माझे बालपण पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

माझे बालपण
माझ्या बालमित्रमैत्रिणींनो,

अनेकोत्तम आशीर्वाद. तुमच्या ‘चिन्मय बाल-विश्व’ त्रैमासिकाच्या गुणी संपादिका सौ. मीनाक्षीताई यांनी मला एक दिवस विचारले, "बाई, आमच्या वाचकांसाठी तुमच्या बालपणीच्या काही आठवणी सांगाल का?" मी म्हटले, "जरूर सांगेन" कारण तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणींशी बोलण्याची संधी कोण गमावील बरे?

माझी पहिली आठवण आहे ना, ती माझ्या हिंगण्याच्या शाळेतली. तिथल्या बोर्डिंगमध्येच मी राहत असे. त्या शाळेचे संस्थापक होते गुरुवर्य आण्णासाहेब कर्वे, एक थोर समाजसेवक!
कोणत्याही बोर्डिंगात राहायचे म्हणजे काही नियम पाळायलाच लागतात. आमच्याकडे एक नियम असा होता की जेवताना पानात काही टाकयचे नाही. आपल्याला एखादा पदार्थ आवडला नाही तर तो परत घ्यायचा नाही पण पहिला वाढलेला खाल्लाच पाहिजे. एक दिवस लाल भोपळ्याची भाजी केली होती. तिच्यात खूप पाणी होते. ती गिळगिळीत भाजी काही केल्या माझ्या घशाखाली उतरेना. म्हनून मी दिली ती पानात टाकून आणि लगबगीने ताटवाटी घासायला घेऊन गेले नळावर! नळाजवळ एक पातेले असायचे मिरच्या, लिंबाच्या साली असले सटरफटर पदार्थ टाकायला. त्यात मी ती भाजी टाकणार एवढ्यात माझ्या मानेला जोरदार हिसका बसला म्हणून मी मागे वळून बघते, तर बोर्डिंगच्या मोठ्या बाई ‘आक्का’ पाठीशी उभ्या! मांजराचे लहानसे पिल्लू आपण त्याची मान पकडून त्याला उभे धरतो ना, तशी त्यांनी माझी मान धरली होती. त्यांनी विचारले, "माले, पानात भाजी का टाकलीस तू?" मी म्हटले, "शीः किती विसविशीत आणि गिळगिळीत आहे ती! मला नाही आवडत असली भाजी! माझी आई किती छान करते ही भाजी" त्यावर काहीही न बोलता त्यांनी माझ्या बखोट्याला धरले आणि बळजबरीने मला पुन्हा पंक्तीत आणून बसवले. अस्मादिकांचा पारा अर्थातच चढला. तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी विचारले, "हं, काय हवे आहे तुला भाजीबरोबर? भात की भाकरी? सांग लवकर आणि चटदिशी भाजी खाऊन टाक बघू, शाळेला उशीर होतोय"- पण तरीही मी गप्पच! आता त्या माझ्या पानापुढं चक्क फतकल मारून बसल्या तेव्हाचा माझा अवतार काय वर्णावा? राग, अपमान, भीती अशा संमिश्र भावनांनी मनात गर्दी केल्यामुळे डोळ्यातून, नाकातून पाणी येतंय, रडून डोळे लाल झाले आहेत, कपाळावर आठ्यांनी एकच गर्दी केली आहे आणि एकदा डाव्या हाताने शर्टाला तर तर एकदा हाफ पॅंटला (त्यावेळी मी हाच पोशाख घालीत असे) मी डोळ्यातले पाणी पुसते आहे. पुढच्या मागच्या पंक्तीत जेवणार्‍या मुली कोणी कुतूहलाने तर कुणी ‘बरं झालं चांगली फजिती झाली ते’ अशा भावनेने माझ्याकडे बघताहेत, तोंड लपवून हसताहेत आणि ‘आक्का’ तर पानापुढून उठतच नाही आहेत. त्यांनी काही वेळ वाट पाहिली आणि त्या म्हणाल्या, "हे बघ तू ही भाजी खाल्ल्याशिवाय मी काही आज जेवणार नाही." हा तर मोठाच बॉंब होता. तेव्हा मात्र रडतखडत ती भाजी मी एकदाची तोंडात कोंबली. आणि श्वासही खाली न टाकता वरती घटाघटा पाणी पिऊन ताटवाटी उचलून तरातरा चालू लागले. बालवाचकांनो, या गोष्टीला आता पन्नासपेक्षा अधिक वर्षे होऊन गेली पण पुन्हा म्हणून मी पानात कधी काही टाकले नाही. अगदी खानावळीत जेवण्याचा प्रवासात प्रसंग आला तरी! इतका तो धडा माझ्या मनात पक्का ठसला. तसेच  तुम्हाला हेही सांगते की मला भाताची खरपुडी आणि कढी आवडते हे ‘आक्कां’च्या कायम लक्षात असायचे. ती मला त्या आग्रहाने खाऊ घालायच्या! एकाच नाण्याची ही दोन अविस्मरणीय अंगे आहेत, होय ना? 

एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनात माझी मोठीच फजिती झाली. एका नाट्यप्रवेशात मला ‘संत तुकारामां’ची पत्नी ‘जिजाबाई’ हिची भूमिका करायची होती. त्यासाठी नऊवारी लुगडे, चोळी, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, हातात काचेच्या बांगड्या, केसांचा घट्ट खोपा असा जामानिमा करून हातात मुसळ घेऊन मी स्टेजवर प्रवेश केला कारण पहिलेच वाक्य मला म्हणायचे होते ते "कोण मेला माझ्या नवर्‍याला शिव्या देतो, घालू का हे मुसळ टाळक्यात" असे होते. मी ते वाक्य ठसक्यात म्हटल्यावर प्रेक्षकात एकच हंशा व टाळ्यांचा कल्लोळ उडला. स्वाभाविकच मला थोडी ‘ग’ ची बाधा झाली. पुढचा प्रवेश एका ऎतिहासिक नाटकातला-म्हणजे अगदीच वेगळा होता. त्यात मी राजा झाले होते. म्हणून रेशमी अंगरखा, सुरवार इत्यादी कपडे मोत्याचे खूप अलंकार, कमरेला रेशमी शेला, पायात जरीची पादत्राणे इत्यादी घालून म्यानातली तलवार काढत काढत काढत मी भाषण करू लागले, "मर्दांनो, लढा लढा. म्हणा हरहर महादेऽऽव" या सगळ्या वीरश्रीच्या भाषणात माझ्या डोक्यावरचा रेशमी रुमाल खाली केव्हा पडला आणि पूर्वीच्या प्रवेशातला माझा केसांचा खोपा उघडा कसा झाला ते मला कळलेच नाही. पण प्रेक्षक मात्र ओरडू लागले, "राजाला खोपा आला, राजाचा खोपा पहा" तेव्हा - - मात्र मी गेले पार घाबरून नि गडबडून! तेव्हा बाईंनी स्टेजवरचा पडदा टाकला आणि मला नीटनेटका पोशाख चढवून पुन्हा प्रवेश पुढे चालू करावयाला सांगितले. मी लागले बाई मुळुमुळू रडायला. तेव्हा बाई म्हणाल्या, "आत्ता असं घाबरून तू रडत बसलीस तर पुन्हा कधी स्टेजवर जाणे तुला शक्य होणार नाही. तेव्हा निर्भय मनाने आणि आत्मविश्वास धरून चल बघू पुढे" आणि शिट्टी वाजवून त्यांनी पडदा उघडला देखील! पुढे प्रवेश रंगला आणि काम फत्ते झाले. नंतर मी नाटकात खूपदा कामे केली या सगळ्या यशाचे श्रेय बाईंनी त्यावेळी जागृत केलेल्या आत्मविश्वासालाच आहे. जवाहरलालजी म्हणतात, "यश निर्भय माणसांनाच मिळते, भित्र्यांना नाही."

आमच्या शाळेच्या मदतीसाठी दिवाळीच्या सुट्टीत घरोघरी जाऊन आम्ही मुली भाऊबीज फंड गोळा करीत असू. या कामात भलेबुरे असे वेगवेगळे अनुभव आम्हाला येत. अनेक श्रीमंत लोक आम्ही मुली कशासाठी आलो, आमची संस्था गरिबांसाठी आणखी काय काय कामे करते अशी कसलीही चौकशी न करता दरवाजातूनच आम्हाला हाकलून लावत. कधी याच्या अगदी उलटा अनुभव अनपेक्षितपणे येई. दोन पिढ्या आमच्या घरी काम करणारा म्हातारा नोकर ‘दशरथ’ एक दिवस मला म्हणाला, "व्हय गं मालनबाई, कशापायी उन्हातान्हातून ती कसलीशी लांबडी बुके घेऊन रोज फिरायला लागली आहेस गं तू सुट्टीत आराम करायचा सोडून?" त्यावर ती पावतीपुस्तके आहेत व आम्ही अशा अशा कामासाठी ती वापरतो म्हणून मी त्याला सगळे समजावून सांगितल्यावर मनाच्या उमाळ्याने तो म्हणाला, "गरिबांच्या मदतीसाठी हाय होय हे समदं काम, लई बेस काम हाय. त्या कामाला ह्यो घे माझा गरिबाचा रुपया" म्हणून लगेच आपल्या कनवटीचा रुपया काढून त्याने माझ्या हातावर ठेवला. मी छनछन वाजणार्‍या त्या रुपयाची त्याला पावती दिली. त्यावेळी माझे डोळे पाणावले होते. माझ्या मनात आले, पैशाने श्रीमंत असणारा मनाने श्रीमंत असतोच असे नाही. उलट स्वतः दरिद्री असणारा आमचा ‘दशरथ’ त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने खरा श्रीमंत आहे. दुःखी माणसाला दुःखितांचे दुःख लगेच कळते ते हे असे!

