पण लक्षात कोण घेतो? पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

पण लक्षात कोण घेतो?

दसरा दिवाळी हॊऊन दोन महिने तरी सहज उलटून गेले होते. अशा एक दिवशीच्या दुपारची ही गोष्ट! जवळच्याच एका बॅंकेत माझे थोडे काम होते. म्हणून मी गेले होते. ते व्हायला जरा वेळ होता म्हणून तिथलीच एक खुर्ची घेऊन मी तिच्यावर जरा टेकले. इकडे तिकडे पाहत असताना माझे लक्ष सहज समोरच्या भिंतीवर लावलेल्या लक्ष्मीच्या सुंदर चित्राकडे गेले. त्याला एक हार घातला होता. पण तो घालून खूपच दिवस झाले असावेत, कारण त्या हाराची फुले वाळून कोळ झाली होती. ते पाहून माझे मन अस्वस्थ झाले.

‘असाच’ अनुभव एका प्रसिद्ध शाळेत मी व्याख्यानाला गेले होते तेव्हा मला आला. व्याख्यान ज्या हॉलमध्ये होते, तिथे सरस्वतीचे एक सुबक चित्र होते. त्या चित्राला घातलेल्या हाराची लक्तरे, वाळून, सुकून अशीच लोंबत होती. लहानमोठ्या शहरातल्या देशभक्तांच्या, कलावंतांच्या पुतळ्यांना घातलेल्या हारांच्या नशिबी हेच लिहिलेले आपण नेहमी पाहतो. अशा वेळी माझ्या मनात येते,  "लक्ष्मी काय नि सरस्वती काय त्यांची आपण पूजा करतो ते त्यांना देवता मानून. त्यापाठीमागे श्रद्धा असते, भक्तिभाव असतो. म्हणूनच त्यांना घातलेल्या हारांचे निर्माल्य झाल्यावर दुसर्‍या दिवशी ते हार स्मरणपूर्वक काढून टाकायला नकोत का? दिवसेंदिवस वाळलेल्या हारात त्यांना गाडून टाकण्याने त्यांच्याबद्दलच्या भावनांचे पावित्र्य कसे राखले जाणार? या गोष्टी नेहमीच्याच आहेत, पण लक्षात कोण घेतो?"

जीवनाच्या सर्व व्यवहारात याचेच प्रतिबिंब दिसते. प्रतिवर्षी शाळा, महाविद्यालये यांची स्नेहसंमेलने थाटात आणि दणक्यात साजरी होत असतात. पण त्या वेळी समारंभाला शोभा आणण्यासाठी लावलेल्या पताका समारंभ होऊन गेल्यावर कित्येक दिवस फाटून चिंध्या झालेल्या स्थितीत फडफडतच राहतात. आपल्या संस्थेच्या आवाराची शोभा त्यामुळे किती उणावते इकडे कोणाचेच लक्ष कसे जात नाही? सणावाराला गृहिणी फुलांचे तोरण घराला बांधतात, ते तरी कितीजणी वेळेवर काढून टाकतात? वस्तूंचा आपण कसा उपयोग करतो, त्यातूनही आपली सौंदर्यदृष्टी, रसिकता, संस्कारही प्रकट होत असतात. हे काय सांगायला हवे? पण पुन्हा तेच, गोष्टी नेहमीच्याच पण लक्षात कोण घेतो?

