स्वागतकक्ष arrow सय arrow गुणी गं माझा भाऊराया!
गुणी गं माझा भाऊराया! पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

गुणी गं माझा भाऊराया!

स्वरभास्कर ’भीमसेन’जींच्या गाण्याने आपल्याला होणारा आनंद शब्दांत सांगता येईल का? चांदण्यारात्री, निशिगंधाच्या सुवासाने मनावर केलेली जादू सांगायला शब्द सापडतील का? तशीच स्थिती आपल्या जवळच्या आणि प्रिय माणसाबद्दल लिहिताना आपली होते. त्यातून ती व्यक्ती आपल्या दुःखामध्ये बरसणारा पाऊस झालेली असली, निराशेच्या अंधारात प्रकाश देणारा दीप बनलेली असली, आपल्या माथ्यावरचा तिचा आशीर्वाद हीच आपली सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे असे आपल्याला वाटत असले म्हणजे तर तिच्याबद्दल लिहिणे अधिकच अवघड बनते.

माझा एकुलता एक भाऊ ‘मुकुंदा’ याचेच हे सगळे वर्णन आहे. त्यांच्या माझ्या वयात अंतर आहे फक्त अडीच वर्षांचे! पण लहानपणापासूनच त्याच्या वयाच्या मुलांच्या मानाने तो कितीतरी जास्त शांत, समंजस आणि प्रगल्भही आहे. या वयात एकमेकांशी भांडणे, रुसणे हा बहीण-भावंडाचा जन्मसिध्द हक्कच असतो. पण हा कधीसुध्दा माझ्याशी भांडला नाही किंवा मला चापटपोळी, धम्मकलाडू यांचा ‘प्रसाद’ याने कधी दिला नाही. ते डिपार्टमेंट आमच्या आईकडे, तिला आम्ही ‘नन्नी’ म्हणत असू. ती रुपाने देखणी, उत्तम सुगरण, सुरेख गाणारी, पट्टीची खेळाडू, फर्डी वक्ती आणि अशीच कितीतरी होती! पण तिचा स्वभाव म्हणजे कडकडणारी वीजच! तिचा गडगडाट एकदा सुरु झाला म्हणजे स्वयंपाक घरातून किंवा ती जिथे असेल तिथून पळी, झारा, लाटणे, फुंकणी असे कोणते अस्त्र माझ्या दिशेने ती फेकील याचा नेम नसे. मुकुंदा हाडाचा गरीब, सालस! त्यामुळे माझ्या तुलनेने नन्नीच्या अस्त्रांच्या मार्‍यात तो कमी वेळा सापडायचा. ‘शंकरभाऊ’ फार मायाळू आणि शांतिब्रह्म! ते आम्हा दोघांचा जिवलग सवंगडीही होते. पण ते घरात नसले म्हणजे ’मुकुंदा’वरच माझे रक्षण करण्याची वेळ यायची. म्हणूनच अगदी बालवयापासून त्याच्यावरच्या माझ्या गाढ प्रेमात कृतज्ञतेचीही एक सुगंधी केशरकाडी मिसळलेली आहे.

या उत्कट भावबंधामुळेच आपण मुकुंदासारखेच दिसावे, राहावे असे मला वाटे. म्हणून मी त्याच्यासारखा सदरा-विजार, कोट-बूट असा पोषाख करु लागले. केसही त्याच्यासारखेच कापून घेतले. यामुळे एकदा मोठी गंमतच झाली. किर्लोस्करवाडीच्या आमच्या गणेशोत्सवासाठी आमचे औंधचे राजेसाहेब, श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी एका वर्षी आले होते. मुकुंदाने आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला, तेव्हा आमच्याकडे बघत त्यांनी शंकरभाऊंना विचारले, "शंकरराव, तुम्हाला दोन्ही मुलगेच आहेत वाटते?" त्यांच्या तोंडचे हे शब्द ऐकून मला कमालीचा आनंद झाला. ‘भावा गं बहिणींचे। गोड किती असे नातें। कळे एका हृदयातें। ज्याच्या त्याच्या।’ म्हणजे काय याचा अर्थ तेव्हा मला कळला. ती आठवण गुलाबपाण्यासारखी माझ्या मनात आजही घमघमते आहे.

