मखमली हिरवळ पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

मखमली हिरवळ

दारावरची घंटी किणकिणली म्हणून मी लगबगीने उठले. दार उघडून पाहते तर तिथे मध्यम उंचीचे, गव्हाळ वर्णाचे एक गृहस्थ उभे ! मला पाहताच अतिशय प्रसन्नपणे हसले आणि मान किंचित लववून त्यांनी नमस्कार केला. ‘या ना आत’ मी अदबीने म्हटले. आत येता येताच ते सांगू लागले, "आत्ताच ‘संचार’चा ताजा अंक वाचला. इथल्या ‘सेवासदन’ मध्ये कसलासा समारंभ आहे आणि त्याच्या अध्यक्ष तुम्ही आहात हे तेव्हाच मला कळलं. म्हटलं, काही झालं तरी तुम्हाला आज गाठायचंच आणि आमच्या घरीही घेऊन जायचं असं ठरवून मी आलो." त्यांच्या अगत्याचा सच्चेपणा मला त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होता. प्रत्युत्तरादाखल मी नुसती हसले. माझ्यासमोर एका बैठया चिमुकल्या वेताच्या खुर्चीत दोन्ही गुडघे जमिनीवर उभे करुन त्यावर हाताचे टेकण देऊन, ते बसले. हातात असलेली बाकदार कमानीची काठी एखाद्या फुलांच्या हारासारखी त्यांनी आपल्या मानेभोवती अडकवली. कसल्या तरी आजाराने त्यांच्या कमरेत बरेच अधुपण आले असावे असे त्यांच्या हालचालीवरुन मला वाटले. काहीसे जाड्या विणीचे, ओचा खोचलेले धोतर आणि एक धुवट सदरा एवढाच त्यांचा पोशाख होता. पायातल्या चपलांना बर्‍याच वर्षात विश्रांती मिळाली नसावी कारण त्या झिजून अगदी रडकुंडीला आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांवरील चाळीशीचे एक भिंग, त्याला किंचितसा तडा गेला होता. लहान मुलाने काढलेल्या सूर्याच्या चित्रात सूर्यबिंब अगदी लहान व त्याची किरणे मात्र लांबच लांब असतात ना, तसेच ते फुटलेले भिंग दिसत होते. बोलण्याचा ढंग खास आमच्या सोलापूरचा होता, अघळपघळ आणि मनमोकळा! ते बोलत असतांना माझे कान त्या बोलण्याकडे आणि मन ‘कोणबाई गृहस्थ हे?’ या प्रश्नचिन्हांत गुंतलेले, असे द्विधा झाले होते. बोलण्याच्या ओघात, "आणि बर का मालतीबाई," हे त्यांचे पालुपद वरचेवर येई त्यामुळे तर मी चांगलीच गोंधळून गेले. मनातला हा गोंधळ लपविण्यासाठी, त्यांना चहापाणी देण्याचे निमित्त साधून मी स्वयंपाकघरात पळ काढला. मला भेटायला आलेला एक बालमित्र तिथेच माझ्या काकीशी बोलत बसला होता. माझी फजिती त्यांच्या नजरेतून सुटली नाही. आपले हसे आवरीत तो हळूच पुटपुटला, "अगं, आमच्या आण्णाच्या आणि तुझ्या वर्गातला ‘नानू दीक्षित’ नाही का हा! मघापासून वेंधळ्यासारखी बघत काय बसली आहेस त्याच्याकडे?"

त्याने पुरविलेल्या माहितीने मला अगदी हायसे झाले. शाळेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या सुमारे तीस एक वर्षात माझी अन नानु दीक्षितची पुन्हा भेटच झाली नव्हती तर मी त्याला एकदम ओळखणार तरी कशी? जुन्या वळणाच्या घरात वाढलेला, बाळबोध वृत्तीचा, लाजाळू, शाळकरी ‘नानू’ क्षणार्धात माझ्या नजरेपुढे उभा राहिला. त्या पार्श्वभूमीवर आताचा ‘नानू’ किती वेगळा दिसत होता. उतरल्या वयाच्या छाया त्याच्या शरीरावर चांगल्याच पसरु लागल्या होत्या. पण त्या कृष्णछायांची सावली त्याच्या मनावर मात्र मुळीच पडली नव्हती. चहाचे घुटके घेत तो मोठया मजेने, चवीने, एकीकडे घेत होता अन दुसरीकडे त्याच्या गप्पा चालूच होत्या. आपण आपल्या पूर्वीच्या शाळेतच आता शिक्षकाचा व्यवसाय कसा करीत आहोत, पहिले ‘कुटुंब’ निर्वतल्याने आपण दुसरे लग्न कसे केले आहे, त्या ‘मंडळीं’ना कन्याचेच वरदान अधिक कसे आहे, कर्जाचा डोंगर आता बराच उतरला असला तरी काही दिवसांपूर्वी एका सावकाराने त्याच्या घरातच आपल्याला कोंडून ठेवण्याचा घाट कसा घातला आणि दयाळू सावकारीणबाईमुळे तो कसा फसला या व अशाच अनेक गोष्टी अगदी रसभरीतपणे आणि घरगुती जिव्हाळ्याने त्याने मला सांगितल्या आणि मधून मधून "बाई, तुम्ही आमच्या ‘अन्नदात्या’" म्हणून मला तीनतीनदा भक्तिभावाने नमस्कारही केला. (या ‘पदवी’चे कारण त्याची एक कन्या आमच्या कारखान्यात काम करते हे होय! तिच्या नेमणूकीस माझा परिचय कितीसा कारणीभूत झाला ते एक भगवंतच जाणे!) तासाभराने शाळेला जाण्याची वेळ होत आल्याने त्याने माझा निरोप घेतला पण जाताना मला पुनःपुन्हा बजावले, "उद्या चहाला घेऊन जाणार हं आमच्या घरी".