मी व्यवसायाने प्राध्यापिका! स्वाभाविकच पुस्तक हेच माझे अत्यंत प्रिय व खरे असे धन आहे, असे मला वाटते. म्हणून परोपरीचे प्रयत्न करून, प्रसंगी त्याच्या अफाट किमतीकडे दुर्लक्ष करूनही मी पुस्तके विकत घेऊन वाचते आणि आमच्या समाजात फुकट्या वाचकांना तर मुळीच तोटा नसतो. अशापैकीच एकाने मला गाठले. "श्रीमान योगी परवा तुमच्या हातात पाहिले. मला द्याल का वाचायला? आठ दिवसात परत करतो. अगदी काळजी करू नका तुम्ही." तो मला म्हणाला. तो होता माझ्या एका ओळखीच्या डॉक्टरांचा कंपौंडर. त्याला ‘हो देते.’ म्हणावे तरी पंचाईत, ‘नाही देत’ म्हणावे तरी संकोच! एकदा पुस्तक आपल्या कपाटातून बाहेर गेले, की ते कधी, कसे आपल्य़ा घरी परतेल, की परतणारच नाही, अशा अनेक विचारांनी मी थोडा वेळ गप्पच बसले. त्या पुस्तकाचे दोन्ही खंड त्यांच्या लेखकाने मला भाऊबीजेला भेट दिले होते. स्वाभाविकच त्या पुस्तकात माझ्या भावना गुंतलेल्या होत्या. पण हे सारे त्याला सांगून काय उपयोग होता? तो पुन्हा म्हणाला, "मी शिवरायांना माझे सर्वात थोर गुरु मानतो. मग त्यांच्याबद्दलचे पुस्तक वाचणे माझे कर्तव्यच नव्हे का? सांगा बरे?" त्याने मलाच असे कोड्यात टाकले. जाऊ दे झाले, तो तरी विकत घेऊन कसा वाचणार बिचारा अशा विचाराने माझी विकेट पडली. मी पुस्तक दिले खरे पण जवळजवळ वर्ष होत आले तरी पुस्तकाचा पत्ताच नाही. मधल्या काळात तो इथली नोकरी सोडून परगावी गेलेला! पण महत्प्रयासाने मी त्याचा पत्ता मिळविला नि त्याला पत्र टाकले. त्याचे उत्तर बार्शी लाईट रेल्वेच्या वेगाने त्याने मला साऽऽवकाश धाडले. पत्रात त्याने लिहिले, "बाई, आमच्या दवाखान्याजवळच्या केमिस्टच्या दुकानात ते पुस्तक मी ठेवून जातो आणि केमिस्टला सांगितले ते पुस्तक तुम्हाला दे म्हणून त्याला झाले सहा महिने तरी. तुम्हीच त्याला विचारा." आहे की नाही न्याय? त्याने केलेली आज्ञार्थी वाक्यरचना वाचून तर माझे मस्तकच तापले. पण करते काय? पुस्तकाने प्रथम तो केमिस्ट, नंतर त्याची पत्नी, मग तिच्या सख्या-पार्वत्या असा प्रवास सहा महिने केला. ते माझ्या हाती आले तेव्हा त्याचे कव्हर बेपत्ता, काही पाने गहाळ झालेली तर काही विस्कळित झालेली! शिवाय पानापानांवर रंगीत पेन-पेन्सिलींनी ‘छान’, सुरेख असे अभिप्राय दिलेले! मला त्या पुस्तकाची बिचार्‍याची दया आली!

हाच अनुभव प्रवासात, मग तो रेल्वेचा असो की बसचा, नेहमी येतो. आपण वर्तमानपत्र वाचायला उघडले की आपल्या डाव्या उजव्या बाजूंनी त्याचे वाचन करणारे भेटतातच. पण पाठीमागचा मजकूरही माना वेळावून वाचणारे गाठ पडतात. आपल्या कधी कळत पण बहुतेक वेळा नकळतच ते वर्तमानपत्र या प्रवाशाच्या हातून त्या प्रवाशाकडे फिरत राहते. आपण स्टेशन आले की उतरायचे म्हणून मागायला जावे तर कुणीतरी महाभागाने त्यावर मुली-नातीला-नातवाला पोळी-बटाटेभाजी खायला घालून त्याला चांगले रंगीबेरंगी केलेले असते! या वागण्याला काय म्हणावे? दुसर्‍याची वस्तू आधी मागू नये पण प्रसंगी मागितलीच तर ती वेळेवर परत करावी, हा साधा शिष्टाचार आहे. गोष्ट नेहमीचीच पण लक्षात कोण घेतो?

