आनंदयात्री पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

एका ज्ञानवंत आनंदयात्रीचे पुण्यस्मरण

आदरणीय, प्रा. स. वा. कोगेकर सर,
सविनय नमस्कार. तुमच्या नावापुढे कै. हे अक्षर लिहिताना मन फार व्याकुळ होते. तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक होतात. तसेच आमचे एक आदर्श श्रद्धास्थानही होतात. सदैव प्रसन्नपणे हसणारी तुमची गोरी बटु मूर्ती, तुमचे निष्कलंक चारित्र्य, गाढ विद्वत्ता, समर्पित वृत्तीने काम करण्याचा तुमचा स्वभाव अणि तुमच्या वागण्या-बोलण्यातला कमालीचा साधेपणा यांनी कोणीही माणूस फार प्रभावित होई.

१९४२ च्या जूनमध्ये ‘विलिंग्डन’ महाविद्यालयात मी तुम्हाला प्रथम पाहिले. महाविद्यालयाचा तो पहिलाच दिवस होता, आणि पहिलाच तास तुमचा होता, Adaministration  या विषयाचा! पांढरे स्वच्छ धोतर, शर्ट, काळा कोट असा अस्सल महाराष्ट्रीय पोशाख तुमचा आवडता होता. वर्गात येताच तुम्ही चौफेर नजर टाकून खूप छानसे हसलात, त्याचा इतका आनंद व आधार आम्हाला वाटला की महाविद्यालयात एखादे मायाळू, आप्त माणूसच भेटल्यासारखे वाटले. सफाईदार इंग्रजीत Adaministration is a sort of machine असे म्हणत तुम्ही स्टेजवर फेर्‍या घालीत शिकवायला सुरुवात केलीत, तासाचा मुळीच वेळ वाया न घालविता! तुमच्या बारीक, पातळ आवाजाला एक छान नाद होता. अवघड विषय सोपा करून सांगण्य़ाच्या तुमच्या हातोटीने आम्ही तासात रंगून गेलो. वसतिगृहात परतल्यावर तुमचे तोंडभरून वर्णन करून तुमच्या फुगर्‍या गालासकट मी तुमची सहीसही नक्कल करून दाखवली. माझ्या वहिनीच्या मैत्रिणी खोलीत होत्या. त्या हसत होत्या. पण त्यातली एक विशेष देखणी, गोरीपान मुलगी ते सर्व उत्कंठेने पाहत होती, हे मला जाणवले. वहिनी मला म्हणाली, "तू ज्यांची नक्कल केलीस ना आत्ता, त्या तुझ्या सरांशीच या दमयंती मुंदरगीचे लग्न ठरले आहे." त्यावर तिच्या गालवर गुलाबच गुलाब फुलले!

यथाकाल तुमचे लग्न झाले. ते सांगली संस्थानातले पहिलेच रजिस्टर पद्धतीचे लग्न होते. प्राचार्य गोकाक सर त्याचे एक साक्षी होते. सर, लग्नाच्या दिवशीही तुम्ही नेहमीप्रमाणेच तास घेतलात आमचा. कामाची टाळाटाळ हा शब्द तुमच्या कोशात नव्हताच. दुसरे दिवशी नवा चॉकलेटी कोट तुम्ही घालून आल्यावर तुमच्या अभिनंदनासाठी आम्ही विद्यार्थ्यांनी स्टॅंपिंग करून वर्ग डोक्यावर घेतला. तुम्ही आपल्या स्वागताचा प्रेमाने हसून स्वीकार केलात. एकदा आम्ही मुली पावसात भिजत चाललो होतो. ते लक्षात येताच सांगलीला घरी निघालेले तुम्ही खाली उतरून वत्सल मनाने म्हणालात, "अशावेळी छत्री असू द्यावी जवळ!"

सर, तुम्हाला आठवते का? पुण्याला बदलून गेल्यावर कोणत्याशा समारंभासाठी तुम्ही विलिंग्डनवर आला होतात. मी माझ्या घरी चहापाण्याला येण्याचे आमंत्रण तुम्हाला दिले. तुम्ही अगत्याने आलात. चहा-फराळ झाल्यावर सुंदर निसर्गदृश्य असलेले छोटेसे फ्रेम केलेले चित्र ठेवू लागले. त्यावर तुम्ही लगेच म्हणालात, " आम्ही आजीव सदस्यांनी अशा भेटवस्तू घेऊ नयेत असा अलिखित संकेत आहे, म्हणून हे काही नको." त्यावर मी आम्हा विद्यर्थ्यांना तुम्हा गुरुजनांबद्दल वाटणार्‍या आदराचे ते एक प्रतीक आहे, वगैरे बराच युक्तिवाद केला. तेव्हा नाईलाजाने तुम्ही ते चित्र घेतलेत. पण माझी १०० टक्के खात्री आहे, ते तुम्ही इथेच महाविद्यालयाच्या कचेरीत देऊन गेले असणार! सर, ‘जाऊ तेथे खाऊ’ हे सध्याचे बहुतांश लोकांचे जगण्याचे उद्दिष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर तुमचे निःस्पृह वर्तन पावसाळी काळोखी रात्रीत चमकणार्‍या विद्युल्लतेसारखे वाटते.

पुण्याला इथून गेल्यावर तुम्ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह, फर्ग्युसन व बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स यांचे प्राचार्य, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु, वायदेबाजारावर नियंत्रण करणार्‍या संस्थेचे सदस्य अशी कितीतरी मानाची पदे भूषविलीत. त्या सर्वांवर तुमच्या संपन्न व्यक्तिमत्वाचा प्रभावी ठसा तुम्ही उमटविलात. खुर्चीमुळे तुम्हाला नसून तुमच्यामुळे खुर्चीला मान व महत्व लाभले. जे जे काम सर, तुम्ही हातात घेतलेत त्या सर्वांचे सोने केलेत.

राम प्रधानांसारखे शेकडो विद्यार्थी हे तुम्ही त्यांच्यावर केलेल्या सुसंस्कारांना आलेले गोमटे फळ आहे. शरद पवार हेही तुमचे विद्यार्थी! या सर्वांना आपण ‘कोगेकर सरांचे विद्यार्थी आहोत’ याचा फार अभिमान वाटतो. माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांचीही भावना तीच आहे. तुमच्यासारखे गुरु शिक्षणव्यवस्थेत पूर्वी होते. ही समाजाला आज दंतकथा वाटेल.

प्रिय दमयंतीबाई व तुमची बुद्धिमान मुले, जावई, सुना, नातवंडे यांच्या सहवासात तुमचा गृहस्थाश्रम फार सुखा-समाधानाचा झाला. वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षी तुम्ही जगाचा निरोप घेतलात, पण तुम्ही शतक पुरे करायल हवे होतेत असे पुन्हा पुन्हा वाटते. तुमचा आशीर्वाद आम्हा विद्यार्थ्यांवर निरंतर असू दे, ही प्रार्थना.

सर, ‘चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन’ या पंक्तीत बसाणार्‍या तुमच्या व्यक्तिमत्वाला माझे कृतज्ञ व नम्र अभिवादन!
आपली नम्र
मालती शं. किर्लोस्कर

               


 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color