आणि दुसरे दिवशी सकाळी ठीक नवाच्या ठोक्याला स्वारी खरेच हजर झाली की! मला आपल्या घरी नेण्यासाठी त्याने टांगाही आणला होता. त्याचे रोडके मरतुकडे घोडे अन कुरकुर आवाज करणारे रुप पाहून मी जरा घाबरलेच पण हातपाय वगैरे काही जायबंदी न होता आम्ही सुखरुपपणे यथाकाळ त्याच्या घरी पोहोचलो. माझ्या आगमनाची वार्ता नानूच्या मुलाबाळांकरवी शेजारच्या बिर्‍हाडातील स्त्रीवर्गाला ह्या आधीच लागली असावी. कारण मला पाहायला बर्‍याचजणी या ना त्या निमित्ताने नानूच्या बिर्‍हाडी डोकावल्या.

नानूचे मातीचे घर इनमीन अडीच खोल्यांचे होते. शंकराच्या पिंडीवर होतो तसा, माझ्या डोक्यावर आणि मी बसले होते त्या खुर्चीवर अधूनमधून पावसाच्या पाण्याचा अभिषेक होत होता. नानू स्वतः एका लोखंडी काडीच्या डुगडुगत्या खुर्चीवर बसला होता. तिच्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, "बाई, या दोन खुर्च्या एवढेच आमचे फर्निचर हं, उरलेल्या दोन त्या शोभिवंत खुर्च्या आहेत ना, ती शेजार्‍यांची प्रॉपर्टी आहे. मुलांनी तुम्ही येणार म्हणून मुद्दाम आणलेली!" आणि स्वतःच्याच बोलण्यावर तो दिलखुलासपणे हसला. आपल्या बिकट आर्थिक परिस्थितीचा दाह, अशा विनोदी बोलण्याचे गुलाबपाणी त्यावर शिंपडून, तो सहन करु पाहत होता. ते पाहून माझा जीव गलबलला. पण नानूचे तिकडे लक्षही नसावे. कारण जवळच बसलेल्या एका सुरेखशा तरुण मुलाकडे वळून तो परत म्हणाला, "हे आमचे जामात. साडेतीन हजारात गाठले आहेत. कसे काय वाटतात? आणि ही आमची ‘मंडळी’! त्यावर नऊवारी साडी नेसलेल्या वेणीचे चक्कर घातलेल्या, नानूच्या शालीन ‘मंडळीं’चा मला अगदी विनम्र नमस्कार. खाली वाकून नि ओचे-पदर सावरीत! (तो घेताना माझा जीव संकोचाने अर्धमेला झालेला!) मग इतर परिवाराचाही अगदी याच पद्धतीने परिचय झाला. नानीबाईंनी दिलेल्या चहा-बिस्किटांचा समाचार घेताघेता मी व नानू शाळेतील आंबटगोड आठवणींची उजळणी करीत होतो. त्याची मुलेबाळे ती कौतुकाने ऐकत होती. तर कधी आपले हसू गालात लपवीत होती. नानू म्हणजे आमच्यावेळचा इंग्रजीचा स्कॉलर! गप्पांच्या वेगात तो स्कॉलर जागा झाला. "A hard nut to crack to read in between the liens at the nick of the moment" यासारखे त्यावेळी आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांनी आमच्याकडून घोटून घेतलेले, वाक्प्रचार त्याने या बोलण्यातही सफाईदारपणे वापरलेले पाहून मला अगदी हसू लोटले. नानूला आम्ही मैत्रिणी त्यावेळी ‘शास्त्रीबुवा’ म्हणत असू. ही त्याची ‘पदवी’ मी त्याच्या पत्नीला सांगताच ती खूपच लाजली. अशा गमतीजंमतीत तासदीड तास केव्हाच निघून गेला. त्यानंतर, तेवढ्याच आपुलकीने नानूने आमच्या शाळेत मला नेले, शाळा मला हिंडवून दाखवली. मुख्याध्यापकांशी घवघवीत शब्दांत माझा परिचय करुन दिला. या सार्‍या यातायातीत आपल्या कंबरेचे दुखणे व संधिवाताची व्यथा तो पार विसरुन गेला होता की काय कोण जाणे! त्याच्या चिमुकल्या घरात आणि आमच्या शाळेच्या प्रशस्त भव्य आवारात नानूबरोबर वावरताना त्याच्या निर्व्याज सरलवृत्तीने, भाबड्या पण प्रेमळ पाहुणचाराने माझे मन भरुन आले होते. भारावून गेले होते. बिच्यार्‍याने पाचपंचवीस हजारांची माया अनेक आप्तस्वकियांवर खर्च केली आणि आता वयाच्या पन्नाशीनंतरचा काळ तो अशा विषण्णावस्थेत कंठीत होता. अगदी समाधानाने आणि खेळकरवृत्तीने कंठीत होता! ना कोणाविरुध्द त्याची तक्रार ना कशाबद्दल धुसफुस! "आमचे हे घरचे गोकुळ आणि माझे विद्यार्थी ही माझी लाखाची धनदौलत आहे, बाई त्यांचे प्रेम असल्यावर मला या पृथ्वीवर काय कमी आहे?" हे त्याचे उदगार मला परतपरत आठवत होते. आर्थिक दुरावस्थेने आपादमस्तक पोळूनही आणि व्यवहारी जगाचे कटू अनुभव घेऊनही त्याच्या मनाची कोवळी पालवी जळली नव्हती. मला त्याचाच खरोखर अचंबा वाटला. वास्तविक नानू म्हणजे माझ्या जिवलग मित्राचा मित्र! म्हणजे माझा चुलत मित्रच म्हणायला हवा. इंग्रजी पाचवीपासून सातवीअखेर केवळ तीनच वर्षे आम्ही एकत्र शिकलो. त्यातही एकमेकांशी बोललो किती वेळा? फारतर पाचसात वेळा, पण त्या वेळचा वर्गबंधूचा निरागस, विशुध्द लोभ त्याने इतक्या वर्षानंतरही तेवढ्याच मायेने जपला होता, जोपासला होता. लहान मुलाने मोराचे पीस आपल्या पुस्तकाच्या पानात जपावे, जोपासावे तसा. मला या लोभाचा ताजेपणा, रसरशीतपणा, पावसाळ्यातल्या सतेज हिरव्यागार मखमली हिरवळीसारखा भासला. विध्यार्थीदशेतून बाहेर पडल्यावर पुढे व्यवसायात, नोकरीचाकरीत, प्रपंचात आपले काही स्नेहबंध जडतात, भावबंध जुळतात, पण ते म्हणजे घरापुढील अंगणात मुद्दाम पाणी पाजून तयार केलेल्या लॉनसारखे बहुधा असतात. लॉन ही डोळ्यांना सुखावते नाही असे नाही. पण मनाला अन भावनांना गारवा देते प्रेमाची ऊब देते ती फक्त पावसाळ्यातली मखमली हिरवळच!

