अ – पराजिता पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

अ – पराजिता

            कॉलेजमधले काम संपवून त्या दिवशी घरी जायला मला दीड वाजला. माझ्या घराच्याच वाटेवर आमच्या विद्यार्थिनीचे वसतिगृह आहे. टुमदार आणि हिरव्यागार झाडीत लपलेले.  दुपारी  सामान्यत: तिथे तसे शांत-निवान्तच असते, कारण बहुतेक कन्यका कॉलेजात गेलेल्या असतात. पण त्या दिवशी मात्र तिथे बरीच गजबज दिसली. दोन मोटारी रस्त्यावरच उभ्या होत्या. आणि काही स्त्री-पुरुषमंडळी मोटारी लगत थांबली होती. विद्यार्थिनी गटागटाने आवारातल्या झाडापाशी उभ्या राहून आपापसात कुजबुज दिसल्या. वसतिगृहाची मोलकरीण " कृष्णाबाई" सामानाची हलवाहलव करीत होती. तिकडे काहीजण प्रश्नार्थक नजरेने, पाहात होत्या.

            हे वातावरण, ही गर्दी पाहून माझी समजूत झाली की कोणी तरी विद्यार्थिनी घरी परत निघाली आहे.  म्हणून मी विचारले " काय ग, कृष्णाबाई "  कुणाच सामान भरते आहेस तू ? कोण चाललीय बोर्डिंग सोडून?  तिने हाताने खुण करुन मला बाजूला बोलवून घेतले आणि खालच्या आवाजात सांगितले, “आगरकर" ताईच सामन चाललंय्‌!  बोलताना ती जरा घुटमळली आणि मी पुढे काही विन्चारण्यापूर्वीच म्हणाली, “आपल्या कानावर बातमी न्हाई आली अजून? तिच्या प्रश्नाचा रोख माझ्या ध्यानात आला नाही. म्हणून मी परत प्रश्न केला, “ कसली गं बातमी? कुणा बद्द्लची?  तेव्हा खिन्न होऊन ती म्हणाली, आगरकर बाई देवाघरी गेल्या म्हण, दीड मैन्हा झाला म्हणत्यात. आता सामान न्यायला त्यांचं काका-काकी आल्याती.

            “ अनघा" च्या मृत्यूची बातमी दु:खद तर होतीच पण अतिशय अनपेक्षितही होती. ती ऐकताच तीव्र दु:खाने मन सुन्न होऊन मी जागच्या जागीच खिळल्यासारखी उभी राहिले.

            तसे म्हटले तर अनघा चा आणि माझा सहवास उण्यापुर्‍या वर्षाचाच. पण पहिल्या भेटीतच तिच्याविषयी माझा ग्रह अनुकूल झाला. वर्गात अभ्यासा कडे तिचे नीट लक्ष असे. मधून मधून ती मार्मिक शंकाही विचारी, तिचा बांधा मोहक, रंग स्वच्छ गोरा, नाक तरतरीत व डोळे किंचित निळसर, झाकीचे होते. उंची बेताचीच. कान मात्र किंचित्‌ पुढे झुकल्यासारखे दिसत. त्यात बहुधा सोन्याच्या रिंग्ज्‌ असत. ओठ पातळ, नाजूक पण त्याचा रंग मात्र बराच काळसर बाटे. अंगलटीने ती कृशच म्हणायला हवी. आपल्या कुरळ्या केसांच्या दोन चिमुकल्या वेण्या ती पाठीवर सोडी, त्यावर कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूला सुंगधी, नाजूक फुलांचा गजरा घातलेला असे.  अंगावरची साडी आकाशी,लिंबोणी अशा मंद रंगाची असे. पोलके नेहमी परी्टघडीचे नि पांढरेशुभ्र असायचे. ते एखादेवेळी बंद गळ्याचे पण बहुधा ओपन कॉलरचे त्यातून ए या इंग्रजी अक्षराचे लॉकेट घातलेली सोन्याची साखळी चमचमायची. पायात मोजे आणि सॅडल्स, डोळ्यात आणि चेहर्‍यावर बघावे तेव्हा आनंदाचे हसरे चांदणे नाचायचे.

