स्वागतकक्ष arrow सय arrow आता दिवस चारी खेळीमेळी
आता दिवस चारी खेळीमेळी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

आता दिवस चारी खेळीमेळी

तिन्हीसांज झालेली! तुळशीरामांची गाथा वाचण्यात मी अगदी रमून गेलेली! एवढ्यात एका अभंगाशी माझे मन थबकून राहिले. अभंगाचा शेवटचा चरण होता, "आता दिवस चारी खेळीमेळी", तो मी पुन्हा पुन्हा वाचीत राहिले. माझ्य मनात आले, सार्‍या आयुष्यभर तुकोबा अनेक आपत्तींनी होरपळून निघाले तरीही आयुष्याच्या संध्याकाळी त्या कशाचीही बोच मनात न ठेवता ते मोठ्या प्रसन्नतेने म्हणताहेत, "खूप खूप आनंदात घालवू या हे शेवटचे दिवस !" तुकोबांची ही जीवनदृष्टी मला फार दुर्मिळ म्हणून फार मोलाची व फार अर्थपूर्ण वाटली. तिने माझ्या मनातल्या दोन आठवणींना उजाळा दिला.

एक आठवण आहे ती भाऊसाहेब खांडेकरांची! भाऊंचा जन्म असाच नानाविध व्याधींना तोंड देण्यात गेला. वार्धक्यात तर त्यांना आपले दोन्ही डोळे गमवावे लागले. तरीही अतिशय शांतपणाने ते मला सांगत होते, "मालूताई, अहो, माझे चर्मचक्षु गेले तरी अंतःचक्षु छान आहेत. त्यांनी मला रविवर्म्याच्या चित्रापासून कुसुमाग्रजांच्या कवितेपर्यंत साऽरे पाहता वाचता येते. ही एक गंमतच आहे." दुसरी आठवण माझ्या वडिलांचीच आहे. ८५व्या वर्षी त्यांचे दात काढून टाकावे लागले. त्यांच्या आवडीचे अनेक पदार्थ मग त्यांना खाताच येईनात. त्याबद्दल कसलीच कुरकुर न करता ते म्हणायचे, "दात नसले की किती मजा येते खाताना ते कुठं माहिती आहे तुम्हा मुलांना? "

आपल्या वाट्याला कितीही दुःखे येवोत त्या दुःखातूनही ही माणसे सुखच शोधतात. हे माझ्या लक्षात आल्यावर त्यांच्या मनाच्या उमदेपणाचे, आनंदी वृत्तीचे मला फार अप्रूप वाटले. दुःखे हा मानवी जीवनाचा एक अटळ भाग आहे, त्याच्यावर मात करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. माणूस हा मूलतः वाईट नसतो. अनेकदा त्याची परिस्थिती त्याला तसे बनवते हे लक्षात घेऊन आपल्याला कटु अनुभव देणार्‍यांकडे आपण क्षमाशीलतेने पाहण्यातच आपले माणूसपण आहे. इतरांप्रमाणे आपल्यातही दोष असतातच की! मग इतरांना कशाला बोल लावायचा? असा कितीतरी उद्‌बोधक आशय त्या तिघांच्या उदाहरणावरून मला समजला. तुकोबा आणि त्यांच्याच वाटेवरून चालणारी मंडळी कोणत्यातरी उदात्त ध्येयाचा ध्यास घेऊन जगत असतात. त्या ध्येयसिद्धीचा सुवर्णक्षण आला की त्यांना स्वाभाविकच जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटते. इहलोकातल्या विलोभनीय गोष्टी इथेच ठेवून आपल्याला एक दिवस अज्ञाताच्या रस्त्याने कायमचे जायचे आहे हे तर त्यांना प्रारंभापासूनच माहिती असते. त्यामुळे जीवनकार्याच्या सफलक्षणी त्यांचे मन तृप्तीने संतुष्ट असते. म्हणूनच उर्वरित जीवन खेळीमेळीने घालवीत ते राहतात. आपल्या आंतरिक समाधानाचे लाडू दोन्ही हातांनी सगळ्यांना वाटण्यत त्यांना परमानंद होतो.

या सुंदर विचारांच्या प्रकशात मग माझी वाटचाल सुरू झाली. ज्यांनी ज्यांनी माझे जीवन आनंदमय, उन्नत आणी संपन्न व्हावे म्हणून प्रयत्न केले त्या सर्वांबद्दलच्या कृतज्ञतेने माझे मन भरून आले. आपण वयाच्या सत्तरीची शीव आता ओलांडली आहे. पुढे प्रवास थोड उरला आहे, त्यासाठी वेळही मर्यादितच आहे हे जाणून भूतकाळातल्या सुखद अनुभवांच्या पुनःप्रत्ययासाठी मी उत्सुक बनले.

