स्वागतकक्ष arrow सय arrow वानप्रस्थातील प्रा. ग. प्र.
वानप्रस्थातील प्रा. ग. प्र. पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

वानप्रस्थातील प्रा. ग. प्र.

गेल्या दोन वर्षात पुण्याला जायला जमलेच नव्हते, पण महिन्या-दीड महिन्यापूर्वी योगायोगाने ते जमले.  अमेरिकेकडून आलेल्या आणि लवकरच तिकडे परत जाणार्‍या नातीने मला पकडवॉरंट्च धाडले. मग न जाऊन कसे चालणार?  मात्र सांगलीहून निघतानाच मी मनाशी पक्के ठरविले होते की, काहीही झाले तरी या ट्रीपमध्ये प्रा. ग. प्र. प्रधानांना हडपसरला जाऊन भेटायचंच!

त्यांचा माझा स्नेह अर्ध्या शतकांहून थोड्या अधिकच वर्षाचा! त्यांची भेट कधीही होवो आणि कुठेही,  ती पुण्यात होवो की सांगलीत, आमच्या घरी होवो की पुणे-मुंबई प्रवासात आगगाडीत होवो ती फार समाधान, आनंद देऊन जाते. पुष्कळ काही नवे शिकवून जाते. त्यामुळे स्वाभाविकच माझ्या मनात त्यांच्या भेटीची उत्सुकता नेहमीच असते. यावेळी तर ती थोडी अधिकच होती. कारण प्रिय ग. प्रं. नी आता वानप्रस्थाश्रम स्वीकारला आहे. हे नवे जीवन ते कसे घालवतात ते पाहण्याची, जाणण्याची मला इच्छा होती.