            वस्तिगृहात ती रहायला येऊन थोडे दिवस झाले तोवर गणपती उत्सव आला. विद्यार्थिनींच्या उत्साहाला आनंदाला त्यावेळी जणू उधाण यायचे. गणपतीची शोभिवंत आरास, मोदक, करम्णुकीचे कार्यक्रम हे सारे अरण्यात त्या अगदी बुडून जात. त्यांच्या मेट्रन प्रा. लीलाताईही हौशी आणि कष्टाळू- मग काय विचारता? उत्सवाच्या मुख्य दिवशी आम्हा प्राध्यापकांना तिथे भोजनाचे आमंत्रण असे. रेखीवरांगोळ्या, उदबत्त्यांचा घमघमाट यांच्या संगतीत पक्वान्नाच्या भोजनाला बहार यायची. त्या सोहळ्याची रंगत वाढायची ती विद्यार्थिनींच्या गाण्यांमुळे त्या कार्यक्रमात अनघा ने जयदेवांची अष्टपदी गोड म्हटली, मी तिला हाक मारुन शाबासकी दिली आणि मग म्हटले, “ तू जरा वरच्या पट्टीत म्हणाली असतीस ना आजची अष्टपदी, तर आणखीनच मौज आली असती, त्यावर तीने सांगितले माझ्या फा‌ऽर मनात होतं हो बाई, पण डॉक्टरकाका परवान्गीच देत नाहीत मला - मला वाटले झाली असेल हिला सर्दीबिर्दी म्हणून नसतील देत डॉक्टर परवानगी.

            कॉलेजची पहिली सहामाही संपून दुसरी सुरु झाली, तशी गॅदरिंगची हवा वाढू लागली. मुलामुलींचे खेळाचे सामने सुरु झाले. एक दिवस रिंगटेनीसचा सम्रिश्र सामना होता. हा खेळ माझ्या विषेश आवडीचा असल्याने तो बघायला मुद्दाम गेले. प्रेक्षकांत अनघा ही होतीच खेळ जसजसा रंगू लागला तशी ही दोन्ही पक्षांची विजयश्री आपल्याकडे खेचून घेण्याची एकच धमाल उडली. अनघाचा जीव खेळात गुंतलेला. तिची कॉमेट्री चालली  होती. ती येत होती अधूनमधून कानावर. “ इंद्रायणी" अग पंळ पळऽ.. अस्सं ! वा ऽ वा...प्लेड्‌...अर्रर्र...अगदी थोडक्यात चुकलं ग.. च्‌-च्‌ -भले ऽ...भले ऽ... औट-औट,,,! अशी तिची उतावळी उत्सुकता पाहून मीम्हटले, अहो अनघबाईऽ कोर्टाबाहेर उभं राहून का करता आहात हो तुम्ही फुकट फौजदारी? ती बिचारी इंद्रायणी बघा तरी किती घामाघूम आणि  लालबूंद झाली आहे खेळून ! तिच्या सारखं तुम्हीही उतरा की रणांगणात. म्हणजे तुमचाही पराक्रम पाहू आम्ही. त्यावर अन्घा खूपच लाजली आणि एक मुरका मारुन म्हणाली या वर्षी नाही, पण पुढच्या वर्षी नक्की दाख्वीन हं बाई मी देखील तुम्हाला खेळून ! सध्या डॉक्टर काकानीच बंदी केलीय्‌ ना मला खेळायला ! तिचे उत्तर ऐकून मी जरा नाराजीनेच म्हटले, दरवेळी ग काय तू डॉक्टरांची सबब सांगतेस अशी? त्यावर खरेतेच सांगतेय्‌ मी असे त्रोट्क उत्तर देऊन ती लगबगीने मैत्रिणीबरोबर निघून गेली.

            तिच्या उत्तराने मात्र माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. हुरहुरही वाटत राहिली.