आम्ही भावंडे दोघंच! पण इतर कुटुंबातल्या भावंडांच्या तुलनेने आमचे एकत्र राहणे कमीच झाले! वाडीची शाळा छोटी, वर्गही कमी म्हणून शंकरभाऊंनी मुकुंदाला सोलापूरला माझ्या डॉ. आजोबांकडे आणि मला हिंगण्याला ‘कर्व्यां’च्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले. त्यामुळे तेव्हा काय किंवा पुढे मोठे होऊन आम्ही आपापल्या व्यवसायात पडल्यावर काय, आमची भेट व्हायची ती मुख्यतः दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतच! तो भेटला की माझे घडाघडा बोलणे सुरु व्हायचे. माझ्या शाळेतल्या हजार आणि एक गोष्टी मी त्याला सांगायची. त्यात आठवडी परीक्षेत ‘गणोबा’नी दगा कसा दिला इथपासून वेळेवर औषध घेतले नाही म्हणून बोर्डिंगच्या बाईंनी कान कसा जोरात पिळला इथपर्यंत नाना हकिकती असायच्या. हा माझे बोलणे ऐकायचा खरा, पण याची भूमिका जास्ती करुन श्रोत्याचीच असायची! खरे म्हणायचे तर हा शहरातून, घरातून आलेला. म्हणजे याच्याकडे कितीतरी गंमतीजमतींचा खजिना असणार! पण याचा स्वभाव पडला मुलखाचा लाजाळू आणि भिडस्त! त्याला काय करणार? वास्तविक तो अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार, पुढे मॅट्रिकच्या वर्गात गेल्यावर शाळेतल्या बाराशे विद्यार्थ्यांमधला ‘सर्वोत्तम’ ‘अष्टपैलू’ विद्यार्थी म्हणून याने भला मोठा चांदीचा पेला मिळविला होता. तो छान चित्रे काढी. शंकरभाऊंनी त्याला एक कॅमेराही दिला होता. कॅमेरा हा त्याचा सर्वात जवळचा मित्र! अगदी आजसुध्दा! मुकुंदाचे अक्षर वळणदार, टपोरे आणि सुंदर होते. त्याची सर्वच बाबतीतली टापटीप वाखाणण्यासारखी होती. शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी होता. प्रथम हॉकी आणि नंतर टेनिस हे खेळही तो चांगले खेळायचा. हे सगळे तो बोलला तर कळणार ना इतरांना? आजही स्वतःबद्दल बोलणे त्याला संकोचाचेच वाटते! ‘किर्लोस्कर’ मासिकाचा संपादक झाल्यावर नुसते बोलणेच नव्हे तर पुष्कळ बोलणे हा त्याच्या व्यवसायाचाच एक भाग असल्याने त्याला बोलावेच लागले!

सुट्टी संपवून आपापल्या गावी परतायची वेळ जवळ आली की ‘मुकुंदा’ अधिकच गप्पगप्प व्हायचा! जेवण्या-खाण्यातले त्याचे लक्ष कमी व्हायचे! त्याला सोलापूरला म्हणजे घरीच जायचे असायचे! त्याच्या कष्टाळू, मनमिळावू स्वभावामुळे आणि हुशारीमुळे आजोबा, काकी सगळीजण त्याच्यावर खूप प्रेम करायची! पण ‘शंकरभाऊ’ना सोडून जायचे त्याच्या अतिशय जिवावर यायचे. तो गाडीत बसल्यावर शंकरभाऊ त्याला सांगायचे, "सांभाळून जा, पत्र पाठव पोचल्यावर" झालं! एवढे शब्द त्यांनी म्हणायचा अवकाश की मुकुंदाच्या डोळ्यांतील गंगाजमुना वाहायला लागल्याच म्हणून समजा! मग ‘शंकरभाऊ’ही गडबडून जायचे. तो बाहेरुन मुळीच दाखवत नसला तरी अंतर्यामी तो आजही खूप हळवा आणि भावनाप्रधान आहे. त्याचा मोठा नातू ‘रोहन’अमेरिकेला जायला निघाला तर मुकुंदाने घरातूनच त्याला ‘बाय बाय’ केले. त्याला फाटकापर्यंत येणे जमले नाही. तीच स्थिती माझ्या एंजिओप्लास्टीच्यावेळी त्याची झाली. आपली एकुलती एक आणि काहीशी अशक्त असलेली बहीण पुन्हा आपल्याला दिसेल की नाही या विचाराने तो फार अस्वस्थ होता. ती अस्वस्थता लपविण्यासाठी काही ना काही कारण सांगून त्याने शस्त्रक्रियेच्या आधी माझे खूप फोटो काढले.

