स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow सेवाव्रती गंगुताई मुंडरगी
सेवाव्रती गंगुताई मुंडरगी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

सेवाव्रती गंगुताई मुंडरगी

पुणे - किर्लोस्करवाडी प्रवास मी अनेकवार केला असला, तरी सुमारे चाळीस वर्षापूर्वी केलेला एक प्रवास माझ्या मनात अगदी खोलवर घर करुन बसला आहे. दुपारची साडेबाराची एक्स्प्रेस, बायकांचा सेकंडक्लासचा डबा ठिच्चून भरलेला. त्यात काही ऍग्लोइंडियन मडमांनी इतरांची पर्वा न करता छानपैकी ताणून दिलेली. त्यांच्या बाकाशेजारीच सडसडीत बांध्यांची, उभट चेहर्‍याची, उजळ वर्णाची, रुंद कपाळ असलेल्या पस्तीशीच्या एक बाई आपल्या तीन-चार वर्षाच्या गोर्‍यापान देखण्या मुलाचं बोट धरुन उभ्या होत्या.

त्या चांगल्या सधन घरातल्या असाव्यात, हे त्यांच्या अंगाखांद्यावरील घसघशीत, सोन्या-मोत्यांच्या दागिन्यांवरुन आणि उंची कपड्यांवरुन सहज लक्षात येत होते. त्यांच्या नाकातली चमकी तर खुलूनच दिसत होती. जांभळ्या रंगाचे जरीचे लुगडे त्या पुढे ओचे सोडून नेसल्या होत्या, त्यावर पांढर्‍या चौकडीच्या कापडाचा पोलका होता. आपल्या लांब केसांचा अंबाडा मानेपासून किंचित वर बांधून त्यावर फुलांचा गजरा त्यांनी माळला होता. त्या आपल्या मार्दवपूर्ण शब्दात, बसायला थोडीशी जागा देण्याबद्दल त्या झगेवाल्या मडमांना पुन: पुन्हा विनवत होत्या. त्यांच्या शब्दोच्चारांवर कन्नड भाषेची छाप होती. त्या मडमांनी त्यांच्या विनंतीकडे ढिम्म लक्ष दिलं नाही. मग जागा देण्याचं दूरच राहिलं. मी ज्युनियर बी. ए. च्या वर्गातली विद्यार्थिनी, ते दृश्य पाहून मला भारी राग आला. तरतरा पुढे होऊन मी त्या बायांना माझ्या भल्याबुर्‍या इंग्रजीत बरेच काही ऐकवलं, तेव्हा कुठं त्या बाईंना बसायला जागा मिळाली.

सौ. गंगुताई मुंडरगी यांची अन्‌ माझी पहिली भेट झाली ती ही अशी. पुढच्या प्रवासात गंगुताईनी आपल्या अगत्यशील अन‍ प्रेमळ स्वभावानं माझ्यावर अशी काही जादू केली, की मी जणू काही त्यांची आप्तच बनून गेले. गंगुताईचा स्वभावच असा रत्नागितीच्या हापूस आंब्यासारखा गोड! ज्याला भेटतील त्याला आपलंसं करुन टाकतील. आपल्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाला आग्रहानं, देशस्थी औदार्यानं, ओतप्रोत खाऊ पिऊ घलाणं हा त्यांचा सर्वात आनंदाचा विषय. डॉ. राजेद्रप्रसाद, सानेगुरुजी, बॅ. नाथ पै, डॉ. मुंजे, सरोजिनी नायडू अशासारखी थोर थोर मंडळीही त्यांच्या आदरातिथ्यातून सुटली नाहीत. यातला एक गंमतीदार किस्सा सांगण्यासारखा आहे. गंगुताईच्या घरी एकदा बालगंधर्व नाटक कंपनीचा मुक्काम होता. त्या सगळ्या मंडळींना पुरणपोळीचं जेवण आग्रह करकरुन वाढण्यात आलं. रात्री ‘मानापमान’ च्या प्रयोगाला आलेली मंडळी, भामिनीच्या (गंधर्वांच्या) गळ्यातून बाहेर पडणार्‍या सुरेल ताना ऐकण्याऐवजी तिचा अनावर खोकलाच ऐकू लागली. गंगुताईकडचा तूप-पोळीचा आग्रह गंधर्वांना बाधला, हे प्रेक्षकांना लागलीच समजलं. बॅ. नाथ पै तर रात्री दोन-तीन वाजतादेखील बरोबर दहा-वीस कार्यकर्ते घेऊन गंगूताईच्या घरी खुशाल येत. ते नेहमी म्हणायचे, “मावशी, तुमच्या हातात द्रौपदीची थाळी आहे!” कारण गंगुताई अर्ध्या रात्रीदेखील स्वयंपाक करुन या मंडळीना खाऊ घालायच्या.