            त्या वर्षीच्या श्रावणातलीच गोष्ट. पावसाने सकाळपासून धार धरली होती. रविवार होता, वेळ संध्याकाळची. बाहेर तर कुठे पडायला येईना. म्हणून पुस्तकांचे कपाट उघडून नवी पुस्तके  बघत होते बाचायला, तेवढ्यात अनघा समोर येऊन उभी. तिच्या हातातल्या रेशमी रुमालात  मंद पिवळ्या रंगाची सोनचाफी आणि टपोर्‍या जाईचा गजरा होता. तो रुमालच माझ्या हातावर ओतीत ती म्हणाली, “ आमच्या मेट्रन म्हणाल्या, तुम्हाला ही दोन्ही फुलं फाऽर आवडतात. आमच्या आजोळी खूप येतात ही.मी गेले होते ना आज गावात तिकडे? तिथून येताना मुद्दाम आणली आहेत तुमच्यासाठी. पीन आहे का हाताशी? नाही तर माझ्याकडे आहे. तिच्यात अडकवन घालते तुमच्या केसावर. घालू ऽ...? तिच्या प्रेमाने माझा जीव संकोचून गेला -

            अशी ही लडिवाळ- गुणी आणि रसिक कन्या. विद्यार्थिनी असून मैत्रीण वाटणारी.

            तिचे आईवडील दूर कलकत्त्याला असत. वडील बडे सरकारी अधिकारी. त्यांची नौकरी फिरतीची, अनघा आणि अतुल अशी त्यांची दोन मुले. दोघही आईबापांची लाडकी. इतरांनाही हवीहवीशी वाटणारी. तिच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये व घरची देखरेखही असावी म्हणून सांगलीला - तिच्या आजोळच्या गावी - शिक्षणासाठी तिला आईवडिलांनी ठेवले. कॉलेजात ती रुळली. रमलीही लौकर. पहिल्याच वर्षाच्या परीक्षेत तिने उत्तम गुण मिळवले म्हणून मी तिला अभिनंदनाचे पत्र धाडले. आठ दिवसांत तिचे उत्तर आले. सुट्टीतल्या गंमतीजमती त्यात ‌तिने कळवल्या होत्या आणि म्हट्ले होतेन्‌ " परवा तुम्ही ध्वज्वंदनाला नेसला होतात ना, निळ्या फुलांची पांढरी एम्ब्रायडरीची साडी ? तशीच मीही तयार करते आहे सध्या तिकडे परत येईन ना,तेव्हा दाखवीन तुम्हाला!  पत्राच्या खाली वळणदार, बारीक अक्षरांतली सही होती, आपली, विनीत " अनघा"

            नव्या वर्षासाठी कॉलेज उघडून दीड महिना होत आला तरी हिचा पत्ताच नव्हता. पत्रही नव्ह्ते. काय झाले कळेना, म्हणून तिला पुन्हा पत्र लिहायच्या विचारात मी होते तेवढ्यात अनपेक्षितपणे तिच्या मृत्यूची दुष्ट वार्ता कानांवर पडली काय झाले असेल तिला? कशाने गेली असेल ती? अशा विचारांनी मला चैन पडेना. मी तिच्या आईला सांत्वनाचे पत्र टाकले आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागले.

            या प्रसंगाला बरेच दिवस लोटून गेले कलकत्त्याहून पत्रोत्त्र अजून आलेच नव्हते तेवढ्यात एकदिवस लीलाताईची चिठ्ठी घेऊन " कृष्णाबाईच आली. त्यांनी लिहिले होते, मालूताई, अनघा चे आईवडील सांगलीत आल्याचे कळले,उद्या दुपारी पाच वाजता त्यांना भेटायला जाऊ या काय?  मी होय म्हणून निरोप दिला.

            अनघा च्या आजोबांचा वाडा जुन्या सांगलीत कृष्णा नदीच्या तीरावर होता. आम्ही तिथे पहिल्यांदाच जात होतो तेही अशा दु:खद प्रसंगाने.

            आम्ही घरात शिरतो तो ओट्यावरच वृध्द अशा एक बाई झोपाळ्यावर बसल्या होत्या. आम्हाला पाहताच त्यांनी समोरच्या खुर्च्यावर आम्हाला बसायला सांगितले. पाचसात मिनिटांत आतून अनघाचे आईवडील आले. एखाद्या धुराच्या खोलीत माणूस सापडला म्हणजे त्याचा जीव कसा कोंड्तो-घुसमटतो ना? त्या दोघाना पहाताच आमची तशीच अवस्था झाली. अनघाचे वडील श्रीधरपंत असतील सुमारे पंचेचाळीस एक वर्षाचे पण एकदमच ते वाकल्यासारखे झाले होते. “आशाताई च्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आणि केसांना येऊ लागलेली रुपेरी छटा खूप काही सांगून गेली.