नानूचा हा स्नेह किती विलोभनीय! किती निरपेक्ष सढळ आणि सहज! अंतःस्फूर्त अशा एखाद्या मधूर भावगीताच्या ओवीसारखा, उन्हाळ्यातल्या सुगंधी पावसासारखा! हिवाळ्यातल्या कोवळ्या रेशमी उन्हासारखा! सदैव हवाहवासा वाटणारा. माणसाला आयुष्यात पैसा, वैभव ही आणि अशीच अनेक भौतिक आणि लौकिक सुखे पुष्कळच उदंड मिळतात पण माणूस केवळ त्यांनीच खरा सुखी होतो का? मला नाही वाटत होतो असे. शाश्वत सुखाचे गुप्तधन नानूसारख्या निर्मळ सुहृदाच्या अंतरंगात त्याला लाभते. माणसाला पुष्कळदा अनपेक्षित दुःखांच्या आवर्तातूनही जाण्याचा प्रसंग येतो. अत्युत्कट प्रीतीने आणि अतीव विश्वासाने ज्याच्या खांद्यावर आपण मान ठेवलेली असते तोच कधीकधी ध्यानीमनी नसताना तिचा चक्काचूर करतो, आपल्या सार्‍या जीवनाची राखरांगोळी झाली तरी त्यातली रांगोळीच तेवढी अलगदपणे वेचून ज्याच्या पानाभोवती आपण जीव ओतून काढलेली असते तोच नेमका ती पायाने बेदिक्कतपणे फरफटून निघून जातो. असल्या असह्य दुःखातूनही माणूस फ़िनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभा राहतो. या प्रसंगानाही मंदपणे अन संथपणे का होईना त्याची जीवनज्योत तेवत राहते. ती कशाच्या बळावर? नानूसारख्या सात्विक अन सच्च्या सुहृदाच्या भावस्निग्धतेवरच ना?

नानूचा निरोप घेताना क्षणभर माझा शब्द गळ्यातच दाटला. दहाच्या आकड्यांची एक नोट त्याच्या हातावर ठेवीत मी म्हटले, "घरच्या भाचरांना ही त्यांच्या आत्याबाईची भेट. ती त्यांना द्यायला विसरु नका हं"

ती घेताना नानूचे ओठ हसत होते अन डोळे.....?

 
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color