स्वागतकक्ष arrow मराठी पुस्तके arrow मधुघट arrow आरसे - पण पारा उडालेले
आरसे - पण पारा उडालेले पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

आरसे  -  पण पारा उडालेले  !       

            परवा परवाचीच गोष्ट! मनाला जरा विरंगुळा म्हणून मी जुनी पत्रे काढून वाचीत बसले होते. ती चाळताचाळता आमच्या सिंधुताईचे पत्र हाती आले. ते त्यांनी मला चाळीसबेचाळीस वर्षापूर्वी लिहिलेले होते. सिंधुताई म्हणजे माझ्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांच्या पत्नी! त्यांचा-आमचा चांगला घरोबा असल्याने अधूनमधून त्या मला आवर्जून पत्रे लिहीत. त्यापैकीच हे एक पत्र होते. पत्रात त्यांनी लिहिले होते, "मालू, हे पत्र मी तुला लिहिले आहे ना, तेव्हा तुझे ‘सर’ पेपर्स तपासण्यात बुडाले आहेत. ते वाचता वाचता खूप गमतीही पाहायला मिळताहेत. सेंट्रल बॅकेचा प्रश्न आहे तो. त्यात शंभरात नव्वद मुलांनी एक वाक्य न चुकता लिहिले आहे, ते म्हणजे, ‘सेंट्रल बॅंक इज बॅंकर्स बॅंक!’ ते पाहून पाहूनसुध्दा मला इतका, इतका कंटाळा आला म्हणतेस म्हणून सांगू. मी चेष्टेने यांना म्हटले,  "अहो, ज्या विद्यार्थ्याने हे वाक्य लिहिले नसेल ना, त्याला ते न लिहिल्याबद्दल माझा म्हणून एक मार्क द्या बरं का! " त्यावर हे मन:पूर्वक हसले! "

            सिंधूताईच्या पत्रातला विनोद सोडला तरी त्यांच्या म्हणण्यात खूपच तथ्य होते. केवळ परीक्षेत, तेही अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणित अशा वस्तुनिष्ठ विषयातच केवळ नव्हे, तर अगदी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या मनातला आशय आपण इतक्या कमालीच्या त्याच ठराविक पध्दतीने, वर्षानुवर्षे व्यक्त करीत असतो, की शेवटी ते शब्द,  अर्थव्यक्तीचे आपले सारे सामर्थ्य गमावून बसतात, असे मला वाटते. उदाहरणार्थ, सकाळी उठून आपण वृत्तपत्र हाती घेतले म्हणजे विमान, रेल्वे, ट्रक, आग अशा कशाना कशामुळे झालेला अपघात बहुधा आपल्या वाचनात येतोच! (‘वाहन’ म्हणजे हटकून अपघात करणारे साधन असा शब्दार्थ शालेय विद्यार्थ्यांना शिकवायला काही हरकत नाही,  असे मला हल्ली वाटू लागले आहे.) अपघाताची बातमी मोठ्या अक्षरात, बहुतेक वेळा सचित्र छापलेली असते. कपड्यात गुंडाळलेले मृतदेह, वेडावाकडा पडलेला ट्रक इत्यादीसह! ( सचित्र बातमी हे आधुनिक वृत्तपत्रविद्येचे एक प्रमुख लक्षण असावे.) बातमीचा मजकूर साधारणपणे असा असतो. : "अमुक अमुक गावी (पुढे गावाचे नाव) लेव्हल क्रॉसिंगवर आगगाडी व ट्रक याची जोरदार टक्कर होऊन पंचवीस ठार व १२ जखमी! (आकडा कमीजास्त! त्याची चूकभूल द्यावी घ्यावी)..  वाचलेल्यात एक.. इतक्या महिन्याचे मूल आहे. .. चौकशीसाठी संबंघित खात्याचे अधिकारी (पुढे कधी कधी त्याचे नाव, हुद्दा इत्यादी) तातडीने अपघातस्थळी रवाना झाले आहेत"  यापुढचा मजकूर वाचण्याची तसदी मी घेतच नाही, कारण तो मजकूर मला पाठच असतो! तो सामान्यत: या छापाचा असतो : "मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी चारशे व जखमींना प्रत्येकी दोनशे रुपये (या दोन्हीत एखाद-दुसरा शेकडा कमी जास्त) रेल्वे खात्याने नुकसानभरपाई म्हणून देऊ केले आहेत." अशी बातमी वाचली, की माझे मन आतल्या आत तडतडत चिडते. माझ्या मनात येते, अपघात न होतील याची खबरदारी घ्यायचे राहिलेच बाजूला, उलट माणूस मरायचाच अवकाश, रेल्वेखाते, सरकार यांचे रुपये-आण्याचे कोष्टक लगेच तयार! मृताचे वा जखमीचे आप्त, त्यांच्यावर अनपेक्षितपणे कोसळलेल्या आपत्तीने त्यांची होणारी व्याकुळ, निराधार अवस्था, यांचे कांही सोयरसुतक असते की नाही या खात्यांना? इतकी कशी त्यांची मने बधिर,  बोथट आणि मख्ख?