मी स्वतःचा बंगला बांधला तेव्हा स्मरणपूर्वक एक पाटी तयार करून घेऊन फाटकावर लावली. "कृपा करून येता-जाता फाटक लावून घ्यावे. फार आभार." पण कायमचा अनुभव हा की भाजीवाली बाई आपलेच घार समजून फाटक सताड उघडे टाकून "हवीय का बाय भाऽजी’ करत घरात येते. बर्‍याच वेळा तिच्या पोरांचे लटांबरही आईच्या पायावर पाय टाकून गृहप्रवेश करते. मग भाजीवालीची शेळी तरी कशी मागे राहील? ती शांत मनाने आत येते. तिला हव्या त्या झाडांची पाने ओरबाडून खाते आणि सगळ्या बागेचा बट्ट्याबोळ करून टाकते. शेळीला बोलता येत नाही, भाजीवलीला बोलून उपयोग भाजीवाली तर मी म्हणते एक अशिक्षित बाई! पण सुशिक्षित समजल्या जाणार्‍या बायकांचा व्याप तरी काय कमी असतो म्हणता का? दुपारी विश्रांतीसाठी जरा आडवे व्हावे, की "हा साबण बघितलात का हो वापरून?" नाहीतर "हे झुरळांवरचे औषध फार गुणकारी आहे हो, एकदा घ्या ना" म्हणून गळ घालणारी विक्रेती फाटक सताड उघडे टाकून हजर! किंवा "मी उडदाचे नि बटाट्याचे पापड विकते" असे काहीतरी घेऊन डोके उठवणारी बाई फाटकावर तोच प्रयोग करते. एकूण माझे घर म्हणजे "आव जाव घर तुम्हारा" असे बनते. त्यातच  "पण तुम्ही काही म्हणा हो मालतीबाई, तुमच्या घरचा कढीलिंब फारच छान आहे" म्हणून हक्काने तोडून नेणार्‍या किंवा "पणजीबाईंचे श्राद्ध आहे केळीची पाने नेते जरा" म्हणणार्‍या भगिनींची भर घाला म्हणजे फाटकाचे रामायण पुरे होईल!

जे फाटकाचे तेच टेलिफोनचे! एके दिवशी एक प्रौढ जोडपे रात्री दहाच्या सुमारास माझ्या घरी आले. त्यांचे नाव, आडनाव मला ऎकूनच माहिती होते. त्यांचे घर माझ्या घरापासून फर्लांग, दोन फर्लांग अंतरावर होते. आल्यावर त्यांनी मला विचारले, "नांदेडला जरा फोन करायचाय, करू ना?" मला वाटले त्यांचे कोणी आप्त वगैरे आजारी असतील म्हणून करायची असेल त्यांना चौकशी! म्हणून मी म्हटले, "करा ना." फोन बुक करून तास दीड तास झाला फोनचा कॉल नाही. अखेरीस जोडपे कंटाळून म्हणाले, "आम्ही जातो आता. फोन आला तर तेवढा तुम्ही घ्या. (पुन्हा आज्ञार्थच!) अन्‌ आमच्या ‘वैशाली’ला विचारा छबीच्या तिसरीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल लागला क? छबी म्हणजे आमची आठ वर्षाची नात हो, आम्हाला तिचा फार लळा म्हणून आलो होतो फोन करायला." असे म्हणून ते मेहूण अंतर्धान पावले. मी कपाळावर हात मारून घेतला. फोनचा रिसिव्हर काढून ठेवला बाजूला आणि झोपून टाकले. कुणाची कोण छबी की बेबी मी काळी की गोरी पाहिली नाही अन्‌ तिच्या परीक्षेसाठी मला शिक्षा! या व्यवहाराला काय म्हणणार? अशा गोष्टी नित्याच्याच, पण लक्षात कोण घेतो?