पुण्यात गेल्या गेल्या मी त्यांना दूरध्वनी केला.  ‘उद्या दहा वाजता या,’ असे त्यांनी नेहमीच्याच आपुलकीनं सांगितले. त्याप्रमाणे मी गेले. ऑगस्टची दहा तारीख होती. बाहेर मुसळधार पावसाचे थैमान चालू होते. अगणित खड्डे असलेल्या पुण्याच्या रस्त्यावरुन त्यातील शक्य तेवढे चुकवीत,  आमचे गायकवाड ड्रायव्हर मोटार चालवीत होते. मला ग. प्र. राहात असलेल्या हडपसरच्या सानेगुरुजी आरोग्य रुग्णालयात पोहोचायला जवळजवळ तास लागला. खरे म्हणजे थोडा उशीरच झाला होता. त्यामुळे ग. प्रं. नी माझी वाट पाहून ‘मुकुंदाकडे आमच्या घरी दूरध्वनी वरुन विचारणा केली. मालूताई तुमच्याकडेच गेली आहे. असे त्याने सांगितले. हॉस्पिटलच्या पायर्‍या चढून मी आत आले आणि पाऊस जरा मंदावलेला पाहून आमच्या ड्रायव्हरना ताजी फळे आणायला पाठवले. पाच-दहा मिनिटांत ते परत आले की, त्यांना बरोबर घेऊन लिफ्टने आपण सर्वात वरच्या मजल्यावर जाऊ असा माझा बेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णाची बरीच गर्दी होती. डॉक्टर्स मंडळी इकडून तिकडे येता जाताना दिसत होती.   ड्रायव्हरची वाट पहात मी तिथल्याच एका बाकड्यावर  बसले. पाच-सात मिनिटेच मी तिथे बसले असेन, तेवढ्यात सहज माझे लक्ष हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराकडे गेले. तर अहो आश्चर्यम्‌!  प्रिय ग. प्र. काठीवर आपल्या डाव्या हाताचा किंचित भार टाकून उभे असलेले पाठमोरे मला दिसले. पोषाख नेहमीचाच! खादीचा स्वच्छ सदरा, लेंगा, पायात जाड चपला आणि डोळ्यांवर चष्मा! मी लगबगीने ते उभे होते तिथे गेले आणि त्यांच्यासमोरच उभी ठाकले. मला पाहताच ते प्रसन्नपणे हसले आणि मला म्हणाले, तुमचीच वाट पाहतो आहे.  त्यांच्या भलेपणाने मला संकोचल्यासारखे झाले. मी त्यांना म्हटले, इतके मजले उतरुन खाली येण्याचा त्रास उगीचच घेतलात तुम्ही. त्यात हो कसला त्रास? आणि लिफ्ट आहे ना?  लिफ्टनेच जाऊ आपण आता माझ्या खोलीकडे तुमचे ड्रायव्हर त्यांचे काम झाल्यावर येतील तिकडे, असे ते म्हणाले. आम्ही मग लिफ्टकडे गेलो, मजल्याचे बटण दाबताना त्यांच्या डोळ्यांना त्रास होत असावा असे मला वाटले, पण तसे बाहेर न दिसू देता त्यांनी मला त्यांच्या खोलीवर नेले. खोली एखाद्या हॉलसारखी प्रशस्त, ऐसपैस, हवेशीर होती. आतल्या बाजूला स्नानाची व इतर व्यवस्था होती. शिवाय आणखीही एक खोली होती. सामानसुमान आणि जेवणासाठी ती बहुधा असावी. पाऊस थांबून खोलीत छानदार प्रकाश आल्याने मनाला कसे टवटवीत वाटत होते. खोलीत दोन खाटा, त्यावर साधी स्वच्छ पांघरुणे होती. दुसरी खाट त्यांच्याबरोबर राहणार्‍या त्यांच्या कोणा सहकारी गृहस्थांची असावी. ग. प्र. यांच्या खोलीभोवती अर्धगोलाकार अशा खोल्या होत्या. ग. प्र. म्हणाले  मालतीबाई या खोल्यांतून आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स राहतात बरका! आणि तिथूनच कांही पावले उचलल्यावर लांब-रुंद असलेल्या गच्चीकडे काहीशा ममत्त्वाने पाहत ते सांगू लागले, इथे मी फेर्‍या मारतो. गच्चीतून कितीतरी दूरवरचा हिरवागार परिसर दिसत होता. पावसाने सुस्नात झालेल्या लहान-मोठ्या इमारतीही नजरेत भरत होत्या.  ग. प्र. अतिशय हौशीने, आनंदाने मला सारी माहिती देत होते. त्यांचा आनंद त्यांच्या डोळ्यातून आणि लगबगीच्या हालचलींतून मला जाणवत होता. त्या सर्वांची मला खूप गंमत वाट्ली. सर्व थोर माणसांच्या मनात एक निरागस, भाबडे, उत्सुकतेने जगाकडे पाहणारे लहान मूल असते असे म्हणतात ना? त्याचा सुखद प्रत्यय ग. प्र. यांच्याकडे पाहून मला येत होता. गच्चीकडून आम्ही त्यांच्या खोलीत आलो एवढ्यात गायकवाड ड्रायव्हर फळे घेऊन आले. मग ती फळे व त्यांच्यासाठी नेलेले खाद्यपदार्थ मी ग. प्र. च्या स्वाधीन केले. त्यांनी ते आतल्या खोलीत नेऊन ठेवले.

