सखी परिमला पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

सखी परिमला

कोणी इतर काहीही म्हणोत पण माणसाचे मन हे एक न उलगडणारे कोडे आहे, याबाबत सहसा कुणाचा मतभेद होणार नाही. मनाचे व्यापार किती अनाकलनीय अन्‌ विलक्षण! त्यातून ठिसूळ अन्‌ भावनाप्रधान माणसांच्या मनांबद्दल तर न बोललेलेच बरे!

हे सारे का येते माझ्या मनात? असे कोणी मला विचारले तर त्याचे उत्तर असे की एखाद्या दिवशी तसे विशेष काऽऽही कारण नसतानाही माझे मन व्याकूळ होते-व्यथित होते. गतकाळातील हर्षविषादांची चित्रे मनःश्चक्षूंपुढून सरकू लागतात. संमिश्र अशा स्मृति माझ्या मनात मुक्काम ठोकून बसतात. बाहेर मुसळधार पाऊस पडत असावा, त्यात भिजून चिंब झालेल्या प्रवाशाला वाटेत एखादे घर दिसावे, त्याने लगबगीने त्याच्या जवळ जाऊन दरवाजावर टक्‌टक्‌ करावे आणि कोणी ‘या’ म्हणायच्या आतच घरात घुसून आपले बस्तान तिथे टाकावे ना, तसे मला या स्मृतिचित्रांबद्दल वाटते. ‘परिमला’च्या आठवणींसंबंधीही असेच आहे. तिचा-माझा स्नेह अवघा एका वर्षातला. तोही शालेय जीवनातला. आम्ही झग्या-परकरात होतो तेव्हाचा. पण त्या सौहार्दाने माझ्या मनावर अतिशय खोल संस्कार केले आहेत.

ती आमच्या कन्या-विद्यालयात राहायला आली ना, तो दिवस माझ्या चांगला स्मरणात आहे. आमच्या ‘वाडी’ला शाळाच नव्हती म्हणून, माझी वयाची पाच वर्षे पुरी होताच आई-आप्पांनी मला या विद्यालयात व तेथील वसतिगृहात शिक्षणासाठी ठेवले. परिमला तेथे आली तेव्हा नुकतीच मी लहान मुलींच्या वसतिगृहातून बड्या वसतिगृहात गेले होते राहायला. कारण आता इंग्रजीचा अभ्यास सुरू झाला होता ना? - त्या वसतिगृहात साधारणतः माझ्या वयाची कोणी विद्यार्थिनी राहायला आली की, मेट्रनबाईंची हाक यायची, ‘मालती, ए मालती’, अन्‌ मी त्यांच्या खोलीकडे गेले की, त्या सांगायच्या, "ही बघ तुला खेळायला आणखी एक नवीन मैत्रीण आली आहे आज." अन्‌ मग घरादाराला, पालकांना सोडून प्रथमच दूर राहायला आलेली ती रडवेली झालेली मुलगी माझ्याकडे सहानुभूतीच्या अपेक्षेने, आशेने पाहायची. आई-वडिलांना परत घेऊन जाणार्‍या टांग्याकडे तिचे डोळे आशाळभूतपणे वळायचे आणि मग गळ्यात दाटून आलेला हुंदका तेथेच आवरण्याचा फसवा प्रयत्न ती करायची. अखेरीस सशाच्या भित्र्या, कावर्‍याबावर्‍या नजरेने भिरभिर भिरभिर पाहात माझ्याबरोबर निमूटपणे चालू लागायची.

