स्वागतकक्ष arrow सय arrow कर्मयोगी - तीर्थरूप बापूराव लेले
कर्मयोगी - तीर्थरूप बापूराव लेले पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

कर्मयोगी - तीर्थरूप बापूराव लेले

चंदनाला किंवा फुलाला आपल्या सुगंधाविषयी कुणाला मुद्दाम बोलावून सांगावे लागत नाही. चंदन उगाळले किंवा फूल उमलले की आपोआपच भोवतालचा परिसर त्या सुवासाने दरवळून जातो. कोणत्याही क्षेत्रातल्या ‘खर्‍या’ मोठ्या माणसांचे असेच असते. त्यांच्या व्यक्तिमत्वातच असे सामर्थ्य असते की त्यामुळे समाज त्यांना मानतो, त्यांचा स्वेच्छेने आदर करतो. ही माणसेच समाजाचे मन आणि जीवन उन्नत, समृद्ध आणि सुसंस्कृत करतात.

तीर्थरूप बापूराव लेले हे अशा माणसांचे उत्तम प्रतिनिधि आहेत. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट झाली दहा वर्षापूर्वी! पण त्यापूर्वी अनेकांकडून त्यांचा तत्वनिष्ठ, ध्येयवादी, शिस्तप्रिय स्वभाव, निष्कलंक चारित्र्य, वृत्तपत्रीय जीवनातील लढाऊ व निर्भय वृत्ती याबद्दल पुष्कळच ऎकलेले होते. त्यांची कुशाग्र बुद्धि, अस्सल देशभक्ति आणि अखंड कार्यमग्नता याचेही वर्णन अनेकांनी मजजवळ केले होते. स्वाभाविकच त्यांच्या भेटीबद्दल मी खूप उत्सुक होते. मी जेव्हा त्यांची मध्यम उंचीची, गोरा वर्ण व घारे डोळे असलेली, साध्या धोतर-सदरा अशा पोशाखातली प्रसन्न मूर्ति पाहिली तेव्हा माझा त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. बापूराव आणि माझा भाऊ मुकुंद किर्लोस्कर यांची मैत्री पन्नासहून अधिक वर्षांची! मुकुंद किर्लोस्कर-स्त्री-मनोहर मासिकांचा संपादक तर बापूराव ‘हिंदुस्थान टाइम्स’चे वार्ताहर! दोघांची दिल्लीत वरचेवर भेट होई. खरे म्हटले तर त्या दोघांची राजकीय मते खूपच भिन्न. पण त्याचा अडसर त्यांच्या मैत्रीत कधीच आला नाही. वाद किंवा मतभेद हा माणसांशी नसून त्यांच्या विचारांशी असतो याचे त्या दोघांनीही कधी भान सुटू दिले नाही. परिणामी दोघांनीही मोठा लोकसंग्रह केला. या विलोभनीय स्वभावविशेषामुळे अनेक क्षेत्रातले, जाति-धर्म-भाषातले लोक बापूरावांना केवळ स्नेही नव्हे तर मार्गदर्शक, सल्लागार असेही मानू लागले.

