कांचनाची निरांजने पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

कांचनाची निरांजने

मला अगदी मनापासून वाटते की, मैत्री म्हणजे परमेश्वराने मानवी मनाला एक अतिशय पवित्र, सुंदर आणि अमोल अशी देणगी आहे. निरपेक्ष आणि गाढ मैत्रीचा अनुभव आणि त्यामुळे होणारा आनंद याची तुलना अमृताशीच होऊ शकेल. एखाद्या नाजूक, सुरेख फुलपाखरापासून तान्हुल्या गोंडस बाळापर्यंत आणि इमानी मुक्या जनावरापासून जीवनाची संध्याकाळदेखील समाधानाने घालविणार्‍या एखाद्या वृद्धापर्यंत कुणाशीही आपल्या मैत्रीचे सूर जुळतात. आणि ते तसे जुळले म्हणजे सगळे जीवनच एक सुगंधी मैफल बनून जाते. 

ज्या थोर स्त्रियांनी हा आनंद मला भरपूर दिला त्या सगळ्याजणी, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे ज्ञान, त्यांना मिळालेला मान त्यांचे समाजातील स्थान आणि त्यांचे वय या सर्वच दृष्टींनी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणूनच त्या मला अतिशय वंद्य वाटतात. ‘शकुंतलाबाई परांजपे’, ‘इरावतीबाई कर्वे’ आणि ‘ज्योत्स्नाबाई भोळे’ यांची नावे माहिती नाहीत असा सुशिक्षित माणूस निदान महाराष्ट्रात तरी सापडणे अवघडच! त्यांचे माझे ‘मैत्र’ जमावे, अशी माझी कसलीच योग्यता नाही, पण तरीही त्या तिघींनी मला ‘आपली मालती’ असे मानले हे माझे मोठेच भाग्य! म्हणून त्यांच्या नावामागे ‘कै.’ हे अक्षर लावताना मन कातर झाल्यावाचून राहात नाही.

‘शकुंतलाबाई’ - या जागतिक कीर्तीचे विद्वान रॅंग्लर र. पु. परांजपे यांची एकुलती एक आणि अतिशय लाडकी कन्या! वडिलांच्या संपन्न बुद्धीचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारी, त्यांच्यासारखीच प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी असलेली, विद्यार्थीदशेपासूनच ‘बंडखोर’ म्हणून प्रसिद्ध असलेली अशी कन्या! स्वतःच्या मनाला जे पटेल ते निर्भयपणे आचरणारी! मगती बाब कोणतीही असो. त्यांना आवडणारा पोषाख घालण्याची असो की संततिनियमनासारखे नाजूक, अवघड काम व्रतस्थपणे करण्याची असो. ‘काळापुढती चार पाऊले चालणारी’ ही एक द्रष्टी स्त्री! कसदार, मोजकं पण सहजसुंदर लेखन करणारी लेखिका!

‘शकुताईं’ना मी पहिल्यांदा कधी पाहिले त्याचे नीटसे स्मरण मल आज नाही; पण मला वाटते की, मी हिंगण्याला कर्व्यांच्या शाळेत शिकत असताना त्यांना पाहिले असावे. आमच्या ‘विद्यालय’ नावाच्या वसतिगृहाला लागून एक विहीर होती. तिच्या काठावर त्या उभ्या होत्या. आज चित्रपट-नाटके यांचे उत्तम लेखन आणि दिग्दर्शन करून जिने मोठाच लौकिक कमावला आहे, ती ‘शकुताईं’ची सुकन्या ‘सई’ त्यादिवशी त्यांच्याबरोबर होती. असेल चार-पाच वर्षांची किंवा त्याहून थोडी लहानच! गुलाबी रंगाचे गाल असलेली, गुबगुबीत, गोरीगोरी पान सोनेरी केसांची ‘सई’ इतकी गोड दिसत होती म्हणून सांगू? ‘शकुताई’ तिला घेऊन अधूनमधून हिंगण्याला यायच्या. कारण आणासाहेब कर्वे आणि रॅंग्लर परांजपे हे अगदी जवळचे आप्त! त्या दिवशी त्या आल्या होत्या ते त्यांच्या चिमुललीला पोहायला शिकवायला म्हणून! आमच्या वसतिगृहाच्या मेट्रन ‘आक्का चिपळूणकर’ त्यावेळी काही विद्यार्थिनींना पोहायला शिकवत होत्या. नवख्या मैत्रिणींचे पाण्याच्या भीतीमुळे तोंडातून आलेले चित्कार विहिरीच्या काठाशी उभ्या राहून आम्ही काही मुली ऎकत होतो. त्यांची थट्टा-मस्करीही करीत होतो. तेवढ्यात ‘सई’ला ‘आक्कां’च्या हाती सोपवून ‘शकुताई’ म्हणाल्या, "आमच्या ‘सई’लाही द्या एक लहानशी डुब्बी. म्हणजे आपोआपच तिची पाण्याची भीती कमी होईल." शकुताईंची अंगलट त्यावेळी फार कृश नाही, फार स्थूलही नाही अशी अंगासरशी होती. हसतमुखाने प्रसन्नपणे त्या इकडे तिकडे वावरत होत्या. त्यांचे रंगरूप आकर्षक, लक्षवेधक होते.  