मग थोडावेळ इकड्च्या-तिकडच्या क्षेमकुशलाच्या, नव्याने वाचलेल्या पुस्तकाच्या गप्पाटप्पा झाल्या नंतर मी त्यांना म्हटले,  "ग. प्र. तुमचे राहाते घर तुमच्या फार आवडीचे होते. नानाविध कामांसाठी तुमच्याकडे अनेक क्षेत्रांतली माणसे येणार. समविचारी स्नेहीसोबती येणार. मार्गदर्शनासाठी सल्ला हवा म्हणून विद्यार्थ्यापासून ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यापर्यंत कितीतरीजण येणार. त्यांनादेखील तुमच्या आजच्या या जागेपेक्षा तुमचे घर मध्यवर्ती आणि सोयीचे होते. तर इतक्या लवकर ते ‘साधना’कडे सुपूर्त करण्याची तुम्ही लगबग का केलीत?" त्यावर पळभरही वेळ मध्ये न जाऊ देता ते म्हणाले, "मला एकांतवास हवा होता." त्यांचे हे उत्तर मला एकदम पट्ले. क्षणभरात त्यांच्या जीवनाचा जणू एक चित्रपटच  माझ्या मनासमोरुन सरकत गेला. आपल्या विद्वत्तेने अध्यापन निपुणतेने व प्रेमळ स्वभावाने, अभ्यासूवृत्तीने एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी मोठेच नाव मिळवले. आपली कारकीर्द यशस्वी आणि नमुनेदार केली. विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाची त्यांना गोडी होती. त्यातील विषयांचा सूक्ष्म व चौफेर अभ्यास त्यांनी केला. राजकारणात सक्रिय राहून दीर्घकाळ काम केले. निर्वैर आणि निरलस वृत्तीने केले. खडतर तुरुंगवासही अतिशय निर्भयपणाने सोसला. ‘साधना’ या गुणी साप्ताहिकाचे चतुरस्त्र संपादक म्हणून लोकादरास प्राप्त झाले. विधान परिषदेचे आमदार, विरोधी पक्षनेते म्हणून समाजापुढे  अजातशत्रुत्वाचा  आदर्श निर्माण केला.  साठाउत्तराची कहाणी, स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत  अशी अनेक पुस्तके लिहिली. जे करायचे ते प्रांजळपणे आणि स्वत:च्या सद्सदविवेक बुद्धीशी इमान राखून हा तर त्यांच्या स्वभावाचा स्थायीभावच  आहे. त्यांनी व प्रा. अ. के. भागवतांनी मिळून लिहिलेले महात्मा गांधीचे इंग्रजी चरित्र प्रसिध्द आहे. मार्मिक, प्रभावी अशी शेकडो, हजारो व्याख्याने दिली.  अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही हे व्रत जीवनभर निष्टेने पाळले. तहानभूक विसरुन ग. प्र. असंख्य दु:खी कष्टी माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटले. राष्ट्रपातळीवरच्या अनेक खर्‍या नेत्याचा लोभ संपादन केला.  कधी उतले नाहीत अशी ही माला आणखी कितीतरी मोठी आहे. आता त्याना खरेच निवांतपणा हवासा वाटत असेल. गर्दीपासून दूर-दूर व्हावेसे वाटत असेल तर ते स्वाभाविकच आहे. शांतपणे असे राहून प्रकृती जशी साथ देईल त्या मानाने ग्रंथलेख्न वाचन, मनन, चिंतन करावे त्यासाठीच हा वानप्रस्थाश्रम त्यांनी स्वीकारला.

