औषध कडू, गुण गोड पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

औषध कडू, गुण गोड

"सोनल, बेटा, असा हट्ट नाही करू, तू शहाणी ना? घेऊन टाक बरं औषध चटकन. ते जरासंच कडू आहे पण त्याचा गुण किती छान आहे. थोड्याच वेळात ताप उतरून जाईल तुझा. हं घे." आमची ‘विद्या’ - माझी भाची - आपल्या छोट्या छोकरीला समजावून सांगत होती.

संध्याकाळची वेळ होती, अंगणात खुर्ची टाकून मी वाचीत बसले होते - ‘विद्या’चे शब्द माझ्या कानावर पडताच मलाही माझे लहानपण आठवले. नुकताच मी इंग्रजी पहिलीत प्रवेश घेतला होता. त्यामुळे लहन मुलांच्या बोर्डिंगातून मोठ्या बोर्डिंगात माझी रवानगी झाली होती. वय सुमारे दहा. जेवणाच्या वेळचा एक प्रसंग - पहिल्याच पंधरवड्यात घडलेला. पाठीमागचा ताकभात मी जेवीत होते, त्यादिवशी भाजी होती तांबड्या भोपळ्याची. मी तिला मुळीच हात लावला नव्हता म्हणून उजव्या हाताला ती जशीच्या तशीच पडून राहिली होती. आमच्या मेट्रन ‘आक्का चिपळूणकर’ फार शिस्तीच्या आणि कडक. पंक्तीतून त्या फेर्‍या मारीत आणि सर्वांकडे बारकाईने लक्ष ठेवीत. जेवण संपताच ताटवाटी हातात घेऊन ती घासण्यासाठी मी नळाकडे जाऊ लागले, तो लगबगीने माझ्यामागोमागच त्या आल्या आणि माझा डावा हात पकडून म्हणाल्या, "हां, थांब बघू जरा. ही भाजी का टाकलीस तू पानात? बोर्डिंगचा नियम ठाऊक आहे ना तुला? पानात पहिल्यांदा वाढलेले पदार्थ प्रत्येकीने खाल्लेच पाहिजेत हा? पदार्थ आवडोत की नावडोत"- एवढे बोलूनच त्या थांबल्या नाहीत तर मला हाताला धरून त्यांनी पुन्हा पंक्तीत आणून बसवले. तो सारा प्रसंग जसाच्या तसा माझ्या डोळ्यंपुढे आजही उभा आहे. रागाने लालबुंद झालेले माझे डोळे वाहू लागले आहेत, झगा किंचित वर उचलून डोळ्यातील पाणी मी पुसले आहे, पंक्तीतल्या मुली माना उंचावून, वेळावून माझ्याकडे पुनः पुन्हा बघताहेत. डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हाताने पदर खोचीत ‘आक्का’ समोर उभ्या आहेत - मी तरी काय कमी होते, मीही हटूनच बसले आणि - हुंदके देत देतच म्हटले, "मला नाही ही गिळगिळीत हौदभर पाणी घालून केलेली भाजी आवडत. आमची ‘नन्नी’ (आई) किती छान करते याच भोपळ्याची भाजी. ही खाल्ली तर उलटी होईल मला." त्याही तेचढ्याच पक्क्या. त्याम्हणाल्या, "होऊ दे, होऊ दे, मग बघीन मी काय करायचं ते. आधी भाजी खा मुकाट्याने." त्यांचा ठेका कायमच राहिलेला दिसताच अस्मादिकांनी सपशेल शरणागती पत्करली - भाजीचा गोळा मी निमूट गिळून टाकला.