 

गोल साडी, साधा पोलका असा त्यांचा पेहराव होता. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी कपाळी कुंकूही लावले होते आणि त्यामुळे त्यांचा चेहरा अधिक सुरेख दिसत होता. त्यांचे हसणे-बोलणे-वावरणे सारेच इतके अकृत्रिम होते की, मला त्या एकदमच खूप आवडून गेल्या. ‘सई’चे वडील रशियन आहेत, उत्तम कलावंत आहेत, असेही आम्ही ऎकून होतो. त्यामुळे ‘शकुताईं’ना पाहण्याची खूप उत्सुकता माझ्या मनात होती. ती त्या दिवशी पुरी झाली!

मध्यंतरी बरीच वर्षे गेली. पुण्याला शिक्षणासाठी मी नाव घातले ते ‘फर्ग्युसन’मध्ये. मराठीचे सुप्रसिद्ध प्राध्यापक रा. श्री. जोग हे माझे स्थानिक पालक होते. त्यांचे वडील ती. बापूसाहेब हे रॅंग्लर परांजपे यांचे चांगले स्नेही! त्यामुळे हिंगण्यानंतर मी ‘शकुताईं’ना पुन्हा पाहिले ते प्रा. जोगांच्या घरी! पण तेवढीही ओळख ठेवून ‘शकुताई’ रस्त्यात भेटल्या की आवर्जून माझी वास्तपुस्त करायच्या. त्या नियमित ब्रीज खेळायला जात असत. माझ्या वसतिगृहाकडे जाणारा रस्ता त्यांच्या घरावरूनच जात होता. यावेळपर्यंत त्या वयाने प्रौढ, अंगाने स्थूल झालेल्या होत्या. त्यांनी आपले केस कापले होते आणि ते मानेसरशीच ठेवले होते. एक दिवस त्या मला म्हणाल्या, "मालती, माझी मांजरे बघायला ये ना एकदा घरी. तुलादेखील ती खूप आवडतील." मीही मग त्यांन म्हटले, "येईन की एकदा सवडीने", पण माझे ते जाणे तसेच राहिले आणि एके दिवशी मोठी गंमतच झाली. रात्री दहा साडे दहाची वेळ असावी. मी ज्या बंगल्यात खोली घेऊन रहात होते, तो बंगला माझ्या मैत्रिणीचाच होता. जिमखान्यावर ‘थिऑसॉफिकल लॉनला लागून! मी नुकतीच ‘फर्ग्युसन’मध्ये लेक्चरर म्हणून कामाला सुरुवात केली होती. रात्रीच्या वेळी खोलीच्या बाहेरच्या प्रशस्त दरवाज्याची कडी वाजली. ठक्‌ ठक्‌.. ठक्‌ ठक्‌! "एवढ्या रात्री कोण बाई आले असावे" असा मी मनाशी विचार करते आहे आणि दरवाजा उघडते आहे तर साक्षात्‌ ‘शकुताई’ पायरीवर उभ्या! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. "अगबाई, आता यावेळी इकडे कुठे तुम्ही?" असे मी त्यांना विचारले तर त्या म्हणाल्या, "मालती, बाहेर चांदणे झकास पडले आहे. हवाही छान आहे. माझ्या मनात आले, मारून येऊ तुझ्याकडे एक चक्कर गं, पाच-सात मिनिटांचा तर रस्ता आहे फक्त! म्हणून आले झालं!" त्यांच्या येण्याने मला झालेला आनंद माझ्या मनात मावत नव्हता. ‘या ना आत" म्हणून मी त्यांना बोलावले. ‘शकुताईं’नी त्या दिवशी लेंग्यासारखा पायघोळ कपडा आणि अंगात सैलसर सुताने विणलेला पोलका घातला होता. तोंडात सिगारेट होती. आणि मला वाटते गळ्यात साखळी बांधलेले एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लूही त्यांनी आपल्याबरोबर आणले होते. मला त्या सगळ्याचीच मोठी गंमत वाटली. ‘शकुताई’ प्रथमच त्या दिवशी माझ्या घरी आल्या होत्या. पण त्यांचे स्वागत करायला, त्यांना खायला द्यायला काही म्हणजे काहीच नव्हते. लाडू-चिवडा-फळे तर सोडाच, पण साधा चहा त्यांना द्यावा म्हटले तर दुधाचाही चट्टामट्टा झालेला! त्यामुळे माझा जीव अगदी कानकोंडा होऊन गेलेला. ‘शकुताई’ आरामशीरपणे खुर्चीत बसल्या. त्या खोलीत चौफेर नजर टाकून म्हणाल्या, "छान हवेशीर आहे हं तुझी खोली आणि तू ठेवली ही आहेस मोठ्या टापटिपीने." मी समाधानाने हसले, पण आतल्याआत माझी चुळबूळ चालू होती. शेवटी मी मोकळेपणाने त्यांना माझी परिस्थिती सांगितली आणि मी म्हणाले," आज घरात फक्त एक नारळ आहे. मी एका लग्नाला गेले होते ना सकाळी, तिथे मिळालेला! ‘नन्नीने नुकतेच कार्ल्याचे लोणचे पाठवले आहे ते आहे पण ते कसे तुम्हाला देऊ हो?" माझे बोलणे ऎकल्यावर त्यांनी सिगरेटचा एक मोठा झुरका मारला आणि मोठ्याने हसून म्हण्ल्या, "हात्तीच्या! त्यात काय गं एवढं अवघड वाटायचं? आण बघू तो नारळ इकडे! मी नारळ त्यांच्याकडे दिल्यावर त्या नारळाभोवती पाण्याचे एक वर्तुळ काढून त्यांनी तो खिडकीच्या फरशीवर जोरात आपटला. नारळाचे एक भक्कल हातात घेऊन त्यातले पाणी आपण प्यायल्या आणि मला ‘आ’ करायला लावून माझ्याही तोंडात ते घातले. एका वाटीत साखर आणि दुसरीत ‘कार्ल्याचे लोणचे’ घालून त्या दोन्ही वाट्या मी त्यांच्यापुढे ठेवल्या. ‘शकुताईंनी नारळात चमचा घालून दोघींना पुरेल एवढा त्याचा चव खरवडून घेतला, त्याच्यावर साखर पेरली आणि कार्ल्याचे लोणचे त्याला तोंडी लावणे म्हणून लावून मिटक्या मारीत ते सर्व खाल्ले. आणि वर "तुझ्या आई चांगल्या सुगरण दिसतात हं" असे प्रशस्तिपत्रही तिला दिले. मग जरा वेळ गप्पा-गोष्टी करून स्वार आली तशीच आनंदात घरी गेली.! त्यांचे हे घरेलू वागणे - त्यातला निखळ निर्मळपण पाहून मी चकितच झाले!

त्यांचे सगळे करणे-वागणे असे मोकळेढाकळे असायचे! आमचे गुरुवर्य आर. एन. जोशी सर हे डी. ई. सोसायटीचे अजीव सदस्य! रॅंग्लरांप्रमाणेच! त्यामुळे ‘शकुताईं’ना सरांनी लहानपणापासून पाहिलेले! एक दिवस ‘शकुताईं’चे सरांना पत्र आले त्यात "रामभाऊ, ‘सई’ला घेऊन मी लवकरच तुमच्याकडे येत आहे. तुमचे घर म्हणजे हिंदु रीतीरिवाज, देवधर्म, सणवार सगळे निगुतीने आणि श्रद्धेने करणारे! ते मला ‘सई’ला दाखवायचे आहे. सोवळेओवळे, चुलीला पोतेरे, आडवे लावून घेणे, उष्टे खरकटे काढून शेण लावणे इत्यादी म्हणजे काय ते तिला कळले पाहिजे" असा मजकूर होता. आपल्या पत्राप्रमाणे ‘शकुताई’ ‘सरां’कडे आल्या. चार-आठ दिवस काय रहायचे ते राहिल्या. ‘सई’ला सर्वांचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले अणि मग पुण्याला परतल्या. आहे ना या विदुषीचे हे सगळे वागणे प्रांजळ अणि गमतीचे? विश्वास बसेल का एकदम एखाद्याचा? 