मुकुंदाने मला सांगितलेली एक आठवण! दिल्लीला असंच काही कामानिमित्त तो गेला असता अपरात्री त्याची प्रकृती एकदम बिघडली. त्याचा मुक्काम होता हॉटेलवर! अशा अवघड वेळी कुणाला सांगणे, त्रास देणे त्याच्या स्वभावातच नाही. जरा पहाट होताच त्याने पहिला फोन केला तो बापूरावांना! दोघांची निवासथाने खूपच दूर. मुकुंदा आठवण सांगताना म्हणाला, "मालूताई, माझा फोन मिळताच तातडीने बापूराव आले. मग डॉकटरांकडे नेणे इत्यादी सर्व त्यांनीच केले. मी ते कधी विसरणार नाही." त्याची ही हकीकत त्याने पुष्कळ वर्षापूर्वी सांगितलेली! पण अगदी अलिकडची एक आता सांगते. सांगलीजवळच्या एका गावातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले एक नामवंत डॉक्टर नुकतेच कालवश झाले, काही दिवसांपूर्वीच! बापूरावांचा मुक्काम होता तेव्हा जळगावात. बातमी कळताच त्यांचा शोभाताई गोरे यांच्याकडे फोन आला. त्या बापूरावांच्या धाकट्या बहीण-माझ्या मैत्रीण आणि वहिनीही! बापूराव म्हणाले, "गोदू, डॉक्टरांच्या मुली फार हुशार आणि गुणी आहेत! त्याच्यासाठी चांगली स्थळे आढळात आली तर लगेच कळव." दुःखितांचे दुःख दूर करण्यात बापूरावांचा पाय सदैव कसा पुढे असतो त्याबद्दल आणखी एक प्रसंग सांगते. माझ्या काकींचे भाऊ प्रसिद्ध गायक कै. बाळ चांदोरकर हे दिल्लीला नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून गेले होते. त्यांना अचानक अर्धांगाचा झटका आला. त्यावेळी बापूरावांनी इतक्या परोपरीने त्यांना साह्य केले की शेवटी न राहवून ते म्हणाले, "देवासारखा माझ्या मदतीला आलेला कोण हा देवमाणूस? मला त्यांना एकदा पाहू दे तरी!" कारण बापूराव नाटकातल्या प्रॉम्पटरसारखे समोर प्रकट न होता, निरपेक्षपणे सारे करीत होते! असा माणूस -निखळ माणुसकीचा गहिवर असलेला- सर्वांनाच ‘आपला’ वाटला तर नवल काय?

त्यांच्या कुटुंबियांना बापूराव म्हणजे सर्वात मोठा आधार! प्रा. एकनाथजी गोरे गेल्यावर त्यांच्या सुविद्य पत्नी शोभनाताई सांगलीत आता एकट्याच राहतात. तर बापूरावांचा चार-आठ दिवसांनी -अनेक कामांच्या धबडग्यातून- त्यांना न चुकता फोन येणार! "गोदू, कशी आहेस?" अमेरिकेत भाचीला म्हणणार, "विनया, काही हवे आहे का तुला?" बापूराव स्वतः अविवाहित. पण त्यांच्या घरी सर्वांचा भरघोस पाहुणचार होत असतो. आमच्या प्रा. डॉ. एन्‌. के. कुलकर्णींची कन्या सौ. शैला विवाहानंतर दिल्लीला गेली. ती परमुलुखात जात असल्याने घरच्या मंडळींना स्वाभाविकच मनात काळजी वाटत होती. त्यावर बापूरावांचे एक स्नेही म्हणाले, "कशाला काळजी करता उगीच? बापूरावांचे घर म्हणजे तिचे माहेरच होईल." त्यांचे शब्द अक्षरशः खरे ठरले. मुकुंदा म्हणतो, " बापूरावांना आम्ही मित्रमंडळी महाराष्ट्रातल्या माणसांचे दिल्लीतले ‘वकील’च म्हणतो. माझी त्या बोलण्याला पुस्ती एवढीच की "एरवीचे वकील अशिलांना लुबाडतानाच सामान्यतः दिसतात. हा वकील मात्र पदरमोड करून, स्वतः भरपूर झीज सोसून पक्षकारांचे काम करतो." बापूरावांच्या जीवनाचा जेव्हा जेव्हा मी विचार करते तेव्हा तेव्हा मला मनापासून वाटते ते असे की, निःस्वार्थपणे दुसर्‍यांसाठी, विशेषतः दुःखितांसाठी, अडीअडचणीत असलेल्यांसाठी झटणे हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभावच आहे. त्यांचा सर्वात मोठा आनंद त्यातच समावलेला आहे. आज सभोवताली पाहिले की अशा सहृदयतेचा, आपुलकीचा दुष्काळच जास्त आढळतो. त्या पार्श्वभूमीवर बापूरावांच्या मनाचे मोठेपण आपल्याला खूप काही शिकवून जाते.