सारा बेळगांव जिल्हा गंगुताईना ‘मावशी ’ या लाडक्या नावानंच ओळखतो. हे अनुरुप नाव त्यांना  सानेगुरुजींनी दिलं. पंचक्रोशीतल्या अनेक अनाथ पोरीना गंगुताईंनी माया ममतेनं हृदयाशी धरलं, दिलासा दिला. सानेगुरुजींनी हे स्वत: पाहिलं. तेव्हां ते गहिवरुन म्हणाले, “माय मरो-मावशी जगो" याचा साक्षात प्रत्यय मी तुमच्या इथं घेतला.  म्हणूनच असेल कदाचित, गंगुताईंच्या गावातले लोक कौतुकानं म्हणतात.  “गंगुताईंचं घर म्हणजे अनेकांच माहेर आहे.”

गंगुताईंचा पिंड जन्मजात समाजसेविकेचा, समाजसेवेच्या कार्यातील इतकी क्षेत्र  त्यांनी हाताळली आहेत, की ती पाहून मन थक्क होऊन जावं. त्यांनी आपल्या गावात, म्हणजे चिकोडीतच नव्हे, तर आसपासच्या खेड्यापाड्यातूनही बालशिक्षणाचा अन स्त्रीशिक्षणाचा मोठ्या हिरिरीनं प्रसार केला. स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं म्हणून ठिकठिकाणी शिवणकामाचे वर्ग सुरु केले. कृत्रिम फुलं, मेणबत्या, खडू इत्यादी वस्तू बनवण्याचे वर्ग सुरु केले. या वर्गांचा फायदा त्या भागातल्या हजारो स्त्रियांना झाला अन त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या.

स्त्री-मुक्तीच्या कल्पना कागदावरच रेंगाळत होत्या. त्या काळात गंगुताईंनी अशिक्षित आणि अडाणी स्त्रियांना स्वावलंबनाचे अन स्वाभिमानाचे धडे दिले. स्वत:च्या खर्चानं प्रवास करुन त्यांनी ठिकठिकाणी स्त्री - जागृतीच काम केलं. चूल आणि मूल यापलीकडे स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला जेव्हा वाव नव्हता, त्या काळात गंगुताईनी स्त्रियांच्या सर्वांगीण उन्न्तीसाठी किती कष्टावं,  किती राबावं?

चिकोडीच्या म्युनिसिपालिटीतून निवडून येऊन सरपंच होणार्‍या गंगुताई या पहिल्या महिला. त्यांच्या निरपेक्ष समाजसेवेची ही पावती होती. गावावर दुष्काळाचं सावट आलेलं असताना या बाईंनी  ‘बजेट संपलं’ म्हणून स्वस्थ न बसता, आपली पदरमोड करुन गोरगरिबांना अंबील, दूध अन कपडे वाटले. स्पृश्यास्पृश्यतेचे नियम समाज कटाक्षानं पाळत होत्या. त्या दिवसांत ही बाई महार-मांग वाड्यात जाऊन उपाशी - वनवासी लोकांना पोटाशी धरत होती. “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे,”  हे त्यांच्या जीवनगीताचं पालुपद आहे.

सरपंच म्हणून फेरनिवड झाल्यानंतर गंगुताईंनी गावातल्या ओढ्यावर पूल बांधून घेतला. यामागे हेतू होता, चिकोडीतल्या भाविकांना पावसाळ्यातसुद्धा देवाचं दर्शन घडावं हा. ओढ्यावर असलेल्या दत्ताच्या या देवालयाला पावसाळ्यात जाणं अशक्य होऊन बसायचं. एवढंच करुन त्या थांबल्या नाहीत, तर गावात स्वच्छ्ता राहावी म्हणून गटारं बांधून घेतली, रस्ते दुरुस्त करुन घेतले, ठिकठिकाणी औदुंबराची झाडं लावली.

गंगुताईंची दत्तभक्ती जगावेगळी. नृसिंहवाडीच्या वार्‍या त्यांनी किती केल्या असतील ते एक त्या दत्तात्रयालाच ठाऊक! देवभक्तीच्या जोडीला संत-महात्म्यांच्या सेवेचंही त्यांना वेड होत. कर्नाटकातल्या वरदहळ्ळीचे थोर ‘संत श्रीधरस्वामी’ गंगुताईंचं आराध्यदैवत. स्वामींचाही त्यांच्यावर तेवढाच लोभ. स्वामी त्यांना आपली मुलगी मानायचे.

संकेश्वरजवळच्या नेर्ली या छोट्याशा गावात-इनामदारांच्या सधन घराण्यात गंगुताईंचा जन्म झाला; पण त्यांचं बालपण मात्र चिकोडीला त्यांच्या आजोबांच्या घरी गेलं. गंगुताईंचे आजोबा रामचंद्र धोंडो कुलकर्णी म्हणजे मोठा तालेवार, दानशूर अन लोकप्रिय गृहस्थ. या शतकाच्या सुरुवातीस चिकोडीची पहिली इंग्रजी शाळा त्यांनीच सुरु केली.  आजोबांच्या घरी लाडात वाढलेली नात स्वभावानं धीट अन तेजस्वी. मामाबरोबर घोड्यावरुन रपेटीला जाणारी ही त्या काळातली गावातली एकुलती एक मुलगी. तिचं शिक्षण जेमतेम मराठी तीन इयत्ता. तेराव्या वर्षी लग्न होऊन ही सदाप्रसन्न, मायाळू, उदार स्वभावाची सुकन्या डॉ. व्यंकटेश मुंडरगी यांची गृहलक्ष्मी झाली. ईश्वरकृपेने तिला लाभलेला पती उत्साही, बुद्धिमान अन प्रत्येक कार्यात पत्नीला साहाय्य करुन पहाडासारखा तिच्या पाठीशी उभा राहणारा.

या मुंडरगी घराण्याची परंपराही अशीच तेजस्वी. भीमराव मुंडरगी हा शूर अन देशभक्त पुरुष १८५७ च्या बंडात तात्या टोपेंच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजांशी लढलेला आहे. या तेजाचा वारसा या नातसुनेनं पुढं चालवला, उज्ज्वल केला. हुतात्मा भगतसिंगाच्या  बलिदानानं त्यांच्या मनातला राष्ट्रभक्तीचा स्फुल्लिंग चेतवला गेला. दोन लहान मुली पदरात अन तिसर्‍यांदा दिवस गेलेले; पण या कशाचीही पर्वा न करता गंगुताईंनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. निर्दय आणि निष्ठुर इंग्रज कलेक्टरनं सांगितलं पण त्या अवघड अवस्थेतही या  करारी बाईनं ते अमान्य केलं, सारा तालुका निषेधासाठी तुरुंगाच्या दारात धरण धरुन बसला तेंव्हा कुठं बाईची सुटका झाली. स्वातंत्र्यलढ्यात किती भूमिगत कार्यकर्त्यांना या माऊलीनं आश्रय दिला, मायेची ऊब दिली ते केवळ इतिहासपुरुषालाच ज्ञात असणार.

गंगुताईंच जीवनगीत अधिक मधुर व्हायला त्यांच्या घरगुती जिव्हाळ्याच्या अंत:स्फूर्त अन्‌ प्रांजल वक्तृत्वाची खूप मदत व्हायची. समयोचित अभिनयाचीही त्याला जोड असायची. अभ्यासू अन्‌ जिज्ञासू वृत्तीनं त्यांनी जे जे वाचन केले, मग ते आध्यात्मिक असो वा ललित साहित्य असो, त्यातील जे काही चांगल आहे, भलं आहे, ते त्यांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळंच त्यांच्या जीवनाला आदर्शाचं  वलय लाभलं.

भारतातल्या महान नेत्यांशी त्यांचा जवळून संबंध आला तो गंगुताईंच्या विविधरंगी, विविधढंगी कार्यामुळंच अस्पृश्यतानिवारण कार्याबद्दल महात्मा गांधीनी त्यांचा जाहीर सभेत मानपत्र देऊन खास गौरव केला, तर गावाच्या वतीनं जवाहरलाल नेहरुचं स्वागत करण्यांचं भाग्य गंगुताईंना लाभल. कमलादेवी चट्टोपाध्याय, सरोजिनी नायडू यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

सुमारे १५ वर्षापूर्वी कर्नाटक शासनानं गंगुताईंचा बालशिक्षणक्षेत्रातला अनुभव लक्षांत घेऊन बालशिक्षण समितीवर त्यांची नेमणूक केली. या शाळांतून कन्नड-मराठी भाषांचा समन्वय कसा साधायचा, याबद्दलची त्यांची मतं शासनाला गंभीरपणे विचारात घ्यावी लागली आहेत. “भाषा हे संघर्षाचं साधन नसून संपर्काचं माध्यम आहे.” हे गंगुताईंनी आपल्या वागणुकीनच लोकांना पटवून दिलं.

आमच्या तीर्थस्वरुप गंगुताईंबद्दल किती लिहावं, किती सांगावं ! आयुष्याच्या उताराच्या काळात अनुरुप पती, पंचकन्या, पुत्र, स्नुषा, नातवंड, पणतवंड, यांच्या कुटुंबमेळाव्यात सुखानं कालक्रमण-करत असतानाही त्यांनी सेवाव्रताची कास सोडली नाही.  अशातच त्यांच्या लखलखीत स्मरणशक्तीवर हळूहळू विस्मरणाचं दाट धुकं पसरु लागलं. अन त्यांच्या समाजकार्यात खंड पडू लागला. त्यांची प्रकृती बिघडतच गेली.

गंगुताई गेल्या .... रेडिओनं, वृत्तपत्रानी ही बातमी आणली अन मलाच नव्हे, तर अनेकांना आपल्या शिरावरचं मातृछत्र हरपल्याचा भास झाला असणार. त्या आमच्यातून गेल्या तरी, आमच्या हृदयात त्यांनी चिरंतन स्थान पटकावलं आहे.

 

  

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color