एकदा गप्पांच्या ओघात त्या मला म्हणल्या, "मालती, संततिनियमना’वर व्याख्यान देण्यासाठी मी नगर-बारामती की अशाच कुठल्याशा, पुण्याहून फार लांब नसलेल्या, गावी एकदा गेले होते. सभेसाठी संध्याकळी स्त्री-पुरुष मंडळी येऊ लागली. तेवढ्यात कार्यक्रम ज्यांनी ठरविला होता त्यांच्यापैकी एक प्रौढसे गृहस्थ माझ्याजवळ येऊन मला म्हणाले, "आपल्याला एक विनंती करायची आहे. व्याख्यानासाठी जमलेल्या पुरुषांचे म्हणणे आहे की. आजची ही सभा फक्त पुरुषांपुरतीच ठेवायला आपण परवानगी दिलीत तर फार बरे होईल. कारण व्याख्यानाचा विषय नाजूक! त्यासंबंधी काही प्रश्न किंवा शंका विचारायच्या असल्या तर बायकांसमोर त्या विचारणे पुरुषांना अवघड वटते." मी म्हटले, "‘ठीक आहे. पण मग हा विचार तुम्ही आधीच केला असतात तर बरे झाले नसते का झाले?’ नंतर जमलेल्या स्त्रियांना काय सांगायचे ते मी सांगितले, आणि त्या आपापल्या घरी परत गेल्या. सभा-प्रश्न-शंका-उत्तरे- सगळे होऊन पार पडली. आता निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा मी त्या पुरुषांना म्हटले. "मी एक प्रश्न विचारते आता तुम्हाला! मगाशी ‘श्रोत्यात बायका नकोत’ असे तुम्ही म्हणालात पण तुम्हाला व्याख्यान देणारी तर मी एक बाईच आहे ना? ती मी कशी काय चालले तुम्हाला? अं?" त्यावर त्या सगळ्यांची अशी काय गडबड उडाली म्हणतेस, ती बघून माझी छान करमणूक झाली." आपणच आता सांगा की आहे की नाही ‘शकुताई’चा मिस्किलपणा शंभर नंबरी?

आपल्या वडिलांवर ‘शकुताईं’चे फार प्रेम! त्यांच्याविषयी बोलताना ते प्रेम सतत जाणवायचे. पण ‘शकुताई’ स्वभावाने खट्याळ! एकदा सांगत होत्या, "मालती, आमचे ‘आप्पा’ ना भारी कंजूष माणूस! समज उद्या जर मी त्यांना म्हणाले, आप्पा, तुमच्या जुन्या दाताच्या कवळ्यांचा आता काही उपयोग नाही तुम्हाला, तर मी टाकून देऊ का त्या कचर्‍याच्या डब्यात? तर ते मला म्हणतील, ‘नको, नको, ‘शकू’, तसं नको करू मुळीच! त्या चार आण्याला का होईना, पण तू विकून टाक कुणाला तरी.’" या निर्व्याज-खेळकर संवादातूनही त्यांचे वडिलांवरचे प्रेमच व्यक्त होत होते. पिता-पुत्रीतले हे मित्रत्वाचे नाते मला फार भावले. मी त्यांना म्हटले, "शकुताई, अहो ती आपासाहेबांसारख्या विश्वविख्यात विद्वानाची कवळी आहे हे कळायचा अवकाश, ती घेणारा ती चार आण्याला नव्हे कित्येक हाजार रुपयांना घेईल." माझ्या उत्तराने त्या खूष झाल्या आणि प्रेमाने त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला. रॅंग्लरसाहेबांच्या निधनानंतर मी ‘शकुताईं’ना सांत्वनाचे पत्र धाडले होते. त्याला त्यांनी लिहिलेले उत्तर छोटेसेच पण मोठे हृदयस्पर्शी होते. ते पत्र आणि रॅंग्लरसाहेबांना त्यांच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने मी धाडलेल्या पत्राचे त्यांनी पाठवलेले उत्तर ही दोन्ही मी खूप जपूऽऽन ठेवली आहेत. 