आमच्या बोर्डिंगला लागूनच आमची शाळा होती आणि जवळच शिक्षकांची चाळ होती. आमचे ‘तात्या’ - म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक व श्रेष्ठ तत्त्वज्ञ वामन मल्हार जोशी - त्या चाळीतच राहत. मी असेन मराठी पहिली दुसरीत तेव्हाची ही एक आठवण! शाळा सुटली की आम्ही मैदानावर खेळायला जायचो. तात्यांना लहान मुलांची फार आवड. त्यामुळे तेही कधी कधी संध्याकाळी आमच्यात खेळायला यायचे. तात्यांनी आम्हाला एक खेळ शिकवला होता. त्याचे नाव होते ‘गांधी म्हणतात.’ म्हणजे काय तर "गांधी म्हणतात पळा, उड्या मारा" असे म्हटले तरच पळायचे, किंवा उड्या मारायच्या, नाही तर नाही. त्याप्रमाणे आम्ही खेळायचो. खूऽऽप मजा यायची! अंधार पडला की खेळ थांबवून जाताना अम्ही मुली तात्यांना म्हणायचो, "तात्या, एवढे एवढे काय?" ते म्हणायचे ‘वांगे.’ आम्ही विचारायचे ‘त्याला काय?’ तात्या उत्तर द्यायचे ‘देठ!’ मग आपले पडके दात दाखवीत खळखळून हसत आम्ही त्यांना  सांगायचो, "बरे! तर तुमची आमची उद्या संध्याकाळी मैदानावर भेट!" मग तेही मनापासून हसायचे. भारी प्रेमळ होते आमचे तात्या! पुढे आम्ही मोठे झालो. शाळा, कॉलेजात गेलो तेव्हा तात्यांनी देशासाठी सोसलेला तुरुंगवास, लिहिलेली उत्तम उत्तम पुस्तके, त्यातून व्यक्त झालेले उदात्त आणि उदार विचार, तात्यांना समाजात असलेला मोठा मान याचे महत्त्व आम्हाला कळले. आज मनात येते, "किती वेड्यासारखे वागलो आपण! किती त्रास दिला तात्यांना! ते सर्वच दृष्टींनी थोर होते. पण त्यावेळी त्याची पुसटशी सुद्धा जाणीव त्यांनी आम्हाला करुन दिली नाही. मित्रमैत्रिणींनो, खरा त्यागी, ज्ञानी, देशभक्त, थोर माणूसच फक्त असा निगर्वी आणि साधासुधा असतो आणि तोच फक्त समुद्रातल्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला जीवनभर प्रकाश देतो, रस्ता दाखवतो.