            चातुर्मास संपला, की लग्न्मुंजींची आपल्याकडे एकच धमाल उडते, थोड्याफार प्रसिध्द घराण्यातल्या मुलामुलीचे लग्न, मुंज असे मंगलकार्य झाले की बहुधा त्याची बातमी छापून येतेच. विवाहाच्या बातमीत अनेकदा वधु-वरांची मुंडावळ्यासह छायाचित्रेही घेतात. कधी कधी ती इतकी पुसट   (किंवा पाठीमागच्या कागदावरच्याच छायाचित्राचा ब्लॉक त्यावर उमटलेला) असतात, की चिं. वि. जोशांच्या कथेतील ‘मधुबाला’प्रमाणे या मधुबालातील वधू कोणती व वर कोणता हेही ओळखणे दुरापास्त होते. बातमीत दोन्ही पक्षातील प्रसिध्द आप्तांची नावे, नाती इत्यादी लिहून बातमीदार हटकून म्हणतो, "या समारंभास विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्टित मंडळी हजर होती." ना त्या वाक्याच्या रचनेत थोडाफार बदल की ना त्या शब्दाऐवजी नामवंत, थोर,  मान्यवर असा एखादा त्याच अर्थाचा शब्द!  या वाक्याचा,    माझ्या मनाने इतका धसका घेतलाय, अनेक परिचितांकडच्या कार्यांना जायचेच मी हल्ली टाळू लागले आहे. मला वाटते, दिवाकर यांच्या ‘तेवढेच ज्ञानप्रकाशात’ या नाट्यछटेच्या चालीवर ‘तेवढेच प्रतिष्टितात’  हा वार्ताहर आपल्यालाही ढकलेल एखादेवेळी! ते संकटच नको. व्यक्तीच्या जीवनातील विवाह-मंगलासारख्या हृद्य व मंगल प्रसंगाचे हे असले रटाळ वर्णन रसायनशास्त्रातील एचटुओ म्हणजे पाणी या फॉर्म्युल्यासारखे मला अगदी तोंड पाठ होऊन गेले आहे,  हल्ली!

            माझ्या बासष्ट वर्षाच्या आयुष्यात सभासंमेलनांना जाण्याचे प्रसंग, माझ्यावर थोडे का आले असतील! तिथेही अनुभव हाच!  स्त्रियांच्या शाळेत, महाविद्यालयात, मंडळात किंवा अशाच एखाद्या संस्थेत आपण श्रोता म्हणून गेलो आणि अध्यक्षस्थानी कोणी सद्‌गृहस्थ असले की ते बहुधा पुढचे वाक्य सबंध भाषणात आपल्याला किमान एकदा तरी ऐकवणारच! ते म्हणजे, "भगिनांनो, स्त्री म्हणजे संसाररुपी रथाचे एक चाक आहे."  फुटलेल्या ग्रामोफोनच्या तबकडीवरची सुई जशी एकाच जागी मागेपुढे होत राहून ‘कशी बाई जाऊऽऽ मी कुंजवना? कुंऽऽजवना’ किंवा अशीच दुसरी काही तरी ओळ पुन:पुन्हा ऐकवत राहते ना, तसे हे शेकडो वेळा ऐकलेले वाक्य माझ्या कानांना शीण आणते. गोलघुमटात एकदा उच्चारलेला शब्द सातदा ऐकायला येतो म्हणतात, तशी माझी स्थिती होते. मी स्वत:शीच पण वक्त्याला उद्देशून ( अर्थातच मनातल्या मनात) म्हणत असते,  "अहो बाबा, ( अध्यक्ष स्त्री असल्यास अहो बाई, ) जरा तुमचे उपमान तरी बदला की हो. स्त्रीला पाहिजे तर संसाररुपी चित्राची फ्रेम म्हणा, संसाररुपी वस्त्राचे अस्तर म्हणा, चालेल आम्हाला, तेवढाच जरा,  चेंज होईल आणि काय हो, तुमचा हा रथ आणि त्याचे चाक इतकी वर्षानुवर्षे चालून अजून दमली कशी नाहीत म्हणते मी! " 