भारताचे नाव दूरदूर देशात पोहोचविणार्‍या आणखी एक विदुषी म्हणजे आमच्या इरावतीबाई कर्वे! उत्तम लेखिका, विचारवंत, संशोधिका, अशा कितीतरी नात्यांनी जगाला त्यांची ओळख आहे. ‘मानव-वंशशास्त्राच्या’ ‘अतिथी प्राध्यापिका’ म्हणून कितीदा तरी त्या परदेशात गेलेल्या. स्वच्छ तेजस्वी गोरा रंग, महराष्ट्रीय स्त्रियात सहसा आढळणार नाही अशी छान उंची (म्हणून तर त्यांच्या सासूबाई त्यांना ‘दीपमाळ’ म्हणायच्या!), हसरे वत्सल-मायाळू घारोळे डोळे. त्यामुळे या विद्यालक्ष्मीचे रूप पाहणार्‍याला खिळवून ठेवी! त्यांना इरकली वाणाची, गडद रंगाची सहावारी लुगडी फार आवडत, ती त्यांना फार शोभूनही दिसत. नेसणं फार पायघोळ नसायचे. जरा घोट्यापर्यंत उचललेले दिसायचे. अंगात सैलसर कापडाचा आणि माझी आठवण बरोबर असेल, तर कधीकधी खणाचाही पोलका त्या घालायच्या. त्यांच्या भालप्रदेशावरचे ठसठशीत कुंकू त्यांना इतके सुंदर दिसायचे म्हणता! त्यांचे सारे व्यक्तिमत्वच विलक्षण प्रभावी आणि उत्तुंग होते! कर्वे-किर्लोस्करांचा स्नेह पाऊणशे-ऎंशी वर्षांइतका जुना! त्यामुळे आम्हा मंडळींवरची त्यांची माया एका आगळ्या गोडव्यात भिजलेली असायची!

पूर्वी त्या कर्वे रोडवरून बरेच अंतर चालून गेल्यावर एस. एन. डी. टी. कॉलेजपासून थोड्याशा अंतरावर त्या रहायच्या. पण पुढे प्रकृतीला तिथे राहणे सोसवेना म्हणून गुलटेकडीकडे नवा बंगला बांधून त्य तिथे रहायला गेल्या. शेवटची काही वर्षे त्या तिथेच होत्या. त्याच घरात रहात असताना त्यांना देवाघरचे आमंत्रण आले. कधीही मी त्यांना भेटायला गेले म्हणजे त्या प्रेमाने विचारायच्या, "गडे मालती, कशी आहेस बाई तू? काय म्हणते तुझी सांगली?" त्यांच्या तोंडचे ‘गडे मालती’ हे शब्द मला मोठे लडिवाळ वाटायचे. क्षेमकुशलाची विचरणा झाल्यावर मी "डॉ. दिनकरराव कुठे आहेत?" असा प्रश्न केला की त्या उत्तर द्यायच्या, "अगं दिनू ना? बसला असेल काहीतरी वाचीत त्याच्या खोलीत. जा ना, हाक मार हवं तर त्याला. पण हे बघ, तुला आधीच सांगून ठेवते. तुमची डी. ई. सोसायटी आणि तिथले वाद-विवाद-कटकटी अशा कशासंबंधी तुला काही बोलायचे विचारायचे असले तर तुम्ही दोघेही लांब बाहेरच्या खोलीत जाऊन बसा. नसता ताप तुम्हा दोघांच्याही डोक्यांना!" इरावतीबाई हाडाच्याच ज्ञानोपासक होत्या. कर्मयोगी होत्या. स्वाभाविकच शिक्षण संस्थातून चालणारे हेवेदावे आणि राजकारण याचा त्यांना उबग येई. राग येई. त्यावेळी त्या अगदी स्पष्ट शब्दात आपले विचार परखडपणे सांगत. काही कामासाठी मी गेलेली असो की, केवळ त्या उभयतांना भेटायला म्हणून गेलेली असो, त्या आईच्या मायेने मला खाऊ घालत. लाडू-वड्या-चिवडा असे जे कोणते खाद्य पदार्थ घरात त्याचा डबाच त्या आमच्या दोघींमध्ये ठेवत अणि मनापासून हसून म्हणत, ’अगं डबा मध्ये अशासाठी ठेवते की मग उगीच हिशेब नको करायला आपण किती खाल्ले त्याचा! शिवाय डब्यामुळे गप्पात विघ्नही येत नाही. कंटाळा येईतो खुशाल खात रहावे." 