चाळीसावर वर्षे होऊन गेली या गोष्टीला, पण ह्या एवढ्या कालावधीत घरात काय पण बाहेर खानावळीत प्रवासात देखील जेवताना पुन्हा पहिले वाढलेले अन्न मी टाकलेले मला आठवत नाही. टाकावेसेच वाटले नाही. ते ‘आक्कां’नी केलेल्या कठोर पण गुणी संस्काराने!
* * * * *                       
इंग्रजी चवथीतला असाच एक प्रसंग मनात कायमचे घर करून राहिला आहे. त्यावेळी मी सोलापुरात आजोबांजवळ शिक्षणासाठी राहिले होते. त्यांना भेटण्यासाठी ‘शंकरभाऊ’ (माझे वडील) तिथे आले होते. आमच्या घरातली सर्वच वडील मंडळी आम्हा मुलांशी फार खेळीमेळीने व जिव्हाळ्याने वागत. माझ्या बरोबरीच्या मैत्रिणींना त्याचे भारी नवल वाटायाचे. त्या म्हणायच्या, "आम्हाला बाई आमच्या ‘बाबां’ची, ‘दादां’ची भारी भीती वाटते. ट्रीपला जाण्यासाठी वर्गणी मागायची असो की सिनेमाला जायचे असो." माझ्या मनात येई, वडील मंडळींना कशासाठी भ्यायचे? ती तर आपली मित्रमंडळीच जणू. तर त्या दिवशी काय झाले, काकींनी मला हाक मारली आणि म्हणाल्या, "जा ग, बाबांना सांग जेवायचे झाले आहे, खालती या." माझे आजोबा माडीवर रेडिओ ऎकत बसले होते. बातम्या चालू होत्या. वेळ रात्रीची आठ सव्वाआठची. मला पोंच तेवढाच. मी खुशाल जिन्याच्या खालच्या पायरीवरच उभी राहिले आणि दोन्ही हात तोंडाशी फुगवूनच स्वरात खालून हाक दिली, "बाऽबा, जेवायला खाली याऽ." जेवणघराकडे जाण्यापूर्वी हातपाय धुऊन यावे म्हणून मी जाते तो माझ्या पाठीशी ‘शंकरभाऊ’ येऊन उभे! माझ्या खांद्यावर ममताळूपणे हाता ठेवीत, शांतपणे त्यांनी मल विचारले, "मालढोक, (ते मला मुलासारखे संबोधीत) तू माडीवर येऊन ‘बाबांना’ निरोप सांगितला असतास तर तुला काही त्रास झाला असता काय?" तो प्रश्न ऎकताच मला वरमल्यासारखे झाले. मी गप्पच उभी राहिले व पानावर जेवायला बसल्यावरही माझे मौनच होते. आपल्या घरातील वडील माणसे आपल्याशी खेळीमेळीने, जणू समवयस्क बनून बोलतात, वागतात हा त्यांचा मोठेपणा आहे. पण म्हणून आपण त्यांचा यथोचित मान राखयला विसरणे हे बरोबर नाही हे पटदिशी लक्षात आले. आजतागायत असा वेडेपणा मी पुन्हा केला नाही.
* * * * *
प्रतिवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात सुट्टीसाठी आम्ही मुले किर्लोस्करवाडीला जमलो होतो. चांदण्यात गच्चीवर हास्यविनोद, गप्पाटप्पा हे चालू होते. त्या ओघात मासिकाकडे आलेल्या एका लेखाबद्दल ‘शंकरभाऊ’ काही सांगत होते. लेख एका लेखिकेचा होता. कशाने ते मला नीटसे स्मरत नाही, पण तिच्याविषयी माझ्या मनात दुरावा होता. ती साधारण आमच्याच वयाची - असलीच तर दोन-तीन वर्षांनी मोठी होती. तिच्या लेखाचा विषय निघताच काहीसे उसळून मध्येच मी म्हटले, "ती आंधळी ना? आहे मला ठाऊक!" शंकरभाऊ बोलताबोलता एकदम थांबले. माझ्याकडे त्यांनी टक लावून पाहिले, आणि काहीशा व्यथित स्वरात म्हणाले, "या घरात राहणारी, या टेबलावर जेवणारी सगळी माणसे समंजस आणि सुसंस्कृत आहेत असे मी मानतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या शारीर अधूपणाचा, व्यंगाचा असा कडवटपणे उल्लेख करणे त्यात बसते असे नाही मला वाटत. जोरात आलेल्या तापाने तिची दृष्टी अंध झाली यात तिचा काय दोष सांग बरे? तुझ्या कानांनी तुला कमी ऎकू येते म्हणत तुला कोणी हिणवले तर कसे वाटेल तुला? सांग -" त्यांच्या बोलण्याने टेबलावरचे सगळे वातावरण बदलले. उरलेले जेवण मी निमूट खाली मान घालून जेवले. हा धडा आजतागायत पक्का लक्षात राहिला आहे.