            थोडा वेळ नुसता बसूनच गेला. कुणीतरी बोलायलाहवे म्हणून मीच मग विचारले कधी आलात कलकत्त्याहून?  झाले चार-पाच दिवस – बाहेरच्या तुळशीवृंदावनाकडे नजर टाकीत "आशाताई" म्हणाल्या-

            पुन्हा कांही क्षण व्याकूळ करणारी शांतता -

            कलकत्त्यांत कशांत मनच लागेना. अतुल च्या शाळेलाही दुर्गादेवी च्या सणाची सुट्टी आहे म्हणून पडलो झालं बाहेर" श्रीधरपंतांनी सांगितले. अनघा बद्द्ल तपशिलाने विचारावे असे किती वेळा माझ्या मनात येत होते, पण कसे विचारावे हेच कळेना. तेवढ्यात अनघा च्या आईच सांगू लागल्या, मालूताई. आमच्या अनघा च ऑपरेशन मनासारखं झालं म्हणून आम्ही किती आनंदात होतो... पण कसलं काय ! वाक्य अर्धेच तोडीत त्यांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला.

            आम्ही नको नकोच म्हणत होतो. पण तिचाच फाऽर आग्रह आणि हट्ट ऑपरेशन करायचेच  म्हणून मग तयार झालो. पण – भलतंच होऊन बसलं कांही तरी - ! भावनोत्कटतेने श्रीधरपंत उद्‌गारले.

            हळूहळू त्या दोघांची मने जरा उकलू लागली होती दु:खाला मोकळेपणी बोलून जरा वाट मिळाली तर त्यानाही हवी असावी - कारण मग "आशाताई"च आपण होऊन सांगू लागल्या, लहानपणी काही महिन्यांची असतांना अनघा एकदम कासावीस होऊन रडायला लागायची, तिच्या हातापायांची बोट आणि ओठ काळेनिळे व्हायचे, आम्हालाही लक्षणे बरी वाटली नाहीत. म्हणून पुष्कऽऽळ डॉक्टरांना तिची प्रकृती दाखवली. सगळ्यांचं म्हणणं एकच " हिच्या हृदयात दोष आहे ! ते कळल्यापासून फार जपून जपून वाढवलं बघा आम्ही तिला पण तीनचार वर्षाची झाल्यावर ना ती छान खेळायची, व्यवस्थित खायची-प्यायची, तिची समजशत्त्कीही चांगली तल्लख होती, तेंव्हा आम्हाला साहजिकच वाटायचं की आता वाटेल हिला बरं. पण एकदमच केव्हा तरी तिचा श्वास कोंडायचा, ती घाबरीघुबरी व्हायची तेंव्हा डॉक्टरांनी मुंबईला तिच्या हृदयाचे एक लहानसे ऑपरेशन केले त्यावेळीच ते आम्हाला म्हणाले होते " तुमची मुलगी जरा मोठी म्हणजे सोळा-सतरा वर्षाची झाली ना, म्हणजे आणखी एक ऑपरेशन करायला लागेल ते बरंच मोठ आणि अवघड आहे. पण मला आशा आहे की तुमची छोकरी त्यातून सुरक्षित पार पडेल. “ पण तिला यापैकी कशाची कल्पना तुम्ही दिली होतीत का? आता मात्र माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना.  न देऊन काय करणार सांगा ?  तिला सऽगळ्याची हौस. नाटकांत काम करावं, सतार शिकावी, खेळात भाग घ्यावा, एक ना दोन दर वेळा आम्हाला म्हणायला लागायचं जपून हं अनघा, नाहीतर, हे नाही ग झेपायचं तुला! ती हिरमुसली व्हायची आमचाही जीव अवघडायचा. पण दुसरा ईलाजच काय होता?