अविवाहित मंडळींची लग्ने जमविण्याची त्यांना मोठी हौस होती. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी त्या ते सोसत. लग्नासाठी मलाही त्या आग्रह करायच्या. कुणी खूप हुशार, तरूण मुलगा त्यांना आवडला की त्यांचे पत्र यायचेच! "गडे मालती, तू त्याला एकदा बघ तरी, तुमचे दोघांचे छान जमेलसे मला वाटते गं!" माझा विवाहविषयक निर्णय मी अधीच घेतलेला होता. त्यामुळे मी त्यांच्या पत्रावर ‘मौन’ पत्करायची. पण त्यामुळे ना कधी त्या माझ्यावर रागावल्या ना त्यांनी कधी आपली माया पातळ केली!"

इरावतीबाईंना हृदयविकाराचा त्रास असल्याचे कुणीतरी मला सांगलीत सांगितले. त्या वार्तेने मी एकदम हादरूनच गेले. त्याना किंवा दिनकररावांना काही विचारायचा धीर मला होईना! माणूस जेवढे जवळचे तेवढे आपले मन अधिक दुबळे होते त्यांच्या आजाराने! लवकरच कामानिमित्त मला पुण्याला जायला लागले. काम पुरे होताच मी त्यांना भेटायला गेले. त्या मला खूप कृश झालेल्या दिसल्या. पुरुष कापतात तसे मानेलगतच त्यांनी केस कापले होते. चेहर्‍यावर थकवा जाणवत होता. जर वेळ इकडचे तिकडचे असे मी त्यांच्याशी बोलले आणि मग आवाजात शक्य तेवढी सहजता आणून त्यांना मी विचारले, "इरावतीबाई नेमका काय त्रास होतो आहे दुखण्याचा तुम्हाला?" त्याच्यावर "आज ना आमच्याकडे मटारची उसळ केली होती" अशी एखादी मामुली गोष्ट सांगावी त्या चालीवर त्यांनी मला सांगितले, "गडे मालती, तुझी पाचही बोटे एकदमच दरवाजात सापडून चेंगरली, तर काय होईल तुला? ते मला हृदयात होते बघ." त्या वेदनाच्या कल्पनेनेच माझ्या छातीत धस्स झाले. मी काहीशा अनावर भावनावेगाने मग त्यांना म्हटले, "इतका त्रास होतो आहे तर जाता कशाला तुम्ही कामाला? कुठे ते तुमचे ‘डेक्कन कॉलेज’ आणि कुठे ही गुलटेकडी! किती अंतर आहे मध्ये? त्यापेक्षा घरीच पडून विश्रांती का नाही घेत?" बोलताना माझा स्वर जड झाला. डोळे एकदम भरून आले. माझ्या नकळतच मी त्यांचा माझ्या हातात हात घट्ट धरला आणि म्हटले, "आम्हाला आशीर्वाद द्यायला तुम्ही अजून खूप खूप वर्षे आम्हाला हव्या आहात." पुढे मला बोलवेना. माझे बोलणे ऎकून चांदीच्या रुपयाचा आवाज कसा किणकिण होतो तशा स्वरात लहान मुलासारखे हसून त्या म्हणाल्या, "अहा गं, वेडाबाई! आणि ही म्हणे प्रोफेसर आहे! किती भित्री गं मालती, तू? अगं डॉक्टर म्हणतात, "इरावतीबाई, तुम्ही कोणत्याही क्षणी मराल". मग मी विचार केला, उगीच घरात बसून वेळ वाया कशाला घालवायचा त्यापेक्षा काम करीतच मरावं." (आणि झाले तसेच.) साक्षात्‌ मृत्यूपुढे उभे राहूनच जणू त्या बोलत होत्या. कमालीच्या मृदु आणि संवेदनाशील असलेल्या ‘इरावतीबाईं’चे मला झालेले हे ‘मृत्युंजय’ दर्शन! त्याने मी थक्क झाले! मनात म्हटले, " इरावतीबाई, हॅट्‌स ऑफ टू यू. तुम्हाला माझे शतशः नमस्कार असोत." 

