काही आठवणी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

काही आठवणी - कधी हसू कधी आसू

आम्हा प्राध्यापक-शिक्षक यांच्या जीवनातली खरी श्रीमंती म्हणजे आनंदी, उत्साहाने ओसंडणार्‍या, आशावादी, गुणी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहवास! त्यांच्या सहवासात आमच्या दुःखाच्या कडा बोथट होतात आणि स्वतःचे वय विसरून आम्हीही त्यांच्यासारखेच बनतो. पुष्कळदा त्यांचे विश्वासू मित्र/मैत्रिणीदेखील होऊन जातो. आपल्या गुरुजनांबद्दल त्यांच्या मनातला श्रद्धाभाव आदर, प्रेम यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. त्याने मन भरून येते. कधी-कधी प्रेमाने वा अनवधानाने ते जे बोलतात त्याने गमतीदार प्रसंग उद्‌भवतात. अशाच काही आठवणीतून मारलेली ही एक छॊटीशी सहल!

सुमारे पस्तीस चाळीस वषापूर्वीची गोष्ट! रात्री साडेआठ- नऊच्या सुमाराला श्रीराम नावाचा एक सुरेख अभिनय करणारा व छानच गाणे म्हणणारा विद्यार्थी दारात येऊन उभा राहिला. त्यावर्षी स्नेहसंमेलनाच्या ‘करमणूक’ समितीचे काम माझ्याकडे होते त्यामुळे बर्‍याचदा तो घरी येत असे. मनमोकळा, सरळ आणि लाघवी स्वभावाचा. "आता काय काम काढलेस?" असे मी म्हटल्यावर त्याने काहीशा संकोचाने, "बाई, काम थोडे खाजगी आहे", असे उत्तर दिले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा-गोष्टीनंतर त्याने आपले मन खुले केले. त्याचा मतितार्थ असा की, त्याच्या घराजवळ राहणार्‍या एका सुस्वरूप, हसर्‍या आणि त्याच्यासारखाच अभिनय आणि गायन यात उत्तम गती असणार्‍या ‘कुमुद’ नावाच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे लग्न एका प्रसिद्ध लेखिकेच्या मुलाशी ठरले होते. पण त्या चिरंजीवांची ‘लैला’ कोणी परजातीय होती व ते त्याने नोकरीच्या गावी परतल्यावर आपल्या आई-वडिलांना कळविले. सर्वांचाच स्वाभाविकच विरस झाला. लग्न मोडले. तिचे वडील एखादा चांगला मुलगा ‘कुमुद’साठी पाहायला श्रीरामला सांगत होते. पंचायत अशी झाली होती की, मधल्या काळात त्या दुक्कलीचेच मेतकूट जमले होते. "बाई, हे सगळे माझ्या घरच्या मंडळींना आणि तिच्या वडिलांना मी कसे सांगू? ते काम तुम्ही कराल का? तुमची माझ्यावर फार माया आहे म्हणून मी फार आशेने तुम्हाला विनंती करायला आलो." श्रीराम म्हणाला. मी हसून त्याला म्हटले, "तुझ्या या रहस्यकथेत तू मला मोठेच जबाबदारीचे काम दिले आहेस हं. मी ते अवश्य करीन." स्वारी खूष होऊन गुलाबजामून खाऊन निर्धास्तपणे घरी परतली. यथाकाल ते लग्न झाले व त्यांचा संसार नातवांना खेळवत छान चालला आहे. कलेच्या क्षेत्रात तर मोठेच नाव दोघांनीही मिळवले.

दुसर्‍या एका प्रसंगात आपल्या ‘प्रेयसी’ला मी रात्रभर लपवून ठेवावे आणि सकाळी येऊन तथाकथित भावी नवरदेव तिला तेथून घेऊन बंगळूरला जाणार होते. तिथे चतुर्भुज होण्याचा त्यांचा मानस होता. दोघांची जात वेगळी, शिक्षण अपूर्ण, वये अज्ञान त्यामुळे दोन्ही घरचा विरोध होता म्हणून हे कारस्थान त्यांनी रचलेले! त्यांना ठामपणे पण गोड शब्दात मी नकार दिला. कमालीच्या निराशेने तो परतला. प्रेम करणे यात मुळीच पाप नाही असे प्रेमकाव्य शिकवताना मी सांगत असे. म्हणून मी एवढी ‘लपाछपी’ करावी अशी विनंती तो मला पुन्हा पुन्हा करीत होता.

आणखी एका वेळी नाशिकच्या एका शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचे अध्यक्षपद माझ्याकडे आले असताना तिथल्या (माझ्या हाताखाली शिकलेल्या व आता तेथे शिक्षिका झालेल्या) कन्यकेने माझा परिचय करून देताना बाईंच्या भरभर बोलण्याने प्रेमाने आम्ही त्यांना ‘डेक्कनक्वीन’ म्हणायचो असे सांगताच मला व श्रोत्यांना हसू आवरणे कठीण झाले.

अशा गमतीदार प्रसंगाप्रमाणे मनाला न विसरता येणार्‍या आठवणीही असतात. ‘अनुराधा’ ही पदव्युत्तर, अतिशय बुद्धिमान, सुस्वरूप व विनयशील सुकन्या एक दिवस ऎन एप्रिल महिन्यात गव्हाच्या खिरीचे पातेले हातात घेऊन उन्हाने लालेलाल झालेली, घरच्या पोशाखातच माझ्याकडे आली. ती उत्तम खीर तिने कमालीच्या आग्रहाने मला खाऊ घातली. हे सर्व कशासाठी? असे विचारताच म्हणाली, "तुम्ही एंजिओप्लास्टी करून घेण्यासाटी पुण्यात गेलात. तुम्हाला लवकर बरे वाटावे म्हणून मी सोळा सोमवार केले. त्याचे आज उद्यापन झाले." तिच्या या शब्दांनी माझा गळा दाटून आला. घास तोंडातच राहिला. प्रेमभराने कृतज्ञतेने तिला जवळ घेऊन थोपटताना दोघींचेही डोळे वाहात होते. आज माझी अनुराधा या जगात नाही, पण सदैव माझ्या हृदयात आहे. अशी ही आमची मुले-मुली त्यांना कसे विसरावे?    

 

  

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color