त्यांना हल्ली कमी ऐकू येते त्यामुळे त्यांच्या चष्म्याच्या जोडीला आता कानयंत्रही आलेले दिसते. त्यामुळे नंतरची प्रश्नोत्तरे मी प्रश्न विचारवा आणि त्यांनी कागदावर उत्तर लिहून दाखवावे या पद्धतीने होत राहिली. मी विचारले, "नवे लेखन काय? " तर दोन ऑक्टोबरच्या ‘साधना’साठी महात्मा गांधींना पत्र लिहिले आहे. ते पत्र तर हा लेख लिहिण्यापूर्वी मी वाचूनही टाकले. विचारप्रवण करणारे ते पत्र वाचकांना खासच खूप दिवस आठवत राहील. वानप्रस्थाचा स्वीकार केल्यापासून त्यांची लेखणी अधिकच बोलकी आणि वेगवान झाली आहे. त्यांच्या तीव्र स्मरणशक्तीचे मला नवल वाटले.  नंतर माझा पुढचा प्रश्न -– "सध्या काय वाचता आहात? "  उत्तर " ‘काफ्का’ वाचतो आहे. " माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांचे हेही बहुधा पुनर्वाचन असणार. जरा थांबून मी विचारले,  "तुम्हाला इथे कसे काय वाटते? "  ग. प्रं. चे लेखी उत्तर "एकनाथ हा आम्हा प्रापंचिकांचा संत! त्याने सांगितलेल्या तीन गोष्टी वानप्रस्थात जमल्या. नावडे प्रपंची बैसणे! नावडे गौरव मिरविणे! बरवे खाणे नावडे! " आणि मग मनमोकळेपणाने हसून त्यांनी लिहिले,  "चवथे मात्र मान्य नाही हं मला.  नावडे कोणाशी बोलणे. " या त्यांच्या उत्तराने मलाही हसू आले मला लिहिलेल्या अलीकडच्या एक-दोन पत्रात त्यांनी म्हटले होते.  "मालतीबाई, मला एकांतवास हवा होता हे खरे असले तरी काहीवेळा एकाकी वाटतेच. " परवाच्या भेटीत त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. माणसांवर भरभरुन प्रेम करणारे, सत्य-शिव-सुंदरावर अविचल निष्टा ठेवणारे, अतिशय सहजपणे, समर्पित वृत्तीने आपले जीवन राष्ट्रासाठी वाहणारे, जिथे जातील तिथे चैतन्याचा, आनंदाचा ठेवा घेऊन जाणारे, आबालवृध्दांशी चट्कन समरस होणारे, पारदर्शक मनाचे असे ग. प्र. मी वर्षानुवर्षे पहात आले. त्यामुळे त्यांच्या या उदगारांनी माझ्या मनात कालवाकालव झाली. त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या (कै) डॉ. सौ. ‘मालविकाताई’ यांची मला तीव्रतेने आठवण झाली. उणीव जाणवली. आमच्या या सरलमनस्क, बुद्धिमान सन्मित्राला, हाडाच्या देशभक्ताला प्रबोधनासाठी वाणी, लेखणी झिजविणार्‍या लेखकाला आणि माणूस  म्हणून मोठीच उंची असलेल्या प्रगल्भ विचारवंताला त्यांनी किती मोलाची, किती मन:पूर्वक आणि सक्रिय साथ दिली. त्याला प्राणाधिक जपून आणि आपणही समाजसेवा करुन सहघर्मचारिणी हे नाते किती सार्थ केले. हे सगळे आठवून माझे मन त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने भ्ररुन आले.

प्रा. ग. प्रं. बरोबर सुमारे तीस-पस्तीस मिनिटेच मला गप्पा-टप्पा करायला मिळाल्या. कारण एकतर त्यांच्याकडे सतत कुणीतरी भेटायला येत होते.  एकदा मासिके, वृतपत्रे वगैरे घेऊन कोणी गृहस्थ येऊन गेले. मध्येच दोन स्त्रिया (त्या बहुधा कोणी सामाजिक कार्यकर्त्या असाव्यात) येऊन बोलून सांगून गेल्या. त्या गर्दीत तीन-चार वर्षाचा एक बाळही त्यांच्याशी लडिवाळपणे काही बोलत राहिले. मला तर वाटले ही दोन समान-स्वभावाच्या दोस्तांचीच भेट आहे.