मला वाटले पळभर आपले वय, व्यवसाय सारे सारे विसरून जावे. बालपणीच्या मैत्रिणींच्या गळ्यात गळा घालून हिंडावे, फिरावे, मनसोक्त खेळावे, प्रवास करावा सृष्टीची विविध ऋतूतील मनोहारी रूपे डोळ्यात साठवून घ्यावी, दुखणी-औषधे-डॉक्टरांचे जाचक नियम सगळे विसरून जावे. अटकमटक काय हवे ते खाऊन मजामजा करावी. मैत्रिणींची थट्टामस्करी करून त्यांना खूप हसवावे. मनमोकळ्या हास्याने प्रफुल्लित झालेली त्यांची मुखकमले पहावीत. दुसर्‍याला सुखी झालेले पाहण्यात केवढा अनिर्वचनीय आनंद असतो नाही का? तो लुटून घ्यावा. ही आनंदाची भेट पुन्हा कधी वाट्याला येते कोण जाणे? उरलेले चारी दिवस यांच्या भेटीच्या सुगंधाने दरवळून जाऊ देत. असा विचार करीत करीत मी माझ्या अभ्यासिकेत केव्हा पोहोचते तेच लक्षात येत नाही. तिथे ज्ञानदेव-नामदेवांपासून विनोबा-बोरकरांपर्यंत आणि शेक्सपिअर-हार्डीपासून डिकन्स-टॉलस्टॉयपर्यंत अनेकांचे पावन दर्शन त्यांच्या साहित्यातून मला होते. मी त्यांच्यापुढे नतमस्तक होते करण यांनीच सार्‍या संकटात मला धीर दिला आहे, मार्ग दाखवला आहे. आयुष्यभर पुरेल एवढी सुंदर विचारांची शिदोरी मला दिली आहे. म्हणून उरलेल्या चार दिवसात जास्तीत जास्त काळ त्यांच्या सहवसात घालवावा असे मला वाटते. माझ्यासारख्या साहित्यप्रेमी सुहृदांनाही या आनंदयात्रेत मी लगबग करून सामील करून घेते. या साहित्यानेच मला शिकविले आहे की, जीवनात सर्वत्र आनंद भरून राहिला आहे. ज्याला तो शोधता येतो, स्वतः निर्माण करायला येतो, त्याला सारे जीवनच "आनंदाच्या डोही आनंद तरंग" असे वाटते.

]असा आनंद माझ्या विद्यार्थ्यांची पत्रेही मला देतात. आमच्या घरातले सुंदर छायाचित्रांचे भांडार म्हणजे तर अलीबाबाची सोन्यामोत्याने भरलेली गुहाच वाटते. सुखदुःखाच्या अनेक स्मृतींना त्यामुळे उजळा मिळतो नि मन टवटवीत होते. या सगळ्या आनंदोत्सवात माझ्या प्रिय कलावंतांची आठवण मी कशी विसरेन? संगीत मला फार प्रिय आहे म्हणून भीमसेनजी, आशाबाई, ज्योत्स्नाबाई अशा माझ्या आवडत्या कलावंतांच्या सुमधुर संगीतात मी चिंब भिजत राहते. पृथ्वीवरचा स्वर्ग त्यांनी मला दाखवला याबद्दल मला फार कृतज्ञ वाटते. सातवळेकर-सिरूरांची चित्रे असोत की रविशंकरंची सतार असो त्यंच्या कलाकृतींनी जीवन श्रीमंत झाल्यासारखे वाटते. जीवनाच्या सायंप्रकाशात मनात सतत येते, वरचेवर येते हा आनंद आत्ताच खूप उपभोगून घेऊ या! या कलावंताप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी थोर स्त्रीपुरूष मला वंद्य वाटतात. त्यांचे स्मरण मला समाजऋणाची सतत आठवण करून देत असते. त्या हुतात्म्यांनी मनात फुलवलेला देशभक्तीचा अंगार या अखेरच्या चार दिवसातही मन निर्भय करीत असतो.

सर्व क्षेत्रात विधायक काम करणारी तरूण मुलेमुली तर आपल्या जीवनाची बॅटरीच पुन्हा चार्ज करून देतात. त्यांच्या कामांना सढळ हाताने साह्य करण्यात गाढ समाधान असते. आता या जीवनाच्या सूर्यास्तकाळी कुणाशी नको कसला हेवादावा की नको रागरुसवा! हवे सारे लोभ-प्रेम असे मन म्हणत राहते. जीवनाच्या अखेरच्या पर्वात आनंदाची देवाणघेवाण जशी चालू असते तशीच मनाच्या गाभार्‍यात एक बोचही असते. ती असते आपली इच्छा असूनही हातून पार न पाडलेल्या संकल्पांची! विठ्ठलाच्या दर्शनाला वारकर्‍यांबरोबर पायी जायचा संकल्प राहूनच गेला. बाबा आमटे याच्या आनंदवनात श्रमदान करायचे राहूनच गेले. शैक्षणिक जगातले प्रदूषण थांबवायला आपण कमी पडलो आणि असेच कितीतरी! एकूणच मानवामानवातला माणूसकीचा गहिवर आटत चालल्याचे दुःखही सोसवत नाही!
याच जीवनसंध्येत मृत्युदूताची चाहूल मन भयकंपित करीत राहते. पण तो कधी ना कधी येणारच! त्याला कसे चुकवणार? पण मला मनपासून वाटते तो जेव्हा प्रत्यक्षात भेटेल तेव्हा त्याला सखा मानण्याचे धैर्य अंगी यावे. त्याला म्हणावे, "मित्रा आलेच हं मी! तुझी भेट ही या लोभसवाण्या इहलोकातला शेवटचा क्षण असला तरी, अनंताच्या प्रवासाचा तोच शुभक्षणही असेल ना? तोही साजरा करू या खेळीमेळीने!"      

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color