इतरांच्या बाबतीत एवढा हळवा असणारा मुकुंदा स्वतःच्या दुखण्यांना केवढ्या धैर्याने आणि शांतपणे तोंड देतो हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा त्याच्यावर विश्वासही बसायचा नाही. कमालीच्या संयमाने, सोशिकपणे, मूकपणे मुळीच चिडचिड न करता तो त्यांना सामोरा जातो. नाही म्हटले तरी आतापर्यंत त्याच्या आठ-दहा तरी शस्त्रक्रिया झाल्या असतील. टॉन्सिल्सपासून नुकत्याच झालेल्या बायपासपर्यंत! एपेंडिसायटीसच्या शस्त्रक्रियेनंतर नाना गुंतागुंतीमुळे काळ तर मोठा कठीण आला अशी सर्वांची स्थिती झाली होती. त्यातून काही महिन्यांनी हा बरा झाला. तेव्हा ‘लाखातून वाचलेला एक’ अशी त्याची नोंद आणि प्रशंसा डॉक्टरांनी केली. याच्या नावावर दोन-चार फ्रॅक्चर्सही रुजू आहेत. इतका सोशिकपणा याने कुठून मिळवला याचा विचार जेव्हा मी करते तेव्हा त्याचे एक उत्तर मला मिळालेले असे. याची विचारसरणी अशी मी कुटुंबातला वडीलमाणूस आहे, म्हणून मी धीरानेच वागले पाहिजे. शेवटी कोणतेही दुखणे ज्याचे त्यालाच सोसावे लागते ना? मग इतरांपुढे त्याच्याबद्दल रडगाणे गाऊन त्यांना का तसदी द्यायची ? हे सगळे खरे आहे, योग्यही आहे पण आचारायला फार फार अवघड आहे आणि मग आम्ही नातलग मंडळी कशाला आहोत? शुश्रुषेसाठीच ना? असे इतरांच्या मनात येतेच! अशा विचारांमुळेच अगदी बायपासला जातानाही हा शांत होता. खूप पुस्तके, वह्या, कागद, पेन्सिलीबरोबर घेऊनच हा हॉस्पिटलकडे जाणार्‍या मोटारीत बसला. आहे ना कमाल? आपले कोणतेही दुःख याने कधी मोकळेपणी एखाद्याला सांगितले असेल असे मला खरोखरीच वाटत नाही. एकूणच आयुष्यात त्याने नेहमीच स्वतःपेक्षा आणि स्वतःच्याही आधी इतरांच्याच सुखांचा, दुःखांचा, सोयी-गैरसोयींचा, आवडी-निवडींचा विचार केला आहे असा माझा अनुभव आहे, अवलोकनही आहे.

