अंधार फार झाला पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

अंधार फार झाला । पणती जपून ठेवू ॥

सकाळी वर्तमानपत्र हातात आल्यावरच मी कॉफ़ी प्यायला सुरुवात करते; पण गेली काही वर्षे वर्तमानपत्र वाचण्याचे औत्सुक्य झपाटयाने मंदावू लागले आहे. वाटते काय वाचायचे त्यात? पान उघडले की, कुठे तरी झालेला मोटारीचा अपघात, त्याची अंगावर काटा आणणारी छायाचित्रे, गावच्या सरपंचापासून मध्यवर्ती सरकारच्या एखाद्या मंत्र्यापर्यंत भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे, स्त्रियांवरचे वाढते अत्याचार, बलात्कार, हुंडाबळी हे किंवा असलेच काही तरी मनाचा सारा उत्साह थिजवून टाकणारेच वाचायचे ना? त्यात आता अमेरिका-अफ़गाणिस्तान यांनी उभा केलेला युध्दाचा राक्षस! दोन्हीही लांडगेच! त्यामुळे मन काळोखाने दाटून येते, पण अशा वेळीच मनाला क्वचित कुठे कुठे प्रकाशाचा किरण दिसतो आणि तो किरण छोटासा असला तरीही मनाला खूप उभारी देतो.

हाच एक प्रसंग पाहा ना - माझ्या ’पसायदान’ या बंगलीत काम करणार्‍या माळ्याचे नाव आहे प्रकाश! तो भक्कम बांध्याचा, काहीचा स्थूलच! वयाने पस्तीसएक वर्षांचा आहे. रंग गोरेपणाकडे झुकलेला! सकाळी तो कामाला येतानाच आंघोळबिंघोळ आटोपून येतो. त्याने दोन भुवयांमध्ये कधी गंधाचा, कधी बुक्क्याचा टिळा लावलेला असतो, पोशाख साधा. हातधुलाईचा सदरा आणि लेंगा, पायात जाड वहाणा! तो मूळ आहे कोकणातला; पण नोकरीच्या निमित्ताने इकडे सांगलीला आलेला. बोलणे किंचित नाकातून, हेल काढीत असे. ‘कधी येताव गावाकडून परत?’ अशा भाषेतले. वागायला प्रामाणिक. एके दिवशी रोजच्या प्रमाणेच सकाळी मी व्यायामासाठी घरातून बाहेर पडले तेवढयात ‘प्रकाश’च समोरुन आला. मी उत्सुकतेने त्याला विचारले, "काय रे ‘सुनंदा’ बाळंत झाली का? काय झाले? मुलगा की मुलगी?" त्याने उत्तर दिले, "बाई, मुलगी झाली. काल संध्याकाळी झाली."
ही त्याला लागोपाठ झालेली तिसरी मुलगी होती. त्यामुळे त्याचा काहीसा विरस झाला असेल असे माझ्या मनात आले. म्हणून त्याला समजावण्याच्या सुरात मी म्हटले, "अरे झाली तर झाली मुलगी! त्यात काय एवढे? आणि खरं विचारशील तर मला बाई मुलीच आवडतात मुलांपेक्षा ! त्यांना जास्त माया असते. मुलांना काय सोने थोडेच लागलेले असते?"

त्यावर शांतपणे हसून तो म्हणाला, "बाई, सगळं देवाचं देणं! त्याच्याविरुध्द तक्रार कशाला करायची? माझी बायको, पोरं सुखरुप आहेत, त्यांच्यात मी सगळं भरुन पावलो!" त्याच्या या प्रांजळ बोलण्याचे मला खरोखरच कौतुक वाटले. कुठल्याशा खानावळीत दिवसभर काम करुन आपला प्रपंच चालविणारा, जेमतेम दोन यत्ता शिकलेला हा ‘प्रकाश’ ! कुठुन आले असेल एवढे शहाणपण त्याला? त्याचे बोलणे ऐकल्यावर एका श्रीमंत डॉक्टरांची मला आठवण झाली. त्यांनाही ‘प्रकाश’सारख्या लागोपाठ तीन मुलीच झाल्या! तिसरी मुलगीच झाली हे कळल्यावर हे डॉक्टर महाशय दहा दिवस आपल्या पत्नीला आणि मुलीला बघायला हॉस्पिटलकडे एकदाही फ़िरकले नाहीत. त्यांच्या सुविद्य पत्नीला काय वाटले असेल? मुलगी झाली हा काय तिचा अपराध थोडाच होता? व्यवसायाने ‘डॉक्टर’ असणार्‍याला हे वागणे कितपत शोभले? मुलगा होत नाही म्हणून बायकोला टाकून देणारे लोकही या डॉक्टरांइतकेच शहाणे (?) असतात. ही माणसे आणि डॉक्टर यांच्यापेक्षा आमचा ‘प्रकाश’ माणूस म्हणून मला कितीतरी अधिक सुसंस्कृत वाटला.

याचीच दुसरी एक आठवण आहे. घरात थोडी शिळी भाकरी, पोळी राहिली होती. त्याचे तुकडे मी अंगणातल्या अळूच्या खाचरात टाकले. दोन दिवसांनी ते तुकडे तिथेच पडलेले बघून मी ‘प्रकाश’ला ते केरात टाकून द्यायला सांगितले. त्यावर तो गप्पच उभा राहिला. माझ्याशी बोलावे की नाही, अशा विचारात तो असावा. जरा वेळाने त्याने मला विचारले, "बाई, अन्नाला ‘देव’ म्हणतो ना आपण? मग ते भाकरीचे तुकडे केरात कसे टाकू?" त्याच्या बोलण्याने मी मनातल्या मनात वरमले. मला वाटले, लहान बोर्डिंगात आपण हिंगण्याला शाळेत शिकत होतो तेव्हापासून "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे" हा श्लोक जेवताना रोज म्हणत आलो; पण ‘प्रकाश’च्या आजच्या बोलण्याने-वागण्याने ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ म्हणजे काय याचा खरा अर्थ आपल्याला समजला. तसा पूर्वी कधीच समजला नव्हता. लग्ना-मुंजीत लोकांना खूप आग्रह करणारे, वाढणारे लोक आपण पाहतो. ते अन्न पानात नि:संकोचपणे टाकून देणारे, एवढेच नव्हे; तर टाकलेल्या जिलब्यांची बढाई मारणारे लोकही खूप आढळतात. त्या पार्श्वभूमीवर ‘प्रकाश’ हा एक साधा, खेडूत माणूस आपल्या हातून चुकूनदेखील अन्नाची अवहेलना होऊ नये म्हणून किती जपतो याचे मला फ़ार महत्व वाटले. मी मोकळेपणाने त्याला म्हटले, "खरं आहे तू म्हणतोस ते. पुन्हा नाही हं मी अशी चूक करणार." अन्नाला परब्रह्म मानण्याचा ‘प्रकाश’च्या मनात खोल रुजलेला संस्कार मला शंभर नंबरी सोन्याएवढाच मोलाचा वाटला. त्याच्या वागण्याने माझ्या मनातला काळोख काही काळ का असेना दूर झाला. जगाच्या दृष्टीने निष्कांचन असलेला ‘प्रकाश’ मला मनाने खरा ‘श्रीमंत’ आहे हे जाणवून फ़ार समाधान झाले.

(कै.) तात्यासाहेब शिरवाडकर म्हणजेच कविराज कुसुमाग्रज हे माझ्याप्रमाणेच हजारो माणसांचे एक वंद्य असे श्रध्दास्थान! मुलायम मनाचे एक तेजस्वी उत्तुंग व्यक्तिमत्व! एकदा त्यांना भेटायला म्हणून माझा एक तरुण सहकारी ‘अविनाश’ नाशिकला गेला. तो इंग्रजीचा उत्तम प्राध्यापक आहे. स्टेशनवर उतरल्यावर त्याने आपल्याला तात्यासाहेबांकडे जायचे आहे, असे रिक्षावाल्याला सांगितले. त्यांचे घर आल्यावर तो उतरला आणि रिक्षावाल्याला त्याचे भाडे देऊ लागला. तेव्हा रिक्षावाला ‘अविनाश’ला म्हणाला, "राहू द्यात साहेब तुमचे पैसे तुमच्याजवळच." ‘अविनाश’ला तो असे का सांगतो आहे ते कळेना. कारण त्याने हिशेबाप्रमाणे बरोबरच पैसे देऊ केले होते. त्याची अवस्था रिक्षावाल्याला लक्षात आली. म्हणून तो रिक्षावाला म्हणाला, "साहेब, तात्यासाहेबांसारखे देवमाणूस हे आमच्या गावाचे भूषण आहे. ती भगवंताची कृपाच आहे म्हणतो आम्ही! तुम्ही त्यांच्याकडे आलेले त्यांचे पै-पाहूणे, लांबून आलेले! तुम्हाला बी आम्ही त्यांच्यासारखेच मानतो. तात्यासाहेबांसारख्या थोर माणसाची आपून बी काही तरी सेवा करावी, असं मला लई वाटतं! त्यांचे योग्यता फ़ार मोठी. त्यात मला चार यत्ता बी न शिकलेल्याला काय कळणार? म्हणून मी ठरवलं आहे, त्यांच्याकडे येणार्‍या पाहुण्यांकडून गाडीभाडं घ्यायचं नाही! तेवढीच आपली सेवा त्यांच्याकडे रुजू झाली असे मानू!" त्या रिक्षावाल्याचे बोलण्याचे अविनाशला फार कौतुक वाटले. तो रिक्षावाल्याशी पुन्हा काली बोलणार तेवढ्यात तो आपली रिक्षा घेऊन परतीचा रस्ता चालू लागला होता. ‘अविनाश’ मला म्हणाला, "मालूताई, त्या रिक्षाचे रंगरुप पाहता त्या रिक्षावाल्याची मिळकत काही विशेष असेल असे मला वाटले नाही. पण त्याची दानत मात्र खरोखरीच वाखाणण्याजोगी होती हं."

‘अविनाश’ला मी म्हटले, "अरे, समाजात देणग्या देणारी माणसे असतात, पण त्यांच्यापैकी बहुतेकजण नानाविध अटी घालतात, अगदी भरपूर शिकलेलेही लोक याला अपवाद नसतात. असलेच तर फार क्वचितच! त्यांच्याशी या रिक्षेवाल्याची तुलना करुन बघ म्हणजे ‘माणूस’ म्हणून कोण खुजे असते किंवा उंच असते ते तुला कळेल." सतत पडणार्‍या पावसाने आपण कंटाळून गेलेलो असतो, त्यावेळी अचानकच तो पाऊस थांबला आणि लख्ख ऊन पडले म्हणजे किती आनंद होतो आपल्याला! रिक्षेवाल्याच्या ‘दानती’ने माझ्या मनातल्या अंधारात स्वच्छ उन्हाच्या प्रकाशाची एक पणती पेटली.

व्यासंगी, विद्वान, प्रसिध्द विचारवंत, पट्‍टीचे वक्ते प्राचार्य नरहर कुरुंदकर हे एका संगीत समारोहाच्या उद्‍घाटनासाठी औरंगाबादला गेले असता व्यासपीठावरच हृदयाच्या तीव्र झटक्याने कालवश झाले. ते आम्हा भावंडांचे जिव्हाळ्याचे मित्र! त्यांच्या मृत्युपूर्वीच चार-पाचच दिवस आधी एका समारंभात त्यांची-माझी पुण्यात भेट झाली होती. गप्पाटप्पा, हास्यविनोदात मजेत वेळ गेला होता. त्यांच्या आठवणी मनात रेंगाळत होत्या तेवढयातच ते देवाघरी गेल्याचे कळले! त्या वार्तेने आम्ही भावंडे अगदी सुन्न होऊन गेलो. कुरुंदकर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जाणे आमचे कर्तव्यच होते. मी सांगलीला परतल्यावर, कुरुंदकरांचे एक स्नेही आणि मी नांदेडला गेलो. त्यांना जाऊन त्यावेळी आठ-दहा दिवस होऊन गेले होते. तरीही सर्व शहरावर दुःखाची गडद सावली असल्याचे जाणवत होते. ‘सांगली-नांदेड’ रटाळ कंटाळवाणा प्रवास करुन शरीर थकले होते. मन तर उदास होतेच. एका हॊटेलात उतरुन सकाळचे आन्हिक आवरुन आम्ही कुरुंदकरांच्या घरी गेलो. त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यावर सर्वांनाच दुःखावेग अनावर झाला. थोडा वेळ तेथे घालवून आम्ही परतलो; तेव्हा दुपारचा दीड वाजून गेला होता. जेवणा-खाण्याची मुळीच इच्छा नव्हती; पण संध्याकाळीच आम्हाला परतीच्या प्रवासासाठी निघणे आवश्यक होते. म्हणून पोटात काही तरी घालणे जरुरीचे होते. आम्ही एका टेबलाजवळ येऊन बसलो.

तेवढयात सुमारे दहा वर्षाचा एक मुलगा समोरुन आला आणि ‘काय आणू साहेब खायला ?’ असे त्याने विचारले. त्याचे मळके कपडे व खांद्यावरचा फडका यावरुन तो हॉटेलबॉय होता हे आम्ही जाणले. टेबलावर काही वर्तमानपत्रे पडली होती. त्यात कुरुंदकरांचे फोटो होते, त्यांच्यासंबंधीचे लेख होते. आम्ही खिन्न मनाने ते सारे पहात होतो. डोळ्यातले पाणी पुसत एकमेकांशी काही बोलत कुरुंदकरांच्या आठवणींना उजाळा देत होतो. तो छोकरा पुनःपुन्हा आमच्याकडे पाहत होता. त्याने लहानशा थाळीत भात-आमटी असे काही तरी आणून ठेवले. आम्ही कसेबसे चार घास खाल्ले आणि बिलाचे पैसेही दिले. त्या छोकर्‍यालाही काही पैसे देऊ लागलो. त्यावर भावनावेगाने तो म्हणाला, "नको, खरंच मला पैसे नकोत" आणि एकदा आमच्याकडे आणि एकदा कुरुंदकरांच्या वर्तमानपत्रातील फोटोकडे पाहत पुढे म्हणाला, "बाई काय सांगू तुम्हाला? ‘गुरुजी’ म्हणजे आमच्या गावचा ‘राजा’ होते हो. (मराठवाडयात “गुरुजी’ या नावानेच लोक कुरुंदकरांना संबोधत.) तो ‘राजा’च गेला बघा!! बाई, सगळं गाव लोटलं होतं त्यांच्या शेवटच्या यात्रेला. कुणीकुणी म्हणते पन्नास हजारांवर लोकं होती. ‘गुरुजीं’च्या जाण्याने आमचा मराठवाडा अगदी पोरका झाला आता. एका दिवसात आमच्या हॉटेलशेजारच्या फोटोग्राफरकडून शेकडो लोकांनी ‘गुरुजीं’चे फोटो नेले. बाई, सगळ्यांना हवेहवेसे असणारे माणूसच कसे नेमके उचलून नेतो हो देव?" ते पोर बिच्चारे अगदी कळवळून विचारत होते. "तुम्ही त्यांची मित्रमंडळी दिसता. तुमच्याकडून कसे मी पैसे घेऊ? आपलं घरातलं माणूस गेलेलं. तेव्हा हे काही गोड वाटेल का? गुरुजी कुणाकुणा मोठया पाहुण्यांना आमच्या हॉटेलात उतरवायला घेऊन यायचे. त्यामुळे मी त्यांना पुष्कळदा पाहिलेलं होतं. जेवल्यावर ना, त्यांना ‘बनारसी पान’ खायला आवडायचे. ते मी आणून द्यायचो! मला म्हणायचे, "रात्रीच्या शाळेत जात जा. काही अडचण आली तर सांग मला!" क्षणभर त्याला पुढे बोलवेचना. जरा थांबून तो बोलू लागला. "आमचं सगळं गाव दुःखात आहे आणि अशावेळी कोण पैसे घेईल का? म्हणून नकोत मला ते! परत नांदेडला याल; तेव्हा आठवणीने आमच्याच हॊटेलात उतरायला या बरं का? आणि तुमचे काहीही काम सांगा, मी आनंदाने करीन. आमच्या ‘गुरुजीं’चे तुम्ही मित्र! ते मला घरचेच वाटत!" असे म्हणून टेबल स्वच्छ करुन डाव्या हाताच्या बाहीने डोळ्यात जमलेलं पाणी पुसून ते पोर आपल्या कामाला निघून गेले.

कुरुंदकरांना ‘मराठवाडा’ आणि मराठवाडयाला ‘कुरुंदकर’ किती प्रिय होते याबद्दल मी खूप ऐकलेलं होतं. पण या निष्पाप शाळकरी पोराने आमच्या काळजालाच हात घातला. कुरुंदकरांना जाऊन लवकरच वीस वर्षे होतील. पण त्यांच्याप्रमाणेच त्या छोकर्‍यालाही मला अजून विसरता येत नाही! पोर वयाने लहान; पण मनाने मोठे म्हणून मनात एक जागा धरुन राहिलं आहे.

मी अनुभवलेले, ऐकले-पाहिलेले हे काही छोटे छोटे प्रसंग! पण ते प्रसंग मला जगण्याची उभारी देतात. भोवतालचा समाज दिवसेंदिवस अधिक क्रूर, विकृत, विद्रूप होत चालचा असताना निराशेने काळवंडून गेलेल्या माझ्या मनाला प्रकाशकिरणांची भेट पाठवतात. त्या किरणांचा प्रकाश देवघरातल्या निरांजनाच्या प्रकाशासारखाच शांत, सौम्य, मंद पण आश्वासक असतो. तो मला भविष्यातल्या सुखदायी सोनपावलांची दिशा दाखवतो. ‘प्रकाश’, ‘रिक्षावाला’, ‘हॉटेलातला छोकरा’ ही लहान; पण खरी सुसंस्कृत माणसे आजचा अभद्र समाज बदलण्याचे सामर्थ्य आमच्या तरुणांना खचित देतील, असा मला विश्वास वाटतो. या ‘नगण्य’ समजल्या गेलेल्या माणसांच्या विशाल मनांनी मी अंतर्मुख होते. भारताच्या इतिहासातली कितीतरी थोर माणसे माझ्या मनःचक्षुंपुढे उभी राहतात. भगवान श्रीकृष्णांनी आपले पुरुषोत्तमपण बाजूला ठेवून ते अर्जुनाचे सारथी झाले, या घटनेची महती मला कळते. आपल्याला अमरपट्टा देणारी सुवर्णकुंडले कर्णाने पळभरात ब्राह्मणवेषात आलेल्या इंद्राला दिली ही कथा मला त्याच्या उदार चारित्र्याचे सर्वोच्च शिखर वाटते. परधर्मीय शत्रूंच्या देवस्थानांचे पावित्र्य जपणारे शिवाजी महाराज मानवजातीचा श्रेष्ठ अलंकार आहेत. याबद्दल माझा अभिमान सहस्त्रपटींनी गुणित होतो. ज्यांच्या इस्टेटीचे आपण ट्रस्टी आहोत त्यांच्या मळ्यातली भाजी ही देखील त्यांची एक प्रॉपर्टीच आहे. असे मानून ती भाजी न स्वीकारता त्या भाजीच्या टोपलीत आपण मंडईतून विकत आणलेली भाजी घालून ती ‘पंडिता’च्या घरी पाठवणारे निःस्पृह, लोकोत्तर देशभक्त लोकमान्य टिळक मला ‘संतां’ची परंपरा चालवणारे दुसरे ‘संत’च आहेत याची खात्री पटते. त्या सर्वांच्या उज्ज्वल चारित्र्याचा लख्ख प्रकाश माझे अंतःकरण प्रकाशमान करुन टाकतो. ही सारी उत्तुंग व्यक्तिमत्वे आणि त्यांनी दिलेले सु-संस्काराचे पाथेय कधीच संपणारे नाही. या पाथेयाबद्दल त्यांचे कसे व किती ऋणी व्हावे?

आमचा ‘प्रकाश’, ‘हॉटेलातला छोकरा’ इत्यादी सर्व मंडळी उपरिनिर्दिष्ट श्रेष्ठ व्यक्तिमत्वांपुढे फार सामान्य असली तरी तीही या श्रेष्ठींनी दाखविलेल्या मार्गांनीच चालणारे गुणी पाईक आहेत म्हणून त्यांचाही आपण आदर करायला हवा. या श्रेष्ठ जनांचे अमृत सोन्याच्या पात्रांतले असेल आणि आमच्या या सामान्य माणसाच्या हातात मातीची पात्रे-भांडी असतील; पण दोन्हींमध्ये सुसंस्काराचेच अमृत आहे याबद्दल मला तिळमात्र शंका नाही आणि ‘पात्र सोन्याचे असो मृत्तिकेचे । वेड मजला आतल्या अमृताचे’ अशी माझी आवड आहे.

सर्व प्रकारची अनुकूलता आणि सुबत्ता असताना आपल्या ‘जन्मदात्यांना’ घरातली ‘अडगळ’ मानून वृद्धाश्रमात टाकणारी मुले, वाममार्गांनी अमाप सत्ता आणि संपत्ती मिळविण्यात आकंठ बुडालेले निर्लज्ज धनदांडगे, त्यांच्याबरोबर आणि खतरनाक गुन्हेगारांबरोबर बेशरमपणे हातमिळवणी करणारे राजकारणी लोक यांच्या आचरणाने प्रक्षुब्ध झालेले, उद्‍ध्वस्त झालेले माझे मन म्हणते, "कधी तरी लवकरच हा पापांचा अंधार नाहीसा होईल, खचित नाहीसा होईल आणि तो दूर करणारे लोक मुख्यत्वे आमचा प्रकाश माळी, नाशिकचा रिक्षावाला यांच्यासारख्या साध्या माणसांतूनच पुढे येतील. म्हणूनच त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या सामान्य माणसांच्या हातात असलेली सु-संस्काराची पणती आपण जपून ठेवू या!"

मनाला पुनःपुन्हा सांगू या ‘अंधार फार झाला। पणती जपून ठेवू। अंधार फार झाला । एकतरी पणती लावू !’

  

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color