यावेळपर्यत पाऊसही जरा कमी झाला होता. ग. प्रं. ची जेवायची वेळ झाली असावी असे वाटून मी त्यांचा निरोप घेण्याचा विचार करीत होते. तेवढ्यात मला आठवण झाली की, त्यांच्या प्रकृतीबद्दल एक विचारायचेच राहिले. तेवढे मी झट्कन विचारले,  ग. प्र. मध्यंतरी तुम्ही न्हाणीघरात पडलात असे कानावर आले. ते दुखणे कसे आहे हो आता? त्यावर त्यांनी सांगितले, "पडलो हो, पण आमच्या इथल्या या हॉस्पिटलच्या डॉक्टर मंडळीनी फार प्रेमाने, तत्परतेने उपचार केले. आता बरा आहे मी. " ते ऐकून मलाही हायसे झाले. "बरं आहे ग. प्र. मी येते आता. प्रकृतीला संभाळून असा. "  असे म्हणून मी नमस्कार केला.  जरा विश्रांती घ्या. असे दोन-तीन वेळा मी सांगूनही ते माझ्याबरोबर खोलीबाहेर आले. लिफ्ट चट्कन वर आली नाही तर “अरे, कॊण आहे रे? जरा लिफ्ट्ला काय झाले आहे बघ” असे मोठ्याने हाक मारुन त्यांनी कुणा सेवकाला सांगितले. आम्ही खाली आलो. आमच्या मोटारीपर्यंत जाताना मी भिजत नाहीना पावसात, हे त्यांनी लक्षपूर्वक पाहिले. आमची गाडी फाटकातून बाहेर पडेपर्यंत हातातल्या काठीवर जरासा भार देत, मघूनमधून चष्मा वर-खाली करीत उभे राहिले. आम्ही हात उंचावून एकमेकांचा निरोप घेतला.

मोटार घराच्या दिशेने निघाली होती, पण माझे मन ग. प्रं. शी झालेल्या छोट्याशा भेटीच्या विचारातच गढले होते. मी स्वत:शीच म्हटले आपले आदरणीय ग. प्र. वानप्रस्थातही पूर्वीसारखेच वत्सल, खेळकर मनाचेच आहेत. कसली चिडचिड नाही, कंटाळा नाही, कुणाची निंदा नाही, तेच प्रामाणिक, सच्चे मन, तीच ध्येयनिष्टा, तीच आचार-विचार-लेखनातील मौल्यवान आणि दुर्मिळ सुसंगती, तोच माणसांचा लोभ, तोच विधायक कामाचा ध्यास, तीच अखंड परिश्रमाची तयारी, तेच ग्रंथ प्रेम, तोच अन्यायाशी संघर्ष,  तोच कणखर ध्येयवाद, विश्वविख्यात साहित्यिक टॉलस्टॉय यांना लिहिलेली अप्रतिम पत्रे असोत की, त्यांची जीवनकथा असो. सुबोध भाषा, मार्मिक विश्लेषण, स्वभावातील नम्रता आणि जिव्हाळा सारे तेच. जे सांगायचे, बोलायचे, लिहायचे ते स्वच्छ. जे पटत नाही तेही तशाच खुल्या पत्राने सांगायचे, हीही एक त्यांची साधनाच नाही काय? ८५ वर्षाच्या आयुष्यात कितीतरी भलीबुरी माणसे, घटना, त्यांनीही पाहिल्या असतीलच ना?  पण आपला सन्मार्ग त्यांनी कधीच सोडला नाही.  त्यात भ्रष्टाचाराचे तर नावच नाही. आजच्या भ्रष्ट-ओंगळ, उद्वेगजनक अशा राजकारणाच्या दलदलीत, दुर्गंधीत हे ग. प्र. नावचे सुंदर, सुगंधी कमळ किती अपूर्व आणि मन प्रसन्न करणारे आहे ना? किती दिलासा देणारे आहे ना?  ग. प्रं. ची मनातल्या मनात आठवण करुन मी म्हटले,  "ग. प्र. देव तुम्हाला शतायुषी करो, तुमच्यासारखी शीलवंत, प्रज्ञावंत माणसे आज फार-फार दुर्मिळ झाली आहेत. शाश्वत मूल्यांना विसरलेल्या आजच्या समाजाला नीतिमान बनवायला, शहाणे करायला, समाजवादी विचारधारेला अधिक सशक्त करायला, आम्हा सर्वांना तुम्ही खूप वर्षे हवे आहात. "

तुमच्या स्नेहीवर्तुळात मला एखाद्या अनुस्वाराएवढी का असेना, पण जागा मला असेल असे मी मानते आणि स्वत:ला धन्य समजते. बराय तुम्हाला मनापासून अभिवादन!.

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color