाटकात झकास काम करी. ती सायन्सला, मी आर्टसला. मग ओळख कधी झाली? तर वसतिगृहातल्या आपल्या मैत्रिणीला भेटायला एकदा ही आली असता सर्वांच्या आग्रहस्तव गाणे म्हणू लागली. योगायोगाने मी तेव्हाच माझा तास संपवून खोलीवर येत होते. तो कानावर तिच्या पदाचे शब्द आले. "लई नाही लई नाही मागणं देवा। पोटापुरतं देई विठ्ठलाऽऽ, लई नाही लई नाही मागणंऽ.."

तिच्या स्वच्छ शब्दोच्चाराने, त्यांच्या मधुर चालीने आणि तिच्या स्वरातल्या आर्जवाने मला भूल पाडली. तिच्या मैत्रिणीच्या खोलीवर मी टक्‌टक्‌ केले. दरवाजा उघडताच मी ‘लीला’चे हात हातात घेत म्हटले, "किती छान आवाज आहे हो तुमचा! मला भारी आवडला. पुन्हा एकदा म्हणाल का हे गाणं? प्लीज हं - पण त्यापूर्वी माझी ओळख करून देते हं तुम्हला ..मी मालती किर्लो..." पण माझे बोलून होण्यापूर्वीच तिने मानेने "आहे ठाऊक मला" असे सांगितले.