याच प्रकारच्या इतिहासाची आणखी एक आवृत्ती झाली, त्याची हकीकत सांगते तुम्हाला. परीक्षेच्या काही कामासाठी मी निघाले होते. औरंगाबादला. संध्याकाळी सामानाच्या बांधाबांधीच्या गर्दीत मी होते तो साधारण ओळखीच्या ‘सावित्रीबाई’ दरवाजात दत्त म्हणून हजर. "मालूताई, अहो, तुमची आणि आमची मोलकरीण एकच आहे ना, तिच्याकडून कळले तुम्ही आज औरंगाबादला जाणार आहात म्हणून. आमची ‘अनुजा’ तिथेच असते. तिला एवढा लाडवाचा डबा पोहोचता कराल का? (निदान वाक्यरचना विनंतीवजा हे तरी नशिबच म्हणायचे) "सकाळीच येणार होते विचारायला तुम्हाला पण आमचे ‘हे’ जायचे होते आज सातार्‍याला त्यांची जरा गडबड होती आणि म्हटले, मालूताई काय ओळखीच्या आहेतच. अनायासे जाताहेत औरंगाबादला, द्यावे झाले डबा!" आता काय बोलायचे वाचकहो, तुम्हीच सांगा. माझ्या बॅगेत जागा नव्हती म्हणून एक पिशवी घेऊन डबा त्यात घातला. आणखी एक जादा डाग सांभाळून नेण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. तिथे गेल्यावर दोन दिवस मला सवडच झाली नाही. तिसर्‍या दिवशी वेळ काढून रिक्षावाल्याच्या हातावर दहा-बारा रुपयांचे उदक सोडून ते ‘अनुजा-प्रिय’ लाडू पोहोचवले एकदाचे! यातच "एवढा निरोप समोरच्या दुकानदारांना ते आल्यावर सांगा हो." "एवढे पत्र पोस्टात टाका हो." असली किरकोळ आख्याने भरीला घाला म्हणजे झाले! दुसर्‍याचा वेळ, कष्ट, पैसा कशाचाच विचार नाही याला काय नाव द्यायचे? रोजचेच पण लक्षात कोण घेतो?

या संस्कार पुराणातला एक अनुभव येतो तो तर ‘सबसे जादा’!! तो म्हणजे निवडणूकीच्या काळातला! निवडणूक गावच्या सरपंचाची असो, की पार्लमेंटच्या खासदारकीसाठी तळमळणार्‍या उमेदवाराची असो. त्या निवडणुकांचा हमामा, गदारोळ सर्ववेळी सारखाच असतो! रिक्षा, जीप, सायकल, बैलगाडी जे वाहन मिळेल त्यातून कर्कश आवाजात, लाऊडस्पीकरवरून चालणारा त्या उमेदवारांचा अखंड प्रचारही भयानक रसाची उत्तम उदाहरणे होत. ती आता आपल्याला तोंडपाठ ( डोळे किंवा कानपाठ म्हणावे हवे तर!) झालेली आहेत. उभा राहणारा उमेदवार ‘बहिरे’ असो की ‘बेहेरे’ असो, ‘धडपडे’ असो की ‘घोरपडे’ असो, आडनावात काय आहे? अखंड ओरडा एकच "xxx यांनाच मते द्या, यांनाच मते द्या." या कर्णकटू कोलाहलाने कानाचे पडदे फाटून जातात. पण मतदारांची दया कोणाला?

बरे नुसते कानावरच निभावते तर गोष्ट वेगळी! पण आपल्या घराच्या भिंती, अंगण स्वतःच्या खर्चाने, कष्टांनी धुवाव्या लागतात ती आणखी एक ब्याद! भिंतीवर कुणचा ‘चंद्र’ तर कुणचा ‘सूर्य’, कोणाचे घड्याळ तर कुणाची सायकल अशी नानाविध चित्रे एकाच वेळी गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्यावरच्या मजकुरात ‘दिपक’, ‘सुशिला’ अशाप्रकारे लिहून शुद्धलेखनाचे किती खून पाडलेले असतात ते वेगळेच! निवडणुकांच्या काळात लोकांची घरे, भिंती, रस्ते रंगवून त्यावर जाहिराती चिकटवून ती घाणेरडी करण्याचा अधिकार हे उमेदवार कोठून मिळवतात? बरे रंगवलीच घरे भिंती तर ती स्वच्छ करायला नकोत? त्याचा जाच घरमालकांना काय म्हणून? पण घसा फोडून सांगितले तरी ते निष्फळच ठरणार. कारण रोजच्या व्यवहारातल्या अशा साध्या साध्या गोष्टीतूनच  प्रत्येक माणसाची संस्कृती, अभिरुची, स्वभाववृत्ती या गोष्टी कळत असतात. त्याची माणूस म्हणून उंची ठरत असते. याची जाणीव कुणाला असेल तर ना? म्हणून म्हणते गोष्टी नेहमीच्याच, पण लक्षात कोण घेतो?

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color