अगदी अलिकडेच आमच्या ‘ज्योत्स्नाबाई’ गेल्या. ‘ज्योत्स्नाबाई’ म्हटले की ‘ज्योत्स्नाबाई’ भोळेच मला पहिल्यांदा आठवतात. त्यांचे व्यक्तिमत्व फार लळा लावणारे, विलोभनीय आणि सदा प्रफुल्ल असे होते! ‘ज्योत्स्ना’ शब्दाचा कोशातला अर्थ आहे ‘चंद्रप्रकाश’! तशाच त्या होत्या. त्यांचे बोलणे, वागणे सगळेच कसे आल्हाददायी आणि मनाला शांत करणारे, मनाला शीतलता देणारे! त्यांना पाहिले म्हणजे मला वाटायचे सुरलोकीचे अ-म्लान सौंदर्य आणि अक्षय सुगंध देणारे कमळच आहे हे इहलोकावरचे! त्यांचा ‘अमृतमधुर’ स्वर तिथूनच त्या घेऊन आल्या होत्या. त्यांचा स्वभाव, स्वर आणि अभिनय यात अधिक मोहक कोणते असा गोड संभ्रम माझ्या मनाला पडायचा! स्त्रियांची कामे स्त्रियांनीच करावीत या वचाराने त्यांनी रंगभूमीवर टाकलेले पहिले पाऊल हे तिच्या दृष्टीने ‘क्षण आला भाग्याचा’ असेच असते. त्या रंगभूमीवर असोत की घरी असोत त्यांच्या भाषेला गोव्याकडच्या मराठीचा एक नादमधुर छोटासा झोका असायचा!

एकदा सुप्रसिद्ध नृत्य पंडिता आणि माझी बालपणापासूनची मैत्रीण ‘बेबी भाटे’ हिच्या बरोबर ‘ज्योत्स्नाबाईं’कडे जेवायला जायचा योग आला. कै. केशवराव जेवताना सहज म्हणाले, "दुर्गा, तुझे ते खास गोव्याकडे करतात ते लोणचे वाढ की बेबीला आणि ‘मालतीबाईं’ना! त्याबरोबर सुगरण गृहिणीच्या अगत्याने त्या लगबगीने उठल्या. कपाटातल्या मोठ्या बरणीतले लोणचे लहान सुंदर चिनी मातीच्या सटात त्यांनी काळजीपूर्वक काढले आणि आम्हाला वाढले. फारच स्वादिष्ट आणि खमंग झाले होते ते! ‘ज्योत्स्नाबाई’, तुमच्या लोणच्याची चव विसरताच येणार नाही इतके ते छान झालंय, पण ते मला कसे करायला येणार? असे मी त्यांना म्हटले, तेव्हा त्या म्हणाल्या, " अगं, अवघड काय आहे त्यात? हे बघ मालती, चांगली पिवळी धम्मक लिंबे घ्यायची, श्रावणात चांगली मिळतात बघ." असे म्हणत मला त्यांनी लोणच्याची कृती तपशीलाने सांगितली. ती ऎकताना मी मनात म्हणत होते, ‘ज्योत्स्नाबाई’ या खरोखरच ‘मंगेशा’ची लाडकी  कन्या आहेत. किती कलांचे वरदान अनंत हस्ताने त्याने यांना दिले आहे! आम्ही जेवत होतो तेव्हा रंगभूमीवरच्या अणि इतरही किती गमतीजमती त्या वेल्हाळपणे सांगत होत्या. त्यातली एक गोष्ट मला आजही आठवते. "आकाशवाणीचे केंद्र तेव्हा नुकतेच सुरू झाले होते. ‘ज्योत्स्नाबाईं’च्या परिचयाचे एक गायक कार्यक्रमासाठी तिथे गेले. गाणे चांगले रंगले. त्या वेळी आतासारखी कार्यक्रम आधीपासून ‘टेप’ करून ठेवण्याची सोय नव्हती. कार्यक्रमाच्या प्रारंभी आणि अखेरी विशिष्ट रंगाचे दिवे लागायचे. तसा दिवा लागण्यापूर्वीच गाणे संपताच अनवधानाने त्या गवयांनी ‘सुटलो बुवा एकदाचा!’ असे म्हटले. ते शब्दही गाण्याप्रमाणेच श्रोत्यांपर्यंत गेले! हा प्रसंग ‘ज्योत्स्नाबाईंनी अगदी आमच्या डोळ्यांपुढे उभा राहील इतका चटकदार करून सांगितला. मग आम्ही सगळेच खूप हसलो.

