स्वागतकक्ष arrow मराठी पुस्तके arrow मधुघट arrow पुष्कळ अजुनि उणा प्रभो मी
पुष्कळ अजुनि उणा प्रभो मी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

पुष्कळ अजुनि उणा प्रभो मी

एखादा दिवस असा उजाडतो की माझ्या मनाच्या तळाशी दीर्घ काळ वसति करून राहिलेला एकादा विचार माझी पाठ म्हणून सोडत नाही. आणि मग त्या विचाराच्या भोवर्‍यात भिरभिरून मन अगदी थकून जाते. त्या दिवशी असंच झालं --

मी प्राथमिक शाळेत शिकत असताना तर्‍हेतर्‍हेचे सुंदर खेळ अतिशय हौशीने आम्हाला शिकवणार्‍या माझ्या आवडत्या बाई दुर्धर अशा एका व्याधीने एकाएकी फार आजारी झाल्या होत्या. त्या दुःखद बातमीने माझा जीव एकदम गलबलून गेला. बाईंची आठवण मनात येताच डोळ्यापुढे उभी राहिली ती त्यांची ठेंगणी ठुसकी देखणी मूर्ति! सदैव प्रसन्नतेचा नि आरोग्याचा साज ल्यालेली. त्यांच्य रुंद कपाळावरचे नाजूक हिरवे गोंदवण त्यांना फार शोभून दिसत असे. सोन्याच्या बांगड्यांबरोबर त्या काचेच्या बांगड्या घालीत त्यामुळे मंजुळ किणकिण करणारे त्यांचे गोरेपान हात, त्यांच्या पातळ ओठावर सदैव उमललेले हास्याचे सूर्यफूल आणि कधीही इस्त्री न मोडलेला त्यांचा डोकीवरचा पदर, ही सारी जणू त्यांच्या हिरव्यागार मनाचीच बोलकी रूपे होती. शिकवण्यात त्यांचा हातखंडाच होता. लेझीम खेळताना त्या अशा भिंगरीसारख्या फिरायच्या की आम्ही त्यांचे मनोहारी रूप पाहतच बसायचो! त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वाने त्यांनी आमची मने केव्हाच जिंकली होती!

अशा माझ्या या बाई! त्यांना भेटायला मी हॉस्पिटलकडे निघाले होते. विलक्षण अधीर आणि कातर मनाने! त्यांच्या खोलीत जाताच माझ्या हातातली ताजी फुले त्यांच्या सुकलेल्या कृश हातावर मी अलगद ठेवली. एखाद्या लहानग्याला थोपटावे तसे त्यांना थोपटले आणि हळुवारपणे विचारले, "बाई, कसं वाटतंय आज? कालच्यापेक्षा बरं आहे ना? लवकर बर्‍या व्हा हं बाई तुम्ही." मला आणखीही कितीतरी त्यांच्याशी बोलायचे होते. पण तोंडातून शब्दच उमटेनात चटकन्‌! म्हणून मी नुसताच आवंढा गिळला. बाईंच्या चाणाक्ष नजरेने ते तेव्हाच जाणले. आपल्या असह्य यातना लपवीत तशा अवघड रुग्णावस्थेतही त्या माझ्याकडे पाहून क्षणभर हसल्या आणि म्हणाल्या, "होईन हो बेटा, मी लवकर बरी! पण तू गं किती घाबरून गेली आहेस वेडाबाई अं? अगं वयापरत्वे माणसाला काहीतरी दुखणे यायचेच ना, त्याला घाबरून कसे चालेल?" आणि माझ्या पाणावलेल्या डोळ्यात क्षणभर आपली दृष्टी त्यांनी मिळवली. आपला वत्सल हात माझ्या पाठीवरून फिरवला आणि जणू मलाच धीर दिला.

थोडा वेळ बसून मी परत निघाले. तेव्हा मात्र त्यांचे डोळे एकदम भरुन आले. आपला डावा हात त्यांनी नुसता हलवला. आणि मानेनेच मला निरोप दिला. हॉस्पिटलच्या पायर्‍या उतरताना तोच तोच एक विचार माझे मन व्याकुळ करीत होता. माझ्या मनात येत होते, बालपणापासून आपल्यावर खूप माया करणार्‍या आपल्या बाई गंभीर दुखण्याच्या दाट छायेत वावरताहेत आणि त्यांच्यावर मनापासून भक्ती करणारी मी त्यांना केवळ पाहात बसले आहे ना? अगदी अगतिकपणे, असहायपणे! त्यांच्या मानसिक वा शारीरिक कसल्याच यातना क्षणभर तरी मला कमी करता येताहेत का? काय उपयोग आहे मग माझ्या भक्तीचा? आदराचा?