या सार्‍या दृश्याची मला अंमळ सवयच झाली होती म्हणाना! पण त्या दिवशीचा प्रसंग अनपेक्षितच वाटला मला. नेहमीप्रमाणे त्या दिवशीही मेट्रनबाईंची, वत्सल स्वरात उच्चारलेली हाक माझ्या कानी आली. पण मी झाले होते ठिकरीच्या खेळात दंग! त्यामुळे ‘ओ’ म्हणायचे भानच मला राहिले नाही. तेवढ्यात परत, ‘माल्लन्नऽ ..’ असा माझ्या नावाचा काहीतरी चमत्कारिक उच्चार करीत, किंचित बोबडेपणाने कोणीतरी मला हाक मारीत आहे असा मला भास झाला. तो आवाज इतका मंजूळ होता की माझे लक्ष चटकन्‌ तिकडे वेधले. मी गिरकी मारून वळून पाहिले तर काय गंमत? एक सुदृढ बांध्याची, पिंग्यापिंग्या रंगाच्या डोळ्यांची मुलगी तेथे उभी होती. तिच्या डोळ्यातून एक शांत व संथ भाव प्रकट होत होता. तिचे फुगरे फुगरे गाल पाहून मला भारी गंमत वाटली. तिने मुसलमानी पद्धतीचा - म्हणजे सलवार, खमीस असा- पोशाख परिधान केला होता. त्यावर झुळझुळीत रेशमी, मंद गुलबाक्षी रंगाची देखणी ओढणी चमचमत होती. मुलीच्या रुंद कपाळावर कुंकवाची टिकली दिसत नव्हती, पण तिने डोळ्यात घातलेला सुरमा मात्र लगेच ओळखू येते होता. तिच्या कानातले पाणीदार मोत्यांचे डूल वार्‍याने मागेपुढे हलत होते. सूर्यकिरण त्यावर पडताच त्यात घातलेले तांबडे खडे झगमग करीत होते. आपल्या काळ्याभोर लांब केसांच्या वेण्यांशी ती काहीतरी चाळा करीत उभी होती. ती हाक तिनेच मला मारली होती.

एखाद्या मनोहारी चित्रासारखीच त्यावेळी ती मला वाटली. तिच्या हाकेच्या दिशेने मी वळून पाहताच, का कोण जाणे पण ती खुदकन्‌ हसली, त्यावेळी तिच्या गालांना इतक्या छान खळ्य़ा पडल्या होत्या म्हणून सांगू? अन्‌ त्याक्षणी आमची दृष्टादृष्ट झाली तेव्हापासून जी गट्टी जमली ती कायमची!

‘परिमला’चे वडील हैदराबाद संस्थानातले एक नामांकित, वजनदार धनाढ्य सरदार होते. त्यांच्या घरी सर्व प्रकारचे ऎश्वर्य झुलत होते - फक्त अपवाद एकच - अन्‌ तो म्हणजे या त्यांच्या सार्‍या वैभवाला अद्याप वारस लाभला नव्हता - परिमलाला भाऊबीज देणारा सख्खा भाऊ नव्हता -  त्यामुळे या आमच्या एकुलत्या एक गुणी मुलीवर त्यांचा जीव स्वाभाविकच केंद्रित झाला होता. त्याला आणखीही एक कारण होते. हे सरदारसाहेब एकदा फार बीमार झाले. मोठमोठ्या धन्वंतर्‍यांनीही दुखण्यापुढे हात टेकले. पण ईश्वरकृपेने त्या दुखण्यातून ते बाहेर पडले आण लवकरच ‘परिमला’ने त्या घरात प्रवेश केला. घरीदारी म्हणूनच लाडाकोडात ती वाढली होती. आपल्या निर्व्याज सरल स्वभावाने व गोड वाणीने शाळेच्या चिमण्या जगातही तिने मला खूप लळा लावला होता. आज कित्येक तपांच्या वियोगानंतरही तिच्या आठवणीने माझा ऊर भरून येतो, मन तिच्या भेटीसाठी हुरहुरते, आतल्या आत कढते. 

‘परिमला’चे बालपण हैदराबादेत गेलेले. त्यामुळे तिची भाषा अर्थातच तेलगू होती. थोडेसे हिंदी तिला येई. तिच्या घराजवळ किणी एक महाराष्ट्रीय कुटुंब राहत होते म्हणे. त्यामुळे थोडेफार मराठी तिला समजे व मोडकेतोडके मराठी बोलण्याचा ती प्रयत्नही करी.