            परवा, म्हणजे या ऑपरेशनच्या आधीचा एक प्रसंग सांगते तुम्हाला. एक दिवस सकाळी चहाच्या टेबलावरच अनघा म्हणाली, दादा, आई, एक गंमत दाखवू तुम्हाला? आम्ही होय म्हटलं तशी इंडियन एक्सप्रेस मधलंएक कात्रणच तिनं आमच्यापुढे ठेवलं. त्यात म्हटलं होत ,की हृदयाची ऑपरेशन्स करणारे प्रसिध्द इजिप्तशियन डॉक्टर याकूब भारतात लवकरच येत आहेत, तेव्हा ज्यांना त्यांची भेट हवी असेल त्यांनी पुढे दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा. आम्ही ते वाचलं पण काहीच बोललो नाही. तो विषय त्यावेळी तसाच राहिला. तीन-चार दिवसांनी अनघाने तिच्या वडिलांना विचारलं, दादा, हवा किती छान पडलीय्‌ नाही ऽ? विवेकानंद पार्क वर फिरुन यायचं काय सगळ्यानी? ह्यानाही सवड होती. आम्ही बाहेर पडलो. पार्क च्या एका टोकाला गाडी उभी केली सुरेख हिरवळ बघत बघत एका छानशा जागेवर आम्ही मुक्काम केला. अनघा तर भलतीच खुषीत होती. पायबीय पसरुन ति आरामात अतुल शी खेळत होती. तोंडान गप्पा चालूच होत्या. यात गेला असेल सुमारे अर्धा तास. मग आमच्या जवळ येऊन ती लडिवाळपणे म्हणाली आई, दादा, एक गोष्ट मी मागितली तर द्याल मला? अगदी सहज देता येण्याजोगी आहे. देऊ, म्हणुन सांगा. म्हणजे फोडते माझ्या खिरापतीचे नाव मी, अलीकडे तिला फोटोग्राफी शिकायचा नाद लागला होता. आम्हाला वाटलं  हवा असेल तिला एखादा कॅमेराबिमेरा. म्हणुन हे म्हणाले, कळू दे तरी वस्तूचे नाव. मग सांगू उत्तर आणि देण्याजोगी असली तर देऊच, बघा हं, दादा नाही तर ऐनवेळी शब्द बदलाल. यांनी हसतच उत्तर दिलं. छे,छे.

            मग हळूच तिने सांगितले, एका गोष्टीसाठी परवानगी हवीय्‌ मला तुमची, त्याच्यावर हे पुन्हा म्हणाले, ती ग कशासाठी? कॉलेजच्या पहिल्याच वर्षात भेटला की काय एखादा अनिरुध्द आमच्या अनघाला ?  Heartiest congratulations  हं कळु द्या तरी आम्हाला या अनिरुध्दांची सगळी कथा.

            का कोण जाणे पण यांच्या या बोलण्यावर ती जरा गंभिर झाली आणि म्हणाली तसल कांही नाही दादा पण मला मुंबईला जावसं वाट्तंय. डॉ. याकूबना भेटायला. त्याला द्यालना परवानगी? तेव्हा कुठ आमच्या डोक्यात प्रकाश पडला ती काय म्हणतेय याचा. या वेळीही आम्ही मुकच राहिले मग मात्र ती खट्टू झाली आणि काहीशा भावनावेगानं आम्हाला म्हणाली, खरं सांगा तुम्ही दोघं मला, माणसाला जन्मभर अस दुबळंच ठेवणार जीवन कुणाला तरी हवस वाटत असेल का हो?  माझी ही असली प्रकृती म्हणजे सदैवी  सगळ्यांच्या चिंतेचा विषय !  सगळ्यांच्या आनंदावर त्यापायी नेहमी विरजण. मला याचं किती वाईट वाटतं ते इतराना कसं कळणार? कधीचं तुम्ही म्हाणताय्‌ अतुलला पोहायला शिकवू या, एकदा काश्मीरला जाऊ या पण एक तरी बेत पार पड्लाय का यातला? काहीही करायचं म्हटलं की तुमच्या मनात येत असणार, अनघाला कसं सोसणार हे? होय ना? तिचं बोलणं ऐकताना सारखं वाटत होत, तिला जवळ घ्यावं, पाठीवरुन हात फिरवावा, आणि तिच्याशी चार शब्द बोलावेत पण ती तिच्याच भावनांच्या कल्लोळात बुडाली होती.  दूरवर दिसत असणार्‍या कारंजाच्या पाण्याकडे टक लावून पाहत ती पुढे म्हणाली, असलं पांगळं आणि आयुष्यातल्या सगळ्या सुखांन पारखं करणारं आयुष्य मला मुळीच जगावंसं वाटत नाही. एखाद्या काचेच्या भांड्यासारख, handle always  with care,  असं लेबल लावलेलं ! मनातल्या मनात " प्रत्येकानं म्हणायचं, “ बिच्चारी अनघा" ! छे-मुळीच नको ते ! तुम्हीच नेहमी सांगताना, दुसर्‍याच्या आनंदात गुंजभर भर घाला म्हणजे तुमचं सुख तोळ्यानं वाढलंच म्हणून समजा. मी तसं जगणार आहे, जगून दाखवणार आहे. म्हणून म्हणते, द्या तर मला परवानगी मुंबईला जाण्याची!  नाही तर तुम्हीही चला बरोबर ट्रीप होईल अनायसे तुमची !