एकदा आमच्या शाळेला त्यावेळचे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर, लॉर्ड ब्रेबॉर्न सहकुटुंब भेट द्यायला येणार होते. मला वाटते ते एकोणीसशे छत्तीस-सदतीस साल असावे. पण पुण्याहून हिंगण्याला येण्याचा रस्ता म्हणजे काय विचारता? अतिशय खाचखळग्यांचा, वेडावाकडा आणि अस्वच्छ! म्हणून आमच्या गुरुजनांनी ठरवले की, आपणच श्रमदानाने रस्ता तयार करायचा! मग आम्ही लहान मुलीही त्यात सामील झालो. कुणी घमेल्यात दगड, माती भरी तर कुणी घमेले योग्य जागी नेऊन ठेवी. असे आपल्याला झेपेल ते काम करण्यात आम्ही रमून गेलो. आमच्याबरोबर भास्करकाका व सौ. कावेरी मावशी (ही गुरुवर्य अण्णासाहेबांची मुलगा व सून) ही मंडळीही असायची! भरपूर राबायची. विद्यार्थिनींचे कौतुक करायला तीर्थरूप अण्णाही अधूनमधून यायचे. हां-हां म्हणता रस्ता तयार झाला. तेव्हाचा आमचा आनंद काय वर्णावा? त्या रस्त्याने आज आम्ही विद्यार्थिनी जेव्हा जातो तेव्हा अभिमानाने आमची मान उंच होते. त्या कामातून प्रथमच आम्ही शिकलो की शारीरिक कष्टांची आपण केव्हाच लाज बाळगता कामा नये. तसेच ज्ञान फक्त पुस्तकातूनच मिळते असे नाही तर ते कष्टातूनही मिळते इतकेच नव्हे तर अधिक चांगले मिळते! सुट्टीत एकदा घरी आल्यावर बोर्डिंगातले वेगवेगळे अनुभव, आठवणी मी माझ्या वडिलांना सांगत होते. त्या ओघात मी त्यांना म्हटले, "मुकुंददादाला घेऊन तुम्ही मला भेटायला आला होता ना, तेव्हा वर्गातली एक मुलगी मला म्हणते कशी, "तुझ्या भावाला ‘मुक्या’ म्हणतात म्हणजे तो मुका आहे वाटते?" मला भारी राग आला. मी तिला उलट म्हटले, "तुझे आडनाव ‘फाटक’ आहे म्हणूनच तू अशी अंगाने रोडरोड आहेस वाटतं? आणि काय गं कुणाच्या मोडक्या घराचे तू ‘फाटक’ आहेस गं?" मी पुढे काही बोलणार एवढ्यात शंकरभाऊंनी (माझ्या वडिलांनी) मला मध्येच थांबवले आणि ते म्हणाले, "बेटा मालढोक, (हे माझे घरातले लाडके नाव) एखादा माणूस काही वेडेवाकडे बोलला म्हणजे आपणही तसेच बोलायचे का? शहाणी मुले असे नाही करत. आणि एखाद्याच्या शरीरव्यंगाला हिणवणे हे फारच वेडेपणाचे आहे. असे व्यंग असणे यात त्या माणसाचा काय अपराध? पुन्हा नाही ना तू असे बोलणार कुणाला सांग मला." त्यांच्या या मायेच्या शब्दांनी मी एकदम विरघळून गेले आणि भानावर आले. मैत्रिणींनो, मी पूर्वी केलेला हा गुन्हा परत कधीही करायला धजले नाही. इतके वडिलांच्या प्रेमळ स्पर्शाने व वाणीने माझ्या डोळ्यात अंजन घातले.

माझ्या वडिलांप्रमाणेच माझी आईही फार मोठ्या मनाची होती. ती स्वतः फार सुगरण होती. आपल्या घरी येणार्‍या गरजू माणसांना त्या उभयतांनी कधीही रिकाम्या पोटाने परत धाडले नाही. एक दिवस आमची वृद्ध, विधवा दूधवाली कळवळून नन्नीला म्हणाली, "अगं वयनी, चमचा दोन चमचेच लिंबाचे लोणचे दे गं वाईच! माझा नातू तापाने फणफणतोय त्याच्या तोंडाला चवच नाही बघ!" नन्नी लगेच उठलीआणि तिने मोठा द्रोणभरून तिला लोणचे दिले. मी नन्नीला म्हटले, "चमचा दोन चमचे हवे आहे ना तिला? मग इतके कशाला दिलेस?" त्यावर ती म्हणाली, "हे बघ माले, कोणाही गरजू माणसाला जे द्यायचे ते घसघशीत हाताने आणि मोकळ्या मनाने द्यावे. मनात कसल्याही अपेक्षा न ठेवता द्यावे समजलीस? अशांना देवही कधी कमी करीत नाही." बालमित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या आईशी तिच्या मृत्यूपूर्वी माझी भेट झाली ना तेव्हाही ती हेच शब्द माझ्याशी बोलली. देवाघरी गेलेल्या माझ्या आईने सुखी जीवनाचा दिलेला हा मंत्र मी आजवर स्मरणपूर्वक यथाशक्ती पाळत आले आणि खरेच देवाने आजवर मला कधी कशाला कमी केले नाही म्हणून मी त्याची ऋणी आहे. 

माझ्या जीवनातले हे छोटे छोटे प्रसंग! पण ते मला काही ना काही बहुमोल संस्कार शिकवून गेले. जीवनभर पुरणारी शिदोरी त्यांनी मला दिली. म्हणून त्या सर्वांची मी कृतज्ञ आहे. शेवटी मी तुम्हाला इतकेच सांगेन, जीवनात जे जे पवित्र आहे, कल्याणकारी आहे , ते ते आपण मधमाशीच्या मधुसंचयाच्या वृत्तीने वेचित जावे. त्याने आपले जीवन खरे श्रीमंत, खरे समृद्ध होईल. 

असो. आता ही दिवाळी तुम्हाला सुखाची जावो अशा शुभेच्छा देऊन तुमचा निरोप घेते हं.

तुमची,
मालतीमावशी किर्लोस्कर   

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color