या गाण्याच्या वेडाने आमची गट्टीच जमली. मग चारदोन दिवसांनी लीलाची स्वारी माझ्या खोलीवर टपकायची, सांगायची, "पाचदहा मिनिटेच वेळ आहे हं फक्त. नंतर केमिस्ट्रीचा तास आहे म्हटलं मला. काल परवा एक अभंग शिकले आहे. त्याचा उद्‌घाटन समारंभ तुझ्या अध्यक्षतेखाली. म्हणजे काय कळ्‌ळं का? तर पहिल्या प्रथम तुलाच ऎकवते तो. ऎक हंऽ . . " मग ती म्हणू लागायची. त्या नव्या अभंगात ती जणू नवा प्राण ओतायची. त्या गानसमाधीत तिचा तास, ती आणि मी सगळे बुडून जायचो. मैफलीचा शेवट व्हायचा तो मात्र "लई नाही लई नाही"नेच. अलीकडे पंधरावीस वर्षात तरी आमची दोघींची भेट झाली नाही. बिहार-बंगालकडे अपल्या भूगर्भशास्त्र पंडित पतीसवे, मुलाबाळांसवे ती संसारात मग्न आहे. पण तिची तीव्रतेने आठवण झाली की मी स्वतःशीच म्हणते, "लीला जिथं कुठे तू असशील तिथं सुखी अस. यापेक्षा देवाकडं "लई नाही लई नाही मागणं माझं" 
-------------------
‘प्रमिला’ यवतमाळकडची. दुधातुपाच्या प्रदेशातली. धनवंताघरची. पण अंगाने सुदाम्याची बहीण शोभावी अशी. रंग-रूप सर्वच बेताचे. डोळ्यांवर पेपरवेटसारखा जाड चष्मा! स्वभावाने मात्र फार मायाळू आणि सालस. मितभाषी. वडिलांचे छत्र लहानपणीच दुरावले म्हणूनच की काय कोण जाणे पुष्कळदा ही उदास खिन्न दिसायची. शरदऋतूचे दिवस होते. रात्री साडेदहाची वेळ. माझ्या दरवाजावर हलकेच कुणीतरी थाप मारल्याचा मला भास झाला. उठून पाहते तर दारात ‘प्रमिला’ उभी. खाली मान घालून. जरा वेळाने मी विचारले, "हे काय झोपली नाहीस अजून? बरं बिरं नाही का तुला?" ती डोळ्यांनी माझ्याशी बोलली. ते लाल झाले होते. सुजले होते. काहीशा आवेगाने माझे हात आपल्या हातात घेऊन ती म्हणाली, "मालती, जरा बाहेर हिंडू या का चांदण्यात? येतेसऽ  " मी मुकाट्याने चपला पायात घातल्या - आणि वसतिगृहाच्या आवारातच एका प्रशस्त वृक्षाच्या बुंध्याला टेकून आम्ही बसलो. शांत-निळा मंद प्रकाश वरून बरसत होता. अवतीभवती खूपच निवांत वातावरण होतं. मुलींच्या खोल्यातून बहुतेक निजानीज झाली होती. चांदण्याकडे एकटक बघत ती गप्पच बसली. आणि थोड्या वेळाने आपल्या विचारतंद्रीतून जागी होऊन म्हणाली, "आज त्याचा वाढदिवस असायचा. तुझ्यासारखाच तोही भारी गाण्याचा प्रेमी होता. सारखा आग्रह करायचा मला. "म्हण की गं गाणं", आणि मी म्हणायला लागले ना, की उजव्या हाताच्या बोटाने टप्‌टप्‌ करीत मंद स्वरात ताल धरायचा. त्याचं आवडतं गाणं हे - "उघड दार, उघड दार प्रियकरासि आपुल्याऽ उघड दाऽऽर . . . मध्यरात्रीच्या निळ्यात शांत चांदणे खुले पसरुनी रश्मिजाल . . . " बोलता बोलता भावनोर्मी अनावर होऊन ती गाऊ लागली, ती तन्मय होऊन गात होती, मी तन्मय होऊन ऎकत होते. रात्री खोलीवर परतलो तेव्हा साडेबाराचा ठोका पडला! कॉलेजचे शिक्षण संपले. आम्ही पांगलो. जीवनाचे मार्ग बदलले - पण प्रमिलाच्या शब्दाशब्दातून वाहणारी व्यथा - तिचे कोडे मला अज्ञातच राहिले. त्याची हुरहुर वाटते. तिची आठवण आली की मनाला उदासीनता घेरते.
--------------------
‘शांता’ मूळची आमच्या किर्लोस्करवाडीची नव्हे. पण तिची ओळख मात्र वाडीत एका उन्हाळ्याच्या सुट्टीत झाली. सुट्टीतला माझा कार्यक्रम म्हणजे असा असायचा - गावातल्या सगळ्या मैत्रिणींना जमवायचे, ना. धों ताम्हनकरंच्या मागे लागून एक नाटुकले लिहून घ्यायचे. रात्रंदिवस सर्वजणींनी धडपड करून, कष्ट करून ते बसवायचे. ताम्हनकर आमची सारी हौस वात्सल्याने पुरवीत, भरपूर शाबासकीही देत. त्या नाटकाच्या संदर्भात शंकरभांऊ (माझे वडील) कडे ऑफिसात मी जाते तर तिथे एके दिवशी माझ्याच वयाची म्हणजे सुमारे आठ एक वर्षाची मुलगी मी पाहिली. ती शंकरभाऊसमोरच्या टेबलावर बसून मोठ्या धिटाईने त्यांच्याशी गप्पा मारण्यात गढली होती. तिचे डोळे घारेघारे, रंग अस्सल चित्तपावनी तेजाचा, केस लांबसडक असे होते. त्यावरची किंचित सोनेरी छटा पाहून मला तर ती एखाद्या इंग्रजी बाहुलीसारखीच वाटली. मला बघताच जरा लाजून ती टेबलावरून खाली उतरू लागली. तसा शंकरभाऊंनी तिचा हात माझ्या हातात देत मला सांगितले, "मालढोक, ही आपल्या शाळेतल्या वैद्य बाईंची शांता बरं का. पुण्याला आजोळी असते ही शिकायला. सुट्टीत आलीय आपल्या वाडीला. गाणं फार छान म्हणते हं. हिलाही घ्या की तुमच्या नाटकाच्या कार्यक्रमात. म्हणेल एखादे गाणे. म्हणशील न गं? त्यावर तिने मोठ्या आत्मविश्वासाने मान हलवून होकार दिला. शहरी वातावरण, आधुनिकतेचा, टापटिपीचा संस्कार तिच्या सगळ्या हालचालीतून जाणवत होता.

नाटकाचा दिवस उजाडला. रात्री ठीक साडेनवाला आम़चे नाटक सुरु झाले, प्रवेश रंगू लागले. मध्यंतर आला. पुढील अंकाची तयारी होईतो प्रेक्षकांना थोडे गुंतवून ठेवावे म्हणून मध्येच गाण्य़ाचा कर्यक्रम ठेवला. मखमली पडदा वर उचलला गेला. गर्द गुलाबी रंगाची गोल साडी, तीवर तांबडा लाल रंगाचा जरीच्या बुट्ट्यांचा पोलका घातलेली चुणचुणीत मुलगी स्टेजवर आली. तिने मोजकेच फुलांचे आणि सोन्याचे दागिने घातले होते. पायातले पैंजण रुमझुम वाजवीत ती स्टेजवर आली. प्रेक्षकांकडे निर्भयपणे पाहून तिने त्यांना अभिवादन केले. आणि डोळ्यांवर उजवा हात धरून ती काहीतरी शोधू लागली. दोन क्षणानंतर तिच्या मुखातून चरण उमटले, "गोकुळीचा कान्हा कुणी पाहिला की काय गं ऽ ऽ "आणि हां हां म्हणता ती विरहार्त राधेच्या अभिनयात स्वतःला विसरून गेली. किंचित रुंदट, किंचित घोगरा पण अति भावस्पर्शी असा तिच आवाज आणि अनुरूप विभ्रम यांनी एक रात्रीत वाडीकर मंडळींची मने तिने जिंकली.