विचाराच्या पाठशिवणीने माझे डोळे दाटले. बाईंचे चित्र क्षणभर त्या अश्रूंनी पुसट झाले. तिथे दिसू लागले माझ्या देखण्या, सुदृढ, निष्कपट, भाबड्या, आणि येणार्‍याजाणार्‍याला भरबरून खाऊपिऊ घालण्यात सर्वोच्च सुख मानणार्‍या, माझ्या आईचे चित्र! तिथे तरळू लागले माझ्यावर मुली-नातीची माया सर्वकाळ ओतणार्‍या, माझ्या वृद्ध हितचिंतक देवमाणसाचे ‘बापू’चे चित्र! त्यांच्या आयुष्यातील अखेरचा काळ आणि त्यावेळी त्यांनी सोसलेल्या विलक्षण यातना! हे सारे सारे जसे मला आठवले तसेच अगदी अलिकडेच पुनर्जन्म लाभलेल्या माझ्या एका प्रिय मित्राच्या दुखण्याचीही मला तीव्रतेने आठवण झाली. त्याची सेवा करणे तर राहोच पण साधी दृष्टिभेटही मला त्या काळात झाली नाही. या सार्‍या वेळी माझ्या मनाची अशीच विलक्षण तळमळ झाली होती. या आपल्या सार्‍या प्रिय जनांचे दुःख केवळ पाहातच बसणे आपल्या हाती राहावे, त्या दुःखपरिहाराचा कसलाही समाधानकारक पर्याय आपल्याला सापडू नये, या जाणिवेने माझे मन आतल्या आत स्फुंदू लागले. या दुःखनिवारणाबाबतच्या माझ्या असमर्थतेने पिचू लागले. मी स्वतःशीच म्हटले, "विज्ञानाने ज्ञानाची अनेक कवाडे खुली केली. अवाढव्य जग जवळ आणले. अनेक व्याधींवर रामबाण औषधे शोधली, पण आपल्या जिवलगांच्या वाट्याला येणारे लहान मोठे कोणतेच दुःख फार फार इच्छा असूनही आपल्याला कमी करता येत नाही. त्यावेळी आपल्या मनाला ज्या यातना होतात, आपल्या अपुरेपणाच्या त्या दुःखावर कोणते औषध शोधले आहे त्याने? " आणि मग मला एकदम आठवला तो रेव्हरंड टिळकांच्या कवितेतला अन्य संदर्भातला पण एक मार्मिक अर्थपूर्ण चरण. ‘पुष्कळ अजुनि उणा प्रभो मी पुष्कळ अजुनि उणा’ आपल्या शक्तीच्या मर्यादांचे केवढे अचूक चित्रण त्यातून घडते नाही का?

केवळ प्रीतीतल्या माणसाबाबतच हे मला जाणवते असे नाही. एरवीही कदाचित अशी घटना घडते की त्यावेळीही माझे मन याच विचाराने फार व्यथित होते. अगदी खरंच होते! आऊचा काऊ असे आमचे एक दूरचे आप्त होते! भरपूर पैसा आणि दांडगी शरीरसंपत्ति याच्या बळावर सर्वार्थाने फुगलेले. पुरुष माणसाला शक्य असलेले सर्व शौक, या शक्तीच्या बळावर त्यांनी आयुष्यभर निलाजरेपणे आणि यथेच्छ केले. यथाकाल यमदूत त्यांच्या दिशेने वाटचाल करू लागले. फार झपाट्याने. त्यांच्या एका नातेवाइकानेच मला हे सांगितले आणि तो म्हणाला, "भेटून यावे म्हणतो एकदा. तुम्हीही याल का माझ्याबरोबर?" मला वाटले पिकले पान आहे. विसरून जाऊ या त्याचे प्रमाद. म्हणूनच मी केवळ गेले. घरात गेले तो काय! दिवसभर जिथे श्रीमंत खुशालचेंडूंची वर्दळ त्याच्याभोवती नेहमी असायची तिथे आता एक कृश दाईवजा बाईखेरीज कोणीही नव्हते. आम्हाला पाहताच त्याच्या अस्थिपंजर चेहर्‍यावर एक ओशाळे म्लान हसू उमटले. बराच वेळ ते आमच्याकडे नुसते पाहतच होते. अखेर कष्टाने त्यांच्या तोंडून बोबडे बोबडे शब्द आले, " मालूताई, सारा जन्म पापाच्या खाईत नरकात लोळलो गं. पण बरा होण्याची संधी देवानं दिली तर मी नाही गं पुन्हा असा करायचा. नाही मला एवढ्यात जावेसे वाटत. होईन का गं मी बरा?" आणि त्यांनी कुठल्याशा दिशेकडे पाहून हात जोडले. त्यांचे ते केविलवाणे उद्‌गार आणि ती नमस्काराची कृति माझ्या काळजाला जाऊन भिडली. त्यांची मला त्या क्षणी फार फार दया आली. कारण मरणोन्मुख माणसाच्या जिभेवर केवळ सत्यच नांदते. आणि पश्चात्तापाच्या निर्मळ अश्रूंनी धुतले जात नाही असे पाप जगात नसते अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे एरवी ज्याच्या मृत्यूची वार्ता ऎकून मी म्हटले असते, "बरं झालं तो दैत्य आटोपला ते!"त्याच्याबद्दल त्या क्षणी मला प्रांजलपणे वाटलं, " जगू दे बिचारा. याचे काही दुःख मला कमी करता येईल का? कसे येईल?"

पण इथे देखील माझी शक्ति अपुरीच ठरली. चारच दिवसात त्या बापड्याने परलोकी प्रयाण केले! मग पुन्हा एकदा तोच विचार तोच चरण माझ्या मनात रिंगण घालू लागला- ‘पुष्कळ अजुनि उणा प्रभो मी पुष्कळ अजुनि उणा!’      

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color