असे हे आमचे ‘कर्मयोगी’ बापूराव! ‘तरूण भारत’ मध्ये ‘नारायण’ या नावाने येणारे त्याचे लिखाण मी वाचलेले होते. ते मनावर प्रभाव टाकत असे, विचार करायला प्रवृत्त करीत असे म्हणून मला आवडायचे. काही वर्षापूर्वी थोर पंतप्रधान ‘शास्त्रीजी’ यांच्या समवेत ते ताश्कंदला जाऊन आले. दुर्दैवाने लालबहाद्दूर शास्त्रीजींचा देहान्त तिथेच झाला. त्या दुर्दैवी घटनेवर बापूरावांनी हिंदीत लिहिलेला लेख माझ्याकडे पाठवला होता. तो छोटासा हृदयस्पर्शी लेख वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारा होता. आभाराचे पत्र लिहिताना मी नम्रपणे त्यांना विनंती केली होती, " हा लेख भारतातल्या प्रमुख चौदाही भाषात प्रसिद्ध होणे अगत्याचे आहे. इतका तो बहुमोल आहे." लवकरच प्रकाशित होणार्‍या ‘स्मरणगाठ’ या त्यांच्या पुस्तकाची कच्ची प्रत योगायोगाने मला वाचायला मिळाली. गेली सुमारे पन्नास वर्षे बापूरावांचे वास्तव्य दिल्लीत आहे. ‘वृत्तपत्रकार’ म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक थोर नेत्यांना पाहण्याचा! ऎकण्याचा! त्याच्याशी संवाद करण्याचा त्यांना विपुल अनुभव आहे. त्याच्या आधारे प्रसंगानुरूप त्यांनी लिहिलेली काही निवडक व्यक्तिचित्रे या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मान्यवर नेत्यांचे आणि इतर पक्षातील राजकीय पुढार्‍यांचे भारदस्त प्रौढ भाषेत मार्मिकपणे आणि मर्मज्ञ वृत्तीने त्यांनी चित्रण केले आहे. शब्दचित्र सी. डी. देशमुखांचे असो की मौलाना आझादांचे असो, अगदी मोजक्या शब्दात, ठसठशीतपणे त्यांचे चित्र ते आपल्या मनःचक्षूंपुढे उभे करतात. वाचकांना पुष्कळ नवी माहितीही त्यातून मिळते. आपण ज्यांना ‘नेते’ मानतो तीही शेवटी माणसेच असतात. त्यातून ही तर ‘राजकारणा’तील माणसे! त्यांच्यातली सत्तास्पर्धा, रागलोभ, आचार-विचारातली संगति-विसंगति, त्यांच्यातला दंभ-अहंकार, भलेबुरेपणा हा बापूरावांनी जवळून पाहिलेला. असे असूनही कुणाबद्दलच-आपल्या विरोधी विचारसरणी असणार्‍यांबद्दलही- त्यांनी अनुदार उद्गार काढलेला नाही. कसल्याच असंस्कृततेचा स्पर्श आपल्या लेखणीला होऊ दिला नाही हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. वृत्तपत्रीय लेखन असूनही ते कुठेही रूक्ष झालेले नाही उलट त्या क्षेत्रात प्रवेश करणार्‍या नवोदितांना मार्गदर्शक ठरावे असे झालेले आहे. कधी प्रतिपक्षावर एखाद्याच मार्मिक शब्दात ते शरसंधान करतात, कुठे त्या त्या व्यक्तींच्या जीवनातली एखादी खेळकर आठवण, सुखदुःखाचा अनुभव सांगतात अणि आपले लेखन रोचक होईल असे पाहतात. त्यांची समर्पक, प्रभावी भाषा, तिच्या परिपक्वतेमुळे व लेखनातील शिस्तीमुळे आपल्या कायम आठवणीत राहते. बापूरावांच्या विचार-उच्चार-आचार यातील सुसंगतीचे एक सुखदायी दर्शन या पुस्तकाने आपल्याला होते. त्यांच्यातला जातिवंत देशभक्त तर ठायी ठायी भेटतो. प्रत्येक सुजाण वाचकाने वाचावे असेच हे पुस्तक आहे. बापूरावांनी आता निवांतपणे आत्मचरित्र लिहायला हवे. त्याची आपण वाट पाहू या -