माझी आईही चांगले गायची! ‘ज्योत्स्नाबाई’ भेटल्या की ती तिच्या आवडीची ‘माझिया माहेरा जा . . . ’ किंवा ‘बैसले मी पायथ्याशी, तू उभा शिखरावरी’ ही भावगीते त्यांना म्हणायला लावायचीच! चुकूनसुद्धा त्यांनी कधी आढेवेढे घेतले नाहीत. त्यांचे सारे वागणेच असे मोठे स्वागतशील आणि साधे सरळ-निगर्वी असे! सुमारे पाच वर्षापूर्वी आमचा नातू ‘रोहन पुसाळकर’ याचा विवाह ‘ज्योत्स्नाबाईं’ची सुकन्या सौ. वंदना हिच्या सख्ख्या पुतणीशी झाला. चि. सौ. वंदना आईच्या स्वभावाचा आणि स्वराचाही गोडवा घेऊन जन्मलेली! त्या मंगल कार्याला ‘ज्योत्स्नाबाई’ अर्थातच आल्या होत्या. त्यावेळी मंद रंगाची सुरेख जरीची साडी, त्याला संवादी असा ब्लाऊज, गळ्यात मोत्याची शोभिवंत अशी माळ, अंगावर अगदी मोजके अलंकार घालून आलेल्या ‘ज्योत्स्नाबाई’ किती देखण्या दिसत होत्या म्हणून सांगू? वधू-वर उत्तम पोशाखात सुरेख सजवलेल्या बोहल्यावर येऊन उभे राहिले. गुरुजींनी अंतरपाट धरला. आणि अहो आश्चर्यम्‌! साक्षत्‌ ‘ज्योत्स्नाबाई’ मंगलाष्टके म्हणायला उभ्या राहिल्या. त्यावेळी त्यांच्या वयाने ऎंशी वर्षाची शीव ओलांडलेली असावी! शरीरात कर्करोगाने ठाणे दिलेले! पण ते सारे विसरून अतीव मधुर स्वरात ‘ज्योत्स्नाबाईं’नी मंगलाष्टके म्हटली. तो आनंदाचा क्षण वर्णन करायला खरंच माझ्याजवळ शब्द नाहीत. विवाह मंडपातली मंडळी ‘ज्योत्स्नाबाईं’चे अगत्य, उत्साह अणि निर्मळ निगर्वी मन या सगळ्यांनी फार भारावून गेली! चि. रोहन आणि चि. डॉ. सौ. सोनाली याचे ‘शुभ-मंगल’ ‘‘ज्योत्स्नाबाईं’च्या ‘अमृत बोलां’नी झाले! केवढे भाग्यवान हे जोडपे! 

माझ्या ‘भावफुले’ या व्यक्तिचित्रांच्या प्रकाशन सोहळ्याला ‘ज्योत्स्नाबाई’ आवर्जून आल्या होत्या. समारंभानंतर त्यांच्या हाती पुस्तकांची भेट देत मी त्यांना वाकून नमस्कार केला. तेव्हा त्या म्हणाल्या, "मालती, तुझा हात असाच लिहिता ठेव. सुखी अस." आणि मायेने त्यांनी मला शाबासकी दिली. तो मोरपिसासारखा त्यांच्या हाताचा वत्सल स्पर्श मी कधीच विसरणार नाही.

‘ज्योत्स्नाबाई’ गेल्या त्यादिवशी मी योगायोगानेच पुण्यात होते. मुकुंद व सौ. शांता याच्याबरोबर मीही ‘ज्योत्स्नाबाईं’च्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. ‘ज्योत्स्नाबाई’ त्यांच्या ‘माहेरी’ निघाल्या होत्या. घरात-बाहेर माणसे खिन्न मनांनी उभी होती. फुलांच्या-हारांच्या ढिगार्‍यात ‘ज्योत्स्नाबाई’ चिरविश्रांती घेत होत्या. अर्धशतकाहून अधिक काळ जिने मराठी रंगभूमी आपल्या स्वराने आणि अभिनयाने अमर केली ती ‘स्वरसरस्वती’ आता कधीच पुन्हा पहायला ऎकायला मिळणार नव्हती या विचाराने मन विलक्षण व्याकुळ झाले. त्यांच्या पायावर डोके ठेवून मी त्यांना मनोमन नमस्कार केला आणि त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हटले, "तुम्ही आमचे जीवन समृद्ध केलेत. तुम्हाला आम्ही कधी विसरणार नाही ज्योत्स्नाबाई!"

आधुनिक महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक कलाविषयक आणि एकूणच सर्व जीवन ज्यांनी संपन्न केले अशा या तीन ‘खर्‍या’ थोर स्त्रिया! सर्व बाजूंनी अंधारलेल्या आजच्या जीवनात या तिघींनी माझ्यावर जी माया-ममता केली तो स्नेहदीप माझ्या मनाचा गाभारा प्रकाशाने उजळून टाकतो - त्याबद्दल वाटणारी कृतज्ञता शब्दात कशी सामावणार? म्हणून इतकेच म्हणते, या ‘कांचनांच्या निरांजनां’ना माझे विनम्र अभिवादन!      


 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color