            अशा सभा संमेलनातून आणखीही दोन बिकट संकटांना तोंड द्यावे लागत असते.  ते प्रसंग म्हणजे अध्यक्षांचा परिचय व सर्वांचे आभार यांचे! परिचय करुन देणार्‍याच्या मते समारंभाला आलेले अध्यक्ष, अध्यक्षा यांचा वेळ हा नेहमी ‘बहुमोल’  किंवा ‘अमूल्य’च असतो. ( त्यात ‘मू’ चा उच्चार  र्‍हस्व केल्यामुळे पाणिनीपासून मोरो केशव दामल्यांपर्यतचे सर्व व्याकरणकार कपाळावर हात मारुन घेऊन मनात काय म्हणत असतील, कोण जाणे! ) पुष्कळदा वस्तुस्थिती अशी असते, की हे अध्यक्ष महाशय स्वत:चा वेळ कसा घालवावा या चिंतेत असतात किंवा आपल्या गावी पत्ते,  बुद्धिबळ खेळत किंवा अलिकडे टेलिव्हिजन बघत घालवीत असतात. तरीही त्यांचा वेळ ‘अमूल्य’च हं!  आभारप्रदर्शन करणारी व्यक्ती आपल्या खुर्चीवरुन उठून सभास्थानी येताना दिसली, की बसलेले श्रोते लवकरात लवकर उठून सभागृहाबाहेर कसे पडता येईल, याचा रस्ता व संधी शोधू लागतात. त्यांच्या या घबराटीचे कारण एकच असते ते म्हणजे ती व्यक्ती आता म्हणणार, "आता मी शेवटचे आभाराचे गोऽऽड काम करायला उभा-उभी राहिलो-राहिले आहे."  हे शब्द कानांवर पडले, की श्रोत्यांना (अध्यक्षांनासुध्दा पुषकळदा) आभाराचा भार होऊ लागतो आणि ते  गोऽऽड काम करणारी व्यक्ती लवकर खाली बसली तर अधिक  ‘गोड गोड’ वाटण्याची शक्यता असते.

‘भयंकर’ या शब्दाची बिचार्‍याची दशा तर अधिकच भयंकर असते. एखाद्या चित्रपटशौकिनाला चित्रपटाच्या पहिल्याच खेळाला तो जाऊन परतल्यावर आपण ओसंडणार्‍या उत्साहाने विचारायला जावे,  "कसा होता रे पिक्चर? " तो उत्तर देतो, ‘भयंकर सुंदर’  किंवा नुकतीच वधुपसंती करुन आलेल्या आपल्या स्नेह्याला आपण उत्कंठेने विचारावे; "कशा आहेत आमच्या भावी वहिनी? "  की तो काहीसा लाजत, पण फार खुशीत सांगतो, ‘भयंकर छान!’ भलत्याच ठिकाणी बसलेला हा ‘भयंकर’ शब्द ऐकला म्हणजे एखाद्या उंची मखमली, प्रशस्त गालिचावर एखादा बेडूक मध्येच येऊन बसावा ना, तसे मला वाटते. इतका तो शब्द कानाला विद्रूप लागतो. आणि मग एक सलज्ज, मुग्ध, विवाहोत्सुक, तरतरीत, कमीजास्ती सुस्वरुप अशी नवयौवना माझ्या मनश्चक्षूपुढे उभी राहण्याऐवजी एखादी  त्राटिका  किंवा आक्रळविक्राळ  चामुंडाच येऊन उभी ठाकते. यात माझा बिचारीचा काय दोष?  दोष द्यायचाच असेल तर त्या ‘भयंकर’ शब्दाला द्या.