‘परिमला’ विद्यालयात राहायला आली ना त्यावेळी दोन मोठ्या आलिशान मोटारी भरून तिची नातेवाईक माणसे तिला निरोप द्यायला आलेली होती. कोणी बुढ्‌ढी तर कोणी जवान! पण सार्‍यांचा श्रीमंती रुबाब, नोकझोक मन वेधून घेणारा होता. तिच्याबरोबर खाऊचे दोन मोठाले करंडे तर होतेच पण कॅरम बोर्ड, पत्त्यचा डाव, अत्तराच्या नक्षीदार बाटल्या, सुकामेवा असे कायकाय खूप सामान होते. तिच्या दिमतीला एक नोकराणी देण्याचीही तिच्या पालकांची इच्छा होती म्हणे, पण वसतिगृहाच्या नियमात ते बसेना म्हणून राहून गेले.

तिच्या घरच्या या सरंजामाने, वैभवाने आमच्या बर्‍याच मैत्रीणी दबकल्या. मीही भांवावलेलीच होते, पण मेट्रननी पहिल्या दिवशी माझी तिच्याबरोबर ओळख करून दिलेली असल्याने माझी भीड जरा चेपली होती. मी तिच्या खोलीत जेव्हा गेले तेव्हा ती एकटीच खिडकीशी उभी राहून , कुठे तरी नजर लावून उदासवाणेपणाने बाहेर बघत होती. तिचे डोळे पाणावले होते. मग माझ्या ‘खास’ हिंदीत तिला प्रश्न केला, "तुम क्यों रडते? तुमको ठिकरी येते? (दगडाच्या तुकड्याने लंगडी घालत खेळण्याचा हा एक खेळ) मैं तुमको शिकवूंगी "....

घरच्या आठवणीने मलूल झालेल्या त्या ‘परिमला’ला  माझे हिंदीचे ते अफट ज्ञान पाहून हसू आले. तिच्या चेहर्‍यावर थोडी टवटवी दिसू लागताच मला माझे घोडे पुढे दामटायला जरा जोर आला. "तुमको सांगू का? मैंही अशीच रडले पहिले बाद. लेकिन पठ्ठे डरो नको!" - माझी धिटाई, स्वतःची फजिती स्वतःच सांगण्याचा मोकळा स्वभावतिला बहुधा रुचला असावा. तिला थोडा धीरही वाटला असावा. मग लाडीगोडीने ती मला म्हणाली, "मालिनी, मैं आती हूं तुम्हारे साथ खेलनेके वास्ते। चलो चले।" अन्‌ मग अर्ध्या तासातच हुतुतू खेळताना, "ए परिमल, तू मेलीस! तेव्हा हो बघू बाहेर कोर्टाच्या" असे दटावणीने एकमेकींना म्हणत पाठीत खुशाल धपाटे घालण्याइतके आमचे मेतकूट जमले.

वस्तुतः आमच्या दोघींच्या स्वभावात तसे काहीच साम्य नव्हते. याला अपवाद एकच अन्‌ तो म्हणजे गप्पागोष्टी मारण्याची हौस मात्र दोघींना मनसोक्त होती. अन्यथा ती आर्जवी स्वभावाची, मृदु, खूप सोशिक तर मी मुलखाची धांदरट-गडबडी अन्‌ भित्री! पण तरीही आम्ही पळभर एकमेकींना विसंबत नसू.