* * * * *
फर्ग्युसन महाविद्यालयात बी. ए. च्या शेवटच्या वर्षात मी शिकत होते. वार्षिक परीक्षा पाचसहा दिवसांवर येऊन ठेपली होती. त्या सुमारास माझ्या मनाने एकदम कच खाल्ली, आणि परिणामी त्यावर्षी परीक्षेला न बसण्याचा मी निश्चय केला. बोर्डिंग सोडून घारी जाण्यासाठी मी सामानाची बांधाबांध करू लागले. मनाला चमत्कारिक उदासीनता जाणवत होती. डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. तेवढ्यात माझी जिवलग मैत्रिण ‘नलिनी’ (ही आता अर्थशास्त्रातील, आडनावाप्रमाणे ‘पंडिता’ आहे) खोलीत आली आणि काहीशा व्यथित पण परखड शब्दात मला म्हणाली, "मालती, हा काय वेडा विचार घेऊन बसली आहेस तू डोक्यात? ऎनवेळी परीक्षा सोडून जाण्याचा? मी तुला अगदी मनापासून सांगते, तू बैस परीक्षेला. झालेल्या अभ्यासावर तुला सेकंड क्लास सहज मिळेल. जरा धीर धर. तू घरी निघालीस असे कळताच सरल, शांता इत्यादि मैत्रिणींनीही तीच भाषा सुरू केली आहे. त्यांना असे ‘नर्व्हस’ करायला तुझे वागणेच कारणीभूत ठरते. मी बोलते त्याचा तुला आज राग येईल पण मला राहवत नाही म्हणून बोलते. हा निष्कारण येणारा भित्रेपणा तुला पुढील आयुष्यात फार फार नडेल. मी ‘मालवण’ची राहणारी आहे तिथले ‘लवण’ फार खारट असले तरी तुझ्या मनःप्रकृतीला त्याची फार गरज आहे." नलिनीचा आवाज तापला नव्हता. पण माझ्यावरील प्रेमाने त्यात कंप निर्माण झाला होता. तो मला जाणवत होता. मी तिचे म्हणणे ऎकले नाही नि परीक्षा टाकून घरी आले याचा मला आज फार खेद होतो. पण तिच्या ‘मालवणी लवणाने’ माझ्या जीवनात कायमचे मानाचे स्थान मिळवले. त्यानंतरच्या आयुष्यात माझ्या पळपुटेपणाशी होईल तेवढ्या निकराने मी झगडते आहे.
* * * * *
मराठीची प्राध्यापिका म्हणून मी नुकतीच कामाला सुरुवात केली होती. तेव्हाचा हा एक संवाद. प्राचीन काव्य वाचीत असता एका अनोळखी शब्दावर मी अडखळले. तासाची वेळ झाली होती. तेव्हा वाचता वाचता मी दादांना (प्रा. रा. श्री. जोग यांना) उतावळेपणाने विचारले, "दादा, या शब्दाचा अर्थ काय हो?" दादा त्यांच्या शांत, संयमी स्वभावाबद्दल आणि अभ्यासूवृत्तीबद्दल सर्वदूर प्रसिद्ध असलेले, पण काहीशा नाराजीच्या स्वरात ते म्हणाले, "तू घरच्या मुलांसारखीच आहेस, तेव्हा तुला मी अर्थ सांगतो, पण यापुढे नेहमी लक्षात ठेव, तासाला जाण्यापूर्वी किंवा कोणतीही अभ्यासातली शंका विचारण्यापूर्वी  त्याबाबतचे आवश्यक ते संदर्भ आपण स्वतः वाचनालयात जाऊन किंवा इतर परिश्रम करून शोधायला शिकले पाहिजे. तू आता प्राध्यापिका झाली आहेस त्यामुळे सूक्ष्म व सखोल अभ्यासाची गरज वाढतच जाणार हे विसरू नकोस." या व्यवसायात आता तीस वर्षापेक्षा अधिक काळ माझा गेला, पण माझ्या गुरुवर्यांनी दिलेला मंत्र मी सदैव कटाक्षाने जपत आले आहे. अशा किती आठवणी सांगाव्या?

विद्याची सोनल औषध पिऊन केव्हाच झोपी गेली होती, पण माझे मन विचारचक्रात फिरत होते. जणू ते म्हणत होते, "कोंडाण्यावरून पराभवाच्या भीतीने पळून जाणार्‍या सैन्याचे किल्ल्यावरून खाली जाणारे दोर सूर्याजीने तोडले म्हणूनच किल्ला सर झाला, ‘सिंहगड’ ठरला. स्वामी पेशव्यांनी जवळच्या आप्तांना कठोर बनून अपराधाची सजा देण्याचे धार्ष्ट्य केलेम्हणूनच मराठी राज्याचे संरक्षण, संवर्धन झाले ना? युगप्रवर्तक शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना त्यांच्या चुकीबद्दल पन्हाळ्याच्या सजा कोठडीत टाकले; एकांतवासाची शिक्षा दिली - अशा अनुभवांनीच बापसे बेट सवाई असा मृत्युंजय संभाजी घडला ना?

 इतिहास असो की समाज असो, तो घडविणार्‍या अनेक थोरांची जीवने आपल्याला काय सांगतात? त्यांच्या आयुष्यातील यशाचे, कर्तृत्वाचे फार मोठे श्रेय आहे एका विचारसूत्राला - "औषध कडू, पण गुण गोड "याला!           

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color