            इतर अनेक व्यावसायिकांप्रमाणे आम्हा शिक्षक, प्राध्यापकांच्याही संघटना आता ठिकठिकाणी होऊ लागल्या आहेत. एकपरी त्या उपकारक व उपयुक्तही आहेत.  आमच्याही आता परिषदा भरतात, शिबिरे होतात, चर्चा घडतात. अशा कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून कधी शिक्षणमंत्री तर कधी त्यांचे सचिव किंवा असेच कोणीतरी उच्चपदस्थ येतात. ते बहुतेक वेळा रुक्ष, कंटाळवाणा, आमच्या सुखदु:खाशी व वास्तव प्रश्नांशी बेतांचीच जवळीक साधणारा असा उपदेशाचा घुटका आमच्या गळी उतरवतात (मुकी बिचारी कुणी हाका... ही कवितेची ओळ, तो घुटका गिळताना मनात सारखी आठवत असते.) भाषणात एकदा तरी ते म्हणतात, "तुम्ही शिक्षक, प्राध्यापक म्हणजे राष्ट्राचे शिल्पकार आहात. नवी तरुण पिढी तुम्हीच घडविणार आहात. इ.. " भाषण संपल्यावर हारतुरे सोबतच्या सेवकाकडे देऊन चहापाणी आटोपून पाहुणे कर्तव्यपूर्तीच्या आनंदात स्वगृही परततात. पण स्वगृही येऊन बिछान्यावर अंग टाकले तरी माझ्या मनात त्यांचे शब्द सारखे डोकावत राहतात. खेड्यात किंवा लहान गावात मुलीला पाहायला नवरा मुलगा प्रथम येतो तेव्हां स्वयंपाकघरातून तिच्या एकेक नातेवाईक स्त्रिया किंचित डोकावून डोकावून  जातात ना, तसेच त्या शब्दांचेही होते. दरवेळी ही वाक्ये ऐकताना (आजवर किमान शेकडो वेळा तरी मी ती ऐकली आहेत.) माझ्या नजरेसमोर महाराष्ट्रातला काळाकभिन्न खडक, प्रचंड हातोडी छिन्नी हातात घेतलेली मी व वेड्यावाकड्या आकाराचे फोडून पडलेले दगड यांचीच चित्रे तरळू लागतात. मधूनच तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनीचा निरागस चेहरा दिसू लागतो व हे पाथरवटाचे  काम आपल्याला जमलच नाही तर आपले कसे होणार या विवंचनेने माझा जीव उडून जातो. वाटते, सभा चालू असताना आपण शिष्टाचाराचे सर्व नियम घटकाभर गुंडाळून ठेवायला हवे होते व भर सभेत उठून अध्यक्षांकडे वळून म्हणायला हवे होते, "अध्यक्ष महाराज ! बाईसाहेब, आम्हा शिक्षक- प्राध्यापकांची आपणास नम्र विनंती ( विनंती ही नेहमी  ‘नम्र’च असायला हवी बरे.) की या पाथरवटाच्या उपमेच्या कडक पिंजर्‍यातून आम्हाला एकदा सोडवा हो. जग आता कॉम्प्युटरच्या युगातून चाललेले आहे. जेट, बोईंग विमानाच्या युगातून जाते आहे. तेव्हा आम्हाला  ‘इन चार्ज ऑफ कॉम्प्युटर’  असे तरी म्हणा, निदान वैमानिकाची तरी उपमा द्या. तेवढेच आम्ही विमानात बसू. एकविसाव्या शतकाची मौज पाहू. सध्याच्या महागाईमुळे एरवी आम्ही बापडे शिक्षक-प्राध्यापक विमानात कुठून बसणार?  आमचे विद्यार्थीही वर्षानुवर्षे  दगडाच्या उपमेखाली चिरडून गेले आहेत. तेही जरा मोकळी हवा खातील विमानात बसून! " पण  सभ्यपणाच्या दडपणामुळे हे सगळे मनातच राहते.

            मी किर्लोस्कर कुटुंबाची, म्हणजे कारखानदार कुटुंबाची एक घटक.  त्यामुळे नोकरी मागण्यासाठी आलेल्या माजी विद्यार्थ्यापासून मी किराणा व स्टेशनरी माल घेते त्या दुकानातील सेवकांच्या आप्तापर्यंत नानाविध क्षेत्रांतील मंडळी मला पत्रे धाडतात. वर्षाकाठी पाच-पन्नास तरी अशी पत्रे मला येतातच. कारखान्यात यंत्रे  असतात व कामगार ती चालवतात, एवढेच माझे या विषयातले गाढ (?) ज्ञान! पण लिहिणारा "मी टर्नर आहे, फिटर आहे, लेथ चालवू शकतो, डी. एम ई. आहे" असे मला अनाकलनीय असे बरेच लिहून माझी खरीखोटी स्तुती करुन पत्राच्या शेवटी मला विनवितो, "पत्राचे उत्तर त्वरित पाठवावे. मी चातक पक्षाप्रमाणे आपल्या पत्राची वाट पाहत आहे." मला वाटते या मंडळीना एकदा झडझडून विचारावे, "काय हो, तुम्ही चातक पक्षी पाहिला आहेत का कधी? "  मला खात्री असते, माझ्या प्रश्नाचे उत्तर   ‘नाही’ असेच असणार. समजा यांनी कुणी पाहिला असलाच तो चातक पक्षी तर अमुक प्रकारची त्याची मुद्रा म्हणजे वाट पाहण्याची हे यांना कसे कळले असेल ? पण जाऊ द्या, उगीच कशाला अवघड प्रश्न विचारुन मी त्यांना अडचणीत टाकू? कारण मला तरी कुठे माहिती आहे तो चातक पक्षी?  पुन्हा मनात येते माझ्या, त्यांना सांगावे, "मंडळी हो, चांगला माणसांचा, दुर्लभ, असा जन्म देवाने तुम्हाला दिला आहे तो टाकून कशाला जाताय ‘चॅक चॅक’ करायला चातकाच्या जन्माला? ( तो पक्षी असा आवाज करीत असेल हा माझा कल्पनाविलास!!) यापेक्षा, उन्हाळ्याच्या सुट्टीत रेल्वे स्टेशनवर आगगाडीची किंवा लग्नसराईच्या दिवसात बसथांब्यावर बसची आपण जशी वाट पाहतो ना तशी मी तुमच्या पत्राची वाट पाहतो आहे,  असे तरी लिहा, म्हणजे स्वानुभवाने मला तुमची आतुरता लगेच कळेल. "

            अशी किती उदाहरणे द्यावीत? वस्तुत: ध्वनी ही सर्व प्राणिमात्राप्रमाणे निर्सगाने मानवाला दिलेली एक थोर देणगी. तिच्या आधाराने मानवाने स्वकष्टाने, बुध्दीने निर्मिलेली संपदा म्हणजे भाषा. आपले मनोगत उत्कटपणे, प्रभावीपणे दुसर्‍याला कळावे, त्याचे सुखदु:ख, भावनावेग, विचारविलास, कल्पनावैभव ही समजावी म्हणून तर भाषेचा जन्म! तिच्यामध्ये एकाच अर्थाच्या अनेक शब्दांचे केवढे तरी समृध्द भांडार असते. एकाच अर्थाच्या सूक्ष्म, सूक्ष्मतर छटाही ती मोठ्या कौशल्याने दाखवीत असते. एक सौंदर्यभावना वर्णन करायची म्हटले तरी रमणीय, मनोहर, देखणे, चित्तवेधक, शोभिवंत, आकर्षक, सुकुमार  असे कितीतरी चकचकीत बंदे रुपये भाषेच्या खजिन्यात असताना पुन्हापुन्हा त्या मस्त शब्दालाच कशाला वेठीला धरायचे?  शब्दांबाबतदेखील इतका कंजुषपणा कशाला हवा? त्यामुळे कांद्याचे पिठले किंवा भाजीही मस्तच आणि शरदाचे टिपूर चांदणेही  मस्तच ठरते. (पिठले आणि चांदणे हे दोन शब्द चुकून जवळ आले तरी मऊमऊ हिरवळीवर चालत असताना भस्सदिशी पायांत काटा घुसल्यासारखे नाही तुम्हाला वाटत?)

            संतांनी शब्दांना रुप-रस-गंधही असतात असे म्हटले आहे. पण वर उल्लेखिलेल्या पध्दतीने आपल्या दैनंदिन जीवनात-व्यवहारांत आपण शब्दांचा, वाक्यांचा असा कंटाळवाणा व नीरस वापर करीत राहिलो, तर त्या शब्दातून जाणवणार्‍या भावनांचे, अर्थाचे अत्तर आपल्याला कधी गवसेल काय? शब्दाचा डौल, त्यांचे लालित्य, त्यांचे सामर्थ, त्यांची अर्थप्रकटीकरणाची चतुराई व क्षमता यांचा प्रत्यय यथार्थपणे आपल्याला कधी येईल काय? अनेक मनांना जोडणारा सेतू म्हणजे भाषा याची प्रचीती अशाने कशी येईल? वस्तुत: अन्न म्हणजे शरीराचे पोषण करणारा पदार्थ! पण तो अती शिजवला की त्यातली पोषक द्रव्येच नाहीशी होतात!  भाषेचेही तसेच नाही का?

            आरशाचे काम काय? त्यात पाहणार्‍याचे यथार्थ प्रतिबिंब दाखविणे, खरे ना? पण फुटका व पारा उडून गेलेला आरसा ते काम नीट थोडेच बजावतो! मग ज्या शब्दप्रयोगांचा मी वर उल्लेख केला ते शब्दप्रयोग मला पारा उडालेल्या आरशासारखेच वाटतात असे म्हटले, तर चुकले काय?

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color