काही महिन्यांपूर्वी विश्रांतीसाठी ते सांगलीत शोभनाताईंच्या घरी आले असताना शिवाजी विद्यापीठाचे ज्ञानवंत माजी कुलगुरु डॉ. धनागरे यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीकरांनी त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. प्रकृति साथ देत नसतानाही लोकांच्या आग्रहामुळे ते समारंभाला हजर राहिले. मोजक्या पण भावार्द्र शब्दात त्यांनी आपली कतज्ञता प्रकट केली. ऎंशी वर्षाची शीव ओलांडलेले बापूराव जिथे जातील तिथे आनंदाचा प्रकाश, प्रसन्नतेचे चांदणे घेऊन जातात. आयुष्य खडतर अनुभवांची चव घेत घालवूनही त्यांच्या वृत्तीला कडवटपणाचा स्पर्श नाही हे कसे याचे मला कोडे पडते. ते सुटते या जाणिवेने की म्हणूनच त्यांना ‘मोठा माणूस’ म्हणतात-

तीर्थरूप बापूरावांचा लवकरच दिल्लीत सत्कार होत आहे. बापूराव ना कोणी सत्ताधीश की ना कोणी लक्षाधीश! तरीही तो होत आहे याचे कारण सद्गुणांची पूजा करणे ही मानवी मनाची एक ओढ आहे. बापूराव सज्जन मातापित्यांच्या पोटी मध्यम परिस्थितीत जन्मलेले, वाढलेले! पण सामान्य परिस्थितीतला माणूस आपल्या चारित्र्याने, कर्तृत्वाने किती मोठा होतो हे त्यांच्याकडे पाहून आपल्याला कळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक निष्ठावंत, तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी जीवनाला प्रारंभ केला आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेक चतुरस्र बुद्धीच्या थोर माणसांचा गाढ विश्वास, प्रेम, स्नेह संपादन करण्याइतक्या उंचीवर जाऊन ते पोहोचले. ‘अहंकराचा वारा न लागो माझिया चित्ता’ हे सुवचन कधीही न विसरता ते जगले. अशी माणसे आपल्या भाग्याने आपल्याला पहायला मिळाली हेच खरे! अशा माणसांचा सत्कार करणे हे समाजातील चांगुलपणा, संस्कृति टिकविण्यासाठी-वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यकच असते. कारण अशा सत्कारातूनच समाजातल्या चांगल्या शक्ति कार्यरत राहतात. त्यांना प्रेरणा, स्फूर्ति मिळते. त्याचबरोबर समाजातल्या काळवंडलेल्या परिस्थितीने निराश झालेल्या, हतबल झालेल्या हजारो माणसांना धीर लाभतो. आधार लाभतो. गडद अंधरातून जाणार्‍या पांथस्थाला चंद्रकोर किती धीर देते ना? बापूरावांसारखी माणसे हेच काम करतात. म्हणून त्यांचा सत्कार करणार्‍या संयोजकांचेही बापूरावांप्रमाणेच अभिनंदन कारायला हवे.

तीर्थरूप बापूराव दिल्लीहून आता कायमच्या वास्तव्यासाठी जळगावला जात आहेत. त्याने दिल्लीकरांचे डोळे पाणावणारच! पण ते जळगावात असले तरी त्यांचे मन दिल्लीत असणारच यात शंकाच नाही. त्यांचे अभीष्टचिंतन मी आणि माझे कुटुंबीय यांच्यावतीने मी अंतःकरणपूर्वक करते अणि देवाने त्यांना निरामय शतायुषी करावे अशी प्रार्थना करून म्हणते, "बापूराव, सर्व आयुष्य देशाच्या कल्याणासाठी समर्पक वृत्तीने तुम्ही घालविलेत. त्या कृतार्थ जीवनाला माझे नम्र अभिवादन. आता थोडे आम्हा स्नेहीजनांच्या, कुटुंबियांच्या वाट्याला तुम्ही यावे असे आम्हाला वाटते. तुम्ही शोभनाताईंबरोबर मलाही एक लोकरीचे जाकिट पाठविले होतेत. ते मी जपून ठेवले आहे. माझी खात्री आहे कसल्याही संकटातून त्या जाकिटाची ऊब माझे रक्षण करील कारण त्याला ‘नारायणा’चा स्पर्श झालेला आहे. तुमच्या आशीर्वादाचा हात माझ्या माथ्यावर सदैव असू दे एवढेच मागणे!    

               


 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color