            आशाताई बराच वेळ बोलतच होत्या, अनघा चे बोलणे आठवून त्या एकदम गहिवरल्य़ा. त्यांचे डोळे गळू लागले. नाकाचा शेंडा लाल झाला. तो हातरुमालाने पुसत त्यापुढे सांगू लागल्या,  अनघा म्हणाली  सगळ्यांच्या मनातली भीती आहे मला ठाऊक ! ऑपरेशन यशस्वी नाही झालं तर काय करायचं? म्हणुन ते टाळायला बघताय्‌ ना तुम्ही ? पण मी काय म्हणते, असा नकारात्मकच विचार का करायचा आपण ? कशावरुन ऑपरेशन चांगलं होणार नाही? कशावरुन मृत्यू माघारी जाणार नाही? मी छान बरीही होईन ! आणि मग समोरच्या फुलांच्या ताटव्याकडे नजर लावीत ती सांगू लागली. दादा, आई, मी बरी झाले ना म्हणजे वैमानिक होणार हं. मला फार आवडतं ते धाडसी जीवन. उंच उंच निळ्या आकाशात भरारी मारावी, जणू काही आपलं विमान म्हणजे जहाजच एखादं, आकाश-समुद्रात भिरभिरणारं. हळूच ढगांना हात लावून बघावा. सगळी दुनिया पालथी घालावी, अरे काय मजा. अनघा त्या रम्य कल्पनाचित्रात इतकी रमली होतीकी घटकाभर आमचे अस्तित्वच ती विसरली. पळ भरानं भानावर येऊन मग म्हणाली, आई भ्यायचं नाही बरं का, विमानात बसायला काय?

            पंख फुटून उडणार्‍या पाखराचा आनंद तिच्या डोळ्यातून ओसंडत होता. म्हणून म्हणते असं आनंदी आणि निरो‌गी, समर्थ आणि सुंदर आयुष्य जगायची संधी तर द्या आधि मला. मी तुमची मुलगी म्हणून माझ्यावर पहिला हक्क तुमचाच आहे. एकदम कबूल. पण नंतरचा तरी माझा आहे ना? परदेशात तर म्हणे हृदयाच्या ऑपरेशनांचं शास्त्र खूपच पुढ गेलंय्‌  मग हो कशाला एवढ भ्यायच?

            तुम्हाला सांगते लीलाताई, अनघा अशा धैर्याने बोलत होती की एखाद्याला वाटावं आम्ही होतो पेशंट आणि ही होती पालक,जिला आम्ही अजून अजाणच समजत होतो. तिचे हे प्रगल्भ विचार आणि समंजसपण पाहून मी चकित झाले!

            आपल्या शूर मुलीबद्द्ल आशाताईना वाटणारा अभिमान त्या दु:खावेगातही लपला नाही.

            “ हो-नाही करीत आम्ही गेलो एकदाचे मुंबईला. डॉ. याकूबांबरोबर ती त्याच आत्मविश्वासानं आणि सहजपणे बोलली. ऑपरेशनसंबंधी स्रर्व ठरवाठरवी करुन आम्ही निघालो तेव्हा डॉ. याकूब कौतुकाने आम्हाला म्हणाले,  Mr. Agarkar I heartily congratulate you both for having such a brave brilliant daughter. I with her all success”