मुकुंदा अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीधर झाला. टाईम, लाईफ या प्रसिध्द छायाचित्रप्रधान नियतकालिकाचे काम पाहण्यासाठी त्याच्या मनात परदेशी जायचे होते. पण नेमके तेव्हाच दुसरे महायुध्द चालू होते. त्यामुळे प्रवास करणे धोक्याचे होते. म्हणून बेत रहित करावा लागला. त्याच सुमारास शंकरभाऊंच्या मासिकाच्या कचेरीत सहायकाचे काम करणार्‍या त्यांच्या द्वितीय पत्नी एकाएकी निवर्तल्या. तेव्हा शंकरभाऊ मदतनीस हवाच होता. खरे सांगायचे तर त्याचवेळी मुकुंदाला किर्लोस्कर कारखान्यातल्या दुसर्‍या विभागात अधिक धनलाभाची आणि अधिक अधिकाराची जागा मिळण्याची संधी होती, पण ती नाकारून मासिके करीत असलेल्या प्रबोधनाच्या कामातच त्याने मन घातले. स्वतःच्या मनाचा प्रामाणिक कौल त्याने मानला या त्याच्या विवेकनिष्ठ वृत्तीचे आणि निर्लोभीपणाचे मला आजही फार कौतुक वाटते, अभिमान वाटतो.

जीवनात त्याने लोभ केला तो फ़क्त माणसांचा! बहुविध क्षेत्रातली अक्षरशः असंख्य माणसे यांनी जोडलेली आहेत. माणसांच्या मर्यादा, स्वार्थ, दंभ हे सारे तो जाणतो पण तरीही त्याची अशी दृढ श्रध्दा आहे की प्रत्येक माणसाजवळ काहीना काही चांगले गुण, कला, कर्तृत्व ही असतातच. त्याचा त्या माणसाच्या आणि समाजाच्याही विकासासाठी उपयोग होणे/करुन घेणे याची फार आवश्यकता आहे. लहान-थोर, स्त्रीपुरुष, श्रीमंत-गरीब, जात-पात अशा कोणत्याही भेदांना थारा न देता त्यांनी गुणीजनांचा संग्रह केला. माणूस म्हणून त्यातल्या प्रत्येकाची अस्मिता त्याने फार काळजीपूर्वक जपली. इतरांच्या कर्तबगारीला, कौशल्याला, जे जे विधायक, समाजसंपन्न आणि निरामय करणारे त्याला दिसले त्या या कामांना आणि ती करणार्‍यांना त्याने दिलखुलासपणे, आपुलकीने दाद दिली. जागतिक कीर्तीचे चित्रकार कै. ए. ए. आलमेलकर हे मुकुंदाचे शाळेपासूनचे जिवलग मित्र. ते शालेय शिक्षणातील अपयशाने खचले आहेत हे पाहून मुकुंदाने मृदु शब्दांनी धीर देऊन त्यांना चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबईला जाण्याचा आग्रह केला. सर्व प्रकारची मदत दिली. त्यांची मैत्री आलमेलकरांच्या मृत्यूपर्यंत अखंड टिकली. प्रसिध्द लेखक कै. धों. म. मोहिते म्हणाले, "मी पत्रकार, लेखक, कार्यकर्ता जे जे काही झालो ते मुकुंदरावामुळे!" यापेक्षा मोठे प्रशस्तिपत्र काय असणार आहे?

तरुण मुलांवर आणि युवाशक्तीवर मुकुंदाचा विशेष लोभ आहे. उद्याचे जगही मुले-मुलीच घडविणार आहेत याची त्याला कल्पना आहे. म्हणून त्यांची शिबिरे, चर्चासत्रे यांना तो हजर राहतो. त्यांचे विचार ऐकतो, चर्चामध्ये जरुर तेव्हा भागही घेतो, त्यांचे प्रश्न, शंका, अडचणी जिव्हाळ्याने समजून घेतो. चिंतन, वाचन, अभ्यासासाठी त्यांना नवनवे विषय सुचवितो, पुस्तके सांगतो. मासिकांच्या लेखकांना लिहायचा तशी सविस्तर पत्रेही गरज असेल तर लिहितो. त्यांच्यात मिळूनमिसळून राहतो. त्याच्या या साध्या, निगर्वी स्वभावाने त्या तरुणांना नवे बळ लाभते. ते वेळोवेळी त्याच्याशी विचारविनिमय करतात, सल्ला विचारतात, अभ्यासू संपादक म्हणून आज प्रसिध्द असलेले दशरथ पारेकर किंवा इंग्रजीचे गुणी अरविंद सप्रे ही व अशीच आणखीही कितीतरी तरुण मुले त्याच्या भेटीसाठी उत्सुक असतात.

‘किर्लोस्कर’कुटुंब हे पुरोगामी, सुधारक आणि बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहे. मुकुंदा त्याच घराण्यातला असल्याने त्याच्यावर हे सर्व संस्कार झालेले आहेत. स्वाभाविकच शेती, उद्योगधंदे, शिक्षण, राजकारण, विज्ञान अशा कोणत्याही क्षेत्रात नवे म्हणून जे चालते त्या प्रयोगाबद्दल जाणून घेण्याची त्याला अतिशय उत्सुकता, जिज्ञासा असते. त्यासाठी अगदी खेड्यातल्या खेड्यात जाण्याची, शेकडो मैलांचा प्रवास करण्याची, हालअपेष्टा सोसण्याची त्याची केव्हाही तयारी असते. त्या जिज्ञासेच्या पोटी नानाविध विषयावरची पुस्तके तो विकत घेऊन वाचतो, त्याची आवड असणार्‍यांना त्याची शिफारस मुद्दाम भेटून करतो, वाचनाप्रमाणेच त्याचे लेखनही सतत चालू असते. वृत्तपत्रांच्या डोंगरातच तो लपलेला असतो असे म्हणावे इतकी वृत्तपत्रे, मासिके परदेशातली मासिकेही तो घेतो. पुन्हा त्यांची कात्रणे काढून संबंधितांना पाठवतो त्यात वेळ, पैसा, श्रम सगळ्यांचा चुराडा होतो. तो आम्हा कुटुंबीयांचा रोष किंवा नाराजीही त्यासाठी पत्करतो. कर्मयोग्याच्या व्रतस्थवृत्तीने हे सारे चाललेले असते! वृत्तपत्रांच्या कात्रणाप्रमाणेच काही दुर्मिळ अशी छायाचित्रेही त्याने अनेकांना पाठविली आहेत. त्यातील बहुतेकांकडून साधी पोचसुध्दा त्याला मिळत नसे. या खटाटोपात आम्हा कुटुंबीयांशी अनेकदा दुरावा आल्याने आम्हाला चिडल्यासारखे झाले तरी त्याच्यावर रागावणे कसे जमणार.

नव्या जगाशी नाते राखण्यासाठी अनेकवार त्याने परदेशांची वारी केली. अमेरिकेलाही जाऊन आला. प्रवासांचा त्याला कंटाळा म्हणून येत नाही! प्रवासातही त्याची म्हणून एक स्वतंत्र दृष्टी असते. संयोजन, कल्पकता असते. एकदा परदेशाला गेला असता तो किर्लोस्कर मासिके कशी चालतात याची फिल्म करून घेऊन गेला. ती ज्या वर्कशॉपमध्ये दाखवली त्याच्या डायरेक्टरने फिल्मबद्दल आणि तिच्यावरील मुकुंदाच्या कॉमेंटरीबद्दल त्याचे फार अभिनंदन केले. कुटुंबियांसमवेत जवळपासच्या ट्रिपा तर खूपच होतात. त्या प्रवासात अवखळ मुकुंदा पाहायला मिळतो. गप्पा, गाणी, भेंड्या, थट्टामस्करी यांना ऊत येतो. अशा ट्रिप्समुळे कुटुंबातल्या स्त्रियांनाही विश्रांती मिळावी, बदल व्हावा अशी त्याची धडपड असते. कोकणातले एखादे रम्य, स्वच्छ समुद्राकाठचे खेडे किंवा विशेष परिचित नसलेले एखादे थंड हवेचे ठिकाण यांना तो प्राधान्य देतो. निसर्गाची विविध विलसिते पाहण्याची त्याची आणि त्याच्या कॅमेर्‍याचीही हौस फिटते. नातवंडा, पतवंडांत बागडायचा आनंद वेगळाच असतो. कित्येकदा दिवाळीसारखे सणही शहराबाहेर आम्ही साजरे करतो. त्याच त्याच चकल्या, लाडू खात, फटाक्यांचा धूर आणि कर्कश आवाज ऐकत बसण्यापेक्षा एखाद्या नदीकाठची संध्याकाळ मनोरम वाटते.

स्त्रिया, कुटुंबातली वृध्द माणसे आणि घरीदारी काम करणारे सेवक यांच्याबद्दल त्याच्या मनात एक वेगळीच सहृदयता असते. हजारो वर्षे समाजाने स्त्रियांना गुलामगिरीत ठेवले याचे त्याला वैषम्य वाटते. शिक्षणाने ज्ञानाची सर्व क्षेत्रे त्या आता पादाक्रांत करीत आहेत, त्यांना आत्मभान, आत्मसन्मान म्हणजे काय ते आता चांगले समजते आहे. या सर्वांचे समाजाने स्वागत केले पाहिजे अशी त्याची मनापासून अपेक्षा असते. स्त्रियांकडे पारंपारिक दृष्टीने न पाहता त्यांना स्वातंत्र्यासाठी शक्य ती संधी दिली पाहिजे असे तो म्हणतो. स्त्री-पुरुषातला कनिष्ठ, श्रेष्ठ भाव जाऊन ते परस्परांचे मित्र बनले पाहिजेत. स्त्री-पुरुषांची निर्मळ मैत्री समाजाचे बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारायला साह्यकारी ठरेल, असे त्याचे ठाम मत आहे. अनुभवही आहे. प्रसिध्द अभिनेत्री ‘लीला चिटणीस’ यांनी मुकुंदाला कळवले की, त्यांना एका विशिष्ट नाटकाची (माझी आठवण बरोबर असली तर स्वतः लीलाबाईनींच लिहिलेले ते नाटक होते) प्रत तातडीने हवी आहे. मुकुंदाने नाटकाचे पुस्तकच झेरॉक्स करुन त्यांना पाठवले. मुकुंदा विविध सामाजिक क्षेत्रात वावरतो, मासिकांमुळेही अनेक स्त्रियांचा परिचय झालेला असतो, त्या पुष्कळदा सल्लामसलतीसाठी, मार्गदर्शनासाठी किंवा कधीकधी मनमोकळ्या गप्पा करण्यासाठीही त्याच्या घरी येतात. त्याची पत्नी ‘सौ. शांता’ शैक्षणिक, साहित्यिक अशा अनेक कामात अग्रेसर आहे. मुकुंदाचे तिला त्या कामात सक्रिय सहकार्य असते. केवळ त्यातच नव्हे तर एरवी केवळ स्त्रियांनीच केली पाहिजेत असे आपण मानतो ती कामेदेखील उदाहरणार्थ चहा करणे, मीठ, चटणी वाढून घेणे तो संतोषाने आणि संकोच न वाटून घेता करतो.

आज समाजात वृद्धांची स्थिती पुष्कळच दयनीय झालेली दिसते. वृद्धांश्रमांची वाढती संख्या विचारी माणसाला व्यथित करते. मुकुंदाचे घरातल्या वृद्ध मंडळींकडे फार बारीक लक्ष असते. त्यांना काहीही कमी पडू नये याकडे तो जातीने लक्ष देतो. आमच्या पंच्याण्णव वर्षांच्या काका व काकीकडे तो आठपंधरा दिवसांनी स्मरणपूर्वक फेरी मारतो. गप्पाटप्पा करुन दोघेही ताजेतवाने होतात. मातृतुल्य अशा आमच्या सोलापूरच्या सरस्वती काकींना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये या इच्छेने त्यांच्या शाळेला सुट्टी झाली की तो प्रतिवर्षी दोन-अडीच महिन्यांसाठी त्यांना पुण्याला घेऊन येई. वृद्धांबद्दलची ही त्याची कृतज्ञता मनाला खूप काही शिकवून जाते. आमच्या घरचा कोकणचा गडी ‘विठू’ त्याने पन्नास वर्षे आमच्याकडे काम केले. तो वृद्ध झाल्यावर त्याला सेवानिवृत्त करुन मुकुंद-शांताने त्याला कोकणात धाडले. त्याला मूलबाळ नव्हते. म्हणून तो व त्याची पत्नी दिवंगत होईपर्यंत दरमहा तीन आकडी रक्कम प्रेमाने व स्वेच्छेने त्या उभयतांनी धाडली. मुकुंदा माझ्या सांगलीच्या घरी येतो तेव्हा आमच्या ‘शिवा’ नोकराबरोबर त्याच्या गप्पा खूप वेळ चालतात. असे थोर मनाचे मालक किती चाकरांना भेटत असतील ?

त्याच्या अशा सुसंस्कृत वागण्याने त्याच्या मुलीबाळींवरही नकळत संस्कार होतात आणि म्हणूनच इरावती, विद्या, मोहना या त्याच्या तीनही कन्यांना त्यांना कधीही न रागावणार्‍या गप्पाटप्पातून, प्रवासातून अप्रत्यक्ष उत्तम संस्कार करणार्‍या आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना जबाबदार्‍यांचे स्वातंत्र्य देणार्‍या दादांबद्दल आदर वाटतो.

मुकुंदाच्या संपादकीय कारकीर्दीबद्दल - ती एकूण अडोतीस वर्षांची आहे. आता थोडे सांगते, किर्लोस्कर मासिकांनी महाराष्ट्राच्या वाङमयीन, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात मन्वंतर घडवले ही गोष्ट खरीच आहे. मुकुंदाच्या हाती सूत्रे आल्यावर भरपूर पायपीट करुन प्रसंगी लोकल बसने प्रवास करुन त्यांनी नवनवे लेख मिळवले. त्यांना वेगवेगळे, ताजे, वर्तमानकालीन समस्यांवरचे विषय देऊन लिहिते बोलते केले. नव्या युगाची आव्हाने स्वीकारुन मासिकांचा आशय व दर्शन यात बदल केला. कितीतरी पुरवण्या, विशेषांक काढले, इंग्लंडमधील जगप्रसिध्द ‘अल्बर्ट हॉल’मध्ये ‘लता मंगेशकरां’चा कार्यक्रम झाला. त्यांना ‘प्लॅटिनमची रेकॉर्ड’ भेट दिली, अशी माहिती तिकडील लेखकांकडून मिळताच ‘मनोहर’ची बहारदार पुरवणी - भरपूर माहिती नवी मिळवून मुकुंदाने काढली व ती पुरवणी लताबाईंना देण्यासाठी तो सर्व संपादक मंडळाला बरोबर घेऊन गेला. काम करायचे ते एकजुटीने, परस्परांशी विचारविनिमय करुन! मी साहेब म्हणून अधिकार गाजवीन हे त्याच्या स्वभावातच नाही. जिवंत नागांना पकडून त्यांचे खेळ करणारे सांगली जिल्ह्यातले ‘बत्तीस शिराळे’ हे गाव आज जगाच्या नकाशावर आले ते मुकुंदाने सचित्र असा त्याच्यावरचा ‘धों.म. मोहित्यां’चा लेख प्रसिध्द केल्यावरच! ‘कोयनेचा भूकंप’ तिथे तर संपादकाची सर्व प्लॅटून पाऊसवार्‍यात मदतकार्य पाहायला गेली. भाकर्‍यांनी भरलेल्या एका तंबूत मुकुंदा अंग आखडून घेऊन आडवा झाला. या त्याच्या साध्या वागण्याचे सर्वांना फार नवल वाटले. विश्वविख्यात व्यंगचित्रकार ‘आर. के. लक्ष्मण’ यांचे पुण्यातले पहिले व्याख्यान मुकुंदाने घडवून आणले. शं.वा.कि. जन्मशताब्दीच्या निमित्ताने चित्रकारांच्या प्रदर्शनासारखे नवनवे उपक्रम केले. त्याच्या विचारप्रधान, तर्कशुद्ध संपादकीयांचे ‘पेरणी’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. तरुण वयात समाजसत्तावादाचा त्यांच्या मनावर बराच प्रभाव पडला. त्याचेही दर्शन काही लेखातून झाले, त्याचे प्रभावी वक्तृत्व हा त्याच्या जीवनाचा आणखी एक सुंदर पैलू आहे. त्याचे सर्व काम त्याने समाजाच्या ‍‍ऋणाचे स्मरण ठेवून केले. तळमळीने, प्रयत्नांची पराकाष्ठा करुन केले. आपल्या सहकार्‍यांना अडचणीत सर्व प्रकारची मदत करुन त्यांची मने प्रसन्न ठेवली. मासिकांच्या व प्रपंचाच्या सर्व जबाबदार्‍यात त्यांची बुद्धिमान, कर्तबगार, कल्पक, कलासंपन्न पत्नी सौ. शांता हिचे त्याला परोपरीचे साह्य झाले. त्याबद्दलची कृतज्ञता तो मोकळ्या मनाने व्यक्त करतो. जीवनात जी जी कर्तव्ये, जबाबदार्‍या, भूमिका त्याच्या वाट्याला आल्या त्या त्याने प्रांजळपणाने, सच्चेपणाने पार पाडल्या. संगीत, नाटक अशा ललित कलांचा आस्वाद घेऊन जीवन अधिक संपन्न केले. जगाचे भलेबुरे अनुभव येऊनही, प्रसंगी अन्याय सोसूनही त्याने आपले सौजन्य सोडले नाही, ही केवढी मोलाची गोष्ट नव्हे काय? इतरांची मते पटली नाहीत तरी ती सहिष्णुतेने तो ऐकतो म्हणून आज ऐंशी वर्षाच्या वयातही त्याच्या मित्रपरिवारात भरच पडते आहे. दररोज सकाळ, संध्याकाळ न चुकता तो दोन अडीच मैलांची रपेट करतो. त्यामुळे मला लोक पुष्कळदा विचारतात, "मालूताई, तुम्ही मोठ्या की मुकुंदराव?" आहे ना गंमत!

माझी पंचाहत्तरी झाल्यापासून मी लवकर थकते. मला प्रवास झेपत नाही. म्हणून मुकुंदा त्याची मोटार पाठवतो. महिन्या-दोन महिन्यांनी मला भेटून जातो. भाऊबीजेला फक्त एक रुपया घाल म्हटले तर एकावर चार शून्य घालूनही कधीकधी ती रक्कम तबकात टाकतो. अशी या भावाची वेडी माया आहे. पण मी त्याचीच भुकेली आहे. असा भाऊ मिळायला भाग्यच लागते.

शंकरभाऊंच्या दुसर्‍या विवाहाने व्याकुळ झालेल्या माझ्या मनाला त्याने धीर दिला. समजावले, "मी आहे ना तुझ्या पाठीशी जन्मभर." असे सांगून स्वतःला त्या घटनेने झालेले दुःख गिळले, आपला शब्द पाळला. माझ्या सर्व दोष-उणिवांसह मला सांभाळले. त्यांची सूचक शब्दांत प्रसंगी जाणीव करुन देऊन ते सुधारायला साह्य केले. त्याच्या सहवासात मी "बहिणभावाची। माया आंतर काळजाची। पिकले सिताफळ। त्याची गोडी साखरेची।" अनुभवली. नुकताच आजारातून उठलेला माझा चुलत भाऊ मुकुंदाने फार आग्रह केल्याने विश्रांतीसाठी त्याच्याकडे आला होता. तो परत जाताना मला, "मालूताई युवर ब्रदर ईज ए ज्युवेल!" अगदी खरं आहे ते.

माझ्या जीवनकथेची पाने आता संपत आली आहेत. देवाकडे आता मागणे एकच, त्याने मुकुंदाला सुखी ठेवावे, शतायुषी करावे आणि तो माझ्याजवळ असताना मला ते आमंत्रण यावे, ओठावर त्याचे नाव असावे, कारण ‘मुकुंद’ हे देवाचेच नाव आहे ना? आणि पुनर्जन्म असलाच तर मुकुंदाच मला भाऊ म्हणून मिळावा, बस्स्! इतकेच मागणे.

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color