हीच शांता आता माझी सख्खी वहिनी झाली आहे. मला दाट, गोड संशय आहे, तेव्हाच तिने आमच्या ‘मुकुंदा’ला पाहून ठेवले असावे.

माझी आईही गाणे म्हणयची. ती कोकणातली. बाराव्या वर्षी लग्न होऊन आमच्या घरी आलेली. माहेर फार जुन्या, बाळबोध वळणाचे. तेव्हा गुरूजवळ बसून कसे शिकणार ती गाणे? पण त्याची तिला उपजतच फार चांगली जाण होती. बालगंधर्वांची ती निस्सीम भक्त. त्यांच्या अखेरच्या आजारात त्यांच्या बिछान्याशी बसून तर कधी घरातल्या कृष्णमूर्तीपुढे बसून ती सवड मिळेल तेव्हा गाणी म्हणायची. त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून तिच्या स्वरात एक वेगळीच उत्कटता नि आर्तता असे.

मला सदैव वाटे हिचा गळा एवढा चांगला, हिने का आम्हाला म्हणून दाखवू नये गाणे? मग एखद्या दिवशी मी हटूनच बसे आणि, "नन्ने, तू आज तू आज गाणे म्हणून नाही दाखवलेस तर मी जेवणारच नाही." असा धाक तिला दाखवी. ती खूप आढेवेढे घेई. "काही तरी काय गं तुझा वेड हट्ट, माले? माझं कसलं गाणं! उगीच विरंगुळा म्हणून म्हणते काहीतरी" असे उत्तरही देई. पण माझा हट्ट चालूच राही, मग तिचा नाईलाज होई. अलिकडे खूप पोहण्यामुळे तिचा आवाज ओढवत नसे तिला - गाणे म्हणण्यापूर्वी ती स्वतःशीच त्याच्या ओळी गुणगुणून पाही, डावा हात कानावर ठेवी, डावा पाय पोटाजवळ उभा करी आणि म्हणू लागे, "रांगोळी घातिली सजले अंगण! पायी तुडवून जाऊ नको ऽ रे । विश्वासाने ठेली मान मांडीवर, चूर निष्कारण करू ऽ  नको रे।" तिची तळमळ अंतःकरण काबीज करी. शब्दातील अर्थाच्या विविध छटा ती अचूक पकडी. अखेरी अखेरी तिचा कंठ रुद्ध होई आणि घशात आवंढा दाटून माझेही डोळे डबडबत. भाबडी उघड्या मनाची माझी निष्कपट आई, तिच्या मनातली सारी उलघाल मला त्या शब्दाशब्दात जाणवे आणि तिच्या उपेक्षित, अयशस्वी जीवनाचा पट डोळ्यापुढून जाऊ लागे. तिचे गाणे संपून गेले तरी एकमेकींकडे पाहत न बोलताच आम्ही खूप बोलत असू.

बेळगाव जवळ येत चालले होते. आठवणींच्या साखळीच्या चित्रपटात प्रवास कधी संपत आला ते कळलेच नाही. या चित्रपटात माझे विद्यार्थी-विद्यार्थिनीही होते. परिचित आप्तही होते. यातली काही देवाघरी गेली आहेत, काहींची कितीतरी वर्षात दृष्टीभेटही नव्हती, या सार्‍यांची या चित्रपटाच्या निमित्ताने पुनर्भेट झाली. त्यांच्या दर्शनाने कधी ओठात हसू तर कधी डोळ्यात आसू दाटले. स्टेशनवर उतरताच माझी मैत्रीण ‘प्रेमा’ म्हणाली, "एकटीच होतीस वाटतं डब्यात? कंटाळा आला असेल मग प्रवासात?" मी पटकन्‌ उत्तर दिले, " छे गं! छानच सोबत होती आणि प्रवासही मजेत झाला." ती आश्चर्याने बघतच राहिली. प्रवासात माझे सोबती कोण होते हे तिला कसे कळणार?   

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color