            हॉस्पिटलमध्ये जायचा दिवस ठरला. त्या दिवशीही ती रोजच्यासारखीच आनंदांत होती. देवाला, घरच्या सर्वाना, तिनं वाकून नमस्कार केला, आमच्या विठू गड्यालाही ती विसरली नाही. नमस्कार करताना अनघा त्याला म्हणाली, बर का विठूबाबा, मी हॉस्पिट्लमधून परत येणार ना, ती अगदी " सहृदय बनून हं" त्याचे डोळे भिजले ते पुसत तो म्हणाला. औक्षवंत व्हा, ताई"-

            ऑपरेशन नीट पार पडलं. आमची आशा पलवली. डॉक्टरांनी सांगितलं पहिले अठ्ठेचाळीस तास विशेष काळजीचे असतात. त्यापैकी पहिले चाळीसबेचाळीस तास या मानाने पुष्कळच निर्विघ्नपणे पार पडले. मी मनात सतत रामरक्षा म्हणत होते. किती वाटत होतं....आशातईना आता मात्र पुढे बोलणेच अशक्य झाले.

            श्रीधरपंतांनी उठून त्यांना भांडंभर पाणी दिलं आणि थोडा वेळ तेही गप्पच राहिले. माझे मन पुढची हकिकत जाणायला फार अधीर झाले होते. ते जाणवून असेल कदाचित्‌ श्रीधरपंतांनी पुढची हकिकत पुरी केलीच.

            “अनघा" होती इमर्जन्सी वॉर्ड्मध्ये. तिथं कमालीची शांतता-क्षणाक्षणाला तिच्या प्रकृतीवर डॉक्टरांची, स्पेशल नर्सची देखरेख होती. इतरांना तिथं जायलाही मज्जाव. अगदी आईवडिलांनादेखील.खोलीला लागून लांब कॉरिडॉर होता. त्याच्या टोकाशी आलोचन जाग्रणं अरीत आम्ही बसून होतो. अनघाच्या आईनं तर दोन दिवसांत पाण्याचा थेंबही घातला नव्हता तोंडात. बहुतेक वेळ अनघा औषधांच्या गुंगीतच असे पण तिची नर्स नंतर सांगत होती, केव्हातरी मिनिट्‌ दीड मिनिट ती डोळे उघडी. त्यावेळी मला भास होई की ती किंचित हसते आहे की काय ! हे ऐकल्यावर मला वाटलं, खरंच का ती हसत असेल? कांही सांगायच होतं की काय तिला? बहुधा ती म्हणत असेल कायऽय दादा, हरवलं की नाही मी मरणाला? उगीचच भीत होता तुम्ही. आता काय होईन मी महिन्याभरांत छान बरी ! मग जगाचा फेरफटका करायचा आहे विमानानं. विसरला नाही ना?

            पुढचं काय सांगू तुम्हाला? शेवटच्या पाच-सहा तासांतच तिच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. रक्तप्रवाहाच्या कामात अडथळा होऊ लागला. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीपण कशाचाच काही उपयोग झाला नाही. अनघा आम्हाला सोडून गेली-आता उरल्या केवळ आठवणी श्रीधरपंत सद्‌गदित झाले. त्यांचा कापरा आवाज मनाला कापीत गेला. आशाताईनी बराच वेळ आवरलेला हुंदका एकदम फुटला -    

            आम्ही दोघी घरी यायला चाललो. किती तरी वेळ न बोलताच आम्ही रस्ता कापीत होतो. वसतिगृहाचे दिवे दुरुन दिसू लागले. जड मनाने लीलाताई म्हणाल्या, सारंच अघटित झालं म्हणायच. नाही का? मी मान डोलवली आणि एक दीर्घ श्वास घेत म्हटलं, जे घडलं त्याचा विचार करु लागलं म्हणजे माझ्या मनात येते, शारीरदृष्ट्या मृत्युनं अनघाला जिकलं, पण ज्या असामान् धैर्यानं तिने मृत्यूचा विचार केला, त्याला सामोरी गेली, ते पहिले म्हणजे वाटतं ही शर्यत अनघानंच जिंकली. कारण माणूस जगतो यापेक्षा तो मृत्यूचे स्वागत कसे करतो यावरच त्याची खरी योग्यता ठरते. त्यादृष्टीनं पाहिले तर अनघाला अ-पराजिता म्हणायला हवं. हो की नाही?

     

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color