आमची लीला पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

आमची लीला - एक प्रतिभावंत शिक्षणतज्ञ

लीलाताई व माझ्यात सौहर्दाचे एक स्निग्ध नाते जुळले, जमले ते पंधरावीस वर्षांपूर्वी! आमच्या विलिंग्डन महाविद्यालयात नव्या प्राध्यापकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होता त्यासाठी आलेल्या समितीत शिवाजी विद्यापीठातर्फे ‘एक्सपर्ट’ म्हणून ताई आल्या होत्या. ते काम संपवून माझ्या घरी आल्या. गप्पागोष्टी चालल्या असता पोटतिडकीने आणि काहीशा उद्विग्न होऊन मला एकदम म्हणाल्या, "मालूताई, आपली ही प्राध्यापक मंडळी, यांचे वाचन किती कमी असते हो! स्वतःच्या विषयातील नवे ज्ञान, विचारप्रवाह संशोधन यांची जुजबी माहितीही यांना असत नाही. याला काय म्हणावे? हे विद्यार्थ्यांना काय शिकवणार? अभ्यासाची गोडी त्यांना कशी लावणार? कशी त्यांची मने फुलविणार?" त्या अतिशय प्रांजलपणे बोलत होत्या. ती तळमळ माझ्या मनाला भिडली. त्या अनेक वर्षे बी. टी. कॉलेजच्या प्राचार्य होत्या. शिस्तप्रिय, काहीशा कडक पण आपल्या अध्यापनकलेत पारंगत असा त्यांचा सार्थ लौकिक होता. कर्तबगार व सुचरित प्रशासक म्हणून सर्वजण त्यांना मान देत. त्यामुळे प्राध्यापकांच्या अनास्थेने त्या व्यथित होणे स्वाभाविकच होते. 

या घटनेला काही वर्षे होऊन गेली. त्यांचे शिक्षणविषयक वाचन-मनन-चिंतन चालूच होते. त्यातून आणि शिक्षणाकडे पाहण्याच्या त्यांच्या स्वतंत्र दृष्टिकोनातून, अभिनव असे त्यांचे ‘सृजन-आनंद-विद्यालय’ जन्माला आले. त्यांच्या व्यासंगवेलीवर उमललेले ते गोमटे फूल! त्याने अल्पावधीतच अनेकांचे लक्ष वेधून घेतलेल्या त्या आमची आशा, व सहकारी भगिनी या सर्वांनी छॊट्या बालकांसाठी जणू जादूचे एक नवे विश्वच उभे केले. त्यांची बुद्धी आणि कल्पनाशक्ती तेजस्वी व्हावी म्हणून त्यांनी जे विविध प्रयोग, उपक्रम केले ते पाहिले म्हणजे आपणही पुन्हा लहान व्हावे आणि त्या सुरेख शाळेत जाऊन शिकावे असे वाटते. विद्यार्थ्यांच्या नवनवोन्मेषशाली प्रतिभेला, बुद्धीला जागृत करणार्‍या या शाळेने विद्यार्थ्यांचाच नव्हे तर त्यांच्या पालकांचाही निरमय विकास होत आहे. शिक्षण व त्याच्याशी संबंधित असणार्‍या सर्व घटकांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी समाजाला मिळते आहे. शाळेचे ‘नंदनवन’ बनविणार्‍या सृजन-आनंदसारख्या शाळा गावोगावी निघायला हव्यात. या शाळेचे नाव हळूहळू भारतभर पोहोचते आहे. या अपूर्व कामगिरीबद्दल त्यांना स्पेशल सलाम!

लीलाताईंचे लेखन, ते ‘लीलाताईंचे पान’ असो की पुस्तक असो ते मनोवेधक असते. आशय आणि अभिव्यक्तीची एकरूपता, विवेचनाची रेखीव मांडणी, प्रसादपूर्ण, ओघवती डौलदार भाषा असे त्यांचे किती विशेष वर्णावेत? त्यांचे ललितलेखनही अंतःकरणाला भिडते. ‘कोल्हापूर-सकाळ’ मधील त्यांचा आप्पासाहेबांवरचा लेख वाचताना कितीदा तरी माझे डोळे भरून आले!

लेखणीप्रमाणेच वाणीची देवताही त्यांना प्रसन्न आहे. सांगलीच्या कन्या महाविद्यालयातले त्यांचे शिक्षणविषयक व्याख्यान ऎकताना आम्ही श्रोते विलक्षण रंगून गेलो होतो. प्रचलित शिक्षणपद्धतीचे किती मार्मिक आणि परखड विश्लेषण त्यात केले होते! त्याने श्रोते अंतर्मुख न झाले तरच नवल म्हणायचे! चित्तवेधक वाणी-लेखणीची ही ‘वडिलोपार्जित’ दौलत त्यांनी कितीतरी वाढविली आहे. जणू चक्रवाढ व्याजानेच म्हणा! त्यांची भेट झाली की कितीतरी आशयसंपन्न इंग्रजी-मराठी ग्रथांची ओळख होते, विचारांना नवे धुमारे फुटतात, मन सुखावून जाते. आमची दोघींची मते नेहमीच जुळतात असे नाही पण स्वतःची मते त्या ज्या आत्मविश्वासाने मांडतात ते पाहणे हेही एक शिक्षणच असते.


 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color