ती आली ना, त्या वर्षाच्या अखेरीअखेरीच्या दिवसातलीच ही गोष्ट आहे. पण तिची पक्की आठवण मला राहिली आहे त्याला कारणही तसेच झाले. जे झाले ना ते असे - आमच्या विद्यालयाच्या बाजूने जाणारे कालव्याचे दोन फाटे दोन हात असल्यासारखेच जणू दिसत. त्यांच्या बाजूंनी पेरू, जांभळे, आंबे यांच्या झाडांची रेलचेल असायची. अधूनमधून जवळपासच्या एखाद्या बागेत, मळ्यात ‘कावेरी मावशी’, ‘दांडेकर बाई’ आम्हाला सहलीला घेऊन जायच्या. तेव्हा पोट फुगेपर्यंत समोर येणार्‍या खाद्यपदार्थांचा आम्ही समाचार घेत असू. खूप मज्जा येई तेव्हा. या बागमळ्यांच्या, अवतीभवतीचा, खडकवासल्याकडे जाणारा रस्ता आजच्यासरखा वाहनांनी, माणसांनी, इमारतींनी तेव्हा गजबजलेला नव्हता. उलट कमालीची स्तब्धता तिथे वावरत असे.

त्या वर्षी आंब्याला मोहोर थोडा लवकरच येऊ लागला होता. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस, तोंडाला पाणी सुटावे अशा लिंबाएवढ्या कैर्‍या झाडांना लटकू लागल्या. कसे कोण जाणे पण माझ्या मनात आले, आणू या थोड्या कैर्‍या तोडून! अन्‌ मग पुढच्यामागच्या कसल्याच परिणामांचा विचार न करता आमची दुक्कल एका संध्याकाळी आपल्या परकरांचे घोळ हलवीत, झुलवीत, हातात हात गुंफून निघाली कालव्याच्या काठाकाठाने आंबराईवर स्वारी करायला. एका डेरेदार भरगच्च आंब्याच्या झाडाजवळ आम्ही येऊन ठेपलो. बागेचा राखणदार माळी ऎनवेळी आला तर काय घ्या म्हणून टेहेळणी करायला परिमला खाली उभी राहिली व मी चढवेल तेवढ्या उंच, त्या झाडावर चढले. कापर्‍या हाताने पण तोडता येतील तेवढ्या कैर्‍या उतावळेपणाने मी तोडल्या, परिमलाच्या परकराच्या घोळातही काही फेकल्या. पण - ! दैव देते अन्‌ कर्म नेते म्हणतात ना, तस्से झाले!

आमच्या पराक्रमाची चाहूल लागल्यामुळेच की काय कोण जाणे, बागेच्या मालकाचा एक भला मोठा, दांडगा कुत्रा धावत धावत आमच्या दिशेने येताना मला दिसला. त्याचा गडद किरमिजी रंग, लांबट पोट, लाळ गाळत लवलवणारी जीभ व काचेच्या मण्यासारखे लुकलुकणारे, भेदक डोळे पाहून हे शिकारी कुत्रे असले पाहिजे अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. मी निदान फांदीवर तरी सुरक्षित होते पण परिमला? तिचे काय होणार? आगामी संकटाची कल्पना येताच मी घाबर्‍या घुबर्‍या स्वरात तिला म्हटले, "ए शुकशुक, परिमला, तूही चटकन्‌ चढतेस का झाडावर? मी तुला देते हात?" पण माझे वाक्य पुरे होण्यापूर्वीच ते अवाढ्व्य धुड ‘भोंऽऽभोंऽऽ’ असा कर्कश्य आवाज काढीत परिमलाच्या शेजारीच येऊन ठेपले! जमले तेवढे प्रसंगावधान राखून तिने शेजारचा एक दगड भिरकावला त्याच्या अंगावर. मग काय विचारता? ते कुत्रे जे खवळले ते त्याने क्षणार्धात परिमलाच्या पायाचा असा कडाडून चावा घेतला की ती बिचारी जिवाच्या आकांताने कळवळून ओरडली. शेजारपाजारचे शेतकरी, बागवान वगैरे पाच पंधरा माणसे तिथे जमली. पण हे सारे होईपर्यंत परिमला भीतीने जवळजवळ बेशुद्धच झाली होती. या सार्‍या उपद्व्यापाचा व्हायचा तोच परिणाम पुढे झाला. सुपरिंटेडेंट बाईंनी शिक्षा दिली की, ‘मालतीशी पुन्हा शाळा सुरू होईपर्यंत वर्गातल्या मुलींनी महिनाभर बोलायचे नाही.’ पण त्या अपमानाचे दुःख मागे पडावे इतके दुःख मला परिमलाकडे पाहून होई.

इंग्रजी दुसरीतलीच ही गोष्ट. आम्हा मैत्रिणींच्या सहवासाने परिमला आता साधारण बरे मराठी बोलू लगली होती. तरी अधूनमधून ‘न’ च ‘ण’ आणि ‘स’ चा ‘ष’ असा काहीतरी उच्चाराचा गडबडगुंडा होईच. ‘दमयंती-स्वयंवरातील एक उतारा त्या दिवशी बाईंनी पाठ करून यायला सांगितला होता. ‘गद्रे’ बाई वर्गात आल्या. तास सुरू झाला. "काय परिमला, केली का कविता पाठ? म्हण बरं एक कडवे तुला आवडणारे त्यातले!" अशी बाईंनी आज्ञा केली. उमलणार्‍या कळीप्रमाणे, प्रसन्न भासणारी आमची परिमला लाजतलाजत, डुलडुलत उत्तरली, "हो म्हणते ना!" पुन्हा एकवार संथ पाण्यात चालणार्‍या नावेप्रमणे मागे पुढे होत तिने आपला घसा एकदोन वेळ खाकरला आणि किंचित किनर्‍या आवजात, " ना शोडी हा नळ भूमीपाळ माते। अशे, जाणुनि हंस वदे त्याऽऽते ...." इत्यादी चरण ती म्हणू लागली. तिचे उच्चार, तिची ती तान वगैरे ऎकून मुलींनी इतका वेळ कष्टाने दाबून ठेवलेले हसू फस्सदिशी बाहेर फुटले.

अशा खेळीमेळीच्या वातावरणात वर्ष संपत आले. परीक्षा आली - झाली - निकाल लागला. पण त्याने आमच्या सार्‍या रंगाचा बेरंग करून टाकला. परिमला वर्गात मागेच राहिली. हे कळताच त्या दिवशी आमच्या ‘गीता मंदिराच्या’ एका कोपर्‍यात एकमेकींच्या गळ्यात आपले चिमुकले हात घालून आम्ही मुसमुसून रडले अन्‌ रात्री काही न खातापिताच एकमेकींना बिलगून झोपी गेलो. दुसरा दिवस उजाडला. आपापल्या घरी सुट्टीला जाण्यासाठी प्रत्येकीची लगबग त्यादिवशी सुरू झाली. मोटारी भरभरुन पुणे स्टेशनकडे जाऊ लागल्या. सामाची बांधाबांध तिने संपवली होती. तिच्याबरोबर स्टेशनवर मीही जाणार होते. म्हणून मी खोलीत कायसं करीत होते. तेवढ्यात कोणीतरी खांद्यवर अलगद हात ठेवल्यासारखे वाटले. मागे वळून पाहते तर परिमला माझ्य़ाजवळ येऊन उभी होती. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. माझा हात आपल्या हाता घेऊन भावनावेगाने तिने तो दाबला व "मालती, तुझ्या गरीब मैत्रिणीची आठवण म्हणून ठेव हं-" म्हणून आकाशी रंगाच्या कागदात गुंडाळलेली एक पेटी तिने माझ्या हातात ठेवली-अन्‌ झरकन्‌ ती निघूनसुद्धा गेली - मी पेटी उघडून पाहिली. त्यात मेघश्यामाची एक हस्तिदंती मूर्ती होती आणि त्याच पेटीत तिने आपल्या एका फोटोची प्रत ठेवली होती. त्यामागे तिने लिहिले होते - माझ्या प्रिय मैत्रिणीस, मालतीस मला कद्धीकद्धी विसरणार नाहीस ना?  खरंच खरंच नाहीना! – तुझीच – परिमल - मला एकदम हुंदका आला! 

रेल्वे गाडीने शिट्टी दिली निरोप देणारी मंडळी डब्याडब्यातून बाहेर पडू लागली. कुणाचे डोळे पाणावलेले, कुणाचे नाक लाललाल झालेले, कोण हात हलवीत रुद्ध कंठाने निरोप देतोय्‌, तर कोण ‘प्रकृतीला जपा’ म्हणून विनवतोय्‌. पाणी-फळे विकणारे विक्रेते रेंगाळू लागले आहेत. आता गार्ड हिरवे निशाण फडकवणार एवढ्यात परिमला खिडकीतून ओणवून म्हणाली, "पुन्हा कधी भेट होणार गं? की हीच...!" पण तिचे पुढचे शब्द गाडीने घेतलेल्या वेगात मला ऎकूच आले नाहीत - आणि माझ्या डोळ्यातून आलेल्या आसवात परिमलाची मूर्ती अंधुक अंधुक होत गेली -

दोन दिवसांनी ‘वाडी’स माझ्या घरच्या मंडळीत गप्पाटप्पा करण्यात मीही रंगून गेले. विठूने वर्तमानपत्र आणून टाकले. एका हातात गरम कोकोचा कप घेऊन मी ते दुसर्‍या हातात घेतले मात्र, अन्‌ पहिल्याच पानावर मोठ्या टाईपात छापलेल्या बातमीने माझे काळीजच गोठवले - ‘कन्या विद्यालयातील विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू!’ माझ्या डोळ्यापुढे अंधारीच आली. डोळे विस्फारून मी मन घट्ट करून पुढे वाचते तर काय -? त्या दुर्दैवी अपघाताने घेतलेला बळी माझ्या प्रिय सखीचा - परिमलाचाच - होता!

बातमीत पुढे लिहिले होते, गाडी वेगात धावत होती. सोसाट्याचा उन्हाळी वार वाहात होता. रेल्वे इंजिनातून येणारी ठिणगी हिच्या डब्यात आली. अन्‌ हां हां म्हणता तिच्या रेशमी वस्त्राने पेट घेतला. सर्व डॉक्टरी उपाय विफल झाले आणि सोलापुरातील हॉस्पिटलात तिचा अंत झाला! ‘परिमला प्रागदत्त’, ‘अंत’, ‘अंत’, ‘अंत’ ही अक्षरे चक्री वावटळीप्रमाणे माझ्याभोवती भयंकर गतीनं फिरू लागली. भ्रमिष्टासारखी होऊन मी घरभर फिरू लागले. अन्‌ हतबुद्ध होऊन मला ओक्साबोक्शी रडू आले.

जूनमध्ये शाळा उघडली. शाळेत परिमलाची शोकसभा झाली. खालच्या मानेने, पाय रखडत, एकाकी अशी मी एका बाकावर कोपर्‍यात आजार्‍याप्रमाणे जाऊन बसले. कशातच काही जीव नव्हता - परिमलाचा बाक रिकामा होता-रुसला होता जणू! पारिजातकाच्या फुलासारखा सुगंध देणारी माझी परिमला इथे पुन्हा कधी दिसणार नव्हती. पुन्हा ती माझ्यावर रुसणार नव्हती;  माझ्याशी हसणार खेळणार नव्हती -

सभेत बाईंनी बोलायला सांगितले म्हणून मी उभी राहिले, " मैत्रिणींनो, आपली परिमला आता कशी भेटणार पुन्हा" एवढे कसेबसे म्हणून मी मटकन्‌ खालीच बसले. नियतीच्या या क्रूर विलसिताचे स्मरण झाले की, अंतःकरण फाटून जाईलसे मला वाटते. धिटुकली, लाघवी, गुलाबी गालाची इटुकल्या खळ्यांची परिमला माझ्या मनात गेल्या दोन तपात वेळी अवेळी डोकावते अन्‌ खाणाखुणा करून लडिवाळपणे मला विचारते, "खरं सांग मालती, तू नाही ना मला विसरलीस?  माझी गट्टी नाही ना सोडायचीस कद्धी. खरं